অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तैलरंगचित्रण

प्रस्तावना

 

'द चर्च ऑफ ओव्हेर' (१८९०) – व्हान गॉख

तैलरंगचित्रण म्हणजे तेलांमध्ये, बहुधा जवस (अळशी) तेलामध्ये, मिसळलेल्या रंगद्रव्यांचा वापर करून केलेले चित्रण होय. तैलरंगचित्रणाचा शोध यान व्हान आयिक (सु. १३९०–१४४१) व ह्यूबर्ट व्हान आयिक (सु. १३६६–१४२६) या फ्लेमिश चित्रकारबंधूंनी लावला, असे सर्वसाधारणपणे मानले जाते.या विषयीचा विश्वासार्ह पुरावा व्हाझारी (१५११–१५७४) या इटालियन कलासमीक्षकाच्या 'लाइव्हज ऑफ द आर्टिस्ट्‌स' या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत (१५६८) मिळतो. तथापि पाओलो पिनो (सोळावे शतक) या ग्रंथकाराच्या मते इसवी सनाच्या सुरूवातीपासूनच रोमन लोकांना तैलरंगाचे तंत्र अवगत होते व त्याचा उपयोग ते ढाली व अन्य हत्यारे रंगविण्यासाठी करीत. याशिवाय ब्रिटिश म्यूझीयममधील आठव्या शतकातील हस्तलिखितांत व्हर्निश तेल आणि लवकर सुकणारे तेल बनविण्याविषयी माहिती मिळते. त्याचप्रमाणे बाराव्या शतकातील थिऑफिलस आणि इरॅक्लिअस या ग्रंथकर्त्यांच्या हस्तलिखितांत तेलामध्ये रंगकणांचे मिश्रण करण्याच्या पद्धतीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. यावरून व्हान आयिकच्या काळाच्या फार पूर्वीपासूनच इटालियन व रोमन चित्रकारांना तैलरंगांचा वापर करण्याची कला, काहीशा मर्यादित स्वरूपात, अवगत होती असा निष्कर्ष निघतो. हा ऐतिहासिक पुरावा जमेस धरूनही आज उपलब्ध असलेल्या कलाकृतींवरून हेच सिद्ध होते, की तैलरंगांचा चित्रे रंगविण्यासाठी शास्त्रशुद्धतेने केलेला उपयोग व्हान आयिकच्या पूर्वीच्या काळात आढळत नाही.

तैलरंगांच्या चित्रणपद्धतीचा शोध

तैलरंगांच्या चित्रणपद्धतीचा शोध लागल्यानंतर अल्पावधीतच त्यास खूप लोकप्रियता लाभली. त्याची कारणे सामान्यतः पुढीलप्रमाणे दिसून येतात:

(१) हे रंग हाताळण्यास सुलभ असून या रंगांपासून अनेक प्रकारच्या रंगच्छटा व दृक्‌परिणाम निर्माण करता येतात.

(२) हे रंग एकमेकांवर लेपता येतात तसेच रंगांचा ताजेपणा व सहजता न गमावता लेपनात दुरूस्ती करता येते.

(३) जलरंगांप्रमाणे आवश्यकतेनुरूप या रंगांचे पातळ व पारदर्शक थर देता येतात व जरूर पडल्यास छुरिकेने जाड थर माखता येतात.

(४) रंगाचा थर चिकणरंगाप्रमाणे (टेंपेरा) वा ‘गुआश’प्रमाणे सुका म्हणजे न चकाकणारा ठेवता येतो;  त्याचप्रमाणे तो पारदर्शक व तकाकीदार बनविता येतो. थोडक्यात, तैलरंगातील चित्राइतका रंगांचा गहिरेपणा इतर माध्यमांतून रंगविलेल्या चित्रात क्वचितच आढळतो. शिवाय तैलरंग सुकण्यास लागणाऱ्या वेळामुळे आणि सुकण्याच्या विविध प्रकारांमुळे चित्रकाराला रंगलेपनामध्ये अमर्याद स्वातंत्र्य मिळते. चित्र एका दिवसातही पूर्ण करता येते वा एकाच चित्रावर सहा-सहा महिने निर्वेधपणे काम करता येते. तैलरंगचित्रणात रंगलेपनाचे एकाच प्रकारचे तंत्र नसून, चित्रकारापरत्त्वे त्यात विविध व्यक्तिविशिष्ट प्रकार आढळून येतात.

तैलरंगचित्रणाकरिता तेलाचे प्रकार

तैलरंग बनविताना रंगांची वस्रगाळ पूड करून ती तेलामध्ये घोटतात व चित्रामध्ये रंगलेपन करतानाही हे रंग तेलामध्ये पातळ करतात. तैलरंगचित्रणाकरिता वापरावयाची तेले विविध प्रकारची असतात. सर्वसाधारणपणे त्यांची वर्गवारी अशी:

(१) वनस्पतीजन्य–अळशी(जवस) तेल, आक्रोड तेल, ‘पॉपी’ तेल,

(२) खनिज तेले व झाडांच्या अर्कापासून बनविलेली तेले,

(३) मेण व कापूर यांपासून बनविलेली  व

(४) जनावरांच्या चरबीपासून बनविलेली तेले.

यांशिवाय बदाम एरंडी व ऑलिव्ह यांच्या तेलांचाही काही चित्रकारांनी उपयोग केला आहे. पण ही तेले लवकर सुकत नाहीत, असा अनुभव आहे. शिवाय सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन व चिनी लाकूड यांच्यापासून बनविलेल्या तेलांचाही तैलरंगाकरिता उपयोग केल्याचा उल्लेख सापडतो; पण ही तेले रंगकामासाठी तितकीशी उपयोगी ठरत नाहीत. सर्वसाधारणपणे अळशी तेल व टर्पेंटाइन यांचाच उपयोग करणे उचित मानले जाते.

तैलरंगाकरिता वापरावयाच्या रंगांची वर्गवारी

(१) शुद्ध खनिज–भूगर्भात मिळणारी अनेक रंगांची माती व दगड यांपासून बनविलेले रंग,

(२) रासायनिक प्रक्रियेपासून बनविलेले– तांबे, जस्त, कॅडमियम इत्यादींवर रासायनिक प्रक्रिया करून मिळणारे रंग,

(३) वनस्पतीजन्य–वनस्पतीच्या मुळ्यांपासून तयार केलेले रंग व

(४) पशुजन्य–जनावरांचे मुत्र, अस्थी इत्यादींपासून बनविलेले रंग. सर्वसाधारणपणे खनिज रंग पक्के व शाश्वत टिकणारे असतात, शतकानुशतके त्यांत बदल होत नाही.रासायनिक प्रक्रियेपासून बनलेले रंग काही प्रमाणात पक्के असतात. वनस्पतीजन्य व पशूजन्य रंग मात्र तितकेसे पक्के नसतात. काही रंग तर कालांतराने पूर्णपणे उडून जातात.

तेल व रंग यांप्रमाणेच ज्या पृष्ठाधारावर (पेजबेस) चित्र रंगवले जाते, त्यालाही फार महत्त्व असते. तैलरंगचित्र अनेक पृष्ठाधारांवर रंगवले जाते. पंधराव्या शतकात काष्ठफलकावर (पॅनेल) चित्रे रंगविली जात. हा फळा ओक, चेस्टनट इ. प्रकारच्या आणि कमावलेल्या लाकडांपासून बनविलेला असे. त्यानंतरच्या काळात कापूस, ताग, लिनन, रेशीम इत्यादींच्या कापडापासून ‘कॅन्‌व्हास’ बनवीला जाऊ लागला. तो कॅन्‌व्हास लाकडी चौकटीवर ताणून चित्रफलक बनविण्याची पद्धती सुरू झाली. तीच पद्धती आजतागायत चालू आहे. तथापि कॅन्‌व्हासव्यतिरिक्त स्तरकाष्ठ (प्लायवूड), कठीण लाकडी फळ्या (हार्डबोर्ड), सिमेंटचा पत्रा इत्यादींवरही चित्रे रंगविली जातात.

तैलरंगचित्र ज्या फलकावर रंगवायचे असते (कॅन्‌व्हास, लाकडी फळा इ.) त्या फलकावर प्रथम सफेदीचे तीन थर द्यावे लागतात. त्या प्रक्रियेस ‘प्रायमिंग’ (रंगाचा पहिला हात/प्राथमिक लेप) असे म्हणतात. हा पहिला हात तेलयुक्त किंवा तेलव्यतिरिक्त असतो. तेलव्यतिरिक्त पहिल्या हाताला ‘गेसो’ असे म्हणतात. त्यात गोंद, झिंक ऑक्साइड व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा समावेश असतो. तेलयुक्त पहिल्या हातामध्ये अळशी तेलाचा अंतर्भाव असतो. पहिल्या हातासाठी वापरावयाचे मिश्रण अगदी प्रमाणबद्ध असावे लागते व त्याचे थर सावकाशपणे व एक सुकल्यानंतर दुसरा असे द्यावे लागतात. शिवाय हा पहिला हात एकदम तेल शोषून घेणारा असता कामा नये किंवा अगदी कठीण, गुळगुळीत आणि तेल अजिबात न शोषणाराही असू नये. सदोष प्रायमिंगवरील तैलरंगचित्रांच्या खपल्या पडतात किंवा रंग काळपट होतात.

तैलरंगचित्रणाकरिता लागणारे इतर साहित्य म्हणजे कुंचले, रंगधानी व छुरिका. तैलरंगाचे ब्रश डुकराच्या केसांपासून बनविलेले असतात. याशिवाय सेबलच्या केसांपासून बनलेले कुंचलेही वापरले जातात. पूर्वीच्या काळी रंगधानी वॉलनटच्या लाकडापासून बनवीत. अलीकडे त्यासाठी स्तरकाष्ठचा वापर करतात. छुरिका बनविण्याकरिता विशिष्ट पाणी दिलेले (टेंपर) पोलाद वापरतात.

तैलरंगचित्र तजेलदार व टिकाऊ राहण्यासाठीचे नियम

तैलरंगचित्र तजेलदार व टिकाऊ राहण्यासाठी सर्वसाधारणपणे जे नियम पाळावे लागतात ते असे:

(१) चित्रफलकावरील प्रायमिंग चांगल्या स्थितीत असावे. जुन्या प्रायमिंगचा चित्रफलक निरूपयोगी असतो.

(२) तैलरंगचित्र रंगविताना गडद रंगापासून सुरूवात करावी व हळूहळू उजळ रंगाकडे जावे.

(३) गडद रंग विशेषेकरून पारदर्शक व पातळ थराचे असावेत व गडद रंगांमध्ये शक्यतो पांढऱ्या रंगाचा वापर नसावा.

(४) उजळ रंग जाड थराचे असावेत, पण ते तेलात उत्तम प्रकारे घोटलेले असावेत.

(५) एक थर चांगला सुकल्याशिवाय दुसरा थर देऊ नये; शिवाय उजळ रंगाच्या जाड थरावर (इम्पॅस्टो) पुन्हा गडद पातळ रंगाचा थर देऊ नये. त्यामुळे रंगास तडे पडतात.

(६) तेलात पाण्याचा अंश नसावा. तो असल्यास चित्रास बुरशी येते.

(७) खनिज व रासायनिक रंग कोणते आणि ते मिश्रणामध्ये एकमेकांशी कसे वागतात, त्याचा अभ्यास असावा. सदोष मिश्रणाने चित्रे काळपट पडतात किंवा त्यांस तडे जातात.

(८) चित्र पूर्णपणे वाळल्यानंतर म्हणजे कमीतकमी तीन महिन्यांनंतर त्यावर व्हार्निशचा पातळ थर द्यावा.

तैलरंगाचा विकास

पंधराव्या शतकात तैलरंगाचा वापर सुरू झाल्यापासून पुढील शंभर वर्षांत त्यात झपाट्याने प्रगती झाली. इटली, फ्रान्स, स्पेन, हॉलंड या देशांतील चित्रकारांनी तैलरंगचित्रपद्धती अजरामर केली. पंधराव्या व सोळाव्या शतकांतील इटालियन चित्रकार पेरूजीनो (सु. १४४५–१५२३), रॅफेएल (१४८३– १५२०), जूल्यो रोमानो (सु. १४९९– १५४६), आंद्रेआ देल सार्तो (१४८६– १५३१) इ. चित्रकारांच्या चित्रांतील छायाप्रकाश क्षेत्रे सारख्याच जाड रंगाने रंगविली आहेत, तसेच त्यांच्या चित्रांतील गडद रंग फारसे पारदर्शक नाहीत. याचे एक कारण असे, की त्या काळी प्रत्यक्ष (डायरेक्ट) रंगलेपनाची (म्हणजे चित्रात शेवटी जो रंग हवा असेल तोच पहिल्यापासून रंगविणे) पद्धती नव्हती. तत्कालीन पद्धतीला ‘ब्राउन स्कूल’ असे म्हणत. ही पद्धती म्हणजे संपूर्ण चित्र एका विशिष्ट तपकिरी–करड्या रंगात रंगवावयाचे व ते सुकल्यावर ज्या ठिकाणी जे रंग पाहीजे असतील, त्यांचा पातळ पारदर्शक थर द्यायचा. या प्रक्रियेस ‘ग्‍लेझिंग’ अशी संज्ञा होती. तथापि त्याच काळातील लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५९९) व कोररेद्‌जो (सु. १४८९ –१५३४) यांच्या चित्रांत मात्र गडद रंगांच्या पातळ थरांचा उपयोग छायाक्षेत्रात अगदी नाजुकपणे केलेला दिसतो.

सतराव्या शतकातील चित्रकारांनी तैलरंगांचा अतिशय शास्रशुद्ध पद्धतीने उपयोग केला. विशेषतः ‘पारदर्शक छायाक्षेत्र व जाडसर प्रकाशक्षेत्र’ हे तत्त्व रूबेन्सच्या (१५७७ –१६४०) चित्रांत प्रकर्षाने जाणवते. त्याचप्रमाणे डच चित्रकार रेम्‍ब्रँट (१६०६–६९) व व्हरमेर (१६३२–७५) यांच्या चित्रांतील रंगांची विशुद्धता आणि गहिरेपणा साक्षात अलौकिक वाटतो. स्पॅनिश चित्रकार व्हेलाथ्‌केथ (१५९९–१६६०) याच्या चित्रांतील तंत्रकौशल्यही अभ्यसनीय आहे. त्या काळातील बहुतेक चित्रकारांच्या चित्रांत अत्युच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य दिसून येते. याचे एक कारण त्यांच्या कलासाधनेच्या गुरूकुल पद्धतीमध्ये असावे. त्या काळी चित्रकार होऊ इच्छिणाऱ्याला एकाद्या जेष्ठ चित्रकाराच्या हाताखाली त्याच्या कलानिकेतनात १२ वर्षे उमेदवारी करावी लागत असे. या प्रदीर्घ कालावधीमध्ये रंग घोटण्यापासून ते प्रचंड आकाराची चित्रे रंगवण्यापर्यंतच्या सर्व कामांत त्याला गुरूच्या हाताखाली काम करावे लागे. त्यायोगे त्यास कलानिर्मीतीची सर्व रहस्ये अवगत होत असत. या गुरूकुल पद्धतीची सविस्तर माहिती इटलीत सापडलेल्या बाराव्या ते अठराव्या शतकांपर्यंत लिहिलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांत आढळते. ही हस्तलिखिते 'ओरिजिनल ट्रीटाइझीस ऑन द आर्ट्‌स ऑफ पेंटिंग' या ग्रंथाच्या रूपाने १८४८ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाली.अठराव्या शतकात फ्रान्समधील व्हातो (१६८४–१७२१), दाव्हीद (१७४८–१८२५) तसेच इंग्‍लंडमधील गेन्झबरो (१७२७–८८) यांनी आपापल्या स्वतंत्र शैली निर्माण केल्या. एकोणिसाव्या शतकातही तैलरंगचित्रणाचे अनेक उत्तमोत्तम अविष्कार दृष्टीस पडतात. या काळातील प्रमुख चित्रकार म्हणजे स्पेनमधील गोया (१७४६–१८२८), फ्रान्समधील दलाक्र्‌वा (१७९८–१८६३), अँग्र (१७८०–१८६७) व कॉरो (१७९६–१८७५) आणि इंग्‍लडकॉन्स्टेबल (१७७६–१८३७) व टर्नर (१७७५–१८५१) हे होत

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तैलरंगचित्रपध्दती अत्युच्च बिंदूला पोहोचली होती. तथापि उत्तरकालीन चित्रकारांना त्या रंगलेपनपध्दतीत वातावरणनिर्मितीचा अभाव आढळू लागला. तेव्हा पॅरिसमधील तत्कालीन तरूण चित्रकारांनी तैलरंगाच्या  लेपनपध्दतीत क्रांतिकारक प्रयोग करण्यास सुरूवात केली. हे चित्रकार म्हणजे माने (१८३२–८३), मॉने (१८४०–१९२६), रन्वार (१८४१–१९१९), बाझी (१८४१–७०) व पीसारो (१८३०–१९०३) हे होत. या चित्रकारांनी दृक्‌प्रत्ययवादी शैलीमध्ये चित्रे रंगविली. त्यानंतर साधारणतः १८८० पासून १९४० पर्यंत तैलरंगचित्रणात अगणित बदल घडत गेले. जाडसर रंगलेपन, मूळ स्वरूपातील (प्रायमरी ) रंगाचा उपयोग, रंगाचे विभाजन, छुरिकेने रंग माखण्याची प्रक्रिया, रंगावर चढलेले पोत, सपाट रंग इ. अनेक तंत्रे वापरण्यात येऊ लागली. दुसऱ्या महायुध्दानंतर तर चित्रकारांना रंगाच्या शुध्दतेची व लेपनतंत्राची फारशी अपूर्वाई वाटेनाशी झाली.कोणत्याही प्रकाराचे (एनॅमल, व्हार्निश, केसीन, पॉलीमर, अ‍ॅक्रिलीक इ.) रंग तैलरंगचित्रणात वापरले जाऊ लागले. १९६० पासून आजतागायत अनेक प्रयोग होतच आहेत. मात्र त्याचबरोबर तंत्रशुध्द रंगलेपनपध्दतीवर गाढ निष्ठा ठेवणारा फार मोठा चित्रकारवर्ग आजही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

भारतात तैलरंगचित्रणाची परंपरा

भारतात तैलरंगचित्रणाची परंपरा नव्हती. किंबहुना ब्रिटिश राजसत्ता स्थापन होईपर्यंत भारतीय चित्रकारांना तैलरंगाची माहिती नव्हती. राजा रविवर्मा (१८४८–१९०६) हा भारतातील  पहिला तैलरंग चित्रकार मानला जातो. १८६८ च्या सुमारास थीओडोर जेन्सन हा ब्रिटिश चित्रकार त्रिवेंद्रमला राजाचे व्यक्तिचित्र रंगविण्यासाठी आला होता. त्याच्याकडूनच रविवर्म्याने तैलरंगचित्रणाचे शिक्षण घेतले. त्याने तैलरंगात हिंदू देवादिकांची अनेक चित्रे रंगविली व ती लोकप्रिय झाली. त्याचप्रमाणे इंग्रज राज्यकर्त्यांनी भारतात ठिकठिकाणी कलाविद्यालये स्थापन केली व त्यांतून ब्रिटिश धर्तीवर कलाशिक्षण दिले जाऊ लागले. मद्रास, कलकत्ता, मुंबई व लाहोर येथील कलाविद्यालयांतून त्या काळात इंग्रज अध्यापक नेमण्यात आले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात तैलरंगचित्रणाचे शिक्षण देण्यात येऊ लागले. इंग्‍लंडमधून यूरोपातील प्रमुख चित्रकारांच्या चित्रांच्या प्रतिकृती मागवण्यात आल्या व त्यांचा प्रभाव भारतीय चित्रकारांवर दिसू लागला. आबालाल रहिमान, अल्लाबक्ष ठाकोरसिंग, गांगुली, पेस्तनजी बमनजी, पिठावाला, आगासकर, त्रिंदाद, बाबुराव पेंटर इ. चित्रकार त्या काळात प्रसिध्दीस आले. पुढे १९३०–४० च्या दरम्यान यूरोपात शिक्षण घेतलेल्या अमृता शेरगीलने (१९१३–४१) नवी तैलरंगपध्दती जगापुढे आणली. १९४५ नंतर बरेचसे भारतीय चित्रकार यूरोपात जाऊन शिकू लागले आणि चित्रनिर्मितीमध्ये नवनव्या तत्रांचा अवलंब करू लागले. तथापी दुसऱ्या महायुध्दानंतर यूरोपातील आधुनिक कलाशैलींच्या उदयाने तैलरंगाचे पारंपारिक तंत्र आत्मसात करण्याची आवश्यकता नव्या चित्रकारांना वाटेनाशी झाली. असे असले, तरी आजही काही नामवंत चित्रकार तैलरंगचित्रपध्दतीवर गाढ निष्ठा ठेवून चित्रनिर्मिती करीत आहेत. त्यांपैकी हुसेन, चावडा, रझा, गायतोंडें, सडवेलकर, स्वामिनाथन्, संतोष, पद्‍मसी, बेंद्रे इ. उल्लेखनीय चित्रकार होते. त्यांची चित्रे विशुद्ध तैलरंगचित्रणाचे नमुने म्हणून अभ्यासनीय आहेत.

लेखक : बाबुराव सडवेलकर

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate