অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पलंग

पलंग

एक उपयुक्त फर्निचर – प्रकार, त्याचा उपयोग झोपण्यासाठी वा विश्रांती घेण्यासाठी होतो.

प्राचीन ईजिप्तमध्ये पलंगाचा वापर झोपण्याचे साधन म्हणून प्रतिष्ठित वर्गातील विशेषतः राजघराण्यातील लोक करीत असत. इतरत्र मात्र जेवणासाठीही त्याचा अनेकदा वापर करण्यात येई. प्राचीन ईजिप्तमधील पलंग लाकडी असून चार पाय आणि वर साधी चौकट अशी त्याची रचना असे, तर काहींना मान टेकवण्यासाठी चंद्राकृती पट्टी जोडलेली आढळते. हे पलंग हलके व शोभिवंत असत. असे कित्येक पलंग उत्खननात सापडले आहेत. बहुतेक पलंग हे पक्ष्यांची चित्रे किंवा इतर रंगीत चित्राकृतींनी सजविलेले असत. तूतांखामेनच्या थडग्यात आढळलेला  पलंग हा टेबुर्णीच्या लाकडावर सोन्याचे नक्षीदार जडावकाम केलेला आहे. असिरिया व बॅबिलोनिया येथील राजघराण्यांत ब्राँझ धातूचे रत्नजडीत पलंग वापरले जात. अँसिरियनव इट्उस्कनांचे पलंग हे आकाराने मोठे, कोरलेले आणि वक्राकार असत. भारतीय बाज प्राचीन ग्रीक समाजात ईजिप्शियन पलंगाच्या धर्तीवर पलंग तयार करीत. अलेक्झांडरच्या राजदरबारात सोन्याचा पलंग होता, असे म्हटले जाते. मेसोपोटेमिया, ग्रीस व रोम येथे फर्निचरच्या इतर प्रकारांबरोबरच पलंगाचेही विविध प्रकार दिसून येतात. रोमन पलंगांच्या चौकटी लाकडी किंवा ब्राँझ धातूच्या असून कधीकधी त्या सोने, चांदी वा हस्तिदंत याचा वापर करून सुशोभित केल्या जात, तर काही पलंगांच्या दोनही लांवट बाजूंना बारीक नक्षीदार पट्टी लावलेली असून, खाली उतरण्यासाठी मधोमध मोकळी जागा ठे व ले ली असे. पाँपेई येथील उत्खननात आढळून आ ले ल्या  रो म न  प लं गां चे  ग्री क   प लं गां शी  साम्य आढळते. सम्राट हीलिओगॅबालस वापरत असलेला पलंग संपूर्णपणे चांदीचा होता, तर न्यूय़ॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट येथे ठेवलेला प्राचीन रोमन पलंग, हा इस्तिदंत व संगमरवरी दगडाचे जडावकाम केलेला आहे.

मध्ययुगात सेपूर्ण यूरोपमध्ये पलंगाचा वापर अमीर-उमरावांच्या घरात होत असे. मध्ययुगीन कलेतून पलंगाचा आकारप्रकारांत होत गेलेला बदल सूचित होतो. शार्लमेनच्या ( ७४२१ – ८१४ ) काळात ते अधिक आरामदायी झाले. मध्ययुगात फर्निचरच्या इतर कोणत्याही प्राकारापेक्षा पलंगच अधिक लोकप्रिय होता व त्यावर पैसाही अधिक प्रमाणात करण्यात येई. तेराव्या शतकातील पलंग हे सर्वसाधारणतः लाकडी होते. चौदाव्या शतकात प्रथम टेस्टर म्हणजे वर छतासारखे आवरण असलेले पलंग प्रामुख्याने श्रीमंत लोकांच्या वापरात आले. पंधराव्या शतकात पश्र्चिम यूरोपात दालनाच्या एका कोपन्यात स्थिर स्वरूपात मांडून ठेवण्याचे पलंग निर्माण झाले. एलिझाबेथन कालखंडात पलंगाच्या आकारमानात वराच बदल झाला. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे द ग्रेट बेड ऑफ वेअर हे होय. या चौकोनी पलंगाची प्रत्येक बाजू ३.६६ मी. असून उंची २.२८ मी. आहे.

आधुनिक काळात पलंग तयार करताना विविध प्रकारची सामग्री वापरतात. प्रामुख्याने लाकूड, विविध धातू, पक्ष्यांची पिसे, कापूस, लोकर, सुती कापड, रबरी स्पंज व फोम रबर इ. माध्यमांचा वापर करून आकर्षक व कलात्मक पलंग तयार करतात. पलंगाच्या आकार- प्रकारांत व जडणघडणीत प्राचीन काळापासून आजपर्यंत सतत बदल होत आल्यामुळे अल्कोव्ह पलंग, एंजल पलंग, कॉट, क्रिब, कोच. डचेस पलंग, फोर पोस्टर पलंग, हॉस्पिटल पलंग, ट्रन्डल पलंग व स्ले पलंग असे त्यांत विविध प्रकार निर्माण झाले आहेत.

भारतातही प्राचीन काळापासून पलंग वापरले जात. अमरकोशात तसा उल्लेख सापडतो. वैदिक साहित्यातून निरनिराळ्या प्रकारच्या पलंगांचा उल्लेख केलेला आढळतो. पलंगाची पर्यंक, तल्प, मंचक इ. वेदकालीन नावे आढळतात, तर कौषीतकी उपनिषदामध्ये ब्राह्यणाच्या आसनास पर्यंक असे संबोधले आहे. वेदकाळात महाव्रतामध्ये उदगाता मंचकावर बसून सामगान करीत असे, तर महाभारतकाळात यजमानाला बसण्यासाठी चौरंगासारखे पीठ देण्यात येई. राजपुरुष मंचकावरही बसत असत. लाकडाची काटकोनी चौकट असलेली व काथ्याने विणलेली भारतीय चारपाई किंवा खाट (बाज) विशेषतः महाराष्ट्र, सिंध ( पाकिस्तान) व पंजाब या प्रदेशांत वापरात असल्याचे दिसते. पंजाबमधील अमृतसर व जलंदर या गावी परंपरागत पद्धतीने लाखेचे पाणी देऊन तयार केलेले पलंगाचे पाय वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यांवरील पंजाबी शौलीचे नक्षीकाम व आकृतिबंध आकर्षक असतात. तसेच बाजांच्या  बिणीतही विविध आकर्षक प्रकार आढळतात. कच्छमधील बानी प्रदेशात तयार होणान्या इतर घरगुती सामानांबरोबर वैशिष्ट्यपूर्ण असे पलंगाचे पाय तयार होतात. आंध्रमधील नागार्जुनकोंडा येथील शिल्पाबरून राजवाड्यातील वेताच्या बैठका व पलंग यांची कल्पना येते. तर पश्चिम बंगाल आणि गुजरात येथे नक्षीकाम व लाखकाम केलेले पलंग तयार केल्याचे आढळते. गुजरातमधील संखेड हे  संखेडाकाम पद्धतीने म्हणजे लाखकाम केलेले फर्निचर बनविणारे महत्त्वाचे केंद्र असून, तेथे फर्निचरच्या परंपरागत प्रकारांबरोबरच उत्कृष्ट कलाकाम केलेले पलंगाचे पाय तयार होतात.

सोळाव्या शतकातील पलंग हे अधिक सुशोभित तसेच नक्षीकाम व खोदकाम केलेले आढळतात. याच काळापासून चार खांबाचे पलंग आढलतात. यांना पडदा किंवा मच्छरदाणी अडकविण्यासाठी छत केलेले असते. चीनमध्ये मिंग राजघराण्याच्या काळात ( १३६८ – १३४४ ) काही भागांत पलंगावर रेशमी विरविरीत किंवा जाळीदार कापड टाकण्याची परंपरागत पद्धत होती, सतराव्या शतकात जड चौकट व हलकी चौकट असलेले असे दोन प्रकारचे पलंग विशेषतः यूरोप व इंग्लंडमध्य़े प्रचलित होते. पुढे फ्रान्समध्ये मात्र सतराव्या शतकातच जॅकोविन फोर पोस्टर पलंगाऐवजी प्रामुख्याने हलक्या प्रकारच्या नक्षीकामाने युक्त असे पलंग वापरात आले. त्यानंतर इंग्लडमध्येही त्यांचा वापर सुरू झाला. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात  चिपेंडेल शौलीतील पलंग लोकप्रिय होते, तर एकोणिसाव्या शतकात सर्वसाधारणतः बिडाच्या धातूचे व त्यानंतर पितळेचे पलंग लोकांच्या वापरात आले. अलीकडे विसाव्या शतकात परंपरागत पद्धतीने चालत आलेल्या दुसरी पलंगाऐवजी लहान लहान प्रकारचे दोन पलंग वापरले जातात. दिवाण प्रकारचा पलंग दिवसा बसण्यासाठी व रात्री झोपण्यासाठी उपयुक्त ठरतो. हल्ली सोफा-कम-बेड हा पलंगाचा प्रकार लोकप्रिय झालेला दिसतो. पहाः फर्निचर.

लेखक : सुधीर बोराटे

माहिती  स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate