অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जंतरमंतर

वेधशाळांतील यंत्रांची बांधणी, वर्णन व उपयोग

भारतातील ऐतिहासिक वेधशाळा, जयपूरच्या सवाई जयसिंगाने (१६६९–१७४३) दिल्ली, उज्जैन, वाराणसी, जयपूर व मथूरा या ठिकाणी अशा मोठ्या वेधशाळा १७२४–३० च्या सुमारास बांधल्या. सवाई जयसिंग ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक होता. ऊलुगबेग मिर्झा  याच्या समरकंद येथील वेधशाळेवरून जयसिंगाला या वेधशाळा बांधण्याची स्फूर्ती मिळाली, असे म्हणतात. निरीक्षणासाठी लहान व सुवाह्य धातूची उपकरणे त्या काळी होती; पण त्यांचा लहानपणा, सूक्ष्मतेचा अभाव व होणारी झीज हे दोष लक्षात घेऊन त्याने मोठमोठी दगडाविटांची वेधयंत्रे बनविली. दुर्बिणीच्या पूर्वकाळामध्ये नुसत्या डोळ्यांनी पण सूक्ष्मपणे ज्योतिषविषयक वेध घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेधशाळा निर्मिण्याचा प्रयत्न हा भारतातच झालेला दिसतो. या वेधशाळांतील काही प्रमुख यंत्रांची बांधणी, वर्णन व उपयोग खाली दिलेले आहेत

सम्राटयंत्र

भव्यतेला अनुसरून हे नाव या उपकरणाला देण्यात आले. त्यात एक उत्तर–दक्षिण लांबच लांब जिन्यासारखी चढती भिंत असून, तिचा चढ क्षितिजपातळीशी त्या स्थळाच्या अक्षांशाइतका कोन करतो. तिच्या कडेच्या रेषेत ध्रुवतारा दिसतो. उज्जैनच्या वेधशाळेमधील भिंतीची उंची ६·७० मी. (२२ फूट) व लांबी १२·८० मी. (४२ फूट) आहे. भिंतीच्या दोन्ही पूर्व–पश्चिम बाजूंस चतुर्थांश वर्तुळाकृती रचना विषुववृत्तपातळीत व भिंतीशी काटकोनात आहेत. त्यांच्या त्रिज्या २·७६ मी. (९ फूट १ इंच) आहेत. चतुर्थांश वर्तुळाकृतींवर

तास-मिनिटांच्या खुणा आहेत. त्यांवर भिंतीची सावली पडून वेळ कळते. भिंतीच्या चढावरसुद्धा अंशात्मक खुणा असून त्यांवरून खस्थ गोलांची म्हणजे सूर्य, ग्रह, तारे इत्यादींची क्रांती (विषुववृत्तापासून अंतर) काढता येते. चतुर्थांश रचनेमध्ये ६ झरोके असून त्यांतून ताऱ्यांचे याम्योत्तर संक्रमण पाहता येते. दिल्ली व जयपूर येथे उज्जैनपेक्षाही प्रचंड सम्राटयंत्रे आहेत. त्यांत सूर्याची व ताऱ्यांची क्रांती काढण्याची अधिक चांगली सोय आहे.

मिश्रयंत्र, जंतरमंतर, दिल्ली.

जयप्रकाश

या यंत्रात मोठ्या कढईसारख्या अर्धगोलाकृती असतात. आतील खोलगट पृष्ठभागावर अक्षांश-रेखांशांसारख्या आडव्या-उभ्या रेषा असून वरची कड ही क्षितिजपातळीत असते. त्या कडेवर

उत्तर–दक्षिण तारा ताणलेल्या असतात. या तारांच्या आत पडलेल्या सावलीवरून खस्थ गोलांचे वेध घेता येतात. निरीक्षणासाठी आत जाण्यास मार्ग आहेत. अशी यंत्रे जोडीने असतात. दिल्ली आणि जयपूर येथील वेधशाळांतच ही आहेत. दिल्लीचा गोल ९·४९ मी. (२७ फूट ५ इंच) व जयपूरचा गोल ७·७२ मी. (१७ फूट १० इंच) व्यासाचा आहे.

रामयंत्र

हे गोल हौदाच्या आकाराचे असते. मध्यभागी एक गोल स्तंभ असून, भोवताली त्याच्या उंची इतक्याअंतरावर तितक्याच उंचीची एक गोल भिंत बांधलेली असते. निरीक्षणाकरिता तिचे उभे आणि अंशात्मक समान विभाग पाडलेले असतात. तसेच अंशात्मक विभाग आतील जमिनीवरही असतात. भिंतीच्या प्रत्येक विभागात खाचा असून त्यांतून आडव्या सळ्या घालता येतात. आत पडणाऱ्या त्यांच्या सावल्यांवरून वेध घेता येतात. तसेच ताऱ्यांचीही निरीक्षणे करता येतात. ही यंत्रांची जोडी असते. हे यंत्र फक्त दिल्ली व जयपूर येथेच आहे.

मिश्रयंत्र

या एकाच यंत्रात चार यंत्रांचा समावेश आहे; म्हणून त्यास ‘मिश्रयंत्र’ म्हणतात. यात आतील बाजूस ‘नियतचक्रयंत्र’ असते व पूर्व-पश्चिम बाजूंस सम्राटयंत्रासारखी रचना असते. त्यांच्या साहाय्याने खस्थ गोलांच्या याम्योत्तर संक्रमणाच्या वेळचे उन्नतांश (क्षितिजापासून कोनीय अंतर) काढता येतात. नियतचक्रात दोन बाजूंस अर्धपरिघाकृती रचना असून त्या मध्यान्ह रेषेच्या पातळीशी पश्चिमेस ७७° १६′ व पूर्वेस ६८° १′ अशा कोनांनी कललेल्या आहेत. पूर्व बाजूस मध्यान्ह पातळीत सूर्यभ्रमणदर्शक छायायंत्र आहे. त्याला ‘दक्षिणवृत्ती’ म्हणतात. हे यंत्र दिल्लीच्या वेधशाळेमध्ये आहे.

नाडीवलययंत्र

हे लोडाच्या आकाराचे २·१३ मी. (७ फूट) लांबीचे ध्रुवाभिमुख उपकरण असून त्याचे उत्तर आणि दक्षिण पृष्ठभाग विषुववृत्ताला समांतर पातळीत असतात. त्यांच्या मध्यावर एकेक खिळा पृष्ठभागांना लंब बसविलेला असतो. पृष्ठभागांवर वर्तुळात कालदर्शक खुणा असतात. या यंत्राने कालज्ञान तर होतेच; पण खस्थ गोल कोणत्या गोलार्धात आहे, हेही समजते. खिळ्यांच्या सावलीवरून सूर्याची उत्तर–दक्षिण क्रांती व विषुवदिन या गोष्टींचा बोध होतो. असे यंत्र उज्जैन येथे आहे.

दिगंशयंत्र

या यंत्रात एक ९·७५ मी. (३२ फूट) व्यासाची वाटोळी भिंत असून तिच्या आत ६·०९ मी.

(२० फूट) व्यासाची समकेंद्री भिंत व मध्यभागी १·२२ मी. (४ फूट) उंच व १·२२ मी. व्यासाचा एक गोल चबुतरा असतो. त्याच्या मध्यभागी १·२२ मी. उंचीची एक सळई असते. आतील भिंतीवर अंशांच्या व दिशांच्या खुणा असतात. सळईला एक लांब दोरी असते. खस्थ गोल दोरी व सळई एकाच रेषेत आणून खस्थ गोलाचे  दिगंश (उत्तर बिंदूपासून कोनात्मक अंतर) काढता येते. असे यंत्र उज्जैन येथे आहे.

याखेरीज ‘षष्ठांशयंत्र’, ‘राशीवलययंत्र’ इ. निरनिराळी यंत्रे आढळतात. सर्वच ठिकाणी सर्व प्रकारची उपकरणे बांधलेली नाहीत. हल्ली अधिक गुंतागुंतीची आणि अधिक माहिती देणारी आधुनिक यांत्रिक उपकरणे प्रचलित असल्याने, जंतरमंतरमधील उपकरणे विशेषशी वापरात नाहीत. तथापि त्यांची रचनात्मक भव्यता व ज्योतिषशास्त्राविषयीची तत्कालीन प्रगती या दृष्टींनी जंतरमंतर वेधशाळांना ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. जयसिंगाला पाश्चात्त्य ज्योतिषशास्त्राचीही माहिती बरीच होती. जयप्रकाश, रामयंत्र, सम्राटयंत्र आदी वेधयंत्रांच्या संशोधनाचे श्रेय जयसिंगाचेच आहे. या यंत्रांच्या साहाय्याने त्याने झीज-इ-जदीद मुहम्मद शाही  या ज्योतिषशास्त्रीय सारण्याही संस्कृत व फार्सी भाषांत करविल्या होत्या.

लेखक :१) कृ. ब. गटणे

२) वा. मो. कोळेकर

माहिती स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate