অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निग्रो कला

प्रस्तावना

पश्चिम आफ्रिका, सहाराचा दक्षिण भाग, पूर्वेकडील सरोवराच्या प्रदेशापासून मध्य आफ्रिका व त्यालगतची पश्चिम किनारपट्टी, उत्तर सूदान व अंगोला आणि ऱ्होडेशियापर्यंतचा प्रदेश ह निग्रो कलेचा परिसर होय. इथिओपिया, सोमालीलँड व पश्चिमेकडील नाईल नदीपर्यंतच्या प्रदेशातील लोक निग्रो व भूमध्य सामुद्रिक लोक यांच्या संकरातील होत. भाषिक दृष्ट्या निग्रो जमातीचे चार विभाग पडतात : निग्रो-कांगोली (यात बांटूंचा समावेश होतो), मध्य सूदानी, पूर्व सूदानी व मध्य सहारी. विषुववृत्तावरील अरण्याच्या प्रदेशात पिग्मी आढळतात. पिग्मी लोकांचे नृत्य, संगीत व मौखिक वाड्‌मय हे प्रमुख कलाविष्कार होत. आफ्रिकेच्या नैर्ऋत्येकडील प्रदेशात खोइसान वंशीय लोकांचे वास्तव्य होते व त्यांच्यात बुशमन व हॉटेंटॉट या जमाती होत्या. बांटू, खोइसान इ. जमातींना निग्रो म्हणून संबोधण्यात येत असेल, तरी त्यांच्यात सांस्कृतिक विभिन्नता फार आहे.

प्राचीन बुशमन कला

प्राचीन बुशमन जमातीची कला म्हणजे खडकाच्या कड्याच्या सपाट पृष्ठभागावर खोदलेली चित्रे होत. या चित्रांतून प्राणी, शिकारीची दृश्ये, यातू व धर्मविधींची नृत्ये तसेच भालाईत स्त्रिया यांचे चित्रण दिसून येते. त्यांचा काळ इ. स. पू. सु. ८,००० ते ६,००० वर्षे असा मानण्यात येतो. अटलांटिक समुद्रापासून नाईल नदीपर्यंतच्या वाळवंटाच्या प्रदेशात विपुल गुहाचित्रे व खडकावरील कोरीव शिल्पे पहायला मिळतात. ती सर्वच आफ्रिकन लोकांची आहेत, असे म्हणणे धार्ष्ट्याचे होईल. तथापि सहारातील, विशेषत: तिबेस्ती, तास्सिली व अहॅग्गर (ऑगार) येथील गुंफांतील, इ. स. पू. ५००० ते १२००० या कालखंडातील चित्रे ही आफ्रिकन लोकांची असावीत, असे अनुमान त्या चित्रांच्या वैशिष्ट्यांवरून काढता येते. तास्सिली चित्रांतून वांशिक वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या व्यक्तिप्रतिमा, स्त्रियांच्या केशरचना आणि दागिने यांनी युक्त असा आकृत्या, धनुष्ये, अर्धगोलाकार घरे, प्राणी इ. विषय आढळतात. ही चित्रे इथिओपियातून सेनेगलमध्ये आलेल्या ‘फुलानी’ जमातीची आहेत, असे त्यावरून निश्चितपणे म्हणता येते. सूदान प्रदेशातील डोगोन जमातीची खडकाच्या सपाट पृष्ठावर काढलेली काही चित्रे आढळली; पण केवळ भौमितिक चिन्हांसारखी दिसतात. आफ्रिका खंडाचा दक्षिण भाग म्हणजे जणू शिलाखंडावरील चित्रांचा खुला चित्रसंग्रहच (ओपन एअर गॅलरी) म्हणता येईल. तथापि कलात्मक दृष्ट्या या ‘बुशमन’ जमातीची चित्रकला अधिक श्रेष्ठ व संपन्न वाटते. ही चित्रे बहुरंगी आहेत, हे त्यांचे लक्षणीय वैशिष्ट्ये होय. खनिजांपासून तयार केलेले अनेक प्रकारचे रंग या चित्रांतून आढळतात. मध्य ट्रान्सव्हालच्या मध्यापासून झँबीझीपर्यंतच्या प्रदेशात आढळणाऱ्या या चित्रांतून बुशमन जमातीच्या कलावंताने दैनंदिन व्यवहारातील प्रसंग व धार्मिक विषय रेखाटलेले आहेत. धर्म आणि जादूटोणा यांवरील त्यांची श्रद्धा या चित्रांतूनही प्रतीत होते.

आफ्रिकन शिल्पकला

आफ्रिकन कलेमध्ये चित्रकलेचा आविष्कार तसा दुय्यम स्वरूपाचाच राहिला; कारण आफ्रिकेतील वातावरण चित्रकलेला तितकेसे पोषक नव्हते. त्यांची मंदिरे अत्यंत लहान व नगण्य असल्याने मंदिरांतील भित्तिचित्रांचा प्रकारही रुजला नाही. शेतीवर उपजीविका करणाऱ्या आफ्रिकन लोकांच्या धर्म व जादूटोणा यांच्याशी संलग्न असलेल्या भावना शिल्पकलेतूनच प्रभावीपणे साकार होऊ शकल्या. परिणामत: आफ्रिकेतील निग्रो शिल्प हे कलादृष्ट्या अधिक प्रभावी आणि समृद्ध ठरले.

अत्यंत प्राचीन आफ्रिकन शिल्पकलेचे नमुने नायजेरियाच्या बावशी पठारावरील ‘नोक’ संस्कृतीमध्ये पहावयास मिळतात. त्यांतील मनुष्य व प्राणी यांच्या प्रतिमा असलेली पक्कमृदाशिल्पे इ. स. पू. ५०० ते इ. स. २०० या काळातील असावीत. नायजेरियातील आयफे येथे सापडलेली पक्कमृदाशिल्पे व ब्राँझशिल्पे बाराव्या ते पंधराव्या शतकांतील असावीत. द. ऱ्होडेशियातील झिंबाब्वे संस्कृतीतील (पाचवे-पंधरावे शतक) सोन्याच्या वस्तू आणि शंखजिऱ्यांच्या मूर्ती सापडल्या आहेत. त्यांत पक्षी, गुरे, शिकारदृश्ये, ताईत इत्यादींचे प्रतिरूपण घडविले आहे. सोन्याच्या पातळ ओतकामाच्या शिल्पाकृती निर्माण करण्याची पद्धती निग्रो लोकांना यूरोपशी संपर्क येण्याआधी ज्ञात होती, हे यावरून सिद्ध होते. निग्रो कलेमध्ये नैसर्गिक प्रतिरूपण नसते, असे सर्वसामान्यपणे मानले जाते. परंतु आयफे येथील मानवशिल्पांतून नैसर्गिक प्रतिरूपण आणि विरुद्ध आकारिकता यांचा सुरेख मेळ साधल्याचे दिसून येते. प्राचीन ईजिप्तच्या संस्कृतीचा या शिल्पांवर परिणाम झाला असवा.

रानटी लोकांमध्ये दिसून येणारी शरीराला भूषविण्याची प्रवृत्ती निग्रो लोकांत प्रामुख्याने दिसून येते. सभोवतालच्या वस्तू व वस्त्रे, भिंती तसेच घरातील इतर वस्तू कलात्मकतेने सजविण्याची प्रवृत्तीही त्यांच्यात दिसून येते. अशा प्रकारच्या सजावटीत लाकूड, धातू, दगड, माती, हस्तिदंत, शंख, कवड्या, चामडे इ. विविध प्रकारची माध्यमे वापरली जात. तंत्राची व्यापकतादेखील बरीच दिसून येई. कोरीवकाम, शिल्पकाम, पात्रांवरील नक्षीकाम, रेखाटन, खोदकाम, रंगकाम, धातुविज्ञान, ओतकाम, कुट्टिमचित्रण, विणकाम, शिवणकाम व इतरही अनेक हस्तकलाकुसरींचा आविष्कार निग्रो कलेमध्ये आढळून येतो. अशा प्रकारची वस्तूनिर्मिती व सजावट खास उद्दिष्टांनुसार झाल्याचे दिसते. केवळ कलात्मकता वा अलंकरण साधण्यासाठी केलेली निर्मिती अल्पांशानेच आढळते. निग्रो कलावंतांनी समाजातील व लौकिक जीवनातील नित्योपयोगी वस्तूंनादेखील आकर्षक व कलात्मक रूप दिल्याचे दिसून येते. या वस्तू घडविणारा कारागीर त्या निर्मितीत आपले व्यक्तिमत्त्व ओतत असे.

काष्ठशिल्प व कोरीव काम

काष्ठशिल्पे आणि कोरीव काम यांना आफ्रिकी निग्रो कलेत फार मोठे स्थान आहे. आफ्रिकेत शेतीवर उपजीविका करणारा वर्ग फार मोठा होता व त्यांच्या नित्य व्यवहारात धार्मिक आणि लौकिक उपयोगासाठी लाकडी वस्तू सर्रास वापरल्या जात. या गरजेपोटी निर्माण झालेली काष्ठशिल्पे त्यांतील मानवप्रतिमेच्या कलात्मक उपयोजनामुळे आधुनिक काळात नावाजली गेली. एखादा लाकडाचा तुकडा घेऊन त्यावर अल्पसे संस्करण करून अर्थपूर्ण कलात्मक आकार अशा कौशल्याने निर्माण करायचा, की त्यातून निखळ काव्यात्मकतेचा प्रत्यय यावा. हे निग्रो अलंकरणकलेचे वैशिष्ट्य होय. वाट्या, चमचे, संगीताची वाद्ये वा लोहाराचे भाते यांसारख्या नित्योपयोगी वस्तूंमध्ये मानवतेचा स्पर्श निर्माण करताना निग्रो कलाकार जणू अतिवास्तववादाचाच प्रत्यय आणून देतो. आफ्रिकेमध्ये जमाति-जमातींमधून शिल्पतंत्रांची भिन्नता दिसत असली, तरी आफ्रिकन शिल्पात सर्वसामान्यपणे जे जोषपूर्ण रचनात्मक अलंकरण आढळते, त्यामुळे आधुनिक धनवादी पंथाचे चित्रकार प्रभावित झाले. आफ्रिकन शिल्प प्रामुख्याने समोरून पहाण्यासाठी बनविलेले असते व बव्हंशी त्याच्या दोन्ही बाजू एकसारख्या ही शिल्पे प्राय: उभट किंवा स्तंभात्मक असतात. जणू ती अवकाशाचा वेध घेत असावीत असे वाटते. समोरून, पाठीमागून अथवा एकाच बाजूने पहाण्यासाठी ही शिल्पे असली, तरी वेगवेगळ्या जमातींतील शिल्पे विभिन्न सौंदर्यमूल्यांनी साकारलेली आहेत. त्यामुळे अमुक एका निश्चित सौंदर्यदृष्टीतून निग्रो कला निर्माण झाली, असे म्हणता येत नाही.

काष्ठशिल्पे तयार केल्यावर त्यांवर वेगवेगळे संस्कार होत असत. बहुधा त्यांवर एखाद्या रंगाचा लेप लावला जाई किंवा ती विविध रंगांनी रंगविली जात. कधीकधी धार्मिक विधीतून त्यांवर रक्तही शिंपडण्यात येई. अनेक काष्ठशिल्पे पितळ किंवा खिळे यांनी मढविली जात. त्यांत जिवंतपणा आणण्यासाठी पिसे, लोकर, कापड किंवा कातडे यांचाही उपयोग करण्यात येई. काही शिल्पांतून ओठांभोवती आणि कपाळाच्या वरच्या भागाला बारीक छिद्रे दिसतात. त्या छिद्रांचा उपयोग केस बसविण्यासाठी केला जात असावा. धार्मिक वा मांत्रिक विधींसाठी, सामाजिक वा राजकीय यशप्राप्तीसाठी किंवा केवळ खेळणे म्हणूनही निग्रो शिल्पे निर्माण झाली आहेत.

धर्म, अंधश्रद्धा आणि जादूटोणा यांनी निग्रो जीवन पूर्णपणे व्यापलेले आहे. एका अज्ञात दिव्य शक्तीने सर्व काही भारलेले आहे अशी त्यांची श्रद्धा. याच श्रद्धेतून निग्रो शिल्प आणि कारागिरीच्या वस्तू मंतरलेल्या वाटाव्यात अशा रीतीने निर्मिलेल्या असतात; परंतु अशा शिल्पांचा मूळ हेतू नष्ट होऊन पुढे त्या केवळ सजावटीसाठी वापरण्यात येऊ लागल्या. ही शिल्पे मूलत: कलात्मक दृष्टिकोणातून निर्माण करण्यात आली नाहीत असे मानले जाते, ते सर्वथा योग्य नाही. काही राज्यांतून शिल्पकाराला मोठे मानाचे स्थान मिळत असे. शिल्पकाराला वनस्पतीचे, पशूंचे आणि मानवी अस्थींचे ज्ञान असणे आवश्यक होते. त्याखेरीज अशा वस्तूंतून मंत्राने भारावल्यासारखी दिसणारी वस्तुशिल्पे निर्माण होणे शक्य नव्हते. काँगोतील ल्यूबा जमातीत अशा शिल्पकाराला ‘ब्वाना मुतोंबो’ म्हणत. श्रेष्ठ दर्जाच्या शिल्पकाराला ‘कीम्वुम्बू’ (अजोड) असा किताब देण्यात येई. कासाईमधील क्यूबा जमातीत शिल्पकारांच्या प्रतिनिधीला राजदरबारात स्थान असे, तर बेनिन, दाहोमी व इतर काही राज्यांत राजाच्या पदरी शिल्पकार असत.

आफ्रिकन मूर्तिशिल्पे व मुखवटे

बव्हंशी आफ्रिकन निग्रो शिल्प हे सौंदर्याभिरुचीशी प्रत्यक्षात संबंध नसलेल्या गोष्टींप्रीत्यर्थ निर्माण झाले आहे. निग्रो जीवनातील धार्मिक विधीमध्ये वापरण्यासाठी नृत्यातील मंतरलेल्या मुखवट्यांचा वापर होत असावा. असे असले, तरी काही कलाकृती केवळ कलेसाठी म्हणूनही निर्माण झालेल्या आढळतात. काही कलात्मक वस्तू राजवाडे सजविण्यासाठी त्याचप्रमाणे ऐतिहासिक घटनेची किंवा दिवंगत राजाची स्मृती जतन करण्यासाठी म्हणून निर्माण झाल्या आहेत. अपर व्होल्टामधील मोसी जमातीत जमात-प्रमुखाला भेट देण्यासाठी तांब्याच्या लहान मूर्ती करीत असत. निग्रो कला ही कोणत्याही एका विशिष्ट समाजातील घटकापुरती मर्यादित न राहता व्यक्तिव्यक्तींशी व पर्यायाने संपूर्ण समाजाशी संबंधित आहे. निग्रो जमातीत धार्मिक समारंभांना अजोड स्थान आहे. नेहमीच्या व्यवहारात शरीर शृंगारण्याला तसेच प्रसाधनाला व अलंकार-भूषणांना ते महत्त्व देतात. त्यांच्या दैंनदिन व्यवहारात नृत्य आणि संगीत या कलांनाही अनन्यसाधारण असे स्थान आहे. केवळ फावल्या वेळातच नव्हे, तर धार्मिक विधीमध्ये व रोजच्या कामात मग्न असतानाही निग्रो समाज नृत्य-संगीतीत रमलेला असतो. हीच कला-भिरुची व जिंवत आस्था व्यवहारातील नित्योपयोगी वस्तूंबाबतही त्यांनी जोपासली आहे. त्यांचे मुखवटे आणि शिल्पे ही तर कलात्मक असतातच, पण नित्याच्या वापरातील वाडगे, कृषि-अवजारे आणि इतर साध्यासुध्या व अनलंकृत वस्तूंमधील त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय येतो. अभिजात ग्रीक शिल्पांतून प्रकट झालेल्या देवदेवतांच्या मूर्ती मानवी आदर्शातून निर्माण झाल्या आहेत; याउलट आफ्रिकन शिल्पाकृती आदर्शविन्मुख आहेत असे म्हणता येईल. निग्रो शिल्पकाराने आदर्श निर्माण केला, तो कलातत्वाचा किंवा निर्मितितंत्राचा. कोणत्याही कलात्मक निर्मितीसाठी आवश्यक असणारी संवेदनांची उत्कटता आफ्रिकन शिल्पात पराकोटीला पोहोचलेली आढळते. निग्रो कलेत सादृश्य, विरोध, लय आणि समतोल या कलातत्त्वांनी युक्त अशी एकसंघ कलानिर्मिती करण्याचा प्रयत्न आढळतो. आफ्रिकन शिल्पांच्या निर्मितीमागे केवळ शिल्पकारांचे नैपुण्य दाखविण्याचा किंवा पहणाऱ्याला आनंद देण्याचा उद्देश नव्हता. सत्याहून सत्य अशा सत्त्वगुणाने संपन्न असलेली आफ्रिकन निग्रो कला केवळ निसर्गाच्या नकलेतून साधणारी नाही. निग्रो कलेतील याच सत्त्वगुणाने व लयतत्त्वाने पाश्चात्त्य घनवादी चित्रकार प्रभावित झाले. आफ्रिकन शिल्पात वास्तवदर्शी आणि रचनात्मक प्रवृत्ती प्रामुख्याने नजरेत भरते. निग्रो शिल्प मर्दानी आहे. ते जोरकस व प्रमाणबद्ध असून त्यातून आकृतिबंधाची संवेदना व वास्तवतेची अजोड जाणीव दिसून येते. आफ्रिकन शिल्पातील भव्यता आणि दृढता ही वैशिष्ट्ये साधेपणातून साकार झालेली दिसतात. लहान आकाराच्या शिल्पांतही हे गुण दिसून येतात. ठळक व जोमदार रेषा, कार्यवादी उद्दिष्ट्ये आणि काव्यात्मक अभिव्यक्ती या गुणांनी युक्त अशी आफ्रिकन मूर्तिशिल्पे व मुखवटे यांच्या संशोधनामुळे यूरोपातील आधुनिक कलेला, विशेषत: रंगभारवाद, घनवाद, अभिव्यक्तिवाद इ. आधुनिक पंथांना, प्रेरणा लाभली.

विश्वविख्यात आधुनिक चित्राकार पाब्लो पिकासो याने निर्माण केलेली क्रांतिकारी  घनवाद चित्रप्रणाली प्राय: निग्रो कलेच्या प्रेरणेतून निर्माण झाली. पिकासोने आफ्रिकन मुखवट्यांच्या प्रेरणेतून अनेकविध कलाकृती निर्माण केल्या. त्याची ही चित्रे त्याच्या निर्मितीतील ‘आफ्रिकन’ कालखंड म्हणून प्रसिद्ध आहेत. पिकासोप्रमाणे अनेक घनवादी चित्रकारांनी निग्रो कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकन निग्रो शिल्प व त्याचे कालमूल्य ओळखणारा मॉरिस द व्ह्‌लामँक हा पहिला आधुनिक कलावंत मानला जातो. तो व आंद्रे दरँ यांनी काही आफ्रिकी मुखवटे व मूर्ती यांचा संग्रह केला होता. त्यांतील दरँकडे असलेला एक मुखवटा मातीस व पिकासो यांच्या पाहण्यात आला. ते दोघेही त्या मुखवट्याने अत्यंत प्रभावित झाले व त्यातून आफ्रिकन कलेच्या संग्रहाला मोठी चालना मिळाली, त्याच्या कलात्मक प्रभावातून चित्रकलेतील क्रांतिकारी घनवादी प्रणालीचा उदय झाला, असे व्ह्‌लामँकने नमूद केले आहे.

आधुनिक कलाविश्वाची जडणघडण

आफ्रिकन कलाकृतींची प्राचीन माहिती नेमकी उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची कालनिश्चिती करणे अवघड आहे. ईजिप्तसारख्या पुरातन संस्कृतीशी आफ्रिकन जमातींचा संबंध आला असला, तरी त्यापासून त्यांना फारसा लाभ झाला नाही, त्या वर्षानुवर्षे जगातील इतर संस्कृतींच्या संपर्कांपासून दूरच राहिल्या. कालांतराने निग्रो लोकांना नजिकच्या इस्लामी राज्यांत गुलाम म्हणून न्यायची प्रथा सुरू झाली. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकापर्यंत यूरोपातील फ्रेंच, डच आणि इंग्रज लोकांनी ही प्रथा चालू ठेवली. गुलामगिरीच्या अनिष्ट प्रथेने निग्रो जमातींचे फार नुकसान झाले असले, तरी वैशिष्ट्यपूर्ण निग्रो संस्कृतीचा प्रसार त्यातूनच झाला. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथील निग्रोंच्या संकर जमातींकडून जोमयुक्त संगीत, भित्तिचित्रे आणि शिल्पे यांची निर्मिती झाली. १८०७ मध्ये इंग्लंडने व १८१५ मध्ये फ्रन्सने गुलामगिरीची प्रथा कायद्याने बंद केल्यानंतर आफ्रिकेत वेगवेगळ्या वसाहती निर्माण झाल्या. त्यामुळे निग्रोंच्या पुरातन श्रद्धा नाहीशा होऊ लागल्या आणि परिणामत: त्यांच्या कलाकृतींमध्ये पूर्वीचा जोम राहिला नाही.

पंधराव्या शतकाच्या अखेरीस यूरोपातील संग्रहालयांतून आफ्रिकन कलाकृती दिसू लागल्या. ज्याप्रमाणे आफ्रिकन शिल्पांचा आधुनिक यूरोपीय चित्र-शिल्पांवर प्रभाव पडला, त्याचप्रमाणे आधुनिक काळात आफ्रिकन संगीत-नृत्यादी कलाप्रकारांचाही यूरोपीय जीवनावर फार मोठा प्रभाव पडला. आफ्रो-अमेरिकन लोकनृत्य व लोकसंगीत यांच्या प्रभावातून जॅझसारखा संगीतप्रकार निर्माण झाला. सारांश, आदिम कलेतील जोष व जिवंतपणा यांचा वारसा लाभलेल्या निग्रो कलेचा यूरोपीय आधुनिक कलाविश्वाची जडणघडण करण्यात फार महत्त्वपूर्ण वाटा आहे.

लेखक : वसंत परब

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate