অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिक वास्तुकला

प्रस्तावना

सर्वसाधारणपणे विसाव्या शतकात वास्तुनिर्मितीचे जे परिणत स्वरूप दृष्टोत्पत्तीस येते, त्यास आधुनिक (मॉडर्न) वास्तुकला म्हणावयास हरकत नाही. सध्याच्या यंत्रयुगात इमारतींसाठी लागणाऱ्या साहित्यसामग्रीत नवनवीन भर पडत आहे. इमारतीच्या बांधकामाच्या तंत्रांत सुधारणा होत आहे. मुख्यतः वास्तुनिर्मितीत कार्यवादी दृष्टिकोनाबरोबरच मानवी जीवनाचे तत्त्वज्ञानही प्रकट झाले पाहिजे, अशी आधुनिक वास्तुशास्त्रज्ञांची भूमिका आहे. थोडक्यात सांस्कृतिक प्रगतीशी समांतर असणारे वास्तुकलेचे तत्त्वज्ञान आधुनिक काळात निर्माण झाल्याचे दिसते.

आधुनिक वास्तूचा उगम

आधुनिक वास्तूचा उगम अठराव्या शतकाच्या मध्यानंतर झाला. वीज, गॅस, रेडिओ, रेल्वे, आगबोटी, विमाने यांसारख्या शोधांनी मानवी जीवनात सर्वंकष स्थित्यंतरे घडून आली. धार्मिक युग लोप पावले व यांत्रिक युग सुरू झाले. शहरांची वाढ झपाट्याने होऊ लागली. रुग्णालये, शाळा, बँका, करमणुकीची केंद्रे, न्यायालये, क्रीडांगणे, सचिवालये यांसारख्या सार्वजनिक उपयुक्त वास्तूंची निर्मिती होऊ लागली. विटा, दगड, लाकूड, काच या इमारती बांधण्याच्या पारंपरिक साहित्यांत पोलाद, सिमेंट, प्‍लॅस्टिक, अ‍ॅस्बेस्टस, अ‍ॅल्युमिनियम, ब्राँझ यांची भर पडली.

हेन्‍री रिचर्ड्‌सन या वास्तुशास्त्रज्ञाने १८५८ च्या सुमारास अमेरिकेत पहिली आधुनिक वास्तू उभारली. आंरी लाब्रूस्त या फ्रेंच वास्तुशास्त्रज्ञाशी संपर्क ठेवून यूरोपीय वास्तुरचनाविषयक विचारसरणीची माहिती तो मिळवत असे. याच सुमारास अमेरिकेत लुइस सलिव्हन व फ्रँक लॉइड राइट यांनी वास्तुनिर्मितीत क्रांतिकारक तंत्र परिणामकारकतेने वापरले. इमारतीचा सांगाडा व त्यावर योजिलेले पांढऱ्या पक्वमृदेचे अस्तर (स्किन) यांमुळे पाहणारास इमारत हलकीफुलकी दिसावी, असा यशस्वी प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग आधुनिक वास्तूच्या निर्मितीमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

आधुनिक वास्तुनिर्मितीत लूइस सलिव्हन  याने आकार आणि कार्य यांच्या संवादी अधिष्ठानावर गगनचुंबी इमारतींमधील दुकाने, कचेऱ्या व शेवटच्या मजल्यावरील वीज, गॅस, पाणीपुरवठा या सर्वांची सुसंबद्ध जडणघडण सिद्ध केली. त्याच्या मते निसर्गाच्या प्रत्येक कृतीला एक विशिष्ट आकार असतो. या आकारामुळे त्या कृतीचा अर्थ स्पष्ट जाणवतो. या दृष्टीने आधुनिक वास्तूंत आकार व कार्य यांची एकात्मता साधण्याचा प्रयत्‍न केला जातो.

अमेरिकेतील फ्रँक लॉइड राइट याची वास्तुरचना १९१४च्या सुमारास यूरोप खंडात लोकप्रिय झाली. हॉलंडमध्ये ‘द स्टाइल’ [डॅनिश: ‘de stijl’] नावाचा एक कलासंप्रदायही उदयास आला. त्यात चित्रकार व शिल्पकार यांबरोबरच वास्तुविशारदांचाही अंतर्भाव होता.

यूरोप-अमेरिकेतील आधुनिक वास्तुनिर्मितीच्या विचारप्रणालीत पुढील तत्त्वे प्रभावी ठरली : (१) वास्तुरचना अंतर्भागाकडून बाह्यांगाकडे प्रभावित व्हावी. (२) वास्तूने परिसरातील सृष्टीशी एकात्मता साधावी. (३) वास्तू ही सृष्टीतील स्वयंभू निर्मिती वाटावी; म्हणजे ती जैव स्वरूपाची असावी.

वास्तुशास्त्रज्ञांचे एक आंतरराष्ट्रीय मंडळ १९२०च्या सुमारास स्थापन झाले. यूरोपात व अमेरिकेत आधुनिक वास्तुकलेचा प्रवाह सुरू झाला. वॉल्टर ग्रोपिअस, एरिक मेंडेलसन, रिचर्ड नूट्र, अ‍ॅडॉल्फ लूस, पीटर बेरेन्स, ओटो व्हाग्‌नर, ल कॉर्ब्यूझ्ये, मीएस व्हान डेर रोअ या वास्तुशास्त्रज्ञांनी अभिनव वास्तुकलाविचाराची आघाडी गाजविली. दुसऱ्या महायुद्धात यांतील काही वास्तुविशारद अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी गेले व अशा प्रकारे नव्या वास्तुकलेच्या विचारप्रवाहास व निर्मितीस यूरोप व अमेरिका यांचे विस्तृत क्षेत्र प्राप्त झाले.

मानवी जीवनावर यंत्रयुगाचे विपरीत परिणाम होतील, हे मॉरिस व रस्किन यांसारख्या विचारवंतांनी प्रतिपादन केले होतेच. यंत्र हे मानवाचे गुलाम राहिले पाहिजे, असा आदेश फ्रँक लॉइड राइटने दिला. यंत्रनिर्मित साचेबंद वास्तुसाहित्य अभिनवतेने मांडल्यास वास्तुरचनेतील साचेबंदपणा टाळता येतो हे त्याने दाखवून दिले. यूरोपमध्ये ओटो व्हाग्‌नर याने नक्षीकाम वर्ज्य करून पोलाद, काच या साहित्यांचे आकार रंग इ. स्वभावधर्म वास्तूत खुलविले. अ‍ॅडॉल्फ लूस याने वास्तूमध्ये घनमान, रेखीवपणा व प्रमाणबद्धता यांची खुलावट केली. खिडक्या, दारे, झरोके यांद्वारा साधलेले पारदर्शक आकार व भिंती, खांब यांद्वारा साधलेले अपारदर्शक आकार यांचा नयनरम्य मिलाफ घडवून त्याने वास्तूला एक प्रकारची लयबद्धता प्राप्त करून दिली.

एरिक मेंडेलसन याने आइन्स्टाइन ऑब्झर्व्हेटरीचा मनोरा बांधताना ओतीव आकारासाठी काँक्रीटची योजना करून वक्रगती वास्तू निर्माण केली व वास्तूस शिल्पसदृशता प्राप्त करून दिली.

इमारतीच्या पोलादी सांगाड्यावर काचेची पडदेवजा भिंत वॉल्टर ग्रोपिअसने योजली. ही भिंत बाह्य वातावरणास वास्तूपासून चार हात दूर ठेवण्यासाठी होती. तथापि काचेचे पारदर्शकत्व, त्यातून प्रकाशाचा आतबाहेर होणारा खेळ, काचेवर प्रतिबिंबित होणारी दृश्ये यांनी वास्तूस एक निराळेच चैतन्य दिले.

मीएस व्हान डेर रोअ याने काचेच्या पृष्ठभागाची विविधता वास्तूस साज चढविण्यासाठी योजली. त्याने वास्तूच्या क्षितिजसमांतर भागास जास्त स्पष्ट केले. वास्तूच्या अंतर्रचनेचा बोध प्रदर्शित केला. वास्तूच्या बाह्य भिंती टप्याटप्याने भोवतालच्या निसर्गात विलीन करण्याचा प्रयोग करून, वास्तूचे बाह्य वातावरणाशी तादात्म्य साधले.

वास्तुरचनेची दोन अंगे आधुनिक काळात महत्त्वाची ठरली : (१) वास्तूचे वजन पेलण्यासाठी असणारा रचनाभाग. (२) काच, प्‍लॅस्टिक, अ‍ॅल्युमिनियम, प्‍लायवुड, धातूचे पत्रे यांच्या पडद्या. ह्या पडद्या कारणपरत्वे इच्छित स्थळी योजिता येतात. त्यामुळे आधुनिक वास्तुरचनेत आकारसुलभता किंवा आकारविषयक लवचिकता निर्माण झाली.

शार्ल एद्वार झ्हान्‍रे याचे टोपणनाव  ल कॉर्ब्यूझ्ये. या फ्रान्समधील वास्तुशास्त्रज्ञाने भूमितीच्या आकारास वास्तुरचनेत जास्त प्राधान्य दिले. वास्तूस शिल्पस्वरूप देण्याचा पुरस्कार केला. ‘घरे ही राहण्याची यंत्रे आहेत,’ या त्याच्या उक्तीमुळे फार गैरसमज झाले; तथापि या उक्तीस ‘या घरांतील जीवन यांत्रिक नसावे,’ अशी जोड दिल्याने त्याच्या वास्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच्या वास्तूत खांबांचे आकार वास्तूचे वजन पेलण्याइतपत मजबूत असतात. शिल्पाकार जिने, पुढे झेपावणारे काँक्रीटचे पडदे, त्यांमधील जाळ्या, सूर्यकिरणे थोपविणारे काँक्रीटच्या पट्ट्यांचे उभे-आडवे पोत, सज्‍जे व या सर्वांतून होणारा छायाप्रकाशाचा खेळ ही आधुनिक वास्तूची सर्वसाधारण अशी प्रकृती झाली आहे.

फ्रँक लॉइड राइटची वास्तू जोत्यावर विसावते, तर ल कॉर्ब्यूझ्येची वास्तू स्तंभावर उचललेली असते. इमारतीच्या खाली बागबगीचा, छपरावर बागबगीचा, भरपूर हवा, अपेक्षित प्रकाश, चौफेर आकाशदर्शन यांमुळे आधुनिक वास्तुरचनेने मानव आणि निसर्ग यांच्यातील मध्यंतरीच्या काळात तुटलेले नाते पुन्हा जोडले आहे. ल कॉर्ब्यूझ्ये याने मॉड्यूलर (२ भाग) या ग्रंथाचे लेखन करून मानवी शरीराच्या प्रमाणांची वास्तूत गुंफण करण्याची नवी दिशा दाखविली आहे. या वास्तुशास्त्रज्ञाच्या राँशँ येथील चर्चवास्तुशिल्पाचा भाग व त्यातून प्रतीत होणारे आधुनिक मानवाचे अध्यात्मवादाचे प्रतीक उल्लेखनीय आहे.

आधुनिक वास्तुरचनेच्या तत्त्वप्रणालीत अमेरिकन व यूरोपीय वास्तुशास्त्रज्ञांप्रमाणे मल्वेव्ह्यिच या रशियन वास्तुशिल्पज्ञाचा मोठा वाटा आहे. त्याच्या मते चौकोन, वर्तुळ, त्रिकोण यांसारख्या भौमितिक आकारांतून मानवाच्या काही भावना वास्तूत जास्त प्रकर्षाने व्यक्त केल्या जातात. मानवाच्या शारीरिक व आध्यात्मिक ध्येयांचे दर्शन हा वास्तूचा ‘आत्मा’ आहे. याही तत्त्वावर आधुनिक वास्तूंची उभारणी होत आहे.

वास्तुरचनेत लाटाकृती आकार योजून वास्तुगत अवकाशास वेगवान किंवा वाहते स्वरूप आल्व्हार आल्तॉ  याने १९३७च्या सुमारास दिले. त्यामुळे वास्तूस चैतन्यमयता प्राप्त झाली. चौरस घनाकृतीत असा आविष्कार जाणवत नाही. कालमानानुसार असणारी परिस्थिती व ज्या लोकांसाठी वास्तू निर्माण करावयाची त्यांचे मानसशास्त्र यांचा योग्य संयोग वास्तूत साधला पाहिजे, हा नवा दृष्टिकोन त्याने प्रकट केला.

ओस्कार नीमाइअर या ब्राझीलमधील वास्तुशास्त्रज्ञाने १९५५च्या सुमारास काटकोनी रचना त्याज्य ठरवून भिन्न स्वरूपांचे आकार वास्तूत योग्य ते स्पंदन जाणवण्यासाठी योजिले. अभिनव कला संग्रहालयाच्या इमारतीसाठी त्याने उलटा पिरॅमिड योजिला. इंग्रजी ‘व्ही’ या अक्षरासारख्या स्तंभावरती इमारत अधिष्ठित करणे, सूर्याच्या उष्णतेपासून वास्तूस संरक्षण देण्यासाठी विचित्र आकाराच्या काँक्रीट जाळ्यांचे बाह्य आच्छादन वापरणे, यांसारखी नवी तंत्रे त्याने निर्माण केली. रिचर्ड नूट्र याने वास्तूचे आतील, बाहेरील व भोवतालचे नैसर्गिक वातावरण यांची सुसंगती साधण्यासाठी पुढे झेपावणारी छपरे, खिडक्या, झाडे, फुलांचे ताटवे, नैसर्गिक खडक, जागेचा उंचसखलपणा इत्यादींची कलात्मक सांगड घातली.

आधुनिक वास्तूच्या निर्मितीत काही प्रख्यात स्थापत्यविशारदांचा वाटा आहे. वास्तूत खुला अवकाशविस्तार साधण्यासाठी विविध तऱ्हेचे घुमटाकार आणि विविध आकारांची छते - उदा., द्विवक्रांकित, वास्तूत समकक्षभेद साधणारे तिरकस, छत्रीकार, अर्धडमरूकार, खोगीराकृती इ. - काँक्रीटमध्ये घडविण्यात आली. या रचनेस ‘कवच’ (शेल) रचना म्हणतात. एकोणिसाव्या शतकापासून सभागृहे, प्रार्थनामंदिरे, क्रीडांगणे, विमानतळ इ. या कवचशैलीने बांधण्यात आली. माक्स बेर्ख, एद्वारदो टॉरोहा, रॉबेअर मायार, नेर्वी, मार्सेल ब्रॉयर, फेलीक्स कँडेला या स्थापत्यविशारदांच्या प्रयत्‍नांनी वास्तुरचनेस एक निराळीच दिशा प्राप्त झाली. फुलर याने घडीचे घुमट सादर केले. धातूच्या नळ्या एका विशिष्ट पद्धतीने जोडून थोड्या खर्चात व वेळात घुमट उभारता येतो व काम संपल्यावर परत तो मोडून दुसरीकडे सहज नेता येतो. सर्कशीच्या प्रवासी तंबूची आठवण या घुमटरचनेने येते.

अभिनव वास्तुकल्प व प्रगत स्थापत्य अभियांत्रिकीय तंत्र ह्यांच्या मिलाफात आधुनिक वास्तुकलेच्या विकासाची बीजे आहेत.

संदर्भ :1. Hatje, Gerd, Ed. Encyclopaedia of Modern Architecture, London, 1963.

2. Richards, J. M. An Introduction of Modern Architecture. Harmondsworth, Middlesex, 1962.

3. Scully, Vincent, Jr. Modern Architecture, New York, 1961.

4. Sharp, Dennis, Modern Architecture and Expressionism, London. 1966.

लेखक :कृ. ब.गटणे,

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate