অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दोनातेलो

दोनातेलो

(१३८६–१३ डिसेंबर १४६६). पंधराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ इटालियन मूर्तिकार. इटालियन प्रबोधनकालीन कलेतनवशैली निर्माण करणारा तो एक प्रमुख कलावंत होय. दोनातो दी नीक्कोलो दी बेत्तो बार्दी हे त्याचे मूळ नाव; तथापि दोनातेलो या नावानेच तो प्रासिद्ध आहे. फ्लॉरेन्स येथे जन्म व दीर्घकाळ वास्तव्य. त्याने सुरुवातीस सोनारकामाचे शिक्षण घेतले. वयाच्या सतराव्या वर्षी तो लोरेंत्सो गीबेर्तीच्या कलानिकेतनात काम करू लागला. फ्लॉरेन्सच्या बाप्तिस्मागृहाची ब्राँझची दारे घडविण्याच्या कामी त्याने गीबेर्तीला साहाय्य केले. १४०७ मध्ये तो दूओमो कॅथीड्रलच्या कार्यशाळेत दाखल झाला. त्या ठिकाणी नान्नी दी बांको व प्रख्यात वास्तुकार ब्रनेल्लेस्की यांचा प्रभाव त्याच्यावर पडला. १४०९ च्या सुमारास तो ब्रूनेल्लेस्कीसमवेत रोमला गेला. तिथे प्राचीन अभिजात कलातत्त्वांची त्याने ओळख करून घेतली. दोनातेलोचे सुरुवातीचे उल्लेखनीय शिल्प म्हणजे डेव्हिड (१४०८) ही संगमरवरी मूर्ती होय. तीवर गीबेर्ती आणि नान्नी यांचा प्रभाव जाणवत असला, तरी भावी काळात त्याच्या कलेचे लक्षणीय वैशिष्ट्य ठरलेल्या वास्तववादाची बीजे तीमध्ये आढळतात. ओर सान मीकेले चर्चसाठी त्याने घडविलेली सेंट मार्क (१४११–१३) ही मोठी संगमरवरी मूर्ती आणि कॅथीड्रलच्या दर्शनी भागासाठी घडविलेली सेंट जॉन द इव्हँजलिस्ट (१४१५) ही बैठी मूर्ती ही शिल्पे त्याने रूढ केलेल्या नव्या मानवतावादी शैलीची दर्शक आहेत. ओर सान मीकेलेच्या बहिर्भागासाठी त्याने सेंट जॉर्ज (१४१५–१६) ही मूर्ती घडविली; ती म्हणजे आदर्श शौर्यभावाचे साक्षात प्रतिमांकन होय. या मूर्तीच्या बैठकीच्या खालच्या बाजूस शिल्पिलेले सेंट जॉर्ज अँड द ड्रॅगन हे दृश्य म्हणजे उत्थित शिल्पातील यथादर्शनाच्या नवतंत्राचे प्रबोधनकालीन पहिले उदाहरण होय. त्याने ‘Sehiaceiato’ (उथळ उत्थित शिल्पांकन) या अभिनव तंत्राचा शोध लावला व त्याद्वारे अतिशय कल्पकतेने अवकाशीय खोलीचे परिणाम साधले. या प्रकारातील कोरीवकाम प्रत्यक्षात अगदी उथळ असले, तरी सूक्ष्म चढउतारयुक्त पृष्ठीय घडणीमुळे त्यातून असीम खोलीचा आभास निर्माण होतो. दोनातेलोने सिएना येथील बाप्तिस्मागृहासाठी १४१७ मध्ये सालोमी हे प्रख्यात शिल्प निर्मिले. फ्लॉरेन्स येथील घंटाघरासाठी १४१६ ते १४३९ या प्रदीर्घ कालावधीत त्याने संतविभूतींची अनेक मूर्तिशिल्पे घडविली.त्यांतील त्सूक्कोने (१४२३–२५) हे शिल्प व्यक्तिवैशिष्ट्यनिदर्शक वास्तववादी शैलीमुळे विशेष वाखाणले जाते. त्याच्या सिंगिंग गॅलरीतील नाचणाऱ्या–बागडणाऱ्या आठ बालकांच्या शिल्पाकृतीमध्ये अभिजाततावादी कलासंकल्पनेचे प्रतिबिंब दिसते. तसेच त्याच्या डेव्हिड (१४३०) या ब्राँझमूर्तीवरही अभिजाततावादाचा प्रभाव दिसतो. प्रबोधनकाळातील ही आद्य नग्न पुरुषमूर्ती होय. १४४३ मध्ये तो पॅड्युआ येथे गेला. तेथील दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये त्याने दोन अप्रतिम ब्राँझशिल्पे घडविली. त्यांपैकी पहिले म्हणजे गात्तामेलाता या सेनाधिकाऱ्याची अश्वारूढ मूर्ती (१४४७–५३). अश्वरूढ शिल्पाचा हा प्रबोधनकाळातील आद्य आविष्कार होय. दुसरे शिल्प म्हणजे सान आंतोन्यो चर्चच्या वेदीवरील कुमारी माता व ख्रिस्ती संत यांच्या मूर्ती आणि सेंट अँथोनीच्या जीवनदृश्यांची उत्थित शिल्पे होत. फ्लारेन्सला परतल्यावर त्याने मेरी मॅग्डालिन (सु. १४५४–५५) हे मानसशास्त्रीय वास्तवाची प्रखर अभिव्यक्ति घडविणारे काष्ठशिल्प निर्माण केले. आयुष्याच्या अखेरीस त्याने सान लोरेंत्सोच्या व्यासपीठावरील उत्थित शिल्पमालिका खोदली. फ्लॉरेन्स येथे त्याचे निधन झाले. दोनातेलोन इटालियन प्रबोधनकालीन कलेचा पाया घातला, असे मानले जाते. प्रबोधनकालीन मानवतावाद्यांनी जी नवी मानवप्रतिमा मनाशी कल्पिली होती, त्चा प्रत्यक्षरूप आविष्कार दोनातेलोच्या मूर्तिशिल्पांनी घडविला. उत्तरकालीन चित्रकला आणि मूर्तिकला यांवर त्याचा फार मोठा प्रभाव दिसून येतो.

लेखक :श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate