অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलरंगचित्रण

जलरंगचित्रण

(वॉटरकलर पेंटिंग). पाण्यातील विद्राव्य असलेल्या बंधकद्रव्यांमध्ये मिसळलेल्या रंगांचा वापर करून केलेले चित्रण. पारदर्शक रंगलेपनाने पांढऱ्याशुभ्र कागदाच्या पृष्ठावर वेगवेगळ्या रंगच्छटांचे स्तर पसरून प्रकाशाच्या योगाने दृश्यमान होणाऱ्या वस्तूची तसेच निसर्गदृश्याची हुबेहूब प्रतिमा निर्माण करणे, हे जलरंगचित्रणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय.

जलरंग बनविण्याकरिता रंगद्रव्यांची वस्रगाळ पूड करून ती गोंदाशी एकजीव करतात. हे रंग घनरूपात चौकोनी वड्यांच्या रूपाने व घनद्रव्यरूपात नळीमध्ये भरून सुरक्षित ठेवता येतात. अशा रंगांचा पाण्याशी संबंध येताच ते पुनः द्रवरूप होऊन कुंचल्यांच्या साहाय्याने कागदावर त्यांचे लेपन करता येते. हे रंगलेपन पारदर्शक असल्यामुळे रंगांचे लेप एकमेकांवर देता येतात. तथापि इतर माध्यमांपेक्षा हे माध्यम हाताळताना चित्रकाराला रंगमिश्रणाविषयीचे अचूक ज्ञान व माध्यम हाताळण्याचे पुरेसे कौशल्य यांची विशेष आवश्यकता असते. एकदा लेपन केलेले रंग पूर्णपणे धुऊन टाकता येत नाहीत. त्याचप्रमाणे रंग लवकर वाळत असल्यामुळे व वाळल्यानंतर त्यांच्या छटांमध्ये काहीसा बदल होत असल्याने चित्रकाराला रंगसाहित्याविषयीचे परिपूर्ण ज्ञान व चित्राच्या अभिसाधन प्रक्रियेची (रेंडरिंग) यथायोग्य जाण असावी लागते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रंगलेपन पारदर्शक असल्याने चित्रातील प्रकाशक्षेत्र दाखविण्याकरिता कागदाच्या शुभ्रतेचा पुरेपूर उपयोग करण्यात येतो. चित्रातील परमोच्च प्रकाश (हाय लाइट) दाखविण्याकरिताही पांढऱ्या रंगाचा जराही उपयोग करण्यात येत नाही. पांढऱ्या रंगाचा उपयोग केल्याने रंगाची शुद्धता नाश पावते.

जलरंगचित्रणाकरिता वापरावयाचे रंग स्थायी स्वरूपाचे तसेच प्रकाशाच्या संयोगाने त्वरित बदलू शकणार नाहीत, अशा गुणांचे असावे लागतात. हे रंग बनविण्याकरिता रंगांमध्ये जो गोंद घालावयाचा असतो, त्याचे प्रमाण रंगपरत्वे वेगळे असते. काही रंगांमध्ये गोंदासहित मध, ग्लिसरीन किंवा साखर यांचा उपयोग केल्याने ते रंग दीर्घ काळापर्यंत ओलसर राहून चांगल्या प्रमाणात प्रवाही बनतात. रंगांमध्ये सर्वसाधारणपणे गम ‘अरेबिक’चा उपयोग केला जातो. काही रंगांत नैसर्गिक स्थितीतच गोंद घोटून मिसळता येतो; तर काहींमध्ये उष्णतेच्या साहाय्याने गोंद एकजीव करावा लागतो. मोठ्या आकाराची चित्रे रंगविताना रंग लवकर वाळू नये, म्हणून पाण्यामध्ये विरघळविलेले ग्लिसरीन किंवा कॅल्शियम क्लोराइडचे द्रावण अगर ‘ट्रागाकांथ गम’ यांचाही काही प्रमाणात वापर केला जातो.

रंग कागदावर कायमपणे चिकटून राहण्याकरिता रंगामध्ये जो गोंद व इतर द्रव्ये वापरली जातात; त्यांना बंधकद्रव्ये म्हणतात. वेगवेगळ्या रंगांचे प्राकृतिक गुणधर्म एकसारखे नसतात व चित्रणाकरिता अनेक प्रकारचे रंग एकमेकांसोबत वापरावयाचे असतात. ते एकमेकांच्या संयोगातूनही कागदाच्या पृष्ठावर एकसंधपणे लागले पाहिजेत, म्हणून रंगारंगांतून मिसळावयाचे बंधकद्रव्य योग्य त्या प्रमाणात व काळजीपूर्वक मिसळावे लागते. त्याचप्रमाणे रंग जाडसर होऊ नयेत आणि त्यांची ओलाव्याची क्षमता वाढावी, म्हणून त्यांमध्ये ‘ऑक्स गॉल’ चाही उपयोग केला जातो. जलरंगांचा चित्रपृष्ठावरचा थर अतिशय पातळ असतो व त्यामुळे तैलचित्रासारख्या माध्यमांमधून रंगविलेल्या चित्राप्रमाणे त्यास कालांतराने तडे जात नाहीत, रंगांच्या खपल्या पडत नाहीत किंवा पोपडेही निर्माण होत नाहीत.

जलरंगाचे माध्यम हाताळण्याकरिता विशिष्ट तऱ्हेच्या कुंचल्यांची गरज असते. हे कुंचले मऊ व सडक केसांपासून बनविलेले असून, त्यांचे अग्रबिंदू काहीसे लवचिक व स्थितिस्थापक असावे लागतात. म्हणून अशा प्रकारच्या कुंचल्यांकरिता हंस, बिजू, सेबल, मिनेव्हर इ. प्राण्यांच्या केसांचा उपयोग केला जातो. जलरंगचित्रणाकरिता हाताशी भरपूर पाणी असण्याची आवश्यकता असते. हे पाणी दोन भांड्यांतून असावे. एकात केवळ कुंचले साफ करण्याकरिता आणि दुसऱ्यात रंग पातळ करण्याकरिता. पाण्यात क्लोरीनचा अंश असल्यास काही रंग त्यात योग्य तऱ्हेने विरघळत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे पाणी उकळून वापरावे. रंग अंधुक करण्याकरिता व टिपण्याकरिता स्पंज, टिपकागद व स्वच्छ फडके यांचीही तितकीच आवश्यकता असते.

कुंचल्याप्रमाणे जलरंगाकरिता विशिष्ट प्रकारच्या कागदाची जरूरी असते. हा कागद हाताने बनविलेला असून त्यात चिंध्यांचा वापर केलेला असतो. तो चिवट असून त्याचा पांढरेपणा दीर्घकाळ टिकतो. रंगांचे तसेच पाण्याचेही एका विशिष्ट प्रमाणात शोषण करण्याची क्षमता त्यामध्ये असते. इंग्लंडमध्ये बनविलेल्या अशा प्रकारच्या कागदास ‘वॉटमन पेपर’ असे म्हणतात. हा कागद भरपूर ओला करून एका लाकडी चौकटीत घट्ट ताणून बसविलेला असतो व तो काहीसा दमट असतानाच चित्रणास सुरुवात करावयाची असते. त्यामुळे मोठ्या क्षेत्राचे रंगलेपही सफाईने देता येतात आणि रंगलेपनात तीव्रता किंवा खडबडीतपणा राहत नाही.

आजपर्यंत अनेक चित्रकारांनी चित्रांची सौंदर्यात्मक गुणवत्ता वाढविण्यासाठी जलरंग हाताळण्याच्या अनेक पद्धती शोधून काढल्या आहेत. ओल्यातील रंगमिश्रण, प्रकाशक्षेत्राकरिता कागदाच्या पांढरेपणाचा वापर, प्रकाश दाखविण्याकरिता ओल्या रंगलेपनात स्पंजाचा किंवा सुक्या कुंचल्याचा वापर इ. पद्धती आजही लोकप्रिय आहेत.

जलरंगचित्रणाचा इतिहास तसा प्राचीन आहे. जलरंगाची पद्धती इ. स. पू. दुसऱ्या शतकात ईजिप्तमध्ये ज्ञात होती. इ. स. २५० मध्ये चीनमध्ये रेशमी कापडावरील चित्रे रंगविण्याकरिता जलरंगाचा उपयोग केल्याचा पुरावा सापडतो. त्याचप्रमाणे कागदाच्या शोधानंतर चिनी चित्रकारांनीच प्रथमतः कागदावर उपयोग करण्याचे माध्यम म्हणून जलरंगाचा स्वीकार केला.  तेराव्या शतकानंतर जपानमध्येही जलरंगांतून चित्रे रंगविण्याची पद्धत स्वीकारण्यात आली होती.  पाश्चिमात्य देशांमध्ये पंधराव्या शतकात हस्तलिखिते सुशोभित करण्याकरिता व काष्ठठशांतून रंग भरण्याकरीता जलरंगाचा उपयोग केला जाई. या शतकाच्या उत्तरार्धात छपाईच्या शोधामुळे तसेच प्रगत तैलरंगचित्रणामुळे जलरंगाची पद्धती हळूहळू मागे पडली. जलरंगाचा उपयोग केवळ रेखाचित्रणाकरिता व रेखाचित्रात रंगच्छटा भरण्याकरिता केला जात असे. मात्र सोळाव्या ते अठराव्या शतकांमध्ये इंग्लंड येथे लघुचित्रणासाठी ह्याच माध्यमाचा विशेषत्वाने अवलंब झाला. अठराव्या शतकात इंग्लंडमधील चित्रकारांनी पारदर्शक जलरंगचित्रणतंत्राचा वापर पुनश्च केला. आंग्ल चित्रकार पॉल सँडबी (१७२५–१८०९) याने शाईचा उपयोग न करता केवळ जलरंगाचाच उपयोग करून जलरंगचित्रणाचे स्वायत्त (ऑटोनॉमस) तंत्र विकसित केले. त्यामध्ये  वलरंगमिश्रित अपारदर्शी रंगचित्रणाचा (गूआश) अधिक प्रमाणात अंगीकार करण्यात आला. सँडबीने सुरू केलेल्या जलरंगतंत्रामध्ये अभूतपूर्व कामगिरी केली ती ⇨ जे. एम्. डब्ल्यू. टर्नर  (१७७५–१८५१) याने. जलरंगात त्याने सु. अठरा हजार चित्रे रंगविली. १८०४ मध्ये‘ओल्ड वॉटरकलर सोसायटी'ची स्थापना झाली. पुढे त्याच वर्षी तिचे रूपांतर‘रॉयल सोसायटी ऑफ पेंटर्स इन वॉटरकलर’या संस्थेमध्ये झाले. त्यानंतर १८३१मध्ये ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ पेंटर्स इन वॉटरकलर्स’ची स्थापना झाली. या संस्थांमुळे जलरंगचित्रपणपद्धतीचे महत्त्व फारच वाढले व ती एक स्वायत्त चित्रणपद्धती बनली. या संस्थांमधील नामवंत चित्रकार म्हणजे कॉप्ली फील्डिंग (१७८७–१८५५), जॉन कॉट्मन (१७८२–१८४२), सॅम्युएल प्राउट (१७८३–१८५२) व रिचर्ड बॉनिंगटन (१८०२–२८) हे होत. सर एड्‌विन लॅन्सीर (१८०२–७३) व जी. एल्. टेलर हे दोन चित्रकारही जलरंगचित्रणात निष्णात होते. त्याचप्रमाणे ‘प्री- रॅफेएलाइट्स’ संप्रदायाचे चित्रकार डँटी गेब्रिएल रोसेटी (१८२८–८२), फोर्ड मॅडक्स ब्राउन (१८२१–९३), बर्न-जोन्स (१८३३–९८), डब्ल्यू. एच्. हंट (१८२७–१९१०) व जॉन मिले (१८२९–९६) ह्यांनीही जलरंगचित्रणात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस व नंतरही काही अमेरिकन चित्रकारांनी जलरंगाचे माध्यम प्रभावीपणे हाताळले. त्यांनी वेगवेगळी नवी तंत्रे वापरून जलरंगचित्रणाला वेगळी दिशा प्राप्त करून दिली. त्यांपैकी महत्त्वाचे चित्रकार म्हणजे विन्स्लो होमर (१८३६–१९१०), जॉन मॅरिन (१८७०–१९५३) व अँड्रू वाईथ हे होत.

भारतामध्ये ही रंगपद्धती इंग्रजांकडून आली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बऱ्याच इंग्रज चित्रकारांच्या जलरंगपद्धतीतील चित्रांचा भारतीय चित्रकारांना परिचय झाला. त्याचप्रमाणे जलरंगपद्धतीत निष्णात असलेले नामवंत इंग्रज चित्रकार सेसिल बर्न्‌स हे त्या वेळी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे प्राचार्य होते. त्यांची चित्रे पाहूनही भारतीय चित्रकारांना स्फूर्ती मिळाली असावी. तथापि हे माध्यम हाताळणारे चित्रकार भारतात कमीच आढळतात. अवनींद्रनाथ टागोर, नगरकर, चिमुलकर हे चित्रकार जलरंगचित्रणात निपुण होते; पण त्यांची रंग हाताळण्याची शैली व त्यांचे चित्रविषयही वेगळे होते. त्यांनी आंग्ल चित्रकारांप्रमाणे निसर्गचित्रे काढली नाहीत. आंग्ल परंपरेतून चित्रनिर्मिती करणारे भारतीय चित्रकार म्हणजे सा. ल. हळदणकर व गजानन हळदणकर हे होत. पेडणेकर, परांडेकर आणि एम्. आर्. आचरेकर यांनीही जलरंगात चित्रनिर्मिती केली आहे.

संदर्भ : 1. Bazzi, Maria, The Artist’s Methods and Materials, London, 1960.

2. Brooks, Leonard, Watercolor : A Challenge, New York, 1957.

3. Lintott, E. B. The Art of Watercolour Painting, London, 1926.

4. Torche, Judith, Acrylic and Other Water-Base Paints for the Artist, London, 1967.

लेखक : बाबुराव सडवेलकर

माहीती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate