অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दख्खनी कला

प्रस्तावना

दख्खनच्या भौगोलिक रचनेमुळे दख्खनची कला उत्तरेकडील आर्य आणि दक्षिणी द्राविडी यांच्या सांस्कृतिक संगमाची द्योतक ठरते. तीमध्ये दोन्ही संस्कृतींमधील रूपवैशिष्ट्यांचा विविध प्रमाणातील सहयोग झालेला आढळतो. मंदिरवास्तू, गुंफाशिल्पे, भित्तिचित्रे, चित्रकला आणि कनिष्ट कला यांसारखे कलात्मक भांडार प्रगत करण्यासाठी दख्ख्नला पुरेसे स्थैर्य आणि मनुष्यबळाचा लाभ झालेला होता. दख्खनी कलेच्या जडणघडणीला जे समाज आधारभूत ठरले; त्यांत आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र प्रदेशांतील लोक प्रमुख होत. राजकीय त्रस्ततेमुळे उत्तरेकडील निर्वासितांचे  महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यामुळे मराठी ही एकमेव आर्य भाषा द्राविडी प्रदेशात स्थिरावली.

चित्रनिर्मितीचे अतिप्राचीन म्हणजे लोहयुगीन नमुने शिलांवर खोदलेल्या मानवाच्या व प्राण्यांच्या आकृत्यांच्या रूपात बेंकालनजीक रायपूर तालुक्यात आढळले आहेत. दुसऱ्या शतकानंतर चित्रकला, शिल्पकला व वास्तुकला ह्या अतिशय प्रगत झालेल्या दिसून येतात. महाराष्ट्रात बेडसा येथील यक्षयक्षीणींच्या शिल्पांचे नमुने हे तद्देशीय प्रगती दर्शवितात आणि त्या काळी अस्तित्वात असलेली ही शैली उत्तर काळातही चालू असल्याचे सूचित करतात. कोंडाणे व बेडसा येथील खोदकामाच्या नमुन्यांवरून शिल्प कोरण्याची कला त्या काळातही पूर्णत्वाला पोहोचल्याचे दिसून येते. विशेषतः दगड खोदून बनविलेल्या विहारांच्या रचनेतील परिपूर्णतेवरून दख्ख्नला ख्रिस्तकाळाच्याही पूर्वी उच्च स्वरूपाची वास्तुशिल्पाची परंपरा लाभल्याचे सिद्ध होते.

दख्खनच्या प्राचीन कलाकृती ह्या सिंधुखोऱ्यातील कलाकृतींहून मूलतः भिन्न आहेत. तथापि अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथील अगदी अलीकडच्या उत्खननावरून सिंधुखोरे आणि दख्खनचे पठार या दोहोंमधील दुवा सापडतो. ३,५०० वर्षांपूर्वीही तांब्याचे विविध उपयोग दख्खनमध्ये ज्ञात असल्याचे तेथील उत्खननावरून उघडकीला आले आहे. दख्खनमध्ये, विशेषतः पश्चिम घाटातील भागात, दगड खोदून तयार केलेल्या गुंफा विपुल आहेत. त्यांचा उपयोग निवासस्थानासारखा व पूजास्थानासारखा केला जाई. आश्रम आणि विहार यांच्या निर्मितीसाठी या विभागातील भूरचना, विशेषेकरून पश्चिम घाटातील सपाट माथ्याचे डोंगर, सुयोग्य होती.

मौर्य राजांच्या (इ. स. पू. ३२१–१८७) आश्रयाखालील बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर दख्खनच्या कोनाकोपऱ्यात व दक्षिणेत वास्तुशिल्पाच्या प्रस्थापित संकल्पनांचा प्रसार झाला आणि स्थानिक विविधतेशी त्यांचा मिलाफ झाला. बौद्ध, हिंदू व जैन धर्मीयांनी निर्माण केलेल्या विविध प्रकारच्या शैलींनी प्रतिमाविद्या (आयकॉनॉग्राफी) प्रगत केली; तरीही त्या शैलीमागील रूग्णतत्त्वामध्ये विलक्षण साम्य दिसून येते आणि याचे कारण म्हणजे त्या त्या संप्रदायाच्या गरजांनुसार अनेक योजनांवर बहुधा तेच तेच कारागीर–वृंद काम करीत असत.

सातवाहनांचा इतिहास

सातवाहनांची कारकीर्द (इ. स. पू. सु. १०० ते इ. स. ३००) जसजशी भरभराटीला आली, तसतसा पश्चिमेकडील नद्या-समुद्रांचा उपयोग मध्यपूर्व आणि यूरोप यांच्याशी व्यापार अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी होऊ लागला. या प्रदेशातील श्रीमंत व्यापाऱ्यांनी कल्याण व साष्टी येथील बंदरांत प्रवेश मिळविण्यासाठी पश्चिम घाट ओलांडावा लागे, त्यामुळे त्यांनी या मार्गावरील कार्ले, कोंडाणे, भाजे, कान्हेरी, जुन्नर इ. ठिकाणी आश्रम आणि विहार बांधले. त्यांनी संपन्न स्वरूपाच्या दख्खनी कलेचा प्रत्यक्ष पाया घातला.

तत्कालीन काष्ठवास्तुशैलीवर आधारलेल्या शिलावास्तूंची सुरूवात सातवाहनांनी केली. त्याची प्रचीती कोंडाणे, बेडसा आणि कार्ले येथील दगडातून खोदलेल्या गुंफांवरून येते. परंतु केवळ कार्ले येथील शैलीच अधिक प्रगल्भ आणि जोरदार असल्याचे दिसून येते. सातवाहनांनी आपल्या उत्कर्षकाळात स्तूपशिल्पे, सांची येथील स्तूप व त्याभोवतीचे कठडे, जग्गयपेट व अमरावती येथील स्तूप, कठडे आणि महाद्वारे यांच्या रूपाने भारतीय कलेला काही अप्रतिम, चिरस्मरणीय कलाकृती प्रदान केल्या. तिसऱ्या शतकाच्या सुमारास सातवाहनांना पूर्वेकडे माघार घ्यावी लागली; तथापि दख्खनच्या कलेतील पुढील प्रगतीचा आधार या कलापरंपरेतच होता.

सातवाहनांच्या ऱ्हासाने निर्माण झालेली सांस्कृतिक पोकळी नवीन विजेते पल्लव आणि चालुक्य यांनी परिणामकारक रीत्या भरून काढली. जैन आणि इतर निर्वासित यांच्या स्थलांतरामुळे उत्तरेकडील सुसंस्कृत गुप्तांच्या शैलीचा प्रभाव दख्खनी कलांवर पडला आणि त्यांचे विविध कलापरंपरांशी संयोगीकरण झाले. परोपकारी आणि पुरोगामी अशा पल्लव (इ. स. सु. ५७५–सु. ८००) आणि चालुक्य (५३५–७५७) राजांच्या कारकीर्दीमध्ये बादामी, ऐहोळे, पट्‌टदकल, महाबलीपूर, कांचीपुरम्  येथील चिरवंत कलेची निर्मिती झाली. कांचीपुरम् व पट्टदकल येथील मंदिरे विशेषतः वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पट्टदकल येथे नागर व द्राविड शैलींचा मिलाफ व त्यातून निर्माण झालेली चालुक्य शैली स्पष्ट दिसते.

दख्खनमधील चित्रकलेचा आविष्कार

अजिंठा आणि वेरूळ येथे श्रेष्ठ स्वरूपाच्या चिरंतर कलेची निर्मिती झाली. अजिंठा  हे दख्खनमधील चित्रकलेच्या आविष्काराचा केंद्रबिंदू होय. प्रागैतिहासिक शिलाशिल्पनाच्या आरंभापासून ते भारतीय उपखंडात आजतागायत अस्तित्वात असलेल्या अत्युत्कृष्ट भित्तिचित्रांपर्यंत हा मार्ग खचितच कष्टदायक आणि दीर्घ मुदतीचा असावा. सित्तनवासलमध्ये काही पल्लव शैलीची चित्रे उपलब्ध आहेत. सहाव्या शतकाच्या अखेरीस बौद्ध श्रद्धा आणि धर्म जवळजवळ संपुष्टात आला होता. तो हिंदू धर्माच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होत चालला होता. वेरूळ  येथील गुंफा या घडामोडीचा निःसंदिग्ध पुरावा देतात. वेरूळमधील ‘ब्राह्मण’ शैलीतील शिल्पे गुणवत्ता व वैपुल्य या दृष्टींनी संपन्न आहेत.

सातव्या शतकात दख्खनमध्ये चालुक्यांची सत्ता प्रभावशाली होती. ऐहोळे आणि पट्टदकल या ठिकाणी त्यांच्या लक्षणीय मंदिरवास्तू दिसून येतात. दख्खनमधील नव्याने साधलेल्या कलाशैलीचे मूळ या मंदिरवास्तूंत सापडले. आधीच सामावली गेलेली गुप्त शैली दुसऱ्या पुलकेशीच्या अमदानीत तिला लाभलेल्या प्रादेशिक जोमामुळे अधिकच समृद्ध झाली.

दख्खनी कलेच्या सुवर्णयुगाचा अस्त

वेरूळ आणि घारापुरी  येथील ब्राह्मण गुफांमंदिरात पल्लव व चालुक्य शैलींचे घटक संमिश्र स्वरूपात दिसतात. या मंदिरांच्या, विशेषतः कैलासनाथाच्या, निर्मितीचे श्रेय दख्खनवर अंमल गाजविणाऱ्या राष्ट्रकूटांना दिले जाते. राष्ट्रकूट साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर दख्खनी कलेच्या सुवर्णयुगाचाही अस्त झाला. दक्षिणेकडे चोलांनी सर्जनशील परंपरा चालू ठेवली आणि तिची परिणती उत्कृष्ट चेल ब्राँझशिल्पांच्या प्रतिमाविद्येच्या विकासात झाली. वेंगीच्या चालुक्यांनी मंदिरवास्तूंची निर्मिती चालूच ठेवली. ऐहोळे व पट्टदकल–मंदिरांच्या आदर्श रचनातत्त्वावर जरी शैली आधारित असली, तरी त्यांच्या शिलाशिल्पनामध्ये तपशील आणि अलंकारणाचा प्रादुर्भाव विशेषतः उच्च तांत्रिक कौशल्यातून उद्‌भवलेला दिसतो. अलंकृतता आणि तपशिलांची सूक्ष्म कामगिरी यांसाठी त्या प्रदेशातील रवाळ, नितळ काळा दगडही अंशतः कारणीभूत ठरला. या शैलीतील अंतिम परिपक्वता हळेबीड, बेलूर आणि सोमनाथपूर येथील बाराव्या शतकातील होयसळ शैलीत परिणत झाली.

विजयानगर सत्तेच्या कारकीर्दीतील सांस्कृतिक वैभव

अतिउत्तरेकडील मंदिरशिल्पांमध्ये चैतन्यहीनता आणि तोचतोचपणा आला. मात्र देवगिरीच्या यादवांच्या किल्ल्यांसारख्या सैनिकी वास्तू ह्या मनोवेधक व चिरस्थायी ठरल्या. मुसलमानांच्या दख्खनमधील विजयी आक्रमणाला विजयानगरच्या साम्राज्याने पायबंध घातला. हिंदू प्रतिकाराचा शेवटचा बुरूज ठरलेल्या या विजयानगरच्या राज्यकर्त्यांनी हिंदू कलापरंपरांचे अवशेष जतन करण्याचे कार्य केले. या काळात दख्खनच्या आणि दक्षिणेकडील अन्य कलापरंपरांचा मिलाफ झाला, तरी त्यातून उदय पावलेली कला मात्र आपले पूर्वीचे वैभव निर्माण करू शकली नाही. राजकीय आणि सांस्कृतिक प्रतिकारात गुंतलेल्या विजयानगर राज्याला मोठ्या प्रमाणावर कलात्मक नवनिर्मिती साधण्यास पुरेसा अवसर मिळाला नाही. त्या वेळी हंपी हे एक जगातील मोठे व्यापारी शहर गणले जाई. तेथील कलानिर्मिती भव्य, विपुल, गुंतागुंतीची आणि विविधढंगी होती. तेथील अवशेषांवरून विजयानगर सत्तेच्या कारकीर्दीतील सांस्कृतिक वैभवाची पूर्ण कल्पना येते [विजयानगर साम्राज्य].

इस्लामी वास्तुकला

हिंदूंच्या या अखेरच्या बालेकिल्याचा १५६५ मध्ये तालिकोटच्या लढाईत पूर्ण बीमोड झाल्यानंतर मुसलमानांना हिंदूंच्या सुसंघटित राजकीय प्रतिकाराची धास्ती उरली नाही. त्यामुळे हिंदूंच्या कला व संस्कृती यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काहीसा सहिष्णू बनला. याप्रमाणे दक्षिणेकडील शाहीसत्तांनी हिंदू कैदी आणि निर्वासित यांचा कलेतील नवनिर्मितीसाठी फार मोठ्या संख्येने उपयोग करून घेतला. त्यातून हिंदू संस्कृतीचा प्रभाव मुस्लिम कला आणि संस्कृती यांवर अभावितपणे पडला आणि मुसलमानांनाही तो आस्वाद्य ठरला. हिंदूंची प्रणयकाव्ये तसेच संगीत आणि फलज्योतिष यांवर आधारलेली त्यांची लघुचित्रे हा दख्खनमधील, विशेषतः विजापूरमधील, मुस्लिम राज्यकर्त्यांचा शौकच बनला. हिंदूच्या वास्तुकलेतील आकारिक घटक आणि शिल्प–वैशिष्ट्ये यांचा इस्लामी वास्तुकलेमध्ये सर्रास वापर होऊ लागला. इस्लामी आणि हिंदू कलांच्या या सहज देवाणघेवाणीमुळे दख्खनच्या वास्तुकलेत एक नावीन्यपूर्ण व जोशयुक्त शैली निर्माण झाली. विजापूरच्या ‘मेहतर महाला’ तील सूक्ष्म, अनवट वास्तुशिल्पीय कोरीवकाम आणि आकारिक घडण हा या संयोगीकरणाचा सध्या अस्तित्त्वात असलेला सर्वोत्कृष्ट नमुना होय.

मराठ्यांचे राजकीय वर्चस्व

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राजकीय वर्चस्वामुळे दख्खनमधील इस्लामी आणि ब्रिटिश वर्चस्वाला शेवटचा परिणामकारक असा प्रतिकार झाला. पुण्यातील पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या सैन्याची भारतातील एकमेव आणि फार थोर अशी शक्ती निर्माण झाली. त्यांनी काही कलासंस्कार आत्मसात करून राजवाडे आणि हवेल्या बांधल्या; परंतु बहुधा इस्लामी शैलीने प्रभावित झालेली काष्ठवास्तूंची त्यांची लोकप्रिय शैली विशेषत्वाने प्रादेशिकच राहिली. मुस्लिम आणि अखेर ब्रिटिश विरोधकांशी सामना देण्यात सतत गुंतल्यामुळे मराठ्यांना स्वतःची अशी भव्य स्मारके बांधण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही. मराठ्यांच्या काळातील चित्रांमध्ये लोककला व राजपूत लघुचित्र शैली यांचा वैशिष्ट्यपूर्ण व भाबडा मिलाफ झालेला आढळतो.

दख्खनी कलेचा उगम

भारतावरील ब्रिटिशांच्या वर्चस्वामुळे दख्खनमधील कलापरंपरेचा उच्छेद झाला. इंग्रज राज्यकर्त्यांना भारतीय कलापरंपरेचे फारसे आकल होऊ शकले नाही. स्वतःची वास्तववादी कलाशैली मात्र भारतात रूजविण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. याच वेळी बंगालमधील शांतिनिकेतन संस्थेने भारतीय कलेचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न केला; परंतु चालू परंपरेमध्ये नवीन जोम निर्माण करण्याच्या या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. १८५७ साली सर जमशेटजी जिजीभाई यांनी मुंबई येथे ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ ची स्थापना केली. त्यांचा मूळ उद्देश ब्रिटिश कलातज्ञांकडून येथील रहिवाशांना मार्गदर्शन करून येथील आनुवंशिक कारागिरीचे व कलापरंपरेचे पुनरूज्जीवन करणे, तसेच ब्रिटिश सत्तेचा उपयोग भारतीय कला व कारागिरीच्या विकासासाठी करून घेणे, अशा स्वरूपाचा होता. त्यांचे हेतू अनेकार्थांनी सफल झाले. काही दशकांनंतर सर जे. जे. स्कूलचे तत्कालीन प्राचार्य जॉन ग्रिफिथ यांनी अजिंठ्याचे कलावैभव जगाच्या नजरेस आणले. अजिंठ्याच्या चित्रांच्या प्रतिकृतींसाठी आणि ग्रंथनिर्मितीसाठी त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न प्रशंसनीय आहेत. व्यापक दृष्टिकोनातून पाहता संमिश्र अशा पाश्चिमात्य प्रभावांना आत्मसात करून घेण्याच्या दृष्टीने जे. जे. स्कूलने एक पार्श्वभूमी निर्माण केली व ती सद्यःकालीन दख्खनी कलेच्या उगमास कारणीभूत ठरली.

नृत्यकलेची विकसित शैली

कनिष्ठ कलेच्या प्रांतातही दख्खनी शैलीचे पृथगात्म स्वरूप नजरेत भरते. प्राचीन काळी मृत्तिकापात्रे व जडजवाहिरांचे काम यांसारखे हस्तव्यवसाय शिल्पाच्या जोडीनेच चालत असत. हे कारागीर समकालीन धार्मिक व मूर्तिशास्त्रीय तत्त्वे प्रमाण मानीत आणि त्या शैलीवर आधारित अशी कलाकुसर करीत. हैदराबादजवळील कोंडापुरच्या उत्खननातील पक्वमृदाशिल्पे ही अमरावती शिल्पांच्या समकालीन असून आकारसंकल्पनाच्या व तंत्राच्या दृष्टीने अत्यंत प्रगत आहेत. दख्ख्नच्या शिल्पांमध्ये नृत्यकलेची विकसित शैली दिसून येते. आठव्या ते तेराव्या शतकांतील प्रामुख्याने शाक्त संप्रदायाचा प्रभाव सर्वांगीण प्रगतीला उपकारक ठरला. मंदिरांच्या सेवेत नृत्यकला आणि नृत्यपथके यांना आश्रय देण्याच्या प्रवृत्तीमुळे नृत्यकलेचा विकास व विस्तार घडून आला. तेराव्या शतकात दख्खनमध्ये नृत्यकलेने परमोच्य बिंदू गाठला. तीतील काही विकसित घटक आजही दक्षिणेकडील नृत्यांमध्ये दिसून येतात. अजिंठा, बाघ, सित्तनवासल येथील भित्तिचित्रांतील तांत्रिक कौशल्य सातव्या शतकाच्या अखेरीस परमोत्कर्षास पोहोचले. त्याचा प्रभाव अफगाणिस्तान, चीन, श्रीलंका, जावा, जपान इ. देशांवरही पडला. परंतु दख्खन या आपल्या उगमस्थानीच चित्रकलेचा दर्जा खालावला आणि बादामी, वेरूळ, औरंगाबाद आणि सित्तनवासल येथील भित्तिचित्रे ही या शैलीच्या जवळजवळ शेवटच्या मिणमिणत्या खुणा ठरल्या.

लेखक : वि. मो. सोलापूरकर

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate