অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किशनगढ चित्रशैली

किशनगढ चित्रशैली

किशनगढच्या परिसरात विकसित झालेली चित्रशैली. १६०९ च्या सुमारास किशनसिंग हा जोधपूरचा राजा बनला.  जोधपूर, जयपूर, अजमीर व शाहपूर हे इलाखे त्यांच्या अंमलाखाली होते. त्याच्या नावावरूनच या प्रदेशाला ‘किशनगढ’ हे नाव पडले. हा प्रदेश अरवली पर्वताने वेढलेला असून त्यातील सुंदर ‘गुंडलाओ’ तलावाचे चित्रण अनेक किशनगढ चित्रांतून आढळते. खेळाडूंचे नंदनवन म्हणून किशनगढ प्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टी अजूनही चित्ररूपाने जिवंत आहेत.

किशनसिंग हा कृष्णभक्त असल्याने त्याच्या कारकीर्दीत (१६९९—१७६४) नावाचा राजा होऊन गेला.  तो नागरीदास या नावाने प्रसिद्ध होता. हा विद्वान व ज्ञानी राजा संगीत व चित्रकला यांचा व्यासंगी होता. त्याची सावत्र आई बनकावजी हिची रूपमती नावाची एक दासी होती. पुढे तिने तिची गायिका म्हणून नेमणूक केली. बनकावजीने स्वतः कृष्णलीलांवर अनेक काव्ये रचिली होती. तिच्या सान्निध्यात रूपमतीही काव्ये रचू लागली. हीच रूपमती तिच्या रहाणीमुळे `बनीठनी' म्हणून प्रसिद्ध झाली. सावंतसिंग तिच्या प्रेमात पडला. तिलाच राधा कल्पून त्याने अनेक चित्रे रंगविली. उंच, डौलदार व उभट चेहरा, धनुष्याकृती भुवया, लांबट डोळे, चाफेकळी नाक असलेल्या राधिकेचे अनेक मनोज्ञ विभ्रम त्या चित्रांतून व्यक्त झालेले दिसतात. सावंतसिंगाने जेव्हा दिल्लीला भेट दिली, तेव्हा मोगल सम्राट फरुखसियर याच्याकडे असलेल्या चित्रांतील उभट मनुष्याकृतींची त्याच्यावर छाप पडली व त्याचा परिणाम त्याच्या चित्रांतून दिसून येऊ लागला. त्याने आपल्या राज्यात कलाशिक्षणाची शाळा काढली. उच्च प्रकारच्या कलाकृती जतन करण्याची त्याची वृत्ती होती. त्याचा फायदा तत्कालीन कलावंतांना मिळाला. १७३५ ते १७५७ या काळातील किशनगढचित्रे कलेचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहेत.

 

नंतर सुरधज मुलराजच्या कुटुंबाने कलेला वाहून घेतले. कल्याणदास, अम्रूर, सुरजमल, नानग राम हे किशनगढ शैलीचे प्रसिद्ध कलावंत होत. किशनगढ शैलीतील रंग रसरशीत आणि जिवंत आहेत.  चित्रांत भरपूर मोकळी जागा असून, त्यामानाने मनुष्याकृतींनी व्यापलेली जागा कमी असल्यामुळे, अवकाशाची भव्यता वाढली आहे.  चित्रांची मांडणी चौकोनाकृती राखण्याकडे विशेष कल दिसतो. चित्रात सामान्यतः एका रंगाला प्राधान्य असून तांबडा, पिवळा हे गर्द रंग त्यातील भावपूर्णतेने हृदयाला स्पर्शून जातात. मोगल चित्रशैलीची त्यांच्यावर छाप पडल्याने मोगल चित्रांतून आढळणाऱ्या तीव्र तांबड्या रंगच्छटा, झाडांची आलंकारिक रचना, पोशाखाच्या रंगातील उठावगुण हे विशेष किशनगढ चित्रांत आढळतात. या चित्रशैलीत पर्शियन शैलीतील डोंगरांचे चित्रण बेमालूमपणे मिसळल्याचे दिसून येते. लोककलेतील साधेपणा व सहजता या चित्रांतून दिसून येतात. करड्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रांना गहिरेपणा आणतात.

उत्तम कलेचा नमुना म्हणून दीपवल्लिका, चांदण्यातील तलाव, प्रेमनौका ही चित्रे विशेष उल्लेखनीय वाटतात.  दीपवल्लिका या चित्राची मांडणी साधी आहे. सोनेरी व काळा हे रंग अधिक प्रामाणात वापरून हे चित्र रूपास आणले आहे.  एका सज्जात प्रियकर व प्रेयसी बसले असून ते दिव्यांची आरास पहात आहेत, हे दृश्य कुशलतेने रंगविले आहे.  चित्रात वापरलेल्या तांबड्या रंगाने चित्राला अधिकच मनोवेधकता लाभली आहे. चांदण्यातील तलाव या चित्रात करड्या रंगाचा कुशलतेने वापर करून रात्रीचा परिणाम साधला आहे. मधूनच वापरलेल्या गुलाबी, निळ्या रंगच्छटा

चित्राला गहिरेपणा आणतात.  प्रेमनौका या चित्रात दरवर पसरलेल्या सरोवराचे मनोहारी चित्रण असून त्यातील नौकेचा तांबडा रंग मन आकर्षून घेतो.

संदर्भ : Dickinson, Eric; Khandalavala, Karl, Ed. Kishangarh Painting, New Delhi,1959.

लेखिका :नयनतारा धुरंधर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate