অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्यू कला

प्रस्तावना

इटालीयन, फ्रेंच आदी राष्ट्रीय कलापरंपरांप्रमाणे ज्यू कलेची राष्ट्रीय परंपरा नव्हती. इझ्राएलच्या स्थापनेनंतर मात्र तशी शक्यता निर्माण झालेली आहे. तथापी ज्यू कलानिर्मितीचे वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न एकोणिसाव्या शतकापासूनच सुरू झाला. ज्यूंना स्वतःची मायभूमी नसल्याने त्यांच्या कलेची खास वैशिष्ट्ये विकसित होऊ शकली नाहीत. ज्या प्रदेशात वा ज्या समाजात ज्यू लोक राहिले, त्या प्रदेशाच्या व समाजाच्या कलानिर्मितीचा ठसा ज्यू कलेवर उमटल्याचे दिसते. उदा., सॉलोमनच्या मंदीररचनेत (इ.स.पू. १०००) ईजिप्त व पश्चिम आशिया येथील वास्तुवैशिष्ट्यांचा प्रभाव आढळतो. पहिल्या शतकातील हिरोडीझचे मंदीर ग्रीकांश कलेचा प्रभाव दर्शवते. ज्यू कलापरंपरेच्या अभावाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यूंच्या दहा प्रसिद्ध धर्माज्ञांपैकी दुसरी धर्माज्ञा होय. या धर्माज्ञेनुसार प्रतिमाचित्रणवादी कलांचा निषेध केलेला आहे. त्याशिवाय ज्यूंना ज्या परक्या देशांत राहावे लागले, त्या देशांतील मुख्य सामजिक प्रवाहापासून ज्यू लोक अलग राहिल्याने वा राखल्याने त्यांच्या कलानिर्मितीला वाव मिळाला नाही. वारंवारच्या हद्दपारी आणि कायमची असुरक्षितता यांमुळे कलानिर्मितीला अनुकूल वातावरण ज्यूंच्या बाबतीत निर्माण झाले नाही.

स्वरूप

तरीही वास्तुकलेत ज्यूंचे वेगळेपण जाणवते. वर उल्लेखिलेले सॉलोमनचे मंदिर व हिरोडीझचे मंदिर याची साक्ष देतात. माल्टा, सिराक्यूस, रोम व उ. आफ्रिका येथील ज्यूंची भूमिगत थडगी वास्तुरचनादृष्ट्या उल्लेखनीय आहेत.  सिनॅगॉग  म्हणजे ज्यूंचे प्रार्थनामंदिर. ही मात्र ज्यूंची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुनिर्मिती होय. इ. स. पू. २५० च्या सुमारास ईजिप्तमध्ये सिनॅगॉगच्या वास्तुरचनेचा उगम आढळतो. तथापी ख्रिस्ती चर्च किंवा मशीद यांच्या तुलनेने पाहता ज्यू सिनॅगॉग हे कमी सौंदर्यपूर्ण आहे. कारण त्याचा भर उपयुक्ततेवर अधिक आहे.

शिलाशिल्पन

कनिष्ठ कलांपैकी ज्यूंचे शिलाशिल्पन किंवा दगडावरील कोरीवकाम फिनिशियन कलेचा ठसा दर्शविते. मृत्स्नाशिल्प किंवा मृत्पात्रे यांवरील अ‍ॅमोराइट व फिनिशीयन कलाप्रभाव जाणवतो. धातुकामाचे प्राचीन ज्यू नमुने मात्र क्वचितच आढळतात. तथापी पॅलेस्टाइनमध्ये काष्ठशिल्पांवर सोन्याचे वा चांदीचे पत्रे बसविण्याची कला मात्र त्यांना अवगत होती. हस्तिदंत शिल्पांकनही केले जात असे. मूर्तीकला मात्र ज्यू कलापरंपरेत आढशत नाही. तथापी ड्यूरा–यूरोपॉस येथे केलेल्या उत्खननातून भित्तिलेपचित्रांनी सजविलेले एक सिनॅगॉग आढळून आले आहे. या भित्तिलेपचित्रांचा काळ इ. स. सु. २४५ ते २५६ या दरम्यान असावा. पामेरा (इ. स. दुसरे शतक) व रोम (इ. स. तिसरे-चौथे शतक) येतील भूमिगत थडग्यांत भित्तिचित्रेही आढळतात.

ज्यू सोनार आणि जवाहिरे

मध्ययुगात ज्यू सोनार आणि जवाहिरे पुष्कळ होते व त्यांच अनेक राजघराण्यांशी संबंधही होता. याच कालखंडात चांदीकाम, सुवर्णकाम, वस्त्रकला, मृत्स्नाशिल्प इ. क्षेत्रांतील ज्यू कलानिर्मितीला विशेष चालना मिळाली. त्यामागे अर्थातच प्रमुख प्रेरणा धार्मिक होती. झुंबरांसारख्या कलावस्तूंवर तसेच कापड, दिवे इत्यादींवर धार्मिक प्रतीके चित्रित केली जात. ग्रंथलेखन आणि मुद्रण यांमध्ये ज्यू लोकांनी विशेष आस्था दाखविली. हस्तलिखिते अलंकृत करण्याची ज्यू परंपरा तर जुनी आहे. सनातन ज्यू धर्मग्रंथ  टॅलमुड

(इ. स.पू. सु. २०० ते इ. स. सु. ५००) याच्या ‘हग्गादा’ या भागात मानवाकृती व पशुपक्षी यांचे अद्‌भुतरम्य पौराणिक आकृतिबंध आढळतात. काही जुने अलंकृत हिब्रू ग्रंथ दहाव्या शतकापासून आढळतात. सतराव्या व आठराव्या शतकांत इटलीमधील ज्यू लोक विवाहाच्या कागदपत्रांवर खूप सजावट करीत. सतराव्या शतकापासून ज्यू हौशी कलावंत व्यक्तिचित्रेही रेखाटू लागले.

ज्यू संगीत

ज्यू संगीत मात्र पहिल्यापासून समृद्ध आहे व त्याला एक अतूट परंपराही आहे. बायबलमध्ये गीत व वाद्यसंगीत यांचे अनेक निर्देश आलेले आहेत. देवाची स्तुतिस्तोत्रे, धार्मिक प्रार्थना, सणउत्सवादी प्रसंगी गायिली जाणारी गाणी, लोकगिते, सिनॅगॉगमधील संगीत इ. अंगांनी ज्यू संगीत हे अत्यंत संपन्न बनलेले आढळते. आपल्या स्वतंत्र मायभूमीच्या अभावी ज्यूंना जवळजवळ दोन हजार वर्षे जी भटकंती करावी लागली, त्या भटकंतीत या संगीताने त्यांची सतत साथ केली. अशा भटकंतीत रूपण कला किंवा पार्थीव कला यांची अखंड परंपरा निर्माण होणे शक्यच नव्हते. संगीत मात्र यास अपवाद आहे. ज्यू कलेत म्हणूनच त्यांच्या संगीताला विशेष महत्त्व आहे.

जू कलावंत

एकोणिसाव्या शतकात युरोप-अमेरिकेत अनेक जू कलावंत विखुरले. विसाव्या शतकात आधुनिक ज्यू कलावंतांची पॅरिसमध्ये गर्दीच उसळली. सूटीन, शगाल इ. नावे या संदर्भात उल्लेखनीय आहेत. जेकब एप्स्टाइन हा प्रसिद्ध शिल्पकार ज्यूच होता. इसाकार रायबॅक (१८९७–१९३३) हा ज्यू शिल्पकारही उल्लेखनीय आहे. तेल अव्हिव्हमधील त्याच्याच नावाच्या कलासंग्रहालयात त्याच्या कलाकृती ठेवलेल्या आहेत. इझ्राएल राष्ट्राच्या जन्मापासून स्वतंत्र ज्यू कलेचा वेगाने विकास होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच रूबिन (१८९३) सारखे चित्रकार व झेड्. बेन त्सेव्ही (१९०४–५९) सारखे मूर्तिकार नव्या स्वतंत्र वातावरणात आपल्या कलांची जोपासना करू शकले.

लेखक : १)  रा. ग. जाधव

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate