অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पट्टी

पट्टी

नाजुक धागे किंवा जाळीदार कापडाचा उपयोग करून तयार केलेला विणकामाचा एक कलात्मक प्रकार. सूत, रेशीम, जर, बनस्पतीपासून मिळणारे धागे, प्राण्यांचे मऊसर केस वा लोकर असे विविध प्रकारचे तंतू व धागे एकमेकांत गुंतवून, गुंफून किंवा विणून पट्टी तयार करण्यात येते. पट्टीच्या या विणकामावरून तिचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पैकी एक रीळ पट्टी (बॉबिन लेस) व दुसरी सूचि-अग्र पट्टी (निड्‌ल पॉईंट लेस). यांशिवाय विविध प्रकारची साधने व वीण यांच्या आधारे उसवकाम पट्टी (ड्रॉनवर्क लेस) आणि घोटा पट्टी (शट्‌ल लेस) असेही प्रकार आढळतात.

रीळ पट्टीला इंग्रजीत ‘बॉबिन लेस’ अथवा ‘पिलो लेस’ असे संबोधण्यात येते. ही पट्टी हाताने तयार केली जाते.त्यासाठी उशीचा उपयोग करण्यात येतो. प्रथम कागदाला भोके पाडून तयार केलेला संकल्पित आकृतिबंध उशीवर ठेवण्यात येतो. नंतर आकृतिबंधातील रेषांना अनुसरून टाचण्या अथवा लहान खुंट्या कागदावर टोजून त्यांच्या साह्याने रिळांवरील विविधरंनी धाग्यांची गुंफण करून पट्टी तयार केली जाते. पट्टी तयार झाल्यावर ती उशीवरून काढून घेण्यात येते. आकृतिबंधांचे हे कागद पिढ्यान् पिढ्या उपयोगात आणण्याची प्रथा आहे. रीळ पट्टी ही नितळ, विरळ व नाजुक असल्यामुळे तिचा वापर प्रामुख्याने स्त्री – पुरुषांच्या कपड्यांची पूरक सजावट म्हणून केला जातो.

सूचि-अग्र पट्टीला इंग्रजीत ‘निड्‌ल पॉइंट लेस’ किंवा ‘क्रोशालेस’ ही म्हणण्यात येते. या पट्टीच्या निर्मितीसाठी एकाच प्रकारचा धागा व विशिष्ट सुई यांचा वापर करण्यात येतो. ही पट्टीदेखील हातानेच विणण्यात येते. शिल्पसदृश संपन्नता हे या पट्टीचे एक डोळ्यात भरण्यासारखे वशिष्ट्य असल्यामुळे तिचा वापर मुख्यतः पाश्चात्त्यांमध्ये चर्चमधून व अन्य समारंभप्रसंगी करण्यात येतो. तथापि पूर्वी रीळ पट्टी व सूचिअग्र पट्टी या दोहोंचाही वापर वेशभूषेची शोभा वाढविण्याकडेच होई.

उसवकाम पट्टी हादेखील हाटपट्टीचाच प्रकार होय. यात कापडाचे धागे काढून मोकळ्या झालेल्या जागी नक्षीचे सुंदर टाके घालण्यात येतात. धोट्याचा उपयोग करून हाताने किंवा  मागयंत्राच्या साह्याने धोटा पट्टी विणण्यात येते. यांखेरीज कर्तन पट्टी (कटवर्क लेस), जाळी पट्टी (नेटवर्क लेस), वर्तुळ पट्टी (सर्क्युलर लेस), गाठ पट्टी (नॉटेड लेस), फीत पट्टी (टेप लेस) (असे इतरही विणप्रकार प्रचलित आहेत.

यंत्राच्या साह्यानेही पट्टीची निर्मिती करण्यात येत असून त्यासाठी लिव्हर यंत्रमाग व जकाई यंत्र यांचा वापर करण्यात येतो. यंत्रनिर्मित पट्टीमध्ये रीळ पट्टी व सूचि-अग्र पट्टी या दोहींचेही अनुकरण करण्यात येते. तथापि हातपट्टीचे सौंदर्य यंत्रपट्टीत जाणवत नाही.

प्रागैतिहासिक काळातही पट्टीवजा नाजुक विणकाम रूढ असल्याचे दिसते. त्याकाळातील झिरझिरीत कापडाची वीण याचा पुरावा म्हणता येईल. प्राचीन ईजिप्त व पेरू या देशांत कर्तन विणकाम किंवा उसवकाम यांचे ज्ञान असल्याचे दिसते. इसवी सनाच्या अगदी प्रारंभी ईजिप्शियन लोक कपड्यांना सुशोभित करण्यासाठी पट्टीचा उपयोग करताना दिसतात; तर इटलीमध्ये मध्ययुगात चर्चमधून प्रसंगोपात्त पट्टीचा वापर केला जाई. पंधराव्या शतकात मखमलीवर सोन्याचांदीच्या धाग्यांनी हिरे गुंफीत, पण अठराव्या शतकाच्या मध्यापासून मात्र पट्टीसाठी पांढरा धागा वापरात येऊ लागला.

मध्ययुगात फ्रान्समध्ये पट्टी तयार करण्याच्या कलेला राजाश्रय मिळाला होता. तेथे सोळाव्या शतकात पट्टीच्या विणकामाचा विशेष प्रसार झाला. १८६७ मध्ये पॅरिसमधील प्रदर्शनात ठेवलेला लेसचा एक नमुना ३,५०० पौंड किंमतीचा होता व त्याचे काम ४० स्त्रिया ७ वर्षे करीत होत्या. तेथील जरीकाम केलेली पट्टी प्रसिद्ध होती. स्पॅनिश लोक व्हेनिशियन लोकांपासून ही कला शिकले. जर्मनीतील पट्टी रेशमी जाळीदार कापडावर विणलेली असे. ब्रिटनमध्ये सोळाव्या शतकापासून पट्टी विणण्याची कला विशेष रूढ झाली. त्याच सुमारास हॉलंड व बेल्बियम येथील अनेक कारागीर ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते. १५४३ पूर्वी येथे रीळ पट्टी तयार करीत; परंतु तिला लागणाऱ्या टाचण्या घेणे परवडेना, म्हणून कारागीर मासे व कोंबडे यांच्या हाडांचा टाचण्यासारखा उपयोग करीत. त्यामुळेच बॉबिन लेसला ‘बोन लेस’ असे नाव पडले.

रिंग शाल हा शालीचा प्रसिद्ध नमुना अत्युक्तृष्ट म्हणावा लागेल. मेंढीच्या गळ्याजवळील नाजुक धाग्याच्या लोकरीपासून ही शाल विणत व ती अक्षरशः लग्नाच्या अंगठीमधून (वेडिंग रिंग) आरपार जाई. या शालीची किंमत तिच्या तुप्पट बजनाच्या सोन्याइतकी असू शकेल. ती चौरस आकाराची (सु. १.८३ x १.८३ मी.) असे. अठराव्या शतकात चीनमध्ये पट्टी विणली जाऊ लागली. ती इटालियन सूचिअग्र पट्टीप्रमाणे असे. एकोणिसाव्या शतकात मिशनऱ्यांनी तेथे रीळ  पट्टीचे तंत्र रूढ केले. पट्टीचे आकृतिबंध कालमानाप्रमाणे बदलत गेलेले आढळतात. सुरवातीला भौमितिक आकृतिबंध असत. पुढे समाकार दिंशणाऱ्या गुंडाळ्यांना पाने, फुले, प्राणी इत्यादींचे नैसर्गिक रूपबंध (डिझाइन) देण्यात आले. मांजराचा पंजा, पक्ष्याचा डोळा, घोड्याचा नाल अशी त्यांची नावे असत.

लेसच्या मशीनचा शोध कोणी आणि केव्हा लावला यासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि नॉटिंगॅम येथील इंग्लिश कारागीर हॅमंड याने १७६८ मध्ये मोजे विणण्याचे एक यंत्र तयार केले. या यंत्रामध्ये काही बदल करून पट्टी तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला. १७७१ ते १७७७ या काळात रॉबर्ट फ्रॉस्ट याने चौकोनी जाळीचे कापड तयार केले; तर त्यापुढील काळात १७९५ च्या सुमारास विल्यम डॉसन याने तयार केलेल्या यंत्रात सुधारणा करून पट्टी-यंत्र तयार झाले. १८०१ च्या सुमारास जकार्ड यंत्र पुढे आले. या क्षेत्रातील संशोधक म्हणून जॉन हीथकोट याचेही नाव प्रसिद्ध आहे. त्याने तयार केलेले रीळ जाळीचे यंत्र (बॉबिन नेट मशीन) पट्टीच्या व्यवसायात वाढ करण्यास फार उपयुक्त ठरले. दुसरा संशोधक म्हणजे जॉन लीव्हर याने हीथकोटच्या यंत्रात सुधारण केली. यांत्रिक पट्टीचे पहिले निर्मितिकेंद्र (फॅक्टरी) १८१८ मध्ये मेडवे (मॅसॅचूसेट्स) येथे स्तापन झाले. आधुनिक यांत्रिक पट्टी ही नॉटिंगॅम येथे तयार झालेल्या लिव्हर यंत्रमागावर विणण्यात येते. अलीकडे रासयनिक द्रव्यांच्या उपयोगामुळे कापूस, रेशीम किंवा लोकर यांवर केलेला आकृतिबंध हुबेहुब पुनर्निर्मित करता येतो. ही पद्धत स्वित्झर्लडमध्ये सेंट गॉल जिल्ह्यातील केंद्रावर यशश्वी झाली आहे. सेल्यूलोजच्या खळीचा उपयोग आकृतिबंधाचे नमुने तयार करण्यासाठी केला जातो.

भारतात सूत, रेशीम, सोनेरी जर व रुपेरी जर यांपासून पट्टी विणण्यात येते. १८१८ च्या सुमारास त्रावणकोर येथे पट्टीनिर्मितीचा कुटिरोद्योग सुरू झाला. त्यात डच व पोर्तुगीज तंत्राचे अनुकरण केले जाई. त्रावण कोर येथील तत्कालीन पट्टीमध्ये पऱ्यांची चित्रेआढळून येतात. त्याकाळी फ्रॉक, परकर, साड्या इत्यादींना विविध प्रकारच्या पट्ट्या लावल्या जात. त्यांतील कलात्मकता वेधक असली, तरी पाश्चात्त्य कल्पनांचा व तंत्रांचा अवलंब केलेला दिसून येतो.

द. भारत पट्टीनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहेच; तथापि पंजाबातही शुभ्र पांढरी व रंगीत पट्टी तयार होते. सध्या तर दिल्ली हे पट्टीनिर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. तेथील जरतारी पट्ट्या प्रसिद्ध आहेत. दिल्लीप्रमाणेच लखनौ हेही एक महत्त्वाचे पट्टीनिर्मिती केंद्र ठरले आहे; तर मुर्शिदाबादी विणकर जरतारी पट्टीकरिता प्रसिद्ध आहेत. पुणे, मुंबई, अहमदाबाद व सुरत येथेही पट्टीनिर्मितीचे काम जालते. या पट्ट्यांत अनेक प्रकार असतात. नारिंगी वा लाल रंगाच्या रेशमी सुतावर जरीच्या धाग्याचा वापर करून तयार केलेल्या पट्टीला सुनहरी (सोनेरी) व पांढऱ्या रंगाच्या रेशमी सुतावर रुपेरी जर लावून तयार केलेल्या पट्टीला रुपेरी वा सफेद असे म्हणतात. तसेच विविध प्रकारच्या कामांसाठी विविध प्रकारच्या पट्ट्या तयार करण्यात येतात. त्यांपैकी अतिरुंद पट्टीला धानक व अतिनिरुंद पट्टीला आँचल अशी नावे आहेत. आँचल पट्टी बहुतेक साड्यांसाठी वापरतात. यांखेरीज लचका, पत्री, पट्टा, बंकरी, किरण इ. नावे विविध रुंदीच्या पट्ट्यांना देण्यात येतात. सुरत येथील पट्टीची रुंदी सु. ०.६३ सेंमी. (१/४ इंच) पासून तर सु. ३५.५६ सेंमी. (१४ इंच) पर्यंत असते. या पट्ट्या रेशमी अथवा कृत्रिम धाम्यांपासून बनविल्या जातात. तसेच त्यांना सोनेरी वा रुपेरी जर लावून त्यांवर वेलबुटीचे अथवा भौमितिक आकृतिबंध विणलेले असतात; तर कधीकथी फुलपाखरू, पशुपक्षी वा अन्य मनोवेधक आकृत्या उठविलेल्या असतात.

आंध्र प्रदेशातील नरसापूर व पालकोल येथे पट्टीनिर्मितीची उद्योगकेंद्रे आहेत. सुताच्या धाग्यापासून विणलेली पट्टी तेथे तयार होते. उच्च प्रतीच्या पट्टीसाठी एक विशिष्ट धागा (डायमंड सूतधागा) वापरला जातो. एकट्या नरसापूरच्या परिसरातील ६० खेड्यांतून हा व्यवसाय सु. ५,००० लोक करतात. येथील पट्टीच्या विणीत टी-क्लॉथ बॉर्डर, टेबलावरील आयताकार मध्य, पट्टी-काठ इ. विविध प्रकार आढळून येतात.

अलीकडे यांत्रिक पद्धतीनेही पट्टीची निर्मिती भारतात होऊ लागली आहे.

लेखिका / लेखक : १) इंदू टिळक

२) चंद्रहास जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate