অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घनवाद

परिचय

(क्यूबिझम). एक आधुनिक कलासंप्रदाय. वस्तूचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न न करता, वस्तुपृष्ठांच्या पृथःकरणापासून मिळालेल्या वेगवेगळ्या आकारपृष्ठांच्या आधारे केवळ चित्रकृतीस योग्य अशी रचना स्वतंत्रपणे करणे व त्याबरोबरच वस्तूचा रंग गौण मानून फक्त चित्रकृतीस आवश्यक अशी रंगसंगती साधण्याचा प्रयत्न करणे, या घनवादी चित्रशैलीतील महत्त्वाच्या गोष्टी.

घनवादी चित्रणाचे बीजारोपण

घनवादी चित्रणाचे बीजारोपण पॉल सेझान (१८३९–१९०६) या चित्रकाराने केले, असे मानतात. सृष्टीतील वस्तूंमध्ये सर्वत्र आपणास घनाकार दिसतात, असे त्याने म्हटले होते. त्याने वस्तूच्या आकार- घडणीच्या आणि चित्रात प्रतिबिंबित होणाऱ्या या आकारांच्या सुसंवादित्वाचा स्वतंत्रपणे विचार केला. १९०७ मध्ये भरविण्यात आलेल्या त्याच्या समग्र कलाकृतींच्या प्रदर्शनामधून ही जाणीव प्रकर्षाने झाली आणि तिचा नव्या पिढीच्या चित्रकारांवर फार खोलवर परिणाम झाला. त्यानंतर मातीस व आंद्रे दरँ यांनी चित्रातील रंगपृष्ठाविषयी पद्धतशीर अभ्यास सुरू केला. पाब्लो पिकासोने (१८८१–१९७३) आपल्या Les Demoiselles d’ Avignon (१९०७) या चित्रात वातावरणाचा आभास टाळून, तासलेल्या पृष्ठांसारख्या दिसणाऱ्या मनुष्याकृती रंगविल्या. येथून घनवादी निर्मितीस चालना मिळाली. पुढे आदिम कला व निग्रो शिल्पे यांचाही घनवादी चित्रकारांवर परिणाम झाला. १९०८ साली लुई व्हाक्सेल्स ह्या कलासमीक्षकाने मातीसच्या एका चित्राविषयी लिहिताना प्रथम ‘क्यूब्स’ या शब्दाचा वापर केला यावरूनच ‘क्यूबिझम’ ही संज्ञा रूढ झाली. चित्रकारांनी जरी तिचा स्वीकार केला, तरी ‘आम्ही एखादे नवीन तंत्र रूढ करण्याच्या इराद्याने चित्रे रंगवीत नसून, आमच्या चित्रांमधून आम्ही आमच्या चित्रनिर्मितिविषयक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत’, असे त्यांचे प्रतिपादन होते.

घनवादी शैलीचे स्वरूप

घनवादी शैलीचे स्वरूप पुढे हळूहळू बदलत गेले. लांबी, रुंदी आणि जाडी या तीन परिमाणांनी वस्तूच्या घनाकाराला बहुपृष्ठत्व येते. साधा चौरस घन घेतला, तरी त्याला किमान सहा पृष्ठे असतात. सृष्टीतील माणसे, पशू, पक्षी, प्राणी, दगड, झाडे अशा अनंत वस्तूंची जडणघडण अशा प्रकारच्या बहुविध व संमिश्र घनाकारांनीच झालेली असते. या घनाकारांची दृश्यपृष्ठे जेथे एकत्र मिळतात; त्या ठिकाणी आपणास रेषात्मक कंगोरे दिसतात. कंगोऱ्याच्या या रेषा वास्तव चित्रणशैलीत महत्त्वाच्या मानल्या गेल्या नाहीत. पण वस्तूच्या दृश्य घडणीवर भर देणाऱ्या सेझानने त्या ठळक करून त्यांवर भर दिला. पुढील अवस्थेत या पृष्ठांचे विश्लेषण होऊन ती अलग करण्यास सुरुवात झाली. मूळ वस्तूशी असलेले त्यांचे साधर्म्य कमी होऊन, चित्राच्या पार्श्वभूमीशी ती एकजीव होत गेली. यानंतरच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये केवळ वेगवेगळ्या वस्तुनिरपेक्ष आकारपृष्ठांच्या संश्लेषणातून चित्रनिर्मिती झाली व असे करताना कागदाचे कपटे, कापड, लाकूड अशांसारख्या वस्तूही चित्रफलकावर चिकटविण्यात आल्या. ही प्रक्रिया चिक्कणितचित्रण (कोलाज) म्हणून ओळखली जाते. पुढील दोन अवस्थांचे प्रणेते प्रामुख्याने झॉर्झ ब्राक (१८८२–१९६३) व पिकासो हे होते.

घनवादामुळे चित्रकलेत प्रस्थापित झालेली काही महत्त्वाची तत्त्वे

घनवादामुळे चित्रकलेत काही महत्त्वाची तत्त्वे प्रस्थापित झाली : केवळ वातावरणाचा दृश्य भास निर्माण करणाऱ्या दृक्‌प्रत्ययवादी रंगपद्धतीमुळे वस्तुघडण व पर्यायाने आकृतिघडण दुर्लक्षित झाली होती. तीवर भर देणे आवश्यक होते. शिवाय दृक्‌प्रत्ययवादी चित्रणात प्रकाशजाणिवेसाठी रंगाचा उपयोग करण्यात आला होता. त्याऐवजी रंगाकडे निखळपणे रंग म्हणून पाहणे आवश्यक होते. चित्रातील विषयाचे भासमान स्वरूप महत्त्वाचे नसून, चित्र ही एक स्वयंपूर्ण कलाकृती आहे व तिच्या रचनात्मक ऐक्याला महत्त्व आहे.

घनवादाच्या भरभराटीचा काळ

घनवादाच्या भरभराटीचा काळ साधारणतः १९०७ ते १९१४ असा मानला जातो. या संप्रदायाचे प्रमुख केंद्र पॅरिस हे होते. पिकासो, ब्राक, ग्रीस, लेझे, दलोने, पीकाब्या, मार्कूसी, लीपशीत्स, द्यूशां-व्हीयाँ, ग्लेझ इ. या संप्रदायातील प्रमुख कलावंत होत. भारतामध्ये या चित्रशैलीचा अवलंब करणारे कलावंत गगनेंद्रनाथ टागोर व जहांगीर साबवाला हे होत.

१९१४ नंतर घनवादाचा प्रभाव कमी होत गेला असला, तरी घनवादाने प्रस्थापित केलेले चित्रकृतीच्या स्वायत्ततेचे तत्त्व सर्वमान्य झाले आहे व त्यामुळे लाभलेल्या निर्मितिस्वातंत्र्यातून उत्तरकालीन कलावंतांनी रचनावाद, नवरूपणवाद, अप्रतिरूप चित्रण अशांसारख्या नव्या चित्रशैली निर्माण केल्या.

लेखक : बाबुराव सडवेलकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate