অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोमटेश्वर

गोमटेश्वर

गोमटेश्वर  जैनांची एक उपास्य देवता. वृषभनाथ (ऋषभनाथ) या आद्य जैन तीर्थंकराचा गोमटेश्वर हा पुत्र. गोमटस्वामी व बाहुबली या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. त्याची पारंपरिक कथा अशी : वृषभनाथाने आपले राज्य भरत व बाहुबली या दोन मुलांत विभागून संन्यास घेतला. कालांतराने भरत दिग्विजयासाठी निघाला. बाहुबलीने त्याला विरोध केला. तो म्हणाला, ‘मी गुणांचा उपासक आहे. गुणांपुढे मी नम्र होईन. सार्वभौम म्हणविणाऱ्या कोणापुढेही होणार नाही. एवढेच नव्हे, तर मोठ्या भावासमोरही मी नम्र होणार नाही’ त्यामुळे दोघांत युद्ध पेटले, पण मानवसंहार टाळण्याकरिता त्यांनी द्वंद्वयुद्ध करण्याचा निर्णय घेतला. दृष्टियुद्ध, जलयुद्ध आणि मल्लयुद्ध यांत भरताचा पराजय झाला. अखेर त्याने आपले चक्र सोडले, पण तेही बाहुबलीने परतवले. एवढे होऊनही सर्व राज्य त्याने भरतास दिले आणि स्वतः तपासाठी निघून गेला. अनेक वर्षे तप करूनही त्यास मुक्ती मिळेना, तेव्हा भरत चिंताग्रस्त झाला. त्याने वृषभनाथास याचे कारण विचारले, तेव्हा त्याने सांगितले, की ‘तुझ्या राज्यात तो तप करीत आहे, हे शल्य डाचते. त्यामुळे त्याची तपसिद्धी फलद्रूप होत नाही’. म्हणून भरताने ‘ही पृथ्वी कोणाचीच नाही, तू मनातील शल्य काढून टाक’  असे सांगितले. हे बाहुबलीने मान्य केल्यावर त्यास केवल ज्ञान प्राप्त झाले. अशा या तेजस्वी महापुरुषाच्या लहानमोठ्या असंख्य मूर्ती भारतभर विखुरलेल्या आहेत. उपलब्ध मूर्तीत पहिली ब्राँझ धातूची असून ती सहाव्या शतकातील आहे. तिची उंची अर्धा मी. असून पाद व बाहू लतापत्रांनी वेष्टित आहे. तिच्या उभट गोल चेहऱ्यावर आध्यात्मिकतेची प्रभा दिसते. जटा पाठीवर व काही खांद्यांवर विखुरल्या आहेत. या मूर्तीचे स्थळ ज्ञात नाही. तथापि तिची तुलना सातव्या शतकातील बादामीच्या गुहेतील पाषाणमूर्तीशी करता येईल. वेरुळच्या इंद्रसभा लेण्यातील दक्षिण भिंतीवर खोदलेली बाहुबलीची मूर्ती आठव्या शतकातील असून, तिच्याच धर्तीची पण थोडी वेगळी मूर्ती देवगढ येथील शांतिनाथ मंदिरात आढळते. या मूर्तीच्या अंगावर वेली व नाग यांव्यतिरिक्त इतर प्राणी दिसतात. ही नवव्या शतकातील असावी. या सर्व तुलनात्मक दृष्ट्या लहान मूर्ती आहेत. गोमटेश्वराच्या भव्य मूर्ती मात्र कर्नाटकात आढळतात. त्यांपैकी श्रवणबेळगोळ येथील ९८३ मध्ये खोदलेली मूर्ती प्रचंड असून ती सु. १८ मी. उंच आहे. कारकल व वेन्नुर येथील मूर्ती अनुक्रमे १४८१ व १६०३ मधील असून त्या अनुक्रमे सु. १२·५ मी. व ११ मी. उंच आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोजजवळ गोमटेश्वराच्या अशाच एका ६ मी. उंचीच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अलीकडे (जून १९७५) आग्रा येथेही एका भव्य गोमटेश्वराच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून तिची उंची सु. १४ मी. आहे.

या सर्व मूर्ती सामान्यपणे सारख्या घाटाच्या व समान भाव दर्शविणाऱ्या आहेत. श्रवणबेळगोळ येथील मूर्तीचाच आद्य नमुना पुढे ठेवून त्या घडविलेल्या आहेत; कारण ही मूर्ती कालदृष्ट्या प्राचीन असून अधिक

उठावदार व कलात्मक आहे. कर्नाटकातीलच नव्हे, तर सर्व भारतातील एक अतिभव्य शिल्पकृती म्हणून तिचा गौरव केला जातो. ही शिल्पकृती राछमल्ल या गंग राजाच्या कारकीर्दीत त्याच्या पत्नीच्या आग्रहास्तव चामुंडराय या मंत्र्याने करविली आणि तत्कालीन कलाकारांनी विंध्यगिरी किंवा स्थानिक लोकांत रूढ असलेल्या दोडाबेट्टा किंवा इंद्रगिरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वतावर एकसंघ पाषाणात ती खोदली. या मूर्तीचा रंग भुरका असून ती समभंग अवस्थेत उत्तराभिमुख उभी आहे. तिचा प्रत्येक अवयव घाटदार व प्रमाणबद्ध दिसतो. दिगंबर असूनही मूर्तीच्या चेहऱ्यावर लज्जाभाव किंवा डोळ्यात वासना दिसत नाही. ध्यानमग्न डोळे, कुरळे केस, किंचित वर उचललेली हनुवटी, विशाल छाती, रुंद खांदे, आजानुबाहू ही शरीर वैशिष्ट्ये अत्यंत कुशलतेने घडविलेली असून ओठांवरील स्मितहास्य गूढरम्य वाटते. त्याच्या कमरेपर्यंत दोन्ही बाजूंस वारूळे दर्शविलेली असून त्यांतून फणिधारी सर्प फूत्कार करीत आहेत, तिथूनच दोन वेली वाढून त्यांनी गोमटेश्वराच्या मांड्यांना विळखा घातल्याचे दाखविले आहे. यांवरून त्याच्या तपश्चर्येची खडतरता, मनोनिग्रह व एकाग्र चित्त यांचा प्रत्यय येतो. पुतळ्याला कसलेच आच्छादन किंवा छत्र नाही. तथापि कित्येक वर्षे ऊन, वारा, पाऊस यांमध्ये न्हाऊनही या शिल्पाचे सौंदर्य तीळमात्रही कमी झालेले नाही. दक्षिण भारतातील अतिभव्य अशा गंग शिल्पशैलीचा उत्कृष्ट व परिपक्व असा आविष्कार गोमटेश्वराच्या या मूर्तीत झालेला आढळतो.

मूर्तीच्या डाव्या पायाशेजारी एक शिलालेख आहे. त्यात देवनागरी लिपीत, मराठीत दोन ओळी खोदल्या आहेत. तो मराठीतील प्राचीन शिलालेखांपैकी एक मानण्यात येतो. त्यातील ‘श्री’ हे अक्षर सु.अर्धा मी. उंचीचे आहे.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate