অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नटराज

नटराज

शिवाची जी विविध रूपे आहेत, त्यांपैकी नर्तकरूपातील अथवा नृत्तमूर्ती' च्या रूपातील शिवाला नटराज असे म्हणतात. 'नट्' (नृत्य करणे) या संस्कृत धातूपासून 'नट' (नर्तक) हा शब्द बनला असून, नटराज म्हणजे नटांचा (नर्तकांचा) राजा होय. तो विविध मार्गांनी नृत्याशी निगडित असल्यामुळे त्याचे हे नाव सार्थ ठरते. त्याला नटेश, नटेश्वर, नटशिखामणी व नर्तेश्वर (नृत्येश्वर) असेही म्हटले जाते. शिवाच्या अर्धनारीनटेश्वर या नावात 'नटेश्वर' हा शब्द आहे. नटराजाच्या उजव्या कानात पुरुषाचे तसेचे डाव्या कानात स्त्रीचे कर्णभूषण असते, यांवरून अर्धनारीनटेश्वर हेही नटराजाचेच एक रूप असल्याचे स्पष्ट होते. नटराज हा आद्य नर्तक, नृत्याची अधिष्ठात्री देवता, नृत्यकलेचा प्रवर्तक, आद्य नृत्याचार्य आणि स्वतःच्या नृत्याचा प्रेक्षकही असतो. ब्रह्मांड हीच त्याची नृत्यशाला असते.

नृत्यप्रिय असलेला शिव बाणासुरासारख्या भक्तांच्या नृत्यांनी संतुष्ट होतो आणि स्वतःही सात्त्विक नृत्यांपासून ते तामसिक स्मशाननृत्यांपर्यंत विविध नृत्ये करतो. शैवागमातील माहितीनुसार त्याने १०८ प्रकारांची नृत्ये केली होती. चिदंबरम्‌च्या नटराजमंदिरातील एका गोपुराच्या दोन्ही बाजूंना नृत्याचे हे १०८ प्रकार एक स्त्री नृत्य करीत असलेल्या स्थितीत शिल्पबद्ध केलेले आहेत. शैवागमात प्रत्यक्ष वर्णने मात्र फक्त ९ प्रकारांचीच आढळतात. कैलासावर पार्वतीला रत्‍नखचित सुवर्णासनावर बसवून त्याने केलेले यौगिक व सात्त्विक साध्यनृत्य म्हणजे आदिनाथाने केलेले आदिशक्तीचे प्रणयाराधनच होय. त्याची सात प्रकारांची  तांडव नृत्येही प्रसिद्ध आहेत. प्रत्यक्ष शिल्पांतून नटराजाची 'कटिसम', 'ललित', 'ललाटतिलक', 'चतुर', 'तलसंस्फोटित', 'उर्ध्वजानू'इ. नृत्येही आढळतात. परंतु नटराज विख्यात आहे तो त्याच्या 'नादान्त' नृत्याविषयी. काहींच्या मते नृत्यशास्त्राच्या परिभाषेत हा 'भुजंगत्रसित' (पायाजवळ साप आल्याच्या कल्पनेने लगबगीने पाय उचलण्याची नृत्यावस्था) प्रकार होय. चिदंबरम् येथील नटराजाची मूर्ती याच नृत्याच्या पवित्र्यात आहे. येथील नटराजमंदिर अत्यंत विख्यात असून ते चोलराजा 'परांतक' (पहिला) याने दहाव्या शतकात बांधले.

नटराजाच्या या नृत्याविषयी पुढील कथा प्रसिद्ध आहे. काही विरोधी ऋषींचे पारिपत्य करण्यासाठी शिव चिदंबरम् येथे गेला, तेव्हा त्या ऋषींनी एक नाग, एक वाघ व एक अपस्मार पुरुष (तमिळमध्ये 'मुयलक') यांना शिवावर हल्ला करावयास सांगितले. शिवाने त्या पुरुषाच्या पाठीवर जे नृत्य करून त्या ऋषींना वश केले, ते हे नादान्त नृत्य होय. तेथे असलेल्या पार्वतीने नृत्याचे आव्हान दिल्यावर त्याने नृत्यस्पर्धेत हे नृत्य करून तिला हरविले आणि व्याघ्रपाद व पतंजली या भक्तांसाठी हे नृत्य केले, अशाही कथा आहेत.

हे नृत्य करणाऱ्या नटराजाच्या वेगवेगळ्या मूर्तींमध्ये किरकोळ फरक असतात, परंतु मुख्य कल्पना मात्र सर्वत्र समानच असते. अंशुमद्‌भेदागमातील विवेचनानुसार नटराजाची मूर्ती उत्तम-दश-ताल या प्रमाणात घडवावयाची असते. ही मूर्ती पुढील स्वरूपात आढळते : एका पद्मपीठावर अपस्मार नावाचा बुटका पुरुष पालथा पडलेला असतो व चतुर्भुज नटराज आपला उजवा पाय त्याच्या पाठीवर देऊन स्मित करीत उभा असतो. नटराजाच्या मूर्तीला व्यापणारे एक लंबवर्तुळाकार प्रभामंडळ पद्मपीठावर असते. त्या प्रभामंडळाला बाहेरच्या बाजूला ज्वालांचे अनेक अंकुर असतात. नटराजाने डावा पाय उचलून उजव्या बाजूला धरलेला असतो. मागच्या बाजूच्या उजव्या हातात एक डमरू व डाव्या हातात अग्‍नी असतो. पुढच्या बाजूचा उजवा हात अभयमुद्रेत व डावा हात दंडहस्त वा गजहस्त मुद्रेत उचललेल्या पायाकडे निर्देश करीत खाली झुकलेला असतो. जटा मस्तकावर बांधलेल्या असतात व त्यांवर नाग, कवटी, गंगा, चंद्रकोर, पत्रमाला इ. असतात. मोकळ्या सुटलेल्या काही जटा भुरभुरत असतात. मागचे दोन्ही हात व मस्तकाचा वरचा भाग हे बहुधा प्रभावळीला स्पर्श करीत असतात. डोळे तीन व क्वचित दोन असतात. हार, बाहुभूषणे, रत्‍नखचित मेखला, वाळे, कंकणे व हातापायांच्या बोटांत अंगठ्या असतात. कटिवस्त्र, अंगावर व्याघ्रचर्म व यज्ञोपवीत धारण केलेले असते. हे नृत्य करणाऱ्या नटराजाची अगदी प्रारंभीची शिल्पे इ. स. सु. सहाव्या शतकातील असावीत, असे एक अनुमान आहे.

जगप्रसिद्ध नटराजमूर्ती, ब्राँझ, तिरुवालंगाडू, दहावे शतक.जगप्रसिद्ध नटराजमूर्ती, ब्राँझ, तिरुवालंगाडू, दहावे शतक.

बांधलेल्या जटा, कवटी, गंगा, चंद्रकोर, नाग इ. गोष्टी शिवाच्या इतर रूपांतूनही आढळतात. या मूर्तीच्या रचनेतील बाकीची वैशिष्ट्ये आणि नृत्यामागील प्रतीके पुढीलप्रमाणे भिन्नभिन्न पद्धतींनी स्पष्ट केली जातात. नटराजाचा उजवा पाय हा विश्वनिर्मिती व्हावी म्हणून जीवांना मायेच्या बंधनात टाकतो;तर उचललेला पाय भक्तांना मोक्ष देतो. विश्वनिर्मितीच्या वेळी पहिल्यांदा शब्द बनत असल्यामुळे डमरू हे निर्मितीचे प्रतीक, तर अग्‍नी हे प्रलयंकर तत्त्व असल्यामुळे नाशाचे प्रतीक होय. अशा रीतीने पायांच्या स्थितींमधून बंध व मोक्ष आणि हातांच्या स्थितींमधून निर्मिती व नाश या मूलभूत अवस्थांतील समतोल साधलेला आहे. प्रभामंडळ हे प्रकृतीच्या नृत्याचे प्रतीक आहे. या नृत्यातून विश्वाची जिवंत क्रियाशीलता सूचित होते. त्या प्रभामंडळात प्रकृतीला प्रेरणा देणाऱ्या आद्यप्रेरकाचे नृत्य चालू असते. ही प्रतीके पुढील पद्धतीने ही सांगितली जातात. टेकलेला पाय हा कर्मबंधात अडकलेल्या जीवांना आधार देणारा आहे, डमरूतून शब्दशास्त्र जन्मते, अग्‍नी चराचराची शुद्धी व इष्ट परिवर्तन करतो, अभयमुद्रेतील हात संरक्षण देतो, झुकलेला हात मोक्ष देणाऱ्या पायाकडे निर्देश करतो, अपस्मार हा अविद्येचे प्रतीक आहे, प्रभावळ हे मायाचक्र आहे, शिव पायाच्या व हाताच्या स्पर्शाने ते प्रवर्तित करतो आणि मग माया पंचभूतांच्या रूपाने प्रकट होते, ज्वालांकुरातील ५ स्फुल्लिंग हे पंचभूतांचे द्योतक आहेत इ. स्पष्टीकरणे आढळतात. समग्रमूर्ती हे ॐ रूपी सत्याचे प्रतीक आहे, असेही मानतात. नृत्यमूर्ती आणि ॐ हे अक्षर यांच्या रचनेतही साम्य दर्शविले जाते. 'नमः शिवाय' या पाच अक्षरांशीही या नृत्याचा गूढ संबंध जोडला जातो. उदा., पायात 'न', नाभीत 'म', खांद्यात 'शि' चेहऱ्यात 'वा' आणि मस्तकात 'य' अक्षरे आहे, अशा प्रकारची अनेक स्पष्टीकरणे आढळतात.

जेथे हे नृत्य चालते, ते चिदंबरम् हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे, पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने प्रत्येकाच्या हृदयात एक चिदंबरम् असून तेथे नटराजाचे नृत्य चाललेले असते, प्रत्येक ठिकाणी चिदंबरम् व शिवनृत्य आहे इ. कल्पना आढळतात.

नटराजाचे नृत्य हा ईश्वराच्या आदिशक्तीचा लयबद्ध आविष्कार आहे आणि ते विश्वातील नियमबद्ध हालचालींचे प्रतीक आहे, ही या नृत्यामागची मूळ कल्पना आहे. रॉमँ रॉलांने या प्रतीकात जीवनातील सर्व शक्तींचे सर्वश्रेष्ठ संश्लेषण झाल्याचे म्हटले आहे. हे नृत्य ईश्वराच्या सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव (आवरण, भ्रांती व विश्रांती) आणि अनुग्रह (कृपा व मोक्ष) या पंचक्रियांचे प्रतीक मानले जाते. डमरू हे सृष्टीचे, अभयमुद्रा हे स्थितीचे, अग्‍नी हे नाशाचे, प्रभामंडळ हे तिरोभावाचे व उचललेला पाय हे अनुग्रहाचे प्रतीक होय. शिव आपले सामर्थ्य जड व चेतन सृष्टीमध्ये नृत्याद्वारे संक्रमित करून त्यांनाही नृत्य करावयास लावतो. त्याने नृत्य सुरू केल्याखेरीज प्रकृती नृत्य करीत नाही व त्याचे नृत्य सुरू होताच तीही नाचू लागते. त्रिभुवन हा त्याचा आंगिक अभिनय. सर्व वाङ्‍मय हा त्याचा वाचिक अभिनय आणि चंद्रतारादी हे त्याचा आहार्य अभिनव होत. नृत्य ही त्याची एक लीला आहे. त्याचे नृत्य पाहणाराला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. तो केवळ अंतिम सत्याचेच प्रतीक नाही, तर अनुग्रह करीत असल्यामुळे प्रेमाचेही प्रतीक आहे. नृत्य थांबले, की सगळे विश्व स्वतःत सामावून तो एकटाच आत्मानंदात राहतो. नृत्य संपताना त्याने १४ वेळा डमरू वाजविला व त्यातून संस्कृत भाषेच्या वर्णक्षरांची पाणिनीने सांगितलेली १४ महेश्वरसूत्रे निर्माण झाली. तो गयेला गयासुराच्या देहावर नाचला, भरताचार्यांना त्याच्या प्रेरणेने त्याचा शिष्य तंडू याजकडून तांडव आणि पार्वतीकडून लास्य नृत्याचे ज्ञान प्राप्त झाले आणि भरताचार्यांकडून ते मानवांना मिळाले इ. कथा आढळतात. नृत्यशास्त्रावरील ग्रंथ, पुराणे, मेघदूतादी काव्ये यांतून त्याच्या वैश्विक नृत्याची वर्णने आढळतात.

दक्षिणेतील शिवमंदिरांतून बहुधा सर्वत्र नटराजाच्या मूर्ती आढळतात. मंदिरांच्या एका भागात नटमंडप वा नटसभा असतेच. चिंदबरम्‌च्या सभेला कनकसभा व तेथील नटराजाला कनकसभापती म्हटले जाते. विश्वविख्यात शिल्पकार रॉदँ याने तिरुवालंगाडू येथील मूर्ती (११ वे शतक; उंची ११४·५ सेंमी.; सध्या 'मद्रास गव्हर्मेंट म्यूझीयम' मध्ये) म्हणजे लयबद्ध गतिशीलतेचा जगातील सर्वश्रेष्ठ आविष्कार, असे म्हटले आहे. मूर्तीच्या भोवतीचे प्रभामंडळ व जटासंभार नष्ट झालेला आहे, परंतु भुजंगत्रसित या नृत्यावस्थेतील ही मूर्ती सर्वोत्कृष्ट मानली जाते. तिरुवरंगुळम, शियाळी, तंजावर, तेनकासी, त्रिवेंद्रम, बादामी, वेरूळ इ. ठिकाणच्या नटराज मूर्तीही उल्लेखनीय आहेत. धातू, पाषाण, हस्तिदंत इ. माध्यमांतून या मूर्ती आढळतात. प्रामुख्याने चोल राजांच्या काळातील मूर्ती वैपुल्याने आढळत असल्या, तरी पांड्य, पल्लव, चालुक्य इ. राजवंशांच्या काळातील मूर्तीही आढळतात. बंगालमध्ये पाल व सेन वंशांच्या कारकिर्दीतील शिल्पांतून नर्तेश्वर या रूपाने नंदीच्या पाठीवर नृत्य करणारा शिव आढळतो. द. भारतातील पश्चिमेकडचा चालुक्यांचा प्रदेश, ओरिसा आणि उत्तर भारत येथील सर्व शिल्पांतून नटराज 'चतुर' किंवा 'ललित' नृत्याच्या स्थितीत असतो, त्याच्या शेजारी नंदी असतो आणि त्याला अनेक हात असतात. कित्येकदा नटराजाच्या शेजारी पार्वती आढळते.

शिवाशी संबंध जोडल्यामुळे नृत्यकलेला एक प्रकारचे पावित्र्य व प्रतिष्ठा प्राप्त झाली. शिवाय नटराजाच्या प्रतीकात्मकतेमुळे नृत्य, शिल्प, नाट्य, साहित्य व मूर्तिकला अनुप्राणित झाल्या आहेत. मोहें-जो-दडोमध्ये सापडलेले पाषाणाच्या नर्तकमूर्तीचे धड, आदिवासींची देवापुढची नृत्ये, शिवाचे मूळचे अनार्य रूप इ. गोष्टींचा नटराज कल्पनेच्या उगमाशी काही संबंध असू शकेल, असे काहींनी सूचित केले आहे. नटराजाच्या या प्रतीकात विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म व कला यांचा सुरेख संगम झाला असून सर्व युगांतील व देशांतील तत्त्ववेत्ते, भक्त, कलावंत व रसिक यांना आवाहन करण्याचे सामर्थ्य त्यात आहे.

संदर्भ : 1. Gopinatha Rao, T. A. Elements of Hindu Iconography Vol. II, Part I, Delhi, 1968.

2. Sivaramamurti, C. Nataraja, New Delhi, 1974.

3. Zimmer, Heinrich, The Art of Indian Asia, Vol. I, New York, 1960.

लेखक :आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate