অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टंकचित्र

टंकचित्र

एक तिबेटी धार्मिक चित्रप्रकार. गुंडाळी करता येण्याजोगी व ने-आण करण्यास सुलभ अशी कापडावरील चित्रे ‘टंकचित्रे’ म्हणून ओळखली जातात. ‘थुङ्-कु’ किंवा ‘कु-थुङ्’ हा तिबेटी शब्द गुंडाळी केलेल्या कोठल्याही वस्तूला उद्देशून वापरला जातो. ही चित्रे वा रेखने सुती कापडावर काढली जातात. कापडाला वरच्या व खालच्या कडेवर कळकाच्या काठ्या बसविलेल्या असतात. त्यांवर कापडाची गुंडाळी करता येते. टंकचित्रे ही धार्मिक ध्यानचिंतनाची साधने होत. ती देवळामध्ये अथवा घरात पूजास्थानी टांगली जातात. धार्मिक मिरवणुकांबरोबर नेता येतात किंवा प्रवचने विशद करण्यासाठी त्यांचा वापर होतो. टंकचित्रांच्या निर्मितीमध्ये धार्मिक नियमांची बंधने काटेकोरपणे पाळावी लागत असल्याने विमुक्त निर्मितीला त्यांत फारसा वाव नसतो. टंकचित्रांतून तिबेटी धर्माचा समृद्ध आशय व्यक्त झालेला आहे. बुद्ध व त्याच्याभोवती असलेला देवतांचा किंवा लाभांचा समुदाय; बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग; विश्ववृक्षाच्या फांद्याभोवती जमलेल्या देवता; जीवाच्या विविध योनींतील अवस्था दर्शविणारे भवचक्र; मृत्यू व पुर्नजन्म यांच्या संक्रमणकाळात (पार्-दो) जीवात्म्याला होणारे सूचक, प्रतीकात्मक दिव्याभास; विश्वाचे प्रतीकात्मक दर्शन घडविणारे मंडले; कुंडल्या; दलाई लामा व पंचेन (पंचम) लामा; संत व ८४ महासिद्धांसारखे थोर आचार्य अशा स्वरूपाचे विषय सामान्यपणे टंकचित्रांतून चित्रित केलेले असतात. टंकांचा उगम भारतीय पटचित्रे (कापडावरील चित्रे), धार्मिक विधींसाठी मुळामध्ये जमिनीवर रेखाटली जात अशी मंडले व कथाकथनासाठी कथेकरी वापरीत असत त्या चित्रगुंडाळ्या (स्क्रॉल्स) ह्यांतून झाला असावा. तसेच त्यांतील चित्रणाची स्फूर्ती मध्य आशियाई, नेपाळी व काश्मीरी चित्रसंप्रदायांकडून लाभली असावी. त्यांतील निसर्गचित्रण मात्र चिनी चित्रशैलीचा प्रभाव दर्शवते. टंकांवर चित्रकारांच्या स्वाक्षऱ्या सहसा आढळत नाहीत. काही चित्रांच्या बाजूवर चित्र कोणासाठी बनवले त्याचे नाव व दिनांक श्लोकाच्या स्वरूपात लिहिलेले आढळतात. त्यांचा उगम साधारणतः सातव्या शतकात झाला असावा. टंकांसाठी वापरले जाणारे कापड साधारणतः आयताकृती (सुरुवातीच्या चित्रांमध्ये चौरसाकार) असते. ते चुन्याच्या निवळीमध्ये अत्यंत दक्षतेने भिजविण्यात येते. नंतर त्यावर शंखासारखी गुळगुळीत पृष्ठाची वस्तू घासून त्यास चकाकी आणली जाते. त्यावर चित्राची प्रथम रूपरेषा रेखाटून मग त्या रेखनामध्ये रंग भरले जातात. चित्राभोवती एक वस्त्रचौकट विणलेली असते. चित्ररक्षणार्थ शेवटी चौकटीच्या वरील बाजूस एक रेशमी आवरण शिवण्यात येते. ही चित्रे सामान्यतः धर्मनियमांसंबंधी अनभिज्ञ असलेल्या कारागिरांनी लामांच्या देखरेखीखाली तयार केलेली असतात आणि लामांनी ती पवित्र करून घेतल्याशिवाय त्यांना धार्मिक मूल्य प्राप्त होत नाही.

लेखक : श्री. दे. इनामदार

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate