অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नारायण श्रीधर बेंद्रे

नारायण श्रीधर बेंद्रे

(२१ ऑगस्ट १९१० - १९ फेब्रुवारी १९९२). चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ महाराष्ट्रीय चित्रकार. जन्म इंदूर (मध्य प्रदेश) येथे. त्यांनी आग्रा विद्यापीठाची बी. ए. ही पदवी १९३३ साली मिळविली. याच काळात इंदूर येथील ‘स्टेट स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये दत्तात्रय दामोदर देवळालीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कला शिक्षणही घेतले. या कलासंस्थेवर बंगालच्या शांतिनिकेतन शैलीचा आणि मुबंईच्या कलासंप्रदायाचा प्रभाव होता. या दोन्ही शैलींप्रमाणेच बेंद्रे यांच्यावर ब्राक (१८८२-१९६३) या घनवादी संप्रदायातील फ्रेंच चित्रकाराचाही दाट प्रभाव होता. तद्वतच आदिम कलेपासून ते चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेषही त्यांनी आत्मसात केले. १९३४ साली त्यांनी त्यावेळच्या मुंबई सरकारची ‘कला पदविका’ मिळविली. नंतरची दहा वर्षे त्यांनी भारतातील अनेक चित्रपटप्रदर्शनांत भाग घेऊन बक्षिसे मिळविली; त्यांत ‘बाँबे आर्ट सोसायटी’ चे रौप्यपदक (१९३३) आणिसुवर्णपदक (१९४१). ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चा करंडक (१९४३), पटेल करंडक (१९४६), राज्यपाल पारितोषिके आणि इतर अनेक रोख रकमांची बक्षिसे इ. अंतर्भूत होतात. बेंद्रे यांनी १९३६ ते ३९ या काळात काश्मीर सरकारच्या अभ्यागत कार्यालयात (व्हिजिटर्स ब्यूरो) कलावंत-पत्रकार या नात्याने काम केले. १९४० साली मद्रास येथे त्यांनी एका चित्रपटाचे कलादिग्दर्शन केले. या व्यावसायिक भ्रमणामुळे त्यांना अनेक ठिकाणचे निसर्गसौंदर्य चित्रित करता आले. शिवाय भारतातील ऐतिहासिक स्थळे, संग्रहालये आणि कलासंस्था यांना त्यांनी वेळोवेळी भेटी दिल्या. १९४६ मध्ये अभ्यागत कलावंत या नात्याने त्यांनी शांतिनिकेतनला भेट दिली. हे अनुभव त्यांच्या कलानिर्मितीस पोषक ठरल्याचे दिसून येते. १९४७ ते ५० या कालावधीत त्यांनी ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, हॉलंड, पश्चिम जर्मनी, इटली, ईजिप्त, लेबानन, जॉर्डन, इराक, इराण, अफगाणिस्तान आणि जपान या देशांना भेटी देऊन तेथील कलासृष्टीचा अभ्यास केला. तसेच न्यूयॉर्क येथील ‘आर्ट स्टुडंट्‌स लीग’मध्ये आर्मीन लॅंडेक या कलातज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आरेख्यक कलेचा अभ्यास केला. प्रवासात असताना काही देशांमध्ये त्यांनी आपल्या कलाकृतींची प्रदर्शने आयोजित केली. १९५२ साली भारतातर्फे चीनमध्ये गेलेल्या पहिल्या सांस्कृतिक प्रतिनिधिमंडळामध्ये चित्रकार म्हणून बेंद्रे यांचा समावेश होता. बेंद्रे यांनी भारतातही आपल्या कलाकृतींची प्रदर्शने वारंवार भरविली.

कलाक्षेत्रातील अनेक नामवंत संस्थांशी त्यांनी सातत्याने संबंध राखला. ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ चे तीन वर्षे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष म्हणून दिल्ली येथील राष्ट्रीय कला-अकादमीच्या ललित कला शाखेचे (१९६२ ते ७२), तसेच ‘बाँबे आर्ट सोसायटी’चे (१९७२-७३ ते १९७७-७८) कार्य त्यांनी केले. १९५० ते ६६ या कालावधीत बेंद्रे यांनी बडोदे (गुजरात) येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये चित्रकला विषयाचे प्राध्यापक व नंतर ललित कला विद्या शाखेचे अधिष्ठाता या नात्याने कार्य केले. ते अभिजात कलावंताप्रमाणेच कुशल कलाशिक्षकही आहेत, ह्याची साक्ष या संस्थेतून बाहेर पडलेल्या तरूण चित्रकारांच्या पिढीमुळे पटते. बडोद्यातून निवृत्त होऊन ते मुंबई येथे स्थायिक झाले आणि व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करू लागले. मुंबईच्या ‘मराठी तत्त्वचतुषअटयी सभा’ या संस्थेने सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. तसेच १९६९ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब दिला व १९७४ साली ललित कला अकादमीतर्फे सन्मान्य सदस्यत्व (फेलोशिप) बहाल करण्यात आले. गुजरात व मध्य प्रदेश शासनानेही ताम्रपत्र देऊन त्यांचा गौरव केला. खैरागढ (मध्य प्रदेश) येथील ‘इंदिरा कला संगीत विश्वविद्यालया’ तर्फे त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी देऊ केली आहे.

बेंद्रे हे अष्टपैलू प्रतिभेचे प्रयोगशील चित्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कलाजीवनाच्या सुरुवातीपासूनच अनेकविध प्रयोग केले. कोणत्याही एका विशिष्ट चित्रशैलीची वा पंथाची बांधिलकी त्यांनी मानली नाही. दृक्‌प्रत्ययवादी तंत्राच्या प्रभावातून निर्माण झालेली स्वच्छंदतावादी चित्रशैली – उदा., व्हॅगबाँड (१९३३); धनवादाकडे झुकणारी चित्रपद्धती – उदा., सनफ्लॉवर्स (१९५५); अमूर्त अभिव्यक्तिवादी शैली – एनट्‌वाइन्ड फॉर्म (१९६२) आणि अखेरीस आकृतिनिष्ठ नववास्तववादी शैली – उदा., भिल्ल दांपत्य (१९८०) यांसारख्या वेगवेगळ्या चित्रशैलींतून त्यांनी आपले कलाविश्व साकारले. या सर्व शैलींमध्ये त्यांनी आपल्या व्यक्तिनिष्ठ रंगसंगतीचं पाठपुरावा सातत्याने केल्याचे आढळते. त्यांची चित्रे त्यांतील भावपूर्ण रंगांमुळे रसिकांच्या कायमची स्मरणात राहतात. बेंद्रे यांची अनेक चित्रे भारतातील तसेच परदेशातील कलासंग्रहालयांतून जतन केलेली आहेत.

लेखक : अनंत बोवलेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate