অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कात्सुशिका होकुसाई

जन्म

३१ ऑक्टोबर १७६०

विख्यात जपानी चित्रकार

विख्यात जपानी चित्रकार. जन्म एडो (टोकिओ) येथे एका गरीब कुटुंबात झाला. मूळ नाव टोकितार. ‘होकुसाई’ हे टोपणनाव. कलावस्तू बनविणाऱ्या कावामुरा इचि रोएमॉन यांचा हा मुलगा. वयाच्या पाचव्या वर्षी नाकाजीमा इसे या आरसे-उत्पादकाने त्याला दत्तक घेतले. आरशांच्या पाठीमागे अलंकरण करण्याची कला त्या वेळी जपानमध्ये प्रसिद्ध होती. आकृतिबंधाच्या विविध वैशिष्ट्यांची ओळख होकुसाईला येथेच झाली. काही काळ त्याने पुस्तकांच्या दुकानात नोकरी केली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मुद्राचित्रकार कात्सुकावा शुन्सो यांच्या कलागृहात तो दाखल झाला (१७७८). शुन्सो यांच्या मार्गदर्शनाखाली सु. पंधरा वर्षे होकुसाईने जपानी चित्रकलेच्या निरनिराळ्या शैलींचा (कानो, तोसा व सोतात्सु-कोरिन) तसेच डच कोरीव कामाचा आणि चिनी चित्रकलेचा अभ्यास केला. या दरम्यान त्याने विवाह केला; मात्र १७९० मध्ये त्याच्या पत्नीचे निधन झाले. पुढे १७९७ मध्ये त्याने दुसरा विवाह केला; तथापि त्याच्या दुसऱ्या पत्नीचेही अल्पावधीतच निधन झाले. या दोन्ही पत्नींपासून त्याला दोन मुले व तीन मुली झाल्या होत्या. त्याची साकाई ही मुलगी पुढे चित्रकार म्हणून ख्याती पावली.

सुनिदर्शन

होकुसाईने अनेक ग्रंथांच्या सुनिदर्शनांची (बुक इल्स्ट्रेशन्स) कामे केली. होकुसाईवर तोरी कियानोगा (१७५२–१८१५) व कितागावा उतामारो (?१७५३–?१८०६) या प्रसिद्ध जपानी चित्रकारांचा प्रभावहोता. पुढे तो यथादर्शन तंत्राकडे आकर्षित झाला. हे तंत्र आत्मसात करून त्याने चुशिंगुरा या लोकप्रिय जपानी नाटकावर आधारित कथाचित्रांचा एक मुद्राचित्रसंग्रह तयार केला (१८०६). त्याच्या माउंट फुजी सीन फ्रॉम ताकाहाशी ब्रिज या चित्रावर यूरोपीय चित्रशैलीचा प्रभाव दिसतो. होकुसाईच्या एकूण चित्रसंपदेत निसर्गचित्रांना विशेष महत्त्व आहे. फाइव्ह व्ह्यूज ऑफ ईस्टर्न कॅपिटल अ‍ॅट ए ग्लान्स (१८००), फिफ्टी थ्रीस्टेशन्स ऑफ टोकाइडो (टोकिओ आणि क्योटो यांतील महामार्ग, १८०४) ही त्याची निसर्गचित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. १८२३–३५ या काळात त्याने निसर्गचित्र-मालिकांचा मुद्राचित्रसंच निर्माण केला. थर्टीसिक्स व्ह्यूज ऑफ माउंट फूजी (१८३०-३१), द वॉटरफॉल्स ऑफ जपान, वॉटर्स इन देअर थाउजंड अ‍ॅस्पेक्ट्स, वन हंड्रेड व्ह्यूज ऑफ माउंट फूजी (१८३४) हे काष्ठमुद्राचित्रांचे संच त्याच्या निसर्गचित्रणातील योगदानाची साक्ष देतात.

होकुसाईने आपल्या प्रदीर्घ जीवनात वेळोवेळी आपली नावे बदलली. सु. ५० नावे त्याने बदलली. टोकितोरो, हयाकुरीन, सोरी, काको, मांजी, ग्याको-जीन, शिन्साई ही त्याची काही महत्त्वाची बदललेली नावे. सतत नावे बदलणे व घरे बदलणे (सु. ९३ वेळा त्याने घर बदलले, असेम्हटले जाते) . त्याच्या एकंदर अस्थिर वृत्तीचे, बदलत्या कलात्मक शैलीचे आणि कुतूहलाचे द्योतक होते. फूजी पर्वत हा होकुसाईचा आवडता विषय. फूजी इन क्लिअर वेदर (१८३०–३४), फूजी अबव्ह इन लाइट्निंग (१८३०–३२) आणि ग्रेट वेव्ह अ‍ॅन कनागाव्हा (१८२९) ही त्याची गाजलेली मुद्राचित्रे. फुले आणि पक्षी या दोन विषयांवर द लार्जर फ्लॉवर्स (१८३०) आणि स्मॉलर फ्लॉवर्स (१८३०) असे त्याचे दोन संच आहेत. कुंचल्यांचे जोशपूर्ण काम, कौशल्यपूर्ण रंगसंगती व वैशिष्ट्यपूर्ण रचना-पद्धती ही त्याच्या चित्रनिर्मितीची काही वैशिष्ट्ये होत.

उत्तरार्धाच्या शेवटी त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली. त्याचा प्रतिस्पर्धी हिरोशीगोनी याने होकुसाईचेच विषय घेऊन चित्रनिर्मिती केली व तो लोकप्रिय झाला; तथापि होकुसाईची कलेबद्दलची निष्ठा कमी झाली नाही. पुढे तो चीन-जपानमधील अभिजात विषयांकडे वळला. पोएम्स ऑफ चायना अँड जपान मिरर्ड टू लाइफ (१८३३) या मालिकेतील त्याची निसर्गचित्रे श्रेष्ठ समजली जातात.

रेखाटनतंत्र

रेखाटनतंत्र हा त्याचा आवडीचा विषय होता. क्विक लेसन्स इन सिम्प्लिफाइड ड्रॉइंग्ज (१८१२), पेंटिंग इन थ्री फॉर्म्स (१८२३), पेंटिंग वुइथ वन स्ट्रोक ऑफ ब्रश (१८२३) हे त्याचे प्रसिद्ध ग्रंथ. मांगा (१८१४–७८) ही पंधरा खंडांत प्रसिद्ध झालेली त्याच्या चित्रांची पुस्तक-मालिका त्याची महान निर्मिती समजली जाते.

१८३९ साली होकुसाईचा स्टुडिओ आगीत भस्मसात झाला. त्यात त्याच्या बऱ्याच कलाकृती नष्ट झाल्या; तथापि शोधकवृत्तीच्या होकुसाईने अखेरपर्यंत आपली कलानिर्मिती सुरूच ठेवली. वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी त्याने डक्स इन अ स्ट्रीम हे चित्र पूर्ण केले. ‘उकियो-ए’ (लाकडी ठशांनी चित्र छापण्याची अनुपम पद्धती) या त्याच्या चित्रशैलीचा यूरोपीय चित्रकारांवरही प्रभाव पडला.

मृत्यू

१० मे १८४९

वृद्धापकाळाने टोकिओ येथे त्याचे निधन झाले.

लेखक : माधव इमारते

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate