অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डेव्हिड लो (अलेक्झांडर रेसिल)

डेव्हिड लो (अलेक्झांडर रेसिल)

(जन्म७ एप्रिल १८९१-मृत्यू १९ सप्टेंबर १९६३). आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रिटिश व्यंगचित्रकार. जन्म न्यूझीलंडमधील डनीडन शहरी. लोने चित्रकलेचे रीतसर शिक्षण कधीच घेतले नाही. वयाच्या अकराव्या वर्षी तो आपल्या शहरातल्या एका साप्ताहिकासाठी व्यंग्यचित्रे काढीत होता. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने केवळ चित्रकलेवर, विशेषतःव्यग्यचित्रांच्या आधारावर, उपजीविका सुरू केली. १९११ साली त्याला ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरातील बुलेटिन या वृत्तपात्रात व्यंग्यचित्रकाराची नोकरी मिळाली. त्या काळात त्याने विशेष निकराने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बिली ह्यूझ यांच्यावर व्यंग्यचित्रीय शरसंधान चालू ठेवले. या औद्धत्यपूर्ण व्यंग्यचित्रांमुळे लो याचे नाव गाजू लागले. ही व्यंग्यचित्रे द बिली बुक या नावाने प्रसिद्ध झाली (१९१८).

डेव्हिड लोला १९१९ साली लंडनच्या डेली न्यूज या वर्तमानपत्रात नोकरीचे आमंत्रण मिळाले. ऑस्ट्रेलियन राजकारणापेक्षा इंग्लंडचे आणि यूरोपचे राजकारण हे साहजिकच लोच्या प्रतिभेला जास्त मोठे आव्हान देणारे होते. लवकरच त्याने स्टार या पत्रात प्रवेश केला आणि तेथे १९२७ पर्यंत राहिला. त्या वर्षी ईव्ह्‌निंग स्टँडर्ड या वृत्तपत्रात मालक लॉर्ड बीव्हरब्रुक याच्या निमंत्रणावरून त्याने नोकरी पतकरली. लोची नोकरी आणि त्याची विचारसरणी या दोहोंतील एक मजेदार विसंगती येथे दिसून येते. तो ज्या वृत्तपत्रासाठी काम करीत होता ते आणि बीव्हरब्रुकसारखे त्याचे मालक हे मवाळ विचारसरणीचे व भांडवलशाहीचे पुरस्कर्ते होते. उलट लो आपल्या व्यग्यंचित्रांतून जहाल, डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करीत असे. त्याला त्याच्या मताप्रमाणे व्यंग्यचित्रे काढण्याचे स्वातंत्र्य होते.

लोने ईव्ह्‌ निंग स्टँडर्डमध्ये ‘कर्नल ब्लिम्प’ ही अजरामर व्यंग्यव्यक्तिरेखा निर्माण केली. ब्रिटिश हुकूमशाही व ब्रिटिश भांडवलीशाही यांचे हे प्रतीक. एक लठ्ठ बढाईखोर म्हातारा ‘साहेब’ आणि त्याच्या सील माशासारख्या दिसणाऱ्या मिशा असा या ब्लिम्पचा अवतार असतो. तो सर्व बदलांना विरोध करतो, ब्रिटिश सनातनप्रेमींचे प्रतिनिधित्व करतो. हा कर्नल ब्लिम्प पुढे काही उपहासपूर्ण चित्रपटांतसुद्धा अवतरलेला आहे. दोन महायुद्धांमधल्या काळात इटली, जर्मनीमध्ये फॅसिझमचा उदय झाला, तर जगात जागोजाग साम्राज्यशाही आणि दंडुकेशाही माजली. या सर्व अपप्रवृत्तींचे विच्छेदन करणारी लोची व्यंग्यचित्रे बहारदार आहेत. परतंत्र भारत आणि ब्रिटिश साम्राज्यशाही यांच्यामधल्या लढ्यातील ज्या महत्त्वाच्या घटना होत्या, त्यांच्या संदर्भात महात्मा गांधींचे त्याने काढलेले व्यंग्यचित्र संस्मरणीय आहे. मात्र भारतीय राष्ट्रवादाने ब्रिटनविरुद्ध लढा दिला तर हिटलर, मुसोलिनी यांचे फावेल, असाही इशारा देणे लोला योग्य वाटले. ह्या सगळ्या काळाचे भेदक दर्शन घडविणारा द यिअर्स ऑफ राथ हा लोचा व्यंग्यचित्रसंग्रह (१९४९) विशेष उल्लेखनीय आहे. १९०८ ते १९६०  या काळात लोच्या व्यंग्यचित्रांचे ३० संग्रह प्रसिद्ध झाले. १९५६ साली त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. १९५०  साली त्याने ईव्ह्‌ निंग स्टँडर्ड सोडून डेली हेरल्ड या मजूर पक्षाच्या दैनिकात प्रवेश केला. त्यानंतर तीन वर्षांनी उदारमतवादी मँचेस्टर गार्डियन मध्ये तो व्यंग्यचित्रकार म्हणून आला. १९६२ साली त्याला ‘सर’ हा सम्नान्य किताब मिळाला.

डेव्हिड लो आपली व्यंग्यचित्रे बारीक कुंचला काळ्या शाईत बुडवून काढीत असे. समीक्षकांनी त्याच्या कुंचल्याच्या लपेटीची तुलना चिनी किंवा जपानी चित्रकारांच्या तत्सम कारागिरीशी केलेली आहे. व्यंग्यचित्रकार म्हणून तो एक तल्लख बुद्धीचा विचारवंत तर होताच, परंतु लालित्यपूर्ण कलावंतही होता. लंडन येथे निधन.

लेखक : ज्ञानेश्वर नाडकर्णी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate