অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पैठणी

पैठणी

महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट पारंपरिक प्रकार. पैठणी ही गर्भरेशमी असून तिचा पदर संपूर्ण जरीचा आणि काठ रुंद व ठसठशीत वेलबुटीचे असतात. पैठणीच्या संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखीच वेलबुटी दिसणे, हे तिचे खास वैशिष्ट्य. विवाहप्रसंगी नववधूचा शृंगार व इतर मंगलकार्यात गृहलक्ष्मीचा साज पैठणीने संपन्न करण्याची परंपरा महाराष्ट्रात दिसून येते.

गेली दोन हजार वर्षे पैठण हे या कलेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. पैठण नावावरूनच ‘पैठणी’हे नाव या महावस्त्राला मिळाले. पैठणच्या सातवाहन राजांचा या कलेला आश्रय होता. जुनी पैठणी सोळा हात लांब व चार हात रुंद असून तिच्या काठापदरावर वेलबुटी किंवा पशुपक्ष्यांच्या प्रतिमा असत व तिचे वजन साडेतीन शेरापर्यंत (सु. ३ किलो ३०० ग्रॅ.) असे. एका पैठणीसाठी साधारणत: बावीस तोळे (सु. २५६·६०४ ग्रॅ.) चांदीबरोबर सहा (सु. ५·८ ग्रॅ.), आठ (सु. ७·८ ग्रॅ.), बारा (सु.११·६ ग्रॅ.) व क्वचित अठरा मासे (सु. १७·४ ग्रॅ.) सोने वापरण्यात येई. बारामासी, चौदामासी, एकवीसमासी यांसारख्या नावांनी पैठणीचा प्रकार, दर्जा व किंमत ठरविण्यात येई. १३० नंबरचे रेशीम वापरलेल्या छत्तीसमासी पैठण्या राजघराण्यात गेल्याची नोंद जुन्या कागदपत्रांत आढळते. पैठणीच्या पदरांना असावली, बांगडी, मोर, अक्रोटी व गझवेल यांसारखी अर्थपूर्ण नावे असत. या पदरांवर उंची रेशमी धाग्यांनी जी वेलबुटी काढलेली असे, तिला मीनाकारी म्हणत. ‘असावली’या वैशिष्ट्यपूर्ण पदरावर प्रामुख्याने रुईच्या फुलांची नक्षी असे आणि काठ नारळी आकृतिबंधाचे असून त्यावर ५ ते १८ नारळांच्या प्रतिमा विणलेल्या असत. हिरवा, पिवळा, लाल व करडकुसुंबी हे पैठणीचे खास रंग असून ते करडीच्या मुळांपासून तयार करीत. या रंगांना सुवासही असे. या रंगांखेरीज अंजिरी, सोनकुसुंबी व दुधी इ. रंगांचाही वापर करण्यात येई. पैठणी सु. शंभर वर्षे टिकत असून ती तयार करण्यासाठी एकवीस दिवस लागत. त्यांपैकी केवळ पदराच्या विणकामासाठीच सात दिवस खर्ची पडत. पैठणीच्या निर्मितीत अनेक कारागिरांचा हातभार लागे. सोनार सोन्यारुप्याचे पत्रे ठोकून देत व ते पत्रे ठोकून एकजीव करण्याचे काम चपडे करीत. चपडे हे काम ज्या मठाराच्या (हातोड्याच्या) साहाय्याने करीत, त्या मठारावर व ऐरणीवर पाण्याची विशिष्ट प्रक्रिया केल्यामुळे त्या पत्र्यांना विशेष झळाळी येई. त्यानंतर लगदेकरी या पत्र्यांच्या तारा अतिशय सफाईने ओढीत. नंतर त्या बारीक तारा तारकशी कौशल्यपूर्ण रीतीने काढून देत. त्यानंतर वाटवे त्या सुबक तारा चाकावर गुंडाळून कारागिरांच्या हवाली करीत असत. उंची रेशमी धागेही विविध प्रक्रिया करून तयार करण्यात येत. उदा., रहाटवाल्याने रेशीम धाग्यांची निवड करणे, कातणाऱ्याने ते असारीवर चढविणे, असारीवरील रेशीम चाचपून त्यातून चांगले रेशमी धागे निवडणे, तात नावाच्या यंत्रावरून मग त्या निवडलेल्या धाग्यांच्या देवनळाच्या साहाय्याने लहान लहान गरोळ्या बनविणे व नंतर त्यावरून ते रेशीमधागे ढोलावर घेणे व ढोलावरून फाळक्यावर नेणे इ. विविध प्रक्रिया करण्यात येत. या कातलेल्या रेशमी धाग्याला ‘शेरिया’म्हणत. त्यातही ‘दोन तार शेरिया’, ‘चार तार शेरिया’असे प्रकार असत. नंतर हे रेशीम रहाटवाला रंगाऱ्याकडे देई व रंगारी ते हव्या त्या विविध रंगांत रंगवून मागवाल्याच्या सुपूर्द करी आणि अखेर मागवाला त्याला खळ वगैरे देऊन ते मागावर चढवी व त्यांपासून ताणा आणि बाणा यांच्या साहाय्याने पैठणी विणून पूर्ण करी.

पैठणीच्या विणीत व वाराणसीच्या शालूत बरेच साम्य असे. या दोन्ही पद्धतींत विणकार रेशमी पोताच्या खाली हव्या असलेल्या नक्षीकामाचे आकृतिबंध असलेले कागद ठेवीत व मग त्यानुसार विणकाम करीत. यात विणकराला बरेच कसब दाखवा लागे, तसेच अत्यंत काटेकोरपणाही राखावा लागे.

सतराव्या शतकात रघोजी नाईक या सरदाराने शामदास वालजी नावाच्या एका गुजरात्यास हाती धरून पैठणहून येवलेवाडीला (नासिक जिल्ह्यातील विद्यमान येवला) पैठण विणणारे काही कसबी कारागीर आणून तेथे पेठ वसविली आणि त्यांच्याकडून पैठणीचे उत्पादन सुरू केले. त्यांना कच्चामाल मिळावा तसेच विणलेल्या मालाला बाजारपेठ लाभावी म्हणून मुद्दाम गुजरातेतून व्यापारी आणण्यात आले व त्यांच्या पेढ्या तेथे उघडण्यात आल्या. येथील पैठण्यांना सरदार व धनिक यांचा ग्राहकवर्ग लाभला. पैठण्यांचे उत्पादनही वाढले. येवल्याप्रमाणेच सुरत व अहमदाबाद येथेही पैठणीसदृश रेशमी-जरीची वस्त्रे विणण्यात येत असत, परंतु पैठणी त्यांच्या तुलनेने श्रेष्ठच मानली जाई. पेशवाईच्या ऐन भरभराटीच्या काळात पैठणीचे भाग्य अधिकच उजळले व तिचे मोल ‘मजल्याच्या भाषे’त होऊ लागले होते. सोन्यारुप्याच्या वापरामुळे पैठणी अधिकच भरदार व वजनी बनली व म्हणूनच ‘पैठणी झोक’हा वाक्प्रचार रूढ झाला. तत्कालीन शाहिरांच्या तसेच संत व लोककवी यांच्याही काव्यांत ‘पैठणी’चे उल्लेख वारंवार आढळून येतात.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत पैठणीची परंपरागत शैली व उच्च दर्जा टिकून होता. तिच्यावरील आकृतिबंधात वेलबुटीप्रमाणेच कृष्णपूजेसारखी धार्मिक दृश्येही विणण्यात येत; परंतु नंतरच्या काळात लोकाभिरुचीत पालट होऊ लागला आणि पैठणीच्या परंपरागत शैलीमध्ये नवनवे आकृतिबंध निर्माण झाले. तथापि पैठणीच्या कारागिरांचा पूर्वीचा राजाश्रय वा लोकाश्रय हळूहळू कमी होत गेला. त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांनी इतर धंद्याचा आश्रय घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याचांदीचे भाव चढले, जकार्ड यंत्राच्या विणकामामुळे उत्पादनाचा वेग वाढला, लोकांची दृष्टी स्वस्त खरेदीकडे झुकली, परिणामी पैठणीचे बाजारातून उच्चाटन झाले व तिची जागा बनारसी शालू, कोईमतुरी साडया वा तत्सम भडक, भपकेदार पण स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्त्रांनी घेतली आणि पैठणची व येवल्याची पैठणी मागे पडली.

स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र शासनाने या कलेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले व १९६८ साली पैठण येथे एक ‘पैठणी उत्पादन केंद्र’सुरू केले. १९७४ पासून पैठणी उद्योगाचा विकास करण्याचे काम शासनाने महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाकडे सोपविले. या मंडळाने पैठण व येवला या दोन्ही ठिकाणच्या विणकरांना उत्तेजन देऊन पैठणीनिर्मितीचे कार्य पुन्हा जोमाने सुरू केले व त्यात मंडळास यशही लाभले. १९७५ सालच्या राज्यस्तरावरील हातमाग व हस्तकला उद्योगस्पर्धेत पहिले हजार रुपयांचे बक्षीस पैठणीविणीसाठी पैठणच्या रहिमतबी या विणकर महिलेने पटकविले, तर १९७८ च्या स्पर्धेत या प्रथम पारितोषकाचा लाभ पैठणच्याच सीताराम मारवाडे (साळी) या वयोवृद्ध विणकराला मिळाला. त्यांनी विणलेली पैठणी पारंपरीक पद्धतीची असून तिच्या काठापदरावर पहिल्या शतकातील अतिप्राचीन आकृतिबंध व झाड विणलेले आहे. आज एक नऊ वारी पैठणी तयार करण्यासाठी तीस तोळे (सु. ३५० ग्रॅ.) रेशीम आणि आठ तोळे (सु. ९३ ग्रॅ.) जर लागते. एक किलो रेशीम असेल, तर ते धुऊन त्यातील कांजी निघून गेल्यामुळे ते पाऊण किलोच उरते व त्याचाच वापर पैठणी विणण्याकडे केला जातो. रेशीम व जर या कच्च्या मालासाठी सु. दोनशे रुपयापर्यंत खर्च येतो आणि रेशीम धुणे, गुंडाळणे वगैरे कामांसाठी तीस रुपये व कारागिरांच्या प्रत्यक्ष मजुरीसाठी सत्तर रूपये असा एकूण तीनशे रुपये खर्च खऱ्या रेशमी व जरतारी पैठणीला येतो. ही पैठणी नऊ वार असते व ती तयार करण्यासाठी एका कारागिराला एकवीस दिवस लगतात. त्यांपैकी पदराच्या नक्षीकामाला दीड दिवस खर्ची पडतो. शिवाय यासाठी दोन कारागिरांची गरज असते. बदलल्या परिस्थितीनुरूप आधुनिक अभिरुचीला आवडतील अशा आकृतिबंधांतील पैठणींच्या उत्पादनासाठी लागणारे आर्थिक साहाय्य लाभले, तर दरवर्षी पत्रास हजार रुपयांचे परकीय चलन मिळू शकेल, असा आत्मविश्वास अजूनही या कारागिरांना वाटतो.

विद्यमान पैठणी ही परंपरागत शैलीची नसून ती ‘अजंठा’शैलीची म्हणून ओळखली जाते, कारण तिच्यात अजिंठा येथील भित्तिचित्रांत असलेले पानाफुलांचे व पशुपक्ष्यांचे आकृतिबंध साधलेले असतात. तसेच काठाच्या किनारपट्टीसाठीही ‘फरसपेठी’व ‘इंदौरी’या दक्षिणी शैलींचा वापर करण्यात येतो. ज्या ग्राहकांना परंपरागत पैठणीतील कलाकुसरीचे बारीक नक्षीकाम आणि पदराची भव्यता रुचत नाही; त्यांना या अजंठा शैलीच्या पैठणीतील हलकेफुलकेपणा निश्चितच सुखद वाटतो आणि त्यामुळे ते या पैठणीकडे आकृष्ट होतात.

संदर्भ : Edwardes, S. M. ‘Silk Fabrics of the Bombay Presidency’, Journal of Indian Art Industries, Vol. X, No. 81, 1903.

लेखक : चंद्रहास जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate