অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कालीघाट चित्रशैली

कालीघाट चित्रशैली

एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये रूढ असलेली एक चित्रशैली. कलकत्ता येथील कालीघाटावरील मंदिराशी ती संबद्ध असल्याने तिला ‘कालीघाट’ हे नाव मिळाले. अठराव्या शतकात बंगालमध्ये ग्रामीण चित्रकार पौराणिक चित्रे काढून कापडाच्या गुंडाळीवर डकवीत (‘पाटुआ’ चित्रप्रकार) व गावोगावी जाऊन कथाभाग गाताना त्यासोबत ही चित्रे दाखवीत. ह्या प्रकारात परिवर्तन घडून त्यातून कालीघाट चित्रशैली उद्यास आली. ही चित्रकला एक कौटुंबिक व्यवसाय होता. प्रवासी–यात्रेकरूंना ही चित्रे विकली जात. बहुतांश कालीघाट चित्रे देवदेवतांविषयक आहेत. त्यांत शिव–पार्वती, नृसिंह, राधा–कृष्ण, ब्रह्म, कृष्ण–बलराम, सरस्वती, राम–सीता; तसेच रामायण –महाभारतातील अन्य व्यक्ती इत्यादींची चित्रे आहेत. पौराणिक विषयांखेरीज वाघाशी झुंजणारे योगी व वामाचारी योगी असाही एक विषय त्यांत आहे. वैष्णवांचे चित्रण औपरोधिक व विडंबनात्मक केले आहे. उदा., वैष्णवांना मांसाहार निषिद्ध; तरीही तो ते करतात, हे सूचित करण्यासाठी मासे खाणारे मांजर एका चित्रात काढले असून त्या मांजराच्या कपाळावर वैष्णवांसारखे भस्मविलेपन व गळ्यात जपमाळ आहे.

कालीमातेची विध्वंसक शक्ती व तिचे वत्सल रूप यांचेही चित्रण केलेले आढळते. एका चित्रात पालथा पडलेला दुर्बल पुरुष व त्यास तुडविणारी वेश्या दाखवून पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने बाहेरख्याली बनलेल्या पुरुषांवर टीका केलेली आहे. दोन सवतींचा झगडा व त्यात सापडलेला नवरा हा विषयही चित्रांतून येतो. तत्कालीन खळबळजनक घटनांवर आधारलेली काही चित्रे आहेत. उदा., महंताच्या नादी लागलेल्या स्त्रीचा तिच्या नवऱ्याने केलेला खून एका चित्रमालिकेतून दाखविला आहे. धर्माबद्दलचा आदर, सनातनी मूल्यांविषयी श्रद्धा, भोंदूपणाचा तिटकारा या कालीघाट कलावंतांमधील काही सर्वसामान्य प्रवृत्ती. चित्ररचनेत कमालीचा साधेपणा, संवादित्व, लयबद्धता दिसते. कालीघाट चित्रशैलीची तुलना कित्येकदा आधुनिक फ्रेंच चित्रकार लेझे याच्या चित्रांशी केली जाते. पूर्वकालीन भारतीय चित्रकलेत चिकणरंगांचा वापर केला जात असे; पण कालीघाट कलावंतांनी अधिक प्रवाही असे जलरंगाचे माध्यम स्वीकारले. चमकदार जलरंगांचा वापर, चित्रणाच्या तपशीलातील अंगरंग, सोनेरी–रूपेरी छटा तसेच गडद ओल्या रंगांच्या कडा ठळक करून चित्राकृती ठसठशीत करणे इ. वैशिष्ट्ये कालीघाट चित्रशैलीत दिसून येतात. चित्ररचनेतील तोचतोपणा, साधेपणाचा अतिरेक, तैलचित्रे व इतर चित्रतंत्रे यांची वाढती स्पर्धा व आधुनिक औद्योगिक प्रभाव यांमुळे कालीघाट शैली विसाव्या शतकाच्या आरंभीच अस्तंगत झाली. तथापि  आधुनिक भारतीय चित्रकलेवर तिचा ठसा दिसून येतो.

संदर्भ : Archer, W.G. Kalighat Drawings, Calcutta, 1962.

लेखक :श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate