অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अलेक्झांडर कॉल्डर

अलेक्झांडर कॉल्डर

अमेरिकन शिल्पकार व  चलशिल्पांचा प्रणेता. पेनसिल्व्हेनियातील फिलाडेल्फिया येथे एका कलावंत कुटुंबात जन्म. त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली (१९१५—१९) व काही काळ स्वतंत्र व्यवसाय केला. पुढे ‘आर्ट स्टुडंट्स लीग’ न्यूयॉर्क, येथे त्याने कलाशिक्षण घेतले (१९२३—२६). याच सुमारास नॅशनल पोलीस गॅझेटचा सुनिदर्शक (इलेस्ट्रेटर) म्हणून त्याने काम केले. फ्रान्समध्येही त्याचे दीर्घ काळ वास्तव्य होते. कॉल्डरने तारा व लाकूड यांचा वापर करून कळसूत्री खेळण्यांची छोटी सर्कस तयार केली (१९२६) व त्यामुळे तो प्रसिद्धीस आला.

तसेच तारेची व्यंगात्मक प्रतिमाशिल्पेही त्याने घडविली. १९२९—३२ या काळात त्याचा माँद्रीआन, मीरो, लेझे, आर्प इ. कलावंतांशी निकट संबंध आला व परिणामत: तो अप्रतिरूपतेकडे वळला. प्रारंभी त्याने तारेचा तसेच धातूच्या रंगीत पत्र्यांचा वापर करून अप्रतिरूप स्थिरशिल्पे तयार केली. अशा धातुशिल्पांना यंत्रचलित हालचालींची जोड देऊन त्याने शिल्पकलेच्या इतिहासातील पहिली चलशिल्पे तयार केली व १९३२ मध्ये त्यांचे प्रदर्शन भरवले.

या रंगीत चलशिल्पांना मार्सेल द्यूशांने ‘मोबाइल’ हे नाव दिले. क्षणोक्षणी पालटणारे विविध व आकर्षक आकार हे त्याच्या चलशिल्पांचे वैशिष्ट्य होय. पुढे त्याने नैसर्गिक वायुलहरींनी गती घेणारी चलशिल्पे निर्माण केली. ही चलशिल्पे छतास टांगलेली किंवा दांड्यास वा अन्य आधारास जोडलेली असत. त्याच्या उत्कृष्ट चलशिल्पांत लॉब्स्टर ट्रॅप अँड फिश टेल (१९३९), स्पाइरल (१९५८) इत्यादींचा समावेश होतो. १९५०—६० मध्ये तो पुन्हा स्थिरशिल्पांकडे वळला.

टिकेट विंडो  हे त्याचे एक उदाहरण. शिल्पांखेरीज त्याने रंगमंच-नेपथ्य, ग्रंथसुनिदर्शन इ. क्षेत्रांत कार्य केले. निमल स्केचिंग हे पुस्तकही त्याने लिहिले (१९२५).

संदर्भ : Sweeney, J. J. Alexander Calder, New York, 1951.

लेखक :श्री. दे. इमामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate