অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैन कला

जैन कला

समाजात नवीन धर्मपरिवार निर्माण झाला, की त्याची धर्मवैशिष्ट्ये त्याच्या कलेत दिसू लागतात. जैन कला याला अपवाद नाही. धर्माशी व पर्यायाने जीवनाशी निगडित असलेल्या गुंफा, मंदिरे, हस्तलिखिते त्याचप्रमाणे रोजच्या वापरातील वस्तू यांसारख्या सर्वच निर्मितीत जैनांची सौंदर्यदृष्टी वापरली. वास्तू, शिल्प व चित्र या बाबतींत इतर प्रस्थापित, प्रामुख्याने बौद्ध कल्पनांचा व कलापरंपरांचा प्रभाव सुरुवातीस जैन कलेवर होता; परंतु आकार व घडण या बाबतींत जैन कलेने दाखविलेल्या खास वैशिष्ट्यांमुळे या निर्मितीस शैलीदृष्ट्या महत्त्व आले.

महावीराच्या निर्वाणानंतर तीर्थंकर व धर्मपीठाचे स्वामित्व करणारे स्थविर यांच्या समाधींवर स्तूप बांधण्यात आले. नंतर शिल्पांनी व भित्तिचित्रांनी युक्त अशी लेणी व कालांतराने शिखरमंदिरांचे समूह, अशी वास्तुनिर्मिती झाली. मंदिरांच्या पायांचे आराखडे देवतानिर्दशक अशा ‘यंत्र’ आकृतींवर आधारलेले असत. वास्तूंच्या पायांचे  आराखडे यंत्रात्मक असणे, हादेखील प्रस्थापित विचारसरणीचाच प्रभाव होय. मंदिरातील तीर्थंकर मूर्ती उभी (कायोत्सर्ग) अथवा योगासनात बसलेली असते. सिंहासनावर धर्मचक्र व मूर्तीच्या हृदयस्थानी चिंतामणी असतो. चिंतामणी आदी चिन्हांशिवाय मूर्तीस पूर्णत्व येत नाही, असे काही धार्मिक आदेश शिल्प-चित्र घडविताना पाळले जातात. तीर्थंकरांच्या सिद्धायिका, चक्रेश्वरी, अंबिका, पद्मावती इ. शासनदेवता तसेच ‘नंदीश्वरद्वीप’ (पृथ्वीवरील स्वर्ग) वगैरे पवित्र धर्मप्रतीके जैन लेण्यांतील व मंदिरांतील शिल्पांत साकारली आहेत. सर्वांत जुन्या जैन वास्तू सोन भांडार (बिहार, इ. स. पू. ५७) आणि उदयगिरी येथील होत. तसेच सौराष्ट्र, सित्तनवासल, ऐहोळे, बादामी, वेरूळ लेणी  (३० ते ३४), खजुराहो, ग्वाल्हेर, केरळ, राजपुताना, गुजरात अशा भारतातील सर्वच ठिकाणी जैन अवशेष विखुरले आहेत. हे सर्व अवशेष इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंतचे आहेत. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची (बाहुबली) प्रचंड मूर्ती, दिलबाडा, जैसलमीर येथील संगमरवरी वास्तू व शिल्पे अशी अनेक जैन श्रद्धास्थाने त्यांच्या निर्मितीतील अपूर्वतेमुळे कलेतील सौंदर्यस्थाने झाली आहेत. या वास्तूंचे व मूर्तींचे प्रादेशिक व कालिक शैलींशी फार निकटचे नाते असले, तरी त्यांत जैन परंपरेला अनुसरून ‘सत्त्व’ भावालाच प्राधान्य मिळाले आहे.

तसे पाहता जैन संघातील व्यक्तींनी चित्रे काढू नयेत, चित्रांनी सजविलेल्या वास्तूत राहू नये, अशी बंधने फार पूर्वी होती. पानाफुलांचे चित्रण म्हणजे निर्दोष ‘चित्तकम्म’ व उडणाऱ्या यक्षयक्षिणी, सामान्य स्त्रिया इ. रंगविणे म्हणजे सदोष ‘चित्तकम्म’ अशा कल्पना जुन्या जैन ग्रंथांत आहेत. जैन संप्रदायाच्या अगदी बाल्यावस्थेतील ही स्थिती असावी. दंतकथेनुसार पहिला तीर्थंकर ऋषभनाथ हा सर्व कलांचा जन्मदाता मानला जातो. त्यामुळे चित्रकार, शिल्पकार, यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. मानसोल्लास  (बारावे शतक), आवश्यकचूर्णी   (सु. सातव्या शतकाचा पूर्वार्ध) या ग्रंथांमध्ये चित्रांसाठी भिंतींवर पृष्ठभाग तयार करणे (भूमिसेज्जा), रंग (वण्णे), कुंचले, लाकडी शिल्प (कट्‌ठकम्म), लेप किंवा गिलावा देणे (लेप्पकम्म), आकार किंवा मूर्ती घडविणे किंवा कोरणे (पोत्थकम्म) यांविषयी मार्गदर्शनपर सूत्रे आहेत. प्रमाणबद्ध आकार, सौंदर्यलक्षणे आदींसंबंधी व्याख्या तसेच ‘सतत अभ्यासाने रेखाटनावर प्रभुत्व मिळवावे’, असे उपदेशही आहेत. कलावंतांच्या समूहांनी (चित्तगारसेणि) निर्माण केलेल्या ‘चित्तसभां’ची वर्णने देखील येतात.

इ. स. पू. चौथ्या शतकातील भयंकर दुष्काळात बरेच जैन आचार्य मृत झाले. काहींची स्मृती नष्ट होऊ लागली. या वेळी धर्मवाङ्‌मय नष्ट होऊ नये, म्हणून जैन अंग-उपांगांचे जतन व एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न झाला. तसेच आचार्य देवर्धिगणी क्षमाश्रमण यांच्या अध्यक्षतेखाली वल्लभी येथे भरलेल्या तिसऱ्या परिषदेत (इ. स. सु. ४५४) जैन श्रुतग्रंथ (आगम) लेखनिविष्ट करण्यात आले. पुढे राजाश्रयामुळे आणि श्रीमंत अनुयायांमुळे हस्तलिखितांची निर्मिती अव्याहत होत राहिली. जैन भांडारांमध्ये व खासगी संग्रहांत ग्रथांचा सांभाळ झाला. परकीय आक्रमणाच्या व जाळपोळीच्या काळात बरेचसे वाङ्‌मय नष्ट झाले. अशा वेळी काही जैन भांडारे गुप्त आणि बंदिस्त ठेवण्यात आल्यामुळे हे जुने दुवे आज उपलब्ध होतात.

महावीराच्या जन्माआधी माता त्रिशलेस स्वप्नात शुभचिन्हे दिसणे, महावीराचा गृहत्याग, केशलुंचन, ज्ञानप्राप्तीनंतर ‘समवसरणा’त वास्तव्य इ. प्रसंगांनी व इतर तीर्थंकरांच्या चरित्रचित्रांनी कल्पसूत्र  या प्रमुख जैन ग्रंथाची हस्तलिखिते सजवलेली आहेत. पहिला तीर्थंकर ऋषभनाथ याने मृत्पात्र निर्माण करून मानव जातीस अर्पण केले, ऋषमनाथाच्या विवाहानंतर विवाहसंस्था उदयास आली, त्याच्या मातृनिधनानंतर अंत्यक्रियेसंबंधी नियम अस्तित्वात आले, अशा कल्पनांच्या पार्श्वभूमीवरील चित्रे कल्पसूत्रात येतात. कालकाचार्य कथा, सुबाहू कथा, ज्ञातसूत्र, नागरसर्वस्व  (पद्मश्रीने लिहिलेली कामशास्त्रावरील रचना) अशा अनेक ग्रंथांची चित्रमय हस्तलिखिते, खगोलीय आकृत्या, मंडले वगैरे उपलब्ध आहेत. रतिरहस्य, नाट्यशास्त्र, गीतगोविंद, देवी माहात्म्य, मेघदूत, कुमारसंभव  इ. विविध साहित्यकृतींवर तसेच संगीतातील रागांवर अधिष्ठित असे चित्रणही जैन शैलीत झाले. त्यात पालख्या, उत्सव, मिरवणुका यांची चित्रेही आढळतात. शिल्पांची निर्मिती जरी धर्मनियमांच्या बाहेर होऊ शकली नाही, तरी चित्रकलेत जीवनातील सर्व रसांचा आविष्कार झाला आहे. मोठ्या व्यक्तींना लिहिलेली विज्ञप्तिपत्रे चित्रपूर्ण असत. ‘जैन उत्सवाच्या दिवशी राज्यात पशुहत्या होऊ नये’, अशी विनंती करणारे विज्ञप्तिपत्र जैन मुनी जहांगीरला देत आहेत, असे एक चित्र आहे. चित्र राजपूत मोगल शैलीतील असले, तरी ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. विद्वान आचार्य हेमचंद्र, राजा कुमारपाल अशी व्यक्तिचित्रेही आढळतात. शिल्पांमध्येदेखील राजांच्या व धनिकांच्या प्रतिमांस स्थान असून शिलालेखांवर त्यांचे नामोल्लेखही आहेत.

ताडपत्र, भूर्जपत्र आणि कागद यांचा वापर लिहिण्यासाठी झाली. मुखपृष्ठांसाठी लाकडी पट्ट्यांचा वापर झाला. खनिजांपासून रंग तयार करण्यात आले. लाल, पिवळा, निळा, पांढरा ह्या रंगांइतकाच सोनेरी रंग ठसठशीत असून तो सर्व चित्रांत मुक्तहस्ते वापरला आहे. टोकदार नाक व किंचित हनुवटी, नाकापलीकडील चेहऱ्याच्या बाहेर डोळा आणि पारदर्शक सूक्ष्म वस्त्रांतून दिसणारी अंगप्रत्यंगे ही या शैलीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. नक्षीयुक्त मखरात आणि चौकटीत वळणदार अक्षरांनी मजकूर लिहिला आहे. या सर्व गोष्टींच्या एकत्र मांडणीतील कल्पकतेमुळे ग्रंथाचे एक पान म्हणजे एक चित्र ठरते.

उपलब्ध असलेली अगदी जुनी जैन चित्रे म्हणजे वेरूळ व सित्तनवासल येथील भित्तिचित्रे होत. त्यांचे शैलीदृष्ट्या अजिंठ्याशी साधर्म्य आहे.

पुढे हस्तलिखित चित्रांत येणाऱ्या जैन शैलीवैशिष्ट्यांची सुरुवात वेरूळ येथील भित्तिचित्रांत काही प्रमाणात दिसते. भित्तिचित्रे दिगंबरपंथीय असून बरीचशी हस्तलिखिते श्वेतांबरपंथीय आहेत. या दोन पंथीय रेखाटनांत साधर्म्य नाही. गुजरात, माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड अशा सगळ्याच ठिकाणी चित्रनिर्मिती झाल्यामुळे प्रांतागणिक शैलीभिन्नता दिसून येते. बरीचशी निर्मिती गुजरातमध्ये झाल्याने तसेच चित्रातील आशय जैनेतर असल्याने या शैलीस गुजराती शैली, पश्चिम भारतीय शैली अशी निरनिराळी नावे देण्यात येतात. तशी शैलीच्या नावाविषयी मतभिन्नता असली, तरी या निर्मितीच्या मुळाशी असलेला ‘जैन’ हा शब्द मात्र अबाधितच राहतो. मंदिरांचे समूह–‘वस्ती’–आणि प्रायः गुजरात व राजस्थान या भागांत तयार झालेली सचित्र हस्तलिखिते (अकरावे–पंधरावे शतक) ही जैन कलेची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होत.

संदर्भ : 1. Ghosh, A. Ed. Jaina Art and Architecture, 3. Vols., New Delhi, 1974.

2. Shah, U. P. Studies in Jaina Art, Banaras, 1955.

लेखक :मृगांक जोशी

मराठी  स्रोत : मराठी विश्वकोश

 

 

 

 

अंतिम सुधारित : 7/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate