অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नारायण लक्ष्मण सोनवडेकर

नारायण लक्ष्मण सोनवडेकर

(२१ जानेवारी १९३३-९ एप्रिल २००२). राष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ महाराष्ट्रीय शिल्पकार. जन्म आकेरी, सावंतवाडी येथे. त्यांचे मूळ गाव कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनवडे. पारंपरिक देवालयीन मूर्तिकलेचा पिढीजात वारसा त्यांना लाभला होता. मुंबईतील 'सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट' मधून शिल्पकला विषयातील पदविका परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला (१९५८). पुढे चित्रकलेतील उच्च शिक्षणही घेतले, तसेच धातुकला व शिलातक्षणकला ह्या पूरक विषयांचे अभ्यासक्रमही पूर्ण केले (१९६१). शिक्षणकालातच त्यांना १९५६ साली सुवर्णपदक व नंतर शिल्पकला विभागाची अधिछात्रवृत्ती लाभली (१९५८). १९५९ सालापासून त्यांनी मुंबई येथे व्यावसायिक शिल्पकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली व जवळजवळ ४२ वर्षे शिल्पनिर्मितीचा व्यवसाय केला.

या कारकीर्दीत त्यांना अनेक पारितोषिके व मानसन्मान लाभले. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच तत्कालीन मुंबई राज्य कलाप्रदर्शनातील त्यांच्या शिल्पकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, तसेच 'बाँबे आर्ट सोसायटी' च्या वार्षिक प्रदर्शनात राज्यपालांचे खास पारितोषिकही लाभले (१९५९). १९६२ साली सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेच्या शिल्पकला विभागात अधिव्याख्याता म्हणून त्यांची नेमणूक झाली. विद्यार्थ्यांना कलेेसंबंधी अंतर्मुख करून त्यांच्या कलाजाणिवा विकसित करणे, हे त्यांच्या अध्यापन पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांनी १९७७ साली नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शिल्पनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

सोनडेकरांवर गणपतराव म्हात्रे (१८७९-१९४७) व वि. पां. करमरकर (१८८१-१९६७) या जेष्ठ शिल्पकारांचा प्रभाव होता. त्यांच्या पश्चात स्मारकशिल्पे, व्यक्तिशिल्पे घडविणारे प्रमुख नामवंत शिल्पकार म्हणून नारायण सोनवडेकर यांचाच निर्देश करावा लागेल. सोनवडेकरांच्या व्यक्तिशिल्पांचे खास वैशिष्ट्य म्हणजे, त्या त्या व्यक्तींचे जीवन व कार्य विचारात घेऊन त्याला मूर्तरूप देणारे शिल्प ते घडवीत असत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिशिल्पांत त्या त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांचे सत्त्वगुण प्रकटलेले दिसून येतात. उदा., विवेकानंदांच्या शिल्पांत तेज व सात्त्विकता; छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पात मर्दुमकी; जनरल करिअप्पांच्या शिल्पात करारीपणा, तर महात्मा फुले यांच्या शिल्पात रांगडेपणा हे गुण प्रकर्षाने जाणवतात. कन्याकुमारी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विवेकानंद केंद्राच्या वतीने स्मारकशिल्प म्हणून स्वामी विवेकानंदांचा १० फुट उंचीचा (३·४८ मी.) भव्य पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा सोनवडेकरांनी घडविला (१९७१). कन्याकुमारी येथील किनाऱ्याजवळील समुद्रातील एका खडकावर ('विवेकानंद खडक') उभारलेल्या या शिलास्मारकामुळे (विवेकानंद रॉक मेमोरिअल) सोनवडेकरांना शिल्पकार म्हणून भारतभर कीर्ती लाभली.

सोनवडेकरांच्या अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्पाकृती पुढीलप्रमाणे : चितळे यांचा ब्राँझ पुतळा (उंची ७ फुट-२·१३ मी.) ऑल इंडिया रिपोर्टर्स संस्था, नागपूर (१९६२); महात्मा गांधींचा पुतळा (उंची ९ फुट-२·७४ मी.), महाराष्ट्र विधानभवन, नागपूर (१९७४); सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचा ब्राँझचा अर्धपुतळा (३ फुट-०·९१ मी.), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (१९७५); छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा अश्वारूढ पुतळा (उंची १३ फुट-३·९६ मी.), फर्मागुडी, गोवा (१९७७); महात्मा जोतीबा फुले यांचा ब्राँझ पुतळा (२० फुट-६·०९ मी.), महाराष्ट्र विधानभवन, मुंबई, १९८२, (पहा: मराठी विश्वकोश खंड १७ : पृ. ८००). या शिल्पाकृतींखेरीज डॉ. राजेंद्र प्रसाद (१९८६), जवाहरलाल नेहरू (१९८९), राजीव गांधी (१९९२), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९९), यांसारख्या अनेक मान्यवर लोकनेत्यांची व्यक्तिशिल्पे तसेच काही भारतीय उद्योगपतींची व त्यांच्या परिवारातील व्यक्तींची व्यक्तिशिल्पेही त्यांनी घडविली. उदा., दिवाणबहादूर मेनशिंकई, धारवाड (१९७७), एन्. एन्. मोहन (१९७७), सर जमशेदजी टाटा (१९८५), आदित्य बिर्ला, व्ही एम्. साळगांवकर (१९८६), मुकुंदराव किर्लोस्कर, रवी किर्लोस्कर (१९८९), जमनालाल बजाज (१९९१), कमलनयन बजाज (१९९७), जानकीदेवी बजाज (२००१), इत्यादी. याशिवाय डॉ. होमी भाभा (व्हिएन्ना, १९९६) आणि फील्डमार्शल जनरल करिअप्पा (मडिकेरी, कर्नाटक, १९९६) यांचीही स्मारकशिल्पे त्यांनी तयार केली. भूतानच्या नरेशांनी त्यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून राज्याभिषेक-पदकावरील नरेशाच्या प्रतिमेचे शिल्पांकन करून घेतलेे व त्यांचा यथोचित सन्मानही केला.

चिंतनशील मनोवृत्ती आणि आध्यात्मिक सत्संगाकडे असलेला त्यांचा ओढा त्यांनी साकारलेल्या अनेक संत महात्म्यांच्या व्यक्तिशिल्पांतून दिसून येतो. त्यांत स्वामी नित्यानंद, बाळप्पा महाराज (१९६०), स्वामी रूद्रानंद (१९८६), बसवेश्वर (१९९६), गोविंदस्वामी (१९९७), स्वामी वसुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी, गोवा, २००१), नाना महाराज, अक्कलकोट येथील इ. व्यक्तिशिल्पे प्रभावी आहेत. व्यक्तिशिल्पांखेरीज सोनवडेकरांनी काही सार्वजनिक वास्तुशिल्पेही घडविली. त्यांत १९७७ साली ठाणे शहरातील 'गडकरी रंगायतन' नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारासाठी उभारलेले, किर्लोस्कर-गडकरी-बालगंधर्व यांच्या एकत्रित प्रतिमा असलेले उत्थित शिल्प (१३ फुट X १२ फुट = ३·९६ X ३·६५ मी.) प्रेक्षणीय आहे.

मातीमध्ये प्रतिमा लिंपणे हे व्यक्तिशिल्पाचे मुलतत्त्व अत्यंत महत्त्वाचे असते आणि या बाबतींत सोनवडेकरांचा हातखंडा होता. जगभराच्या अनेक कलाशिक्षण संस्थांमधून आपल्या ह्या कौशल्याची प्रचिती प्रात्यक्षिकांद्वारे ते देत असत. त्यांचा प्रदीर्घ व्यावसायिक कलानुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दोन वेळा त्यांची राज्य कला-सल्लागार मंडळावर नेमणूक केली होती. (१९७९-८३ व १९९१-९५). त्यांनी कलामूल्यांबाबत कसलीही तडजोड न करता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने व्यक्तिशिल्प व स्मारक शिल्पकलेला समकालीन परिमाण व प्रस्तुतता प्राप्त करून दिली. कर्करोगाने त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

लेखक : प्रभाकर कोलते

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate