অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिकणरंग चित्रण

टेंपेरा

चित्रे रंगविण्याची अनेक माध्यमे आहेत. त्यांपैकी काही माध्यमांमधून रंगविलेल्या चित्रांत रंगलेपनाचा अंतिम थर कोरडा व न चकाकणारा दिसतो. या प्रकारास चिकणरंग चित्रण असे म्हणतात. पारदर्शक जलरंगपद्धतीचा समावेश यामध्ये केला जात नाही. चिकणरंग चित्रणाचा महत्त्वाचा गुण म्हणजे रंग खलविण्याकरिता वापरण्यात आलेले माध्यम हे रंगलेपनाचे साधन म्हणून उपयोगात आणले जाते. चिकणरंग चित्रणातील रंगलेप जलरंगाप्रमाणे संपूर्णपणे पारदर्शक नसतात आणि तैलरंगाप्रमाणे प्रकाशाचे परावर्तन करणारेही नसतात. हे रंग चित्रपृष्ठ काहीशा घन स्वरूपात आच्छादून टाकतात. चिकणरंग कोणत्याही स्थितीत शाश्वत टिकणारे असतात. जलरंगाप्रमाणे ते फिकट होत जात नाहीत व तैलरंगाप्रमाणे धुरकट किंवा पिवळट पडत नाहीत. तसेच कालांतराने त्यांना तडेही जात नाहीत.

गेसो

चिकणरंग चित्रण एका विशिष्ट प्रकारच्या स्तरावर केले जाते; त्यास ‘गेसो’ असे म्हणतात. प्लॅस्टर वा खडूची पूड गोंदाशी एकजीव करून त्याचा लेप ज्या आधारफलकावर चित्र बनवावयाचे असते (उदा.,  कॅन्‌व्हास, कडक पुठ्ठा व फळी, सिमेंट-पत्रा किंवा भिंत) त्यावर दिला जातो. त्यामुळे चित्रपृष्ठ हव्या त्या प्रमाणात गुळगुळीत व रंग शोषणारे बनविता येते. चिकणरंगाचे पहिले थर पातळ व पारदर्शक द्यावे लागतात आणि हळूहळू त्यात जाडपणा वाढवावा लागतो. जाड थरांवरही पुन्हा पारदर्शक थर देता येतो आणि त्यामुळे रंगच्छटांचा गहिरेपणा वाढत जातो. चिकणरंग चित्रणाइतकी रंगच्छटांची विविधता दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळविता येत नाही.

चिकणरंग चित्रणाच्या व्याख्येविषयी पूर्वीपासून बरेच मतभेद आढळतात. हेराक्लायस या मध्ययुगीन टीकाकाराच्या मते रंग पाण्याबरोबर वाटून नंतर त्यात गोंद किंवा अंड्याचा बलक एकजीव खलवून त्याचे लुकण तयार करावे. अशा प्रकारे बनविलेले जाड रंग हव्या त्या प्रमाणात पाण्यात पातळ करून चित्रामध्ये भरावे. चेन्नीनी व लोमॅझो या चित्रकारांचेही तेच मत होते. परंतु त्यानंतर व्हाझारी या टीकाकाराने मात्र तैल रोगणासकट सर्व प्रकारच्या माध्यमांना चिकणरंग हीच संज्ञा दिली व त्यामुळे चित्रणपद्धतीविषयी बरेच गैरसमज निर्माण झाले. व्हान आयिक या चित्रकाराने तेल व अंड्याचा बलक यांच्या पायसामधून (एमल्शन) चित्रे रंगविली. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात मानतेन्या व बोत्तिचेल्ली या इटालियन चित्रकारांनी चिकणरंग रंगलेपनावर रेझिन-तैल रंगांचाही मुक्तपणे वापर केला.

चित्रणपद्धती

आज सर्वसाधारणपणे रूढ असलेली चिकणरंग चित्रणपद्धती अशी : रंगाची वस्त्रगाळ पूड करून ती पाण्याबरोबर एकजीव वाटून तिचे लुकण तयार करतात व ज्या माध्यमामधून (अंडे, दूध, गोंद, वनस्पतीचा चीक इ.) रंगलेपन करावयाचे, ते माध्यम पाण्यात पातळ करून रंगात मिसळतात. नंतर हव्या त्या प्रमाणात रंगात पुन्हा पाणी मिसळतात. रंगाची पूड सरळ माध्यमात घोटण्याचीही पद्धत आहे. रंग पातळ करण्याकरिता पाण्याव्यतिरिक्त मद्य, बिअर, चुन्याची निवळी (भित्तिचित्रणासाठी), ऑक्स गॉल यांसारखी इतरही द्रव्ये वापरतात. त्यामुळे रंग अधिक सहजतेने हाताळता येतात. अंड्यामध्ये करावयाच्या चिकणरंगामध्ये अंड्यातील पिवळ्या बलकाचा उपयोग करणे अधिक सुरक्षित असते. त्यामुळे रंगाचा पापुद्रा घट्ट बनतो, रंग ताजेतवाने राहतात आणि कालांतराने त्यांत फरकही पडत नाही. अंड्याच्या पांढऱ्या बलकाचाही उपयोग करण्याची पद्धत आहे, पण ती पद्धत फारशी सुरक्षित नाही; कारण त्यामुळे रंगांचा पापुद्रा ठिसूळ बनतो व त्यास कालांतराने तडे जाण्याची शक्यता असते. अंड्याच्या वापराने कधीकधी चित्राकृतीस कीटक लागण्याची शक्यता असते, शिवाय काम करताना अंड्याचे पायस नासण्याची शक्यता असते. म्हणून संरक्षणाकरिता त्यात व्हेनिगर अ‍ॅसेटिक अम्ल किंवा लवंगाचे तेल यांचे काही थेंब घालतात. अंड्याप्रमाणेच निरसे (न तापविलेले) दुधही चिकणरंगासाठी चांगले उपयुक्त ठरते. दुग्धप्रथिनांमुळे (केसिन) चित्रांतील रंग पक्के राहतात.

चिकणरंग चित्रणाचे भाग

चिकणरंग चित्रणाचे मुख्यतः दोन भाग करता येतात :  पातळ चिकणरंग व जाड चिकणरंग. पातळ चिकणरंग बनविण्यासाठी गोंद, अंडे, दूध, अंजिराच्या पानांपासून काढलेला चीक इत्यादींचा वापर केला जातो व जाड चिकणरंग बनविण्यासाठी गोंद, अंडे यांच्याशी रोगण, जवसादींची तेले वा अल्कलीमिश्रित मेण यांचे मिश्रण करून ते वापरले जाते. चिकणरंग चित्रणाचा उपयोग सर्वसाधारणपणे भित्तिचित्राकरिता व मोठ्या आकाराच्या काष्ठफलकावरील चित्रांसाठी केला जातो.

भारतामध्ये अजिंठादी प्राचीन लेण्यांतील भित्तिचित्रांकरिता योजिलेली रंगपद्धती चिकणरंग जातीची होती. त्या काळी रंग पक्के होण्यासाठी व त्यांची चिकटण्याची क्षमता वाढविण्यासाठी ते कशात घोटले जात, याविषयी निश्चित पुरावा उपलब्ध नाही. तथापि ते रंग वनस्पतीपासून काढलेल्या चिकांत घोटले गेले असण्याची दाट शक्यता आहे. भारतीय लघुचित्रेही चिकणरंगपद्धतीतच मोडतात. त्याकरिता वापरलेले रंग गोंदामध्ये घोटले जात असावेत. आजही जयपूरपद्धतीच्या भित्तिचित्रांकरिता चिकणरंग तंत्राचाच उपयोग केला जातो. जेमिनी रॉय, नंदलाल बोस, बेंद्रे, सोळेगावकर इ. आधुनिक भारतीय चित्रकारांनी चिकणरंग चित्रणाचा विपुल उपयोग केला आहे.

संदर्भ : 1. Bazzi, Maria, The Artist’s Methods and Materials, London, 1960.

2. Massey, Robert, Formulas for Artists, London, 1968.

3. Torche, Judith, Acrylic and Other Water Base–Paints for the Artists, London, 1967.

लेखक : बाबुराव सडवेलकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate