অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुलपे व तिजोऱ्या

घरे, कपाटे, पेट्या, टेबलांचे खण वगैरेंतील वस्तू सुरक्षित रहाव्यात, त्या

आ. १. ईजिप्तमधील पुरातन कुलूप व किल्लीआ. १. ईजिप्तमधील पुरातन कुलूप व किल्ली

चोरीस जाऊ नयेत, तसेच अनधिकृत माणसाला उघडता येऊ नयेत म्हणून त्या बंद करून ठेवण्यासाठी फार पूर्वीपासून वापरण्यात असलेल्या व आताही नित्य वापरात असलेल्या साधनास कुलूप असे म्हणतात. कुलपे विविध आकारांची व प्रकारांची असतात. कुलूप उघडण्यासाठी वा बंद करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सांधनास किल्ली असे म्हणतात. कुलपाला ताळे किंवा टाळा आणि किल्लीला चावी असेही म्हणतात. मोटार, स्कूटर, सायकल इ. वाहने तसेच दूरध्वनीसारखी (टेलिफोनसारखी) साधने बंद करून ठेवण्यासाठीही कुलपे वापरात आहेत.

आ. ३. चीनमधील पूर्वकालीन कुलूप व किल्लीआ. ३. चीनमधील पूर्वकालीन कुलूप व किल्ली

विविध आकाराची, कमीजास्त वजनाची, कौशल्यपूर्ण रचनेची, आलंकारिक, टिकाऊ इ. निरनिराळ्या प्रकारची कुलपे उपलब्ध आहेत. किल्ल्या असणारी, किल्ल्या नसणारी, कोयंड्यात अडकवता येणारी किंवा दाराच्या व खणाच्या फळीच्या अंगातच बसणारी कुलपे असतात. अनधिकृत व्यक्तीने उघण्याचा प्रयत्‍न केल्यास त्या व्यक्तीला गोळीने वा सुऱ्याने इजा होईल किंवा धोक्याची घंटा वाजू लागेल अशा स्वरूपाची यंत्रणा जोडलेली कुलपेही वापरात आहेत. तसेच भोके असलेल्या, भोके नसलेल्या, लहान, मोठ्या, चपट्या, जाड, अंगठीलाच जोडलेल्या, खांद्यावर अडकवता येतील अशा लांबलचक व टोकाजवळ लहानमोठ्या चमत्कृतिजनक खाचाखोचा असलेल्या अशा विविध प्रकारच्या किल्ल्याही असतात.

आ. ४. अंगठीतील किल्ल्याआ. ४. अंगठीतील किल्ल्या

पुरातन कुलपे

कुलपांना फार जुना इतिहास आहे. इ. स. पू. ४००० वर्षे इतक्या जुन्या काळी ईजिप्तमध्ये वापरात असलेल्या एका कुलपाची आणि त्याच्या किल्लीची रचना आ. १ मध्ये दाखविली आहे. एका दाराला कायम बसविलेला एक तुकडा आ. १ (अ) मध्ये दाखविला असून त्यामधील खाचेच्या वरील भागातून तीन लहान कांड्या खाली आलेल्या दिसत आहेत. तशाच तीन कांड्या त्यांच्या मागेही आहेत. या तुकड्याच्या सपाट माथ्यावर कांड्या घालण्याची सहा भोके दाखविली आहेत. दुसऱ्या दारात कायम बसविलेल्या तुकड्यात अडकवता येणारा दांडा (अगर अडसर) (आ) मध्ये दाखविला आहे.  त्याच्या उजव्या बाजूकडील वरच्या सपाट भागावर सहा भोके आहेत व त्याच बाजूच्या टोकाला किल्ली घालण्यासाठी खोदलेला मार्ग दाखविला आहे. अडसर दोन्ही दारांना कायम बसविलेल्या तुकड्यात बसविलेला (इ) मध्ये दाखविला आहे. (अ) मधील सहा कांड्या बरोबर त्यांच्या खाली आलेल्या अडसराच्या सहा भोकांत अडतात. (ई) ही किल्ली आहे व ती अडसराच्या खोदलेल्या मार्गातून जाऊन त्यांत अडकलेल्या सहा कांड्यांच्या बरोबर खाली बसते. ती किल्ली वरच्या दिशेने रेटली म्हणजे कांड्या वर कशा सरकवल्या जातात हे (उ) मध्ये दाखविले आहे. नंतर अडसर उजवीकडे ओढता येतो व दारे उघडता येतात. अशा तऱ्हेची कुलपे नॉर्वे, जपान इ. अतिदूरच्या देशांतही आढळली आहेत.

ग्रीस देशात इ. स. पू. आठव्या आणि सातव्या शतकांत दरवाजाच्या आतल्या बाजूला लावलेला अडसर सरकविण्यासाठी दरवाजाला एक भोक ठेवीत असत. दरवाजा पुढे ओढून या भोकातून एक वाकडी लांबलचक सळईवजा किल्ली घालून तिने दरवाजामागील अडसर सरकवून दार बंद केले जाई. दरवाजा उघडताना तीच सळई भोकातून घालून विरुद्ध दिशेने फिरवून अडसर मागे ओढला जात असे. ही वाकडी सळईवजा किल्ली लांबलचक असून ती खांद्यावर अडकवून बाहेर जाता येत असे. ही किल्ली आ. २ मध्ये दाखविली आहे.

फार पूर्वी चीन देशात वापरात असलेले एक कुलूप व त्याची किल्ली यांची रचना आ. ३ मध्ये दाखविली आहे. (आ) मध्ये कुलपाचा दांडा व मोकळ्या झालेल्या स्प्रिंगा दाखविल्या आहेत; त्यावरून कुलूप लावल्यावर आतील भागात स्प्रिंगा कशा मोकळ्या होतात हे दिसून येते. (इ) ही किल्ली व तीवरील झाकण दाखवते, (ई) व (उ) अनुक्रमे बंद झालेले कुलूप आणि कुलपामध्ये किल्ली घालण्याचे खाचांचे भोक दाखवतात.

आ. ५. कुलपातील अटकाव व किल्लीला असलेल्या तशाच प्रकारच्या खाचा.आ. ५. कुलपातील अटकाव व किल्लीला असलेल्या तशाच प्रकारच्या खाचा.

रोमन लोकांची कुलपे आ. १ मध्ये दाखवल्याप्रमाणेच होती पण कांड्या घट्ट बसण्यासाठी स्प्रिंगा वापरल्या जात. तथापि पुढे त्यांनी धातूंची व अनेक गुंतागुंतीचे अटकाव (लिव्हर) असलेली आणि किल्ली फिरवून उघडणारी कुलपे वापरात आणली. अंगठीत किल्ली बसविण्याची कल्पना रोमन लोकांनीच वापरात आणली. अंगठीतील किल्ल्यांची रचना आ. ४ मध्ये दाखविली आहे.

नंतरच्या काळातील विविध प्रकार

कुलपाच्या रचनेत दोन यांत्रिक युक्त्यांचा उपयोग केलेला असतो. एकीत निरनिराळ्या रचनेचे व गुंतागुंतीचे स्थिर अटकाव बसविलेले असतात आणि दुसरीत स्थिर अटकावांच्याऐवजी उचलेले जाणारे एक किंवा अनेक अटकाव घोडे (किंवा तरफा) बसविलेले असतात. स्थिर अटकावांतून जाऊन चल अटकावांना बरोबर सरकवून कुलपाचा आकडा अघडता यावा म्हणून किल्लीच्या टोकाला असलेल्या तुकड्यात काही खाचा केलेल्या असतात. अशा किल्ल्या कुलपात घालता याव्यात म्हणून खाचांशी जुळती अशी द्वाराची रचना कुलपाच्या तोंडावर केलेली असते. कुलपाच्या आतील भागात बसविलेली एक लहान व किल्लीच्या भोकात शिरेल अशी उभी खीळ असते. किल्लीला भोक नसल्यास कुलपाच्या पुढील व मागील भागास समोरासमोर अशी किल्लीच्या दांड्याच्या मापाची दोन भोके असतात. त्यामुळे किल्लीला आधार मिळून ती सहजपणे कुलपात फिरू शकते. कुलपाला असलेले द्वार त्यातून योग्य अशीच किल्ली जाईल असे असते. तरीही याच किल्लीशिवाय कुलूप उघडलेच जाणार नाही अशी खात्री नसते. तथापि ठराविक किल्लीशिवाय कुलूप उघडले जाऊ नये अशी रचना करण्याचा कुलूप कारखानदारांचा उद्देश असतो.

कौशल्यपूर्ण अटकाव असलेले कुलूप व त्यातील भागात घातलेली किल्ली यांची रचना आ. ५ मध्ये दाखविली आहे व किल्ल्यांचे काही निरनिराळ्या प्रकारचे जुने नमुने आ. ६ मध्ये दाखविले आहेत. निरनिराळे अटकाव असलेली अशा तऱ्हेची कुलपे आजही वापरात आहेत.

आ. ६. किल्ल्यांचे काही जुने नमुनेआ. ६. किल्ल्यांचे काही जुने नमुने

घोड्यांचे कुलूप

अठराव्या शतकात कुलपात उचलले जाणारे घोडे वापरून कुलपे तयार करण्यात इंग्‍लंडमधील रॉबर्ट बॅरन यांनी यश मिळविले. किल्लीला असलेल्या खाचांच्या पट्टीने योग्य त्या उंचीवर घोडे उचलल्यानंतरच कुलपातील अटक खीळ बाजूस सरकवली जात असे. घोड्यांची संख्या व अटक खिळेवर असलेले निरनिराळे प्रतिबंध यांमुळे अनेक भिन्न भिन्न कुलपे आणि त्यांच्या योग्य प्रकारच्या किल्ल्या तयार करता येऊ लागल्या. त्यांपैकी दोन घोडे असलेल्या एका कुलपाची रचना आ. ७ (अ) मध्ये दाखविली आहे.

एकोणिसाव्या शतकात जेरेमिया चब यांनी या उचलल्या जाणाऱ्या घोड्याच्या कुलपात एक नवीन युक्ती वापरात आणली. ही युक्ती म्हणजे कुलपात एक शोधक घोडा घालण्यात आला. योग्य त्याच किल्लीने कुलूप उघडले जाई, पण जर निराळ्या किल्लीने किंवा दुसऱ्या हत्याराने कुलूप उघडण्याचा प्रयत्‍न झाला आणि कुलपातील घोड्यांपैकी एक जरी वाजवीपेक्षा जास्त उंचावला गेला, तर हा शोधक घोडा उचलला जाऊन कुलपाचा आकडा उघडला जाण्यास प्रतिबंध करतो व अशा तऱ्हेने कुलूप उघडण्याचा प्रयत्‍न विफल होतो. एवढेच नव्हे तर असा प्रयत्‍न झाला हेही कळून येते. नंतर कुलपाला त्याचीच किल्ली लावल्यास ते पुन्हा चालू होते. या युक्तीच्या कुलपाची रचना आ. ८ मध्ये दाखविली आहे.

आ. ७. (अ) बॅरन यांचे घोड्यांचे कुलूप : दोन घोड्यांच्या कुलपाची सर्वसाधारण रचना : (१) अटकपट्टी, (२) अटकपट्टीतील निरनिराळे प्रतिबंध, (३) घोडे.आ. ७. (अ) बॅरन यांचे घोड्यांचे कुलूप : दोन घोड्यांच्या कुलपाची सर्वसाधारण रचना : (१) अटकपट्टी, (२) अटकपट्टीतील निरनिराळे प्रतिबंध, (३) घोडे.

येल कुलूप

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास अमेरिकेतील येल यांनी पुरातन ईजिप्त कुलपाचा धर्तीवर कुलपे तयार केली व त्यांचा सर्वत्र प्रसार झाला आहे. त्यांतील एका साध्या प्रकारात एका दंडगोलातील अनेक भोकांत सरकणाऱ्या कांड्या स्प्रिंगांच्या दाबाखाली धरलेल्या असतात. दंडगोलात एक फिरती गुडदी (प्लग) असते व तिच्या पृष्ठभागावर असलेल्या भोकातून दंडगोलातील कांड्या थोड्या आत शिरतात व त्याच वेळेस गुडदीला जोडलेला कोयंडा लागून कुलूप बंद होते. योग्य आकाराची किल्ली गुडदीच्या तोंडात घातली म्हणजे गुडदीत शिरलेल्या कांड्या वर सरकवल्या जाऊन गुडदीच्या पृष्ठभागावर येतात व किल्लीने गुडदी फिरवता येते आणि कोयंडा बाजूस सरकून कूलूप उघडले जाते. ही रचना आ. ९ मध्ये दाखविली आहे. या कुलपाच्या दुसऱ्या एका अवघड प्रकारात एक लहान दंडगोल असून त्याचा अटकपट्टीशी संबंध नसतो. या दंडगोलात एक फिरती गुडदी असून तिचा अटकपट्टी उघडणाऱ्या युक्तीशी संबंध असतो. किल्ली घालून गुडदी फिरवली जाते. कुलूप लावून किल्ली काढून घेतल्यावर दंडगोलात स्प्रिंगांच्या दाबाखाली असणाऱ्या कांड्या गुडदीत असणाऱ्या भोकांत अडकून बसतात. त्यामुळे गुडदी योग्य तीच किल्ली घातल्याशिवाय फिरू शतक नाही. योग्य ती किल्ली  घातल्यावर गुडदी व दंडगोल यांतील कांड्या गुडदीच्या परिघास अनुक्रमे आतून व बाहेरून स्पर्श करीत राहिल्यामुळे गुडदी फिरून अडसर सरकतो व कुलूप उघडले जाते. योग्य तीच किल्ली घातल्याने दोन्ही भागांतील कांड्या कोठे असतात आणि भलत्या किल्लीने त्या कोठे असतात हे अनुक्रमे आ. १० (अ) व (आ) मध्ये दाखविले आहे.

आ. ७. (आ) बॅरन यांचे घोड्यांचे कुलूप :  कुलूप उघडताना होणाऱ्या घोड्याच्या क्रियेच्या विविध अवस्था :  (१) कुलूप बंद असताना अटकपट्टीची स्थिती, (२) किल्लीमुळे घोडा उचलला जाऊन अटकाव पुढे सरकतो, (३) कुलूप उघडल्यावर अटकपट्टीची स्थिती.आ. ७. (आ) बॅरन यांचे घोड्यांचे कुलूप : कुलूप उघडताना होणाऱ्या घोड्याच्या क्रियेच्या विविध अवस्था : (१) कुलूप बंद असताना अटकपट्टीची स्थिती, (२) किल्लीमुळे घोडा उचलला जाऊन अटकाव पुढे सरकतो, (३) कुलूप उघडल्यावर अटकपट्टीची स्थिती.

कांड्यांच्या संख्येत, आकारात आणि दंडगोलातील कांड्या वा गुडदीतील कांड्या भोकांमध्ये कितपत आत शिरतात यात बदल करून हजारो निरनिराळी कुलपे तयार करता येतात. मोटारी व स्कूटरी यांतील कुलपे याच धर्तीवर केलेली असतात. सायकलीच्या बैठकीच्या दांड्यावर बसविलेल्या कुलपात एक वर्तुळाकृती दांडा दाबून फिरवला म्हणजे तो मागील चाकाच्या आऱ्यांमधून जाऊन कुलपाच्या दुसऱ्या तोंडात शिरतो व अडकतो. किल्ली फिरवून स्प्रिंगेच्या क्रियेने तो मोकळा होतो. निराळ्या धर्तीचे पण स्प्रिंगेच्या जोरावरच काम करणारे एक सायकलचे कुलूप पाय मारण्याच्या जागेजवळ मागील चाक धरणाऱ्या दांड्यावर बसवतात, त्यातून एक सरळ लहान अडसर चाकाच्या आऱ्यांत घुसतो व मागील चाक फिरण्यास अटकाव करतो आणि किल्लीने तो मागे घेतला जातो.

आ. ८. जेरेमिया चब यांचे कुलूप.आ. ८. जेरेमिया चब यांचे कुलूप.

दरवाजाच्या चौकटीतील कुलपे

मोठमोठ्या चाळीतील खोल्यांना दाराच्या जाडीत कुलपे बसविलेली असतात व जाता येता  जोराने दार ढकलल्यावर कुलपाची अटक दरवाजाच्या चौकटीत बसविलेल्या एका भागात अडकते व दार बंद होते. काही प्रकारच्या कुलपांत दार बंद झाल्यास, ते आतून किल्लीशिवाय पण बाहेरून किल्ली फिरवून उघडता येते. या कुलपाची रचना आ. ११ मध्ये दाखविली आहे.

आ.९. येल यांचे दंडगोल व गुडदी प्रकारचे साधे कुलूप : (अ) कुलूप बंद असताना दंडगोलाची स्थिती, (आ) कुलूप उघडल्यावर दंडगोलाची स्थिती.आ.९. येल यांचे दंडगोल व गुडदी प्रकारचे साधे कुलूप : (अ) कुलूप बंद असताना दंडगोलाची स्थिती, (आ) कुलूप उघडल्यावर दंडगोलाची स्थिती.

गुरुकिल्ली

(मास्टर की). मोठमोठ्या निवासस्थानांतील (उदा., हॉटेले) खोल्यांना प्रत्येकी निरनिराळे कुलूप व त्याची त्याची निराळी किल्ली असते. एकास स्वतःच्या खोलीशिवाय दुसऱ्याची खोली उघडता येत नाही. तथापि निवासस्थान चालविणाऱ्याजवळ एक सर्वगामी किल्ली वा गुरुकिल्ली असते. तिने तो कोणत्याही खोलीचे कुलूप अघडू शकतो. प्रत्येक कुलपात जादा घोडे बसवलेले असतात व ते या सर्वगामी किल्लीने मोकळे होऊन कोणतेही कुलूप उघडता येते.

नेहमीची कुलपे

नेहमी वापरात असलेल्या कुलपांचे दोन प्रकार व टेबलाच्या खणाला बसवावयाचे कुलूप यांची रेखाचित्रे आ. १२ मध्ये दाखविली आहेत.

आ.१०. येल यांचे दुसऱ्या प्रकारचे कुलूप :  (अ) योग्य किल्लीने कांड्या योग्य प्रकारे उचलल्या जाऊन कुलूप उघडते. (आ) भलत्या किल्लीने कांड्या अयोग्य उंचीवर सरकल्यामुळे कुलूप उघडत नाही.आ.१०. येल यांचे दुसऱ्या प्रकारचे कुलूप : (अ) योग्य किल्लीने कांड्या योग्य प्रकारे उचलल्या जाऊन कुलूप उघडते. (आ) भलत्या किल्लीने कांड्या अयोग्य उंचीवर सरकल्यामुळे कुलूप उघडत नाही.

संयोगी कुलपे

अक्षरे जुळवून एक गुपित शब्द किंवा आकडे जूळवून एक गुपित संख्या तयार करूनच उघडले जाणारे एक संयोगी कुलूप पूर्वी चीनमध्ये प्रचारात होते. अशी कुलपे काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रचारात होती व अजूनही तुरळक आहेत. त्यात फिरत्या चकत्या असून त्यांच्या परिघावर अक्षरे किंवा आकडे खोदलेले असतात. ठराविक शब्दातील अक्षरे किंवा संख्येतील आकडे एका रेषेता येतील अशा तऱ्हेने या चकत्या फिरवल्या म्हणजे कुलपातील एक बाजू व आतील  दांडी बाहेर येऊन ते उघडले जाते. बंद करताना त्याच स्थितीत दांडी घालून तबकड्या वाटेल तशा फिरवून ठेवतात म्हणजे कुलूप बंद होते आणि तो शब्द किंवा आकडा माहीत असणाऱ्या शिवाय इतर कोणालाही ते उघडता येत नाही. वर वर्णन केलेल्या किल्ली असलेल्या कुलपापेक्षा फारच सुरक्षित आहे. या कुलपाच्या व त्याच्या चकत्यांमधील खाचा दांडी वरच्या एका रेषेत आल्या म्हणजे कुलपाची दांडी काढता येते व कुलूप उघडले जाते. अशा कुलपाची अंतर्गत रचना आ. १३ मध्ये दाखविली आहे. बँकांतील तिजोऱ्यांना वरील प्रकारची पण त्यात सुधारणा केलेली कुलपे वापरीत असत. परंतु ती उघडणे फार कठीण असल्यामुळे बँकेवर दरोडा घालणारे, बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यासच पळवून व त्याचा छळ करून वरील कुलपाचा गुप्त शब्द किंवा संख्या त्याच्याकडून वदवून घेत. यामुळे अशा तिजोऱ्यांना नंतर कालनियंत्रित कुलपे बसविण्यात येऊ लागली. संयोगी कुलपांना घड्याळाची जोड दिल्यामुळे तिजोऱ्यांची सुरक्षितता फार वाढली. ठराविक वेळीच म्हणजे बँक उघडल्यानंतर थोड्याच वेळात असे कुलूप उघडता येईल अशी सोय घड्याळाच्या साहाय्याने करण्यात आली. अशा काही रचनांत स्वतंत्र घड्याळे वापरतात.

बँकेतील तिजोरीला बसविलेल्या एका संयोगी कुलपाची अंतर्गत रचना आ. १४ (अ) व (आ) मध्ये दाखविली आहे. आ. १४ (अ) मध्ये तिजोरीच्या दरवाजाला (२) संयोगी कुलूप (१) बसविलेले दाखविले आहे व तिजोरीच्या तक्तपोशीत (४) घट्ट बसविलेले तीन घोडे (३) कुलपाच्या चाकापुढे आलेले दाखविले आहेत.

आ. ११. दाराच्या जाडीत बसवलेले कुलूप व दाराच्या पुढील भागातील किल्ली.आ. ११. दाराच्या जाडीत बसवलेले कुलूप व दाराच्या पुढील भागातील किल्ली.

आ. १४ (आ) मध्ये दरवाजावर (७) बसविलेल्या कुलपाचे भाग दाखविले आहेत ते असे : १, २, व ३ ही चाके फिरविण्यासाठी अनुक्रमे १, २ व ३ या आसांना बसविलेल्या मुठी; मुठीच्या मागे दरवाजावर पक्के बसविलेले व त्यावर आकडे खोदलेले चाक (६) दरवाजाच्या आत असलेल्या प्रत्येक फिरत्या चाकाला एकेक खाच (४, ४, ४) आहे व प्रत्येक चाकापुढे तिजोरीच्या तक्तपोशीत (८) घट्ट बसविलेले तीन घोडे (५, ५, ५) चाकांना लागून पुढे येतील असे दाखविले  आहेत. दरवाजावर घट्ट बसविलेल्या चाकावर १ पासून १२ पर्यंत आकडे खोदलेले आहेत. मूठ (१) घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवून ती १० आकड्यासमोर हळूहळू आणतात, ती १० आकड्यासमोर आल्याबरोबर कट्ट असा आवाज होतो. मूठ (२) फिरवून ती ११ आकड्यासमोर कट्ट असा आवाज होईलपर्यंत आणतात व नंतर मूठ (३) फिरवून ती १२ आकड्यासमोर वरीलप्रमाणेच आणतात. ही क्रीया होत असताना चाकांच्या खाचा घोड्यासमोर एका रेषेत येतात व दरवाजा उघडता येतो. चाकांच्या खाचा सरळ रेषेत असताना दरवाजा बंद करून दरवाजापुढील तिन्हीही मुठी थोड्याबहुत तशाच फिरवल्यावर खाचा निरनिराळ्या ठिकाणी जातात व कुलूप लागून दरवाजा उघडता येत नाही. १०, ११, १२ ह्या तीन संकेत आकड्यांऐवजी तबकडीवरील कोणतेही तीन आकडे घेऊन आतल्या चाकावरील खाचा सरळ रेषेत येतील अशी जुळणी करता येते. खाचा सरळ रेषेत आल्यावर कुलूप उघडता येते.

आ. १२. नेहमीच्या कुलपांचे दोन प्रकार व टेबलाच्या खणाला बसवावयाचे कुलूप.आ. १२. नेहमीच्या कुलपांचे दोन प्रकार व टेबलाच्या खणाला बसवावयाचे कुलूप.

तिजोऱ्या

जाड पोलादी पत्र्यांची बनवलेली, अतिशय जड व महत्प्रयासाने हलविता येणारी लहानमोठी कपाटे म्हणजे तिजोऱ्या होत. यांत मूल्यवान जिनसा, जडजवाहीर, महत्त्वाचे कागदपत्र,  रोकड रक्कम वगैरे अत्यंत सुरक्षितपणे ठेवता येतात. गरजेप्रमाणे यांचे लहान मोठे आकार उपलब्ध आहेत. दुकानात रोजची रोकड रक्कम ठेवण्यासाठी टेबलावर घट्ट बसवता येणारी एक लहान तिजोरीची पेटी वापरतात.

आ. १३. अक्षरे किंवा आकडे जुळवून उघडले जाणारे कुलूप : (अ) बंद, (आ) उघडलेले, (इ) अंतर्गत रचना.आ. १३. अक्षरे किंवा आकडे जुळवून उघडले जाणारे कुलूप : (अ) बंद, (आ) उघडलेले, (इ) अंतर्गत रचना.

या तिजोऱ्यांना लागणाऱ्या अंगच्या कुलपांना दोन किल्ल्या असतात. उघडताना पहिली नंतर दुसरी किल्ली लावावी लागते. बंद   करताना उलट्या क्रमाने किल्ल्या लावाव्या लागतात. दार उघडल्यानंतर पुन्हा आतल्या बाजूस महत्त्वाच्या जिनसा ठेवलेल्या कप्प्यालाही एक अंगचे कुलूप असते. तिजोरीच्या किल्ली जाण्याच्या भोकात स्फोटक पदार्थ घालून दरवाजे फोडण्यात आले असल्यामुळे मोठ्या तिजोऱ्यांना वर वर्णन केलेली संयोगी कुलपे वापरतात.

आगीपासून किंवा ज्योतिपासून बचाव होईल असाच धातू वापरून तिजोऱ्यांनी घडण करतात. कित्येक तिजोऱ्यांच्या रचनेत भोके पडणार नाहीत असाही कठीण धातू वापरतात.

भारतीय उद्योग

फार पूर्वीपासून इतर देशांप्रमाणे भारतातही कुलपे तयार होत असत. अर्थात ती जुन्या पद्धतीचीच असत. परंतु नवीन प्रकारची सुधारलेली कुलपे तयार करण्यास एकोणिसाव्या शतकातच सुरुवात झाली. सध्या कुलपे तयार करण्याची प्रमुख केंद्रे म्हणून पुढील निरनिराळ्या विभागांचा उल्लेख करता येईल.

आ. १४ (अ). बॅकेच्या तिजोरीच्या संयोगी कुलपाचा एक प्रकार.आ. १४ (अ). बॅकेच्या तिजोरीच्या संयोगी कुलपाचा एक प्रकार.

उत्तर विभाग : यात अलीगढ हे मुख्य केंद्र आहे. त्या खालोखाल दिल्ली, जलंदर, कपुरथळा, रुपाड, उदयपूर आणि जोधपूर या शहरांचा समावेश आहे. उदयपूर येथे पत्रित प्रकारची व मिलर प्रकारची कुलपे मोठ्या प्रमाणावर तयार होतात.

अलीगढमधील केंद्रात भारतात तयार होणाऱ्या एकंदर कुलपांपैकी शेकडा ६५–७५ टक्के उत्पादन होत आहे. १८५० च्या सुमारास पोस्ट खात्यानेच येथे कुलपे तयार करण्यास सुरुवात केली. इतर ठिकाणाहून कुलपे करणारे कसबी कारागीर येथे आणण्यात आले व कालांतराने त्यांनी दुसऱ्यांना या कलेत तरबेज केले. शहरात व त्याच्या आससपास हळूहळू कुलपांचे निरनिराळे भाग करण्याचे छोटछोटे कारखाने उभे झाले. या उद्योगात दोन वर्गांच्या लोकांचा समावेश होतो. एका वर्गांतील लोकांजवळ (यांना मध्यस्थ म्हणत) कुलपांच्या निरनिराळ्या भागांची जोडणी करून कुलपावर विद्युत् विलेपन करण्याची वा रंग देण्याची साधने व यंत्रसामग्री असे, तर दुसऱ्या वर्गातील लोक हे कारागीर असत. आपापल्या घरात हातांनी कुलपांचे निरनिराळे भाग ओतून, कानशीने साफसूफ करून पहिल्या वर्गातील लोकांकडे देत असत. अशा  तऱ्हेने हा उद्योग फार मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. तेथील इंडियन इंप्लिमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. मध्ये साधी कुलपे व अँकर प्रेसिंग प्रायव्हेट लि. ह्या कारखान्यात कातडी बॅगांना, पत्र्याच्या ट्रंकांना व इतर पेट्यांना लागणारी कुलपे मोठ्या प्रमाणावर तयार होतात. १९५१ साली उत्तर प्रदेश सरकारने या धंद्यात कुलपांची गुणवत्ता वाढावी व टिकावी या हेतूने एक कारखाना काढला असून त्यात कुलपे तयार करण्यात येतात आणि सर्व प्रकारच्या कुलपांची तांत्रिक परीक्षणाने गुणवत्ता ठरवली जाऊन गुणवत्तेच्या कसोटीस उतरलेल्या कुलपावर सरकारी शिक्का मारण्यात येतो. कुलपांचे तयार केलेले काही लहान भाग छोट्या कारखानदारांना विकले जातात.

दक्षिण विभाग : मद्रास शहर, दिंडीगल, धवलेश्वरम् व बंगलोर या ठिकाणी कुलपे करण्याचे कारखाने आहेत. मद्रास राज्याच्या सरकारने १९५७ साली, उत्तर प्रदेश सरकारप्रमाणेच, दिंडीगल येथे एक केंद्र स्थापन केले असून त्यात कुलपांचे उत्पादन, शिवाय त्यांची दुरुस्ती, त्याबाबत सुधारणा, त्यांना लागणाऱ्या हत्यारांची निर्मिती व धंद्याच्या वाढीस अवश्य असणारे तांत्रिक ज्ञान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑलविन मेटल वर्क्स, हैदराबाद (आंध्र प्रदेश), या कारखान्यात तिजोऱ्यांची कुलपे, सुटी व मोठी कुलपेही तयार करतात.

आ. १४ (आ). बँकेच्या तिजोरीच्या संयोगी कुलपाचा एक प्रकारआ. १४ (आ). बँकेच्या तिजोरीच्या संयोगी कुलपाचा एक प्रकार

पश्चिम विभाग : मुंबईमध्ये गोदरेज अँड बॉइस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. या मोठ्या कारखान्यात तिजोऱ्या, बँकेत असणारी सुरक्षित तिजोरी गृहे, कपाटे यांना लागणारी कुलपे तसेच सुटी लोखंडी व पितळी कुलूप तसेच खास प्रकारची कुलपे तयार होतात. याशिवाय इतर बरीच लहान उत्पादन केंद्रे मुंबईत आहेत.

पूर्व विभाग : कलकत्त्यात सुटी व मोठी कुलपे तयार करणारे व दाबून बंद होणारी कुलपे तयार करणारे कारखाने आहेत. हौरा जिल्ह्यातील बारगाचिया येथील कुटीर केंद्रांतून लाकडी कपाटांना, टेबलांच्या खणांना लागणारी अंगची कुलपे तयार करतात. जगत बल्लारपूर, दोमझूर, पतिहाल, सादतपूर व हनताल येथेही अशी कुटीर केंद्रे आहेत. बारगाचिया येथे सेंट्रल लॉक फॅक्टरी नावाचा एक सरकारी कारखाना असून तेथे मोठ्या प्रमाणात कुलपाचे विविध भाग तयार करून ते निरनिराळ्या कुटीर केंद्रांकडे जुळणी करून कुलपे तयार करण्यासाठी दिले जातात.

पश्चिम बंगाल सरकारनेही सर्व प्रकारच्या कुलपांची कसोटी घेण्याची, छाननी करण्याची व त्यांची गुणवत्ता ठरविण्याची व्यवस्था असलेला एक कारखाना काढला आहे. कुलपावर गुणवत्ता दर्शविणारा शिक्का कारखान्यातच मारला जातो.

लेखक : मा.ग.टोळे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate