অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गांधार शैली

गांधार शैली

गांधार शैली : प्राचीन भारतातील गांधार देशात इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते इ. स. सु. पाचव्या शतकापर्यंत वास्तुकला, मूर्तिकला, कनिष्ठ कला यांची भरभराट झाली. या कलानिर्मितीस गांधार शैली ही सर्वसाधारण संज्ञा दिली जाते. ह्या प्रदेशाचा विस्तार सिंधू नदीच्या पूर्व व वायव्य खोऱ्यांपासून स्वात नदी व काबूल खोर्‍यापर्यंत पसरला होता. सध्या पाकिस्तानचा वायव्य भाग व अफगाणिस्तानचा कंदाहार ह्या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. वेदकाळापासूनच्या वाङ्‍मयात याचे उल्लेख सापडतात. ऋग्वेद, ब्राह्मणग्रंथ, महाभारत व बौद्धवाङ्‍मयातूनही याचा उल्लेख येतो. अलेवझांडरने इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस ह्या प्रदेशावर स्वारी केली. त्यानंतर हा प्रदेश काही दिवस ग्रीक क्षत्रपांच्या अंमलाखाली होता. पुढे मौर्य साम्राज्यात तो समाविष्ट झाला आणि त्यानंतर सिथियन, पार्थियन, कुशाण, शक, हूण इत्यादींच्या आक्रमणाला वेळोवेळी बळी पडला. बहुतेक परकीयांनी त्यात कलादृष्ट्या भर घातली; पण हूणांनी येथील वास्तूंची नासधूस केली. कुशाणांच्या काली त्यांचे साम्राज्य होते व कलेच्या क्षेत्रात– मुख्यत्वे मूर्तिकलेत– आमूलाग्र भरभराट झाली आणि तक्षशिला, पेशावर, बामियान, जलालाबाद, हड्डा, कपिशा, बेग्राम, उद्यान, तख्त-इ-बेहिस्तून, बलाहिस्सार, चार्सद, पलतुढेरी, गझ-ढेरी इ. स्थळे कलाकौशल्याची केंद्रस्थाने म्हणून विख्यात पावली.

वरील प्रदेशांतील कलेवर बहुविध राजवंशांनी अधिसत्ता गाजविल्यामुळे; तसेच रोमन व्यापाऱ्यांशी ह्या प्रदेशांचा संबंध आल्यामुळे, त्यांच्या भिन्न ज्ञापकांचा (मोटीफ) मूळ एतद्देशीय भारतीय कलेवर प्रभाव पडला आणि त्यातून एक संमिश्र वास्तुशिल्पशैली निर्माण झाली. ह्यातील ग्रीकांच्या प्रभावामुळे या पद्धतीस अनेक वेळा ग्रीक-बौद्धशैली म्हणूनही संबोधण्यात येते. येथील शिल्पांचा कालदृष्ट्या क्रम अनिश्चितच आहे. ह्या शैलीच्या बहुविध पैलूंची माहिती करून घेताना त्यांच्या भिन्न कालांतील निवडक अवशेषांचा परामर्श घेणे आवश्यक आहे. बीमरन येथील अवशेषमंजूषा ही सर्वांत प्राचीन म्हणजे इ. स. पू. ५० मधील असून, त्यानंतर पहिल्या शतकात उभ्या बुद्धाच्या दोन विशीर्ष मूर्ती लौडिया टांगाई (इ. स. ६) व हस्तनगर (इ. स. ७२) येथे सापडल्या. ह्याच काळात (७८–१००) कनिष्काची अवशेषमंजूषा शाह-की-ढेरी येथे मिळाली. शिवाय इतर काही मूर्तीही उपलब्ध झाल्या.

दुसऱ्या शतकातील काही चुनेगच्ची मूर्ती तक्षशिलेस सापडल्या आहेत. त्यांपैकी बहुतेक अपोत्थित शिल्पे आहेत. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या शतकांतील बहुतेक मूर्ती चुनेगच्चीच्या व चिकणमातीच्या असून दगडाचा वापर क्वचितच दिसतो. ह्यातील वस्तुनिदर्शक मूर्ती बहुतेक जाऊलियन व धर्मराजिक स्तूपांजवळील असून काही हड्डाजवळ सापडल्या आहेत आणि प्रत्येक वंशाने आपला काहीतरी कलात्मक वारसा येथे ठेवला, त्यामुळे साहजिकच या पद्धतीत नव्या कल्पनांचा व नव्या पद्धतींचा उदय झाला. मानवरूपी बुद्धाची मूर्ती बनविण्याची कल्पना येथेच प्रथम निघाली. संन्यस्त योग्याच्या स्वरूपातील भगवान बुद्धाच्या प्रतिमा नव्या प्रकाराने बनविण्यात आल्या. बुद्धाचे दर्शन अनेकविध योगमुद्रा धारण केलेल्या अवस्थेत घडविण्यात आले. त्याचप्रमाणे राजशाही पोषाख आणि अलंकार धारण केलेल्या बोधिसत्त्वादिकांच्या मूर्ती बनविल्या गेल्या. त्या तत्कालीन स्थानिक सत्ताधीशांचा आदर्श समोर ठेवूनच तयार केलेल्या असाव्यात. ह्या काळापर्यंत देवदेवतांचे स्वरूप ठराविक प्रतीकांच्या द्वारेच व्यक्त करण्यात येत असे. मानवरुपी मूर्ती घडविण्याची सुरुवात निश्चितपणे केव्हा झाली, हे ज्ञात नाही; परंतु इसवी सनाच्या पहिल्या शतकात बुद्धाच्या मूर्तीस इथेच प्रारंभ झाला असावा, असे बहुतेक तज्ञांचे मत आहे.

ग्रीकांच्या अमदानीत ही शैली जन्मास आली आणि कुशाणकालात कुशाण राजांच्या आश्रयाने तिची भरभराट झाली. त्यामुळे भारतीय पारंपरिक मुद्रा व ठेवण, पोषाख, हावभाव आणि देवत्वनिदर्शक चिन्हे ह्या सर्व गोष्टी जरी संपूर्णपणे भारतीय आहेत, तरीही एकूण ह्या कलाशैलीवर ग्रीक कलेची छाप पडलेली प्रामुख्याने दृष्टोत्पत्तीस येते. भगवान बुद्धाप्रमाणेच धर्माचा उपदेश आणि प्रसार करण्यासाठी आणि शांतिप्रस्थापनेसाठी बोधिसत्त्वादिक अवनीतलावर अवतरले, अशी बौद्धपुराणग्रंथातील कल्पना आहे. साहजिकच बुद्धाच्या आणि बोधिसत्त्वादिकांच्या गांधार शैलीत घडविलेल्या सर्व मूर्तींवर देवत्वाचे प्रतीक मानले गेलेले उर्ण्य चिन्ह आहे, क्वचित मंदिलही (उष्णिश) दिसतो. मैत्रेयाला भरदार मिशा दाखविण्यात आलेल्या आहेत आणि विशिष्ट नक्षी कोरलेल्या कडीचा एक जाड हार त्याच्या गळ्यात आहे. बहुतेक बुद्धमूर्तींचे शिर अपोलो ह्या ग्रीक देवतेच्या मूर्तीप्रमाणे मृदू, मांसल आणि यौवनपूर्ण घडविलेले आढळते, तसेच यक्षकुबेरादी मूर्तींचे झ्यूसशी साम्य असून ग्रीक देवतांच्या मूर्तींचे साम्य बुद्धसंत व भिक्षूंच्या विविध मूर्तींत आढळते. वस्त्राची पारदर्शकता व ठेवण, केशरचना, शरीरसौष्ठव हा ग्रीक प्रभाव मानला, तरी हस्तमुद्रा, ध्यानस्थ भाव या गोष्टी हिंदुपंरपरेतील आहेत. एवढेच नव्हे, तर मूर्ती घडविण्याचे तंत्र, शैली आणि शिल्पांच्या कथा पूर्णतः भारतीय आहेत. परंतु एकूण मूर्तिकलेचा कल लालित्यापेक्षा वास्तवतेकडे अधिक झुकत आहे, असे वाटते. डौलदार, प्रमाणबद्ध शरीर म्हणजेच परमेश्वर, ही ग्रीक कल्पना या शिल्पांत भासमान होते.

गांधार शैलीतील मूर्ती पाषाणाच्या, त्याही सुभाजा (शिस्ट) ह्या दगडाच्या बनविलेल्या आहेत; परंतु एकंदरीत पाषाणाचा उपयोग कमी प्रमाणात केलेला आढळतो. त्या सर्वांमधून भव्यता दृष्टोत्पत्तीस येते. या बुद्धाच्या आणि बोधिसत्त्वादिकांच्या सुभाजा दगडातील कौशल्यपूर्ण कोरीव काम केलेल्या भव्य मूर्ती जवळजवळ त्रिमितियुक्त आहेत. ह्यांशिवाय मृत्स्नाशिल्पे, चुनेगच्चीच्या मूर्ती, हस्तिदंती व धातूंच्याही मूर्ती येथे भरपूर प्रमाणात आढळल्या आहेत. कपिशा येथील लहान मृत्स्नाशिल्पे व हस्तिदंती मूर्ती नाजूक व अप्रतिम आहेत. गांधारमधील शिल्पकार मातीच्या मूर्ती उन्हात वाळवून तयार करीत असावेत आणि नंतर त्यांवर चुनेगच्ची किंवा पक्कमृदेची शिरे बसवीत असावेत. ही शिरे बहुधा साच्यातून काढली गेली असावीत, असे अनुमान अशा प्रकारच्या बऱ्याच शीर्षशिल्पांवरून करण्यात आले आहे. पुष्कळशी उपलब्ध शीर्षशिल्पे व्यक्तिचित्रणाचे उत्कृष्ट व कलात्मक नमुने आहेत, ह्यात संदेह नाही. बुद्धाच्या ह्या शीर्षशिल्पांत लयपूर्ण व प्रवाही केशकलाप व चेहऱ्याच्या विविध अवयवांची सुडौल व हृद्य घडण यांवर असलेला ग्रीक-रोमन कलेचा प्रभाव स्पष्टपणे प्रतीत होतो. केसांचे कुरळे गोल झुपके, पिळदार व प्रमाणबद्ध शरीरयष्टी व अंगावर खूप चुण्या असलेली पारदर्शक तलम वस्त्रे, ही मूळ ग्रीक असावीत. व्यक्तिचित्रणात भरदार मिशा दर्शविणे, हे गांधार शैलीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

गांधार शैलीतील बुद्ध, मैत्रेय, वज्रपाणी, शाक्यमुनी, यक्ष, कुबेर, पांचिक इ. पुरुषांच्या आकृतींप्रमाणेच स्त्रियांच्याही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मायादेवी, हरिती, मदिरादेवता, यक्षी, अप्सरा इ. स्त्रियांच्या मूर्ती, त्यांचा पोषाख, अलंकार वगैरेंमध्ये भारतीय छटा दिसते, तर त्यांची शारीरठेवण, आविर्भाव, मुद्रा ह्यांवर पाश्चात्त्य प्रभाव आढळतो. एवढेच नव्हे, तर गांधार शैलीतील धुंद झालेले भक्तगण, पुरुषाकृती स्तंभ, मालाधारी स्त्री-पुरुषाकृती तसेच कॉरिंथियन पद्धतीची स्तंभशीर्षे, काही रचनाबंध वगैरे परकीय ज्ञापकांनी विभूषित झालेले दिसतात. ही सर्व शिल्पे भारतीय शिल्पकारांनी ग्रीकांकडून शिकून घेऊन खोदविली किंवा येथे आलेल्या ग्रीक शिल्पकारांनी ती घडविली, ह्याविषयी काहीच माहिती ज्ञात नाही.

गांधार शैलीतील काही वैशिष्ट्यपूर्ण नमुने अद्यापि गांधार देशातील विविध अवशेषांत पाहावयास सापडतात. तक्षशिलेजवळचा कनिष्काचा स्तूप अद्यापही त्या कलेच्या भव्यतेची साक्ष देतो. ह्याशिवाय भारतातील विविध पुरातत्त्वविषयक वस्तुसंग्रहालयांतून तसेच तक्षशिला, पेशावर, लाहोर, बॉस्टन, लंडन इ. ठिकाणच्या ख्यातनाम वस्तुसंग्रहालयांतून गांधार शैलीचे विविध नमुने आढळतात. यांतील त्रिरत्‍न-बुद्ध, यक्ष-चेतना, पांचिका-हरिती, कमळात बसलेली माया, स्तूप पूजा, बोधिवृक्ष, शुद्धोदनाची यात्रा, कुभण्ड, प्रवासी युगुलांचे शिल्पांकन असलेली प्रसाधनतबके; तसेच मदिराप्राशन, सागरदेवता वगैरेंची तबके, अॅफ्रोडाइटी व सपक्ष देवमूर्ती, स्त्रियांच्या असंख्य मूर्ती, स्त्री व पुरुषाकृती, तीरशिल्पे, गौतम, डायोनिसिअस, हार्पोक्रेटस आणि बुद्धाच्या व वोधिसत्त्वादिकांच्या विविध ठेवणींच्या, बहुविध आविर्भावांच्या असंख्य मूर्ती गांधार शिल्पकलेची विविधता व आगळेपणा विशद करतात. ह्याशिवाय दीपंकर जातक, छंदकिन्नर जातक, उलूक जातक, कच्छप जातक, श्याम जातक, विश्वंतर जातक इ. अनेक जातकादी कथांतून तसेच बौद्ध धर्मग्रंथांतून वर्णिलेल्या बुद्धजीवनातील तथाकथित अनेक प्रसंगांचे शिल्पांकन केलेले येथे आढळते. एवढेच नव्हे, तर देवदेवता, यक्ष, यक्षी, अप्सरा ह्यांच्याही मूर्ती त्यात आढळतात. गांधार शैलीतील काही प्रसंग, मूर्ती व इतर अलंकृत रचनाबंध इतरत्र आढळत नाहीत. उदा., मायादेवीच्या जवळून प्रकट होणारा अर्भकरूपी सिद्धार्थ किंवा नांगरटीच्या समारंभप्रसंगी उत्पन्न झालेले वृक्षाखालील मायाजळ ही शिल्पे सर्वार्थाने वेगळी असून अप्रतिम आहेत; तसेच भारविजय आणि बुद्धनिर्वाण ही गांधारशिल्पे उदात्त कलेची साक्ष पटवितात.

वास्तुशैली : गांधार वास्तुशैलींपैकी फारच थोडे अवशेष सध्या गांधार देशात अवशिष्ट आहेत आणिमूर्तिकलेच्या तुलनेने हे अवशेष फारच गौण आहेत. त्यांत बौद्ध स्तूप व मठ, आयोनिक स्तंभ व स्तंभशीर्षे, कॉरिंथियन स्तंभशीर्षे, पर्सेपलिटन स्तंभशीर्षे, अग्‍निकुंडे, सुर्ख कोतालचे भव्य अग्‍निमंदिर, जांदिअलचे मंदिर, खेरखानेहचे सूर्यमंदिर, लष्करी मनोरे किंवा वर्तुळाकार बुरुज, सिर्कापचा राजवाडा वगैरे महत्त्वपूर्ण वास्तूंचा समावेश होतो. बहुतेक वास्तू बौद्ध वास्तुशैलीत उभारलेल्या आहेत. त्यांपैकी जांदिअलचे मंदिर इ. स. पू. दुसऱ्या शतकातील असून ते पारशी धर्माचे असावे. त्याच्या वास्तुशैलीत इराणी प्रभाव (उदा., त्याचा १२ मी. उंचीचा मनोरा) जरी स्पष्टपणे दिसत असला, तरी दर्शनी भाग व विधान अभिजात ग्रीक वास्तुशैलीचा प्रभाव दर्शवितात. त्यामुळे ग्रीक-इराणी वास्तुशैलीचे हे मिश्रण असावे, असे काही तज्ञांचे मत आहे; तसेच तक्षशिलेतील सिर्कापचा राजप्रासाद भव्य असून त्यास दोन सभागृहे आहेत. त्याचे विधान अॅकिमेनिडी वास्तुपद्धतीचे आहे. सतराव्या-अठराव्या शतकांतील मोगल बादशाहांनी आपल्या राजवाड्यांच्या बांधणीत त्याचे अनुकरण केलेले आढळते. सुर्ख कोतालचे अग्‍निमंदिर व खैरखानेहचे सूर्यमंदिर ह्यांची रचना मिश्रपद्धतीची आहे. त्यावर इराणी व ग्रीक अशा दोन्ही छटा दिसतात. लष्करी वास्तूंवर मुख्यतः रोमन छाप पडलेली असावी. तथापि त्यात स्थानिक परिस्थित्यनुसार काही किरकोळ फेरबदल झालेले दिसतात.बामियान येथील अष्टकोनी अंतर्गृहाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून तेथेही इराणी, रोमन व बायझंटिन छाप आढळते.

बौद्ध वास्तूंमधील स्तूप व बौद्ध मठ ह्यांत मिश्रवास्तुशैली असून त्यांतील रूपणकला मुख्यत्वे स्तूपांच्या कठड्यांवरील व तोरणांवरील अलंकृत रचनाबंधात दिसते. ह्या काळात अर्धवर्तुळाकृती स्तूपांची रचनाअधिक उन्नत दिसते. पेशावरजवळील शाह-की-ढेरी येथील कनिष्काचा स्तूप हे त्याचेच एक उत्तम उदाहरण होय. त्याचे विधान क्रूसाकार असून त्याच्या कोपऱ्यांवर गोलाकार प्रबलनांची (रीइन्फोर्समेंट) योजना केलेली आहे. रुंदी ९५ मी. व उंची ८३ मी. असून तेरा काष्ठवेदिकांमुळे एकंदर उंची पुन्हा वाढली आहे. फाहियान (चौथे शतक) ह्यासंबंधी लिहिताना म्हणतो, ‘भारतीय उपखंडात एवढा उंच दुसरा स्तूप नाही’. ह्याशिवाय गांधार देशाच्या परिसरात गोलाकार विधानांचे असंख्य स्तूप त्या काळात उभारण्यात आले. त्यांपैकी बरेच पडले वा नष्ट झाले असले, तरी अवशिष्ट स्तूपांत धर्मराजिक, मोहरा मोरादू, जामलगर्ही, मणि-किअला वगैरे काही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. संकल्पस्तूपांचीही कल्पना गांधार देशात प्रचलित होती. तख्त-इ-बेहिस्तून, मोहरा मोरादू, जाऊलियन वगैरे काही संकल्पस्तूपांभोवती बौद्ध मंदिरांची रेलचेल असून त्यांत बौद्ध भिक्षूंच्या निवासांसाठी खोल्या बांधलेल्या दिसतात. मंदिरांवर अर्धवर्तुळाकृती घुमटांची रचना केलेली आहे. ह्या सर्व बौद्ध वास्तूंच्या रचनेची मूलभूत कल्पना आणि प्रेरणा भारतीय असली, तरी त्यांच्या विकसनावस्थेत हळूहळू अभिजात पार्थियन वास्तुकलेची छाप पडलेली दिसून येते. गांधार शैलीच्या अखेरच्या काळात स्तूपांभोवतीच्या मंदिरांना मूळ वास्तूपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसते.

चित्रकला व कनिष्ठ कला : गांधार देशातील फारच थोडी चित्रकला आजमितीस उपलब्ध आहे आणि हड्डा, बामियान, मिरान वगैरे काही ठिकाणच्या भित्तिचित्रांतून ती दृष्टोत्पत्तीस येते. त्यांमधील उभी बुद्धमूर्ती व वेदिकेवरील बुद्धप्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रंगकामाचे तंत्र व शैलीभारतीय असली, तरी त्यावर पाश्चात्त्य कलेची छाप आढळते व तीही मुख्यतः रोमन व बायझंटिन कल्पनांची आहे. फोंडुकिस्तान व कक्राक येथील चित्रकलेवर इराणी छाप दिसते.कनिष्ठ कलांमध्ये ब्राँझ व सुवर्ण ह्यांच्या मूर्ती आहेत. ह्यांतील आरसा घेतलेली तरुणी रोमच्या व्हीनसची प्रतिकृती असावी, असे काही तज्ञांचे मत आहे.

गांधार शैलीने शिल्पकलेच्या इतिहासात आमूलाग्र बदल केला आणि त्यातून एक नवीनच संप्रदाय उदयाला आला. गांधार शैलीतील भव्यता, वैविध्य आणि त्यांवरील परकीय संस्कार ह्यांमुळे कलेतिहासात तिला वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. तथापि ह्या कलेत ग्रीकांची अभिजातता किंवा मौलिकता आढळत नाही वा गुप्तकाळातील सौष्ठव व सफाईदारपणा दिसत नाही. तरीही निळसर करडा-सुभाजा जातीचा दगड, चुना किंवा चिकणमाती ही सर्वसाधारण माध्यमे आणि ग्रीकरोमन शैलींचा प्रभाव या खास वैशिष्ट्यांमुळे इतर भारतीय शिल्पांहून गांधार शैलीचा आगळेपणा सहजपणे प्रत्ययास येतो.

संदर्भ : 1. Hallade, Madeleine; Trans. Imber, Diana, The Gandhara Style and the Evolution of

Buddhist Art, London, 1968.

2. Ingholt, H.; Lyons, I. Gandharan Art in Pakistan, New York, 1957.

3. Marshall, Sir John, The Buddhist Art of Gandhara, Cambridge, 1960.

4. Rowland, Benjamin Jr., Gandhara Sculpture From Pakistan Museums, New York, 1960.

5. Saraswati, S. K. A Survey of Indian Sculpture, Calcutta, 1957.

6. Sarkar, H. Studies in Early Buddhist Architecture of India, Delhi, 1966.

लेखिका सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate