অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिक चित्रकला

प्रस्तावना

आधुनिक (मॉडर्न) चित्रकलेची स्पष्ट जाणीव दृक्‌प्रत्ययवादानंतर झाली. उत्तर-दृक्‌प्रत्ययवादी चित्रकार सेझान, गोगँ, सरा यांच्या काळापासून आधुनिकतेचे बळ स्पष्टपणे वेगळे दिसू लागले. वस्तू जशी दिसते, तशी वर्णनात्मक पद्धतीने रंगविण्याची पूर्वींची वास्तववादी पद्धती मागे पडू लागली. प्रबोधन काळ, बरोक काळ आणि नंतरचा नव-अभिजाततावादाचा काळ यांतून वास्तववादी पद्धतीची वेगवेगळी रूपे होऊन गेली. या सर्वच कालखंडांत निवळ वास्तवतेहून अधिक समृद्ध असे कलागुण जॉत्तो, जोर्जोने, रेम्ब्रँट, टर्नर, एल ग्रेको या कलावंतांमध्ये होते. दृक्‌प्रत्ययवादापूर्वीच्या दोम्ये, ड्यूरर, दलाक्र्‌वा, कूर्बे या कलावंतांनी निवळ वास्तवतेपासून काही अधिक मिळविण्याचे प्रयत्‍न केले होतेच. दलाक्र्वा, कूर्बे यांच्या चित्रांतील रंग-आकारांची हाताळणी नाट्यमय व उत्कट होती. खोटी भावविवशता व अतिरंजित गोडवा त्यांनी कटाक्षाने टाळला. ड्यूरर व दोम्ये यांनी अभिव्यक्तीची उत्कटता साधण्यासाठी प्रसंगी आकृतीचे काही प्रमाणात विरूपणही उत्स्फूर्तपणे केले. निसर्गचित्रणात कॉन्स्टेबल व टर्नर यांनी वेगळ्या वाटा शोधल्या होत्या. बरोक काळात चित्रामध्ये लक्ष्यबिंदु निर्माण करण्याचे कार्य रेम्ब्रँटने आपल्या व्यक्तिचित्रणात केले. तसेच टर्नरने ते निसर्गचित्रणात केले. इतर आकारांना गौण ठरवून लक्ष्यबिंदूवरील आकार ठळक करण्याने एकूण चित्रचौकटीची गुणवत्ताच बदलून गेली.

स्वरूप

या सर्वांच्या कार्यामुळे कलाविषयक जाणिवांमध्ये हळूहळू पण निश्चित स्वरूपाचा बदल होत गेला. विज्ञानातील शोधांमुळे व त्यामुळे उदयास आलेल्या यंत्रयुगामुळे जीवनविषयक जाणिवाही बदलल्या. सामाजिक घडण बदलली. तत्त्वज्ञानात नवे प्रश्न निर्माण झाले. पौर्वात्य व पाश्चात्त्य देशांचे परस्परसंबंध वाढले. पौर्वात्य तसेच आफ्रिकी निग्रो कलांशी संबंध आल्यामुळे पाश्चात्त्य कलावंतांना स्वतःच्या अभिव्यक्तिपद्धतीचा नव्याने विचार करणे अगत्याचे वाटले. वस्तूची तीनही परिमाणे दाखविणाऱ्या पाश्चात्त्य चित्रकलेहून लांबी आणि रुंदी अशा दोनच परिमाणांतून शैलीदार व कसदार आकृती साधणारी पौर्वात्य पद्धती मूलतः वेगळी होती. निग्रो कलेतील सरलता, भाबडेपणा आणि राकट रगदारपणा हे गुण पाश्चात्त्यांना नव्याने परिचित झाले. याच दरम्यान छायाचित्रणाचा शोध लागून, दिसते तसे अचूक चित्रण करण्याची आणि चित्रणात वर्णनात्मक व ऐतिहासिक तपशील अबाधित ठेवण्याची यांत्रिक सोय उपलब्ध झाली. त्यामुळे चित्रकलेचे कार्य याहून मूलतःच भिन्न आहे, ही जाणीव प्रखरतेने झाली.

बदल

छायाचित्रणाप्रमाणे अचूक व हुबेहूब चित्रण करण्याऐवजी, निसर्गातील वस्तूवर होणारा प्रकाशाचा परिणाम आणि त्यामुळे जाणवणारा चैतन्याचा विशिष्ट क्षण व्यक्त करण्याचे प्रयत्‍न प्रथम सुरू झाले. त्यातून दृक्‌प्रत्ययवाद उत्क्रांत झाला. माने,  मॉने, दगा,  पीसारो या कलावंतांनी चित्रातील वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रकाशाचा जिवंत प्रत्यय देणे हेच ध्येय ठरविले. दिनक्रमाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मिळणारा प्रकाशाचा लोभस प्रत्यय त्यांच्या चित्रांत साठवलेला दिसतो. प्रकाशाच्या जाणिवेबरोबर रंगांच्या पृथक्करणाची सुरुवातही झाली आणि नवी रंगदृष्टी निर्माण झाली. त्यामुळे चित्रातील वस्तू विसविशीत झाली. तेव्हा पुन्हा नव्याने वस्तूवर भर देऊन चित्रण करणे आवश्यक होते. सेझानने वस्तू आणि रंग यांचा पुन्हा नव्याने मिलाफ केला. त्याने रंगाचे सामर्थ्य अबाधित राखले आणि चित्रण करताना नुसत्या अचूक आकृतीऐवजी वस्तूची घनता जतन केली. वस्तूच्या पृष्ठांचे कंगोरे ठसठशीत केले. गोगँने विशेषतः रंगाची सघन उत्कटता आणि निग्रो पद्धतीच्या आकारांचा ठाशीव रांगडेपणा शैलीदार पद्धतीने आपल्या चित्रांत आणला.  व्हान गॉख  याने आपल्या चित्रांतून दोम्ये, ड्यूरर यांच्याप्रमाणेच पण अत्यंत तरल व भावुक अभिव्यक्ती साधली. यानंतर चित्रकलेचे स्वरूप झपाट्याने बदलत गेले. अनेक विचारसंप्रदाय व अभिव्यक्तिपद्धती उदयास्त पावू लागल्या. जर्मनीत भावनाभिव्यक्तीलाच सर्वस्व मानणारा अभिव्यक्तिवाद उत्क्रांत झाला. निवळ रंगाचेच अभिव्यक्तिसामार्थ्य पणाला लावणारा रंगभारवाद  फ्रान्समध्ये उदयाला आला. सेझानने घनता साधताना वस्तूच्या पृष्ठांचे पृथक्करण सुरू केले. त्यातून पुढे  घनवाद  उत्क्रांत झाला. पिकासो, ब्राक या कलावंतांनी वस्तुपृष्ठांचे संपूर्ण विघटन करून अप्रतिरूप चित्रापर्यंतची मजल सोपी करून दिली. घनवादाच्या विकासातील एका टप्प्यावर आणखी एक प्रवृत्ती दिसली. यंत्रयुगातील गती हेच सर्वस्व मानून, गतिशील वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्थांमधील रूपांचे एका क्षणात चित्रचौकटीत दर्शन घडविण्याच्या प्रयत्‍नातून नवकालवाद  निर्माण झाला. यंत्र हीच खरी वास्तवता मानून, यंत्राचे आकारच चित्रात रचण्याची लकब लेझेसारख्यांनी स्वीकारली.

एवढ्यातच पहिले महायुद्ध भडकून त्यात झालेल्या भयानक मानवी संहारामुळे नवी पिढी बिथरून गेली. ज्या मानवी संस्कृतीत हे युद्ध उद्भवले, ती संस्कृतीच उधळून लावण्याची बंडखोरी सुरू झाली. तत्त्वज्ञान, समाजकारण, कलाविषयक जाणिवा यांमध्ये आजवर वंद्य व रूढ मानल्या गेलेल्या सर्व श्रद्धा व कल्पना ठोकरून लावण्याची लाट  दादावादाने उठविली. ‘वाट्टेल ते, आपोआप सुचेल ते करू!’ ही त्यांची घोषणा होती. चित्रफलकावर रंगाबरोबर वाटेल त्या वस्तू चिकटविताना रूढ कलाकल्पनांना त्यांनी तिलांजली दिली. यातूनच आणखी एक नवी विचारधारा उदयाला आली. संस्कृती, कला, बंडखोरी किंवा नवेपणा या सर्वांचे मूळ मानवी मनात असते. त्या मनाचाच मुख्यतः शोध घ्यावा, म्हणून  अतिवास्तववादाने पराकाष्ठा केली. अशा मनाचा मुक्तपणे शोध घ्यावयाचा, तर नेहमीच्या व्यवहारातील कार्यकारणभाव बाजूला ठेवणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी आपाततः सुचणारे आकार व कल्पना हेच कलासर्वस्व मानले. त्यांची हाताळणी प्रसंगी वास्तववादीही होती. स्वप्‍नसृष्टी ही कार्यकारणभावाने बांधलेली नसते, ती पूर्णपणे मुक्त असते हे गृहीत धरून स्वतःच्या चित्रणात वास्तव, दृश्यविश्व आणि स्वप्‍नसृष्टी यांना त्यांनी एकजीव करून टाकले.  पॉल क्‍ले  याने वस्तूऐवजी  बहुधा नुसत्याच रंग-आकारांच्याच सुसंवादी रचनेतून चित्र उभारले आणि अप्रतिरूप चित्राला निश्चितता, पूर्णता आणि गुणवत्ता आणली. त्याने चित्रकलेच्या मूलतत्त्वांची मौलिक चिकित्साही निबंधरूपाने केली. या सर्व  मंथनामध्ये पिकासो, पॉल क्‍ले यांसारखे काही कलावंत विविध कलासंप्रदायांना जवळचे वाटण्यासारखे होते आणि तशी विविधांगी गुणवत्ताही त्यांच्या कलानिर्मितीत होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर कलेचे स्वरूप पुन्हा बदलले.  जॅक्सन पॉलकने क्रियाचित्रण  सुरू केले. प्रत्यक्ष क्रियेच्या ओघात घडले ते चित्र, अशी क्रियाचित्रणाची भूमिका आहे. चिक्कणितचित्रात कोणत्याही वस्तू चित्रफलकावर चिकटविल्या जातात; मात्र त्यातून सौंदर्याकृती साधण्याची दक्षता घेतली जाते. लोकजीवनाशी किंवा सामान्य माणसाच्या जीवनक्रमाशी निगडित असणारी कलेची रूपे व कल्पना आधारभूत मानून, त्यांतून चित्राकृती साधणारी  जनकलाही उदयास आली. तिच्या पाठोपाठ दृक्‌भ्रमकला पुढे आली. दृक्‌भ्रमकलेमध्ये रंगरेषाआकारांतून अशी आकृती गुंतविली जाते, की तीमधून दृक्‌भ्रम करणाऱ्या हालचाली प्रतीत होतात.

आधुनिकता

भारतीय चित्रकलेला आधुनिकतेचे वळण दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास लाभले. अमृता शेरगिलच्या चित्रांत ते वळण लक्षात येते. सुरुवातीला काही भारतीय वैशिष्ट्येही त्यात जोपासली गेली. पुढे अनेक अभिव्यक्तिप्रकार निर्माण झाले. त्यांपैकी काही टिकले व काही नामशेष झाले. बेंद्रे, हुसेन, शंकर पळशीकर, रझा, हेब्बर, लक्ष्मण पै, न्यूटन सोझा, मोहन सामंत, डी. जी. कुलकर्णी, के. एस्. पणीक्कर, सतीश गुजराल हे प्रमुख आधुनिक भारतीय चित्रकार. आजच्या पिढीतील भारतीय चित्रकार जनकला, दृक्‌भ्रमकला यांसारखे अत्याधुनिक चित्रकलाप्रकारही हाताळीत आहेत.

आधुनिक मानल्या गेलेल्या कलेत आजही परस्परविरोधी विचारधारा आहेत. द्विपरिमाणात्मक चित्रपृष्ठाची कल्पना आता अबाधित राहिली नाही. माध्यमशुद्धतेच्या कल्पनाही मागे पडल्या आहेत. कलावंताच्या भावनाभिव्यक्तीला सर्वस्व मानणारी सुरुवातीची आधुनिक कल्पना आता बाद होत आहे. मानवी मनाचे कलाकृतीवर होणारे संस्कार पुसून तिचे अवमानवीकरण करण्याचे प्रयत्‍न अमेरिकेत चालू आहेत.

संदर्भ : 1. Read, Herbert, A Concise History of Modern Painting, London, 1961.

2. Skira, Albert & Ponente, Nello, Trans. Emmons, James, Modern Painting : Contemporary

Trends, Paris,   1960.

लेखक : संभाजी कदम,

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate