অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रतीक

प्रतीक

सामान्यपणे प्रतीक म्हणजे संकेतमान्य चिन्ह, खूण किंवा स्वतःऐवजी दुसऱ्या एखाद्या पदार्थाचाच बोध करुन देणारा पदार्थ. कबूतर हे शांतीचे व कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक होय. गणितातील चिन्हे हीदेखील एक प्रकारची प्रतीकेच होत. भाषा ही सांकेतिक चिन्हांचीच बनलेली असते. इंग्रजीतील सिंबल, साइन (Sign) या संज्ञाही परस्परपर्यायवाचक म्हणून वापरल्या जातात. काही वेळा केवळ यदृच्छेनेच एखाद्या पदार्थाला दुसऱ्याचे प्रतीक मानले जाते; तर काही वेळा अशा दोन पदार्थांत सादृश्य, कारणकार्यभाव, अवयव- अवयविभाव, व्यक्तिजातिभाव इत्यादींपैकी कोणता तरी संबंध असतो. सूचकता हे प्रतीकाचे स्वरूप आहे, सामर्थ्य आहे आणि एका दृष्टीने मर्यादाही आहे, असे म्हणता येईल. अमूर्ताला मूर्त आणि इंद्रियातीताला इंद्रियगग्य बनविणे, हे प्रतिकनिर्मितीचे एक प्रमुख उद्दीष्ट असू शकते. अभिव्यक्ती अधिक प्रभावी व सुबोध बनविणे, संक्षेप साधून श्रम, वेळ इत्यादींची बचत करणे, क्षणभंगुर अनुभवाला टिकाऊ स्वरूप देणे इ. कारणांनीही प्रतीकांची निर्मिती होते. मानव हा प्रतीकनिर्मिती करणारा प्राणी आहे, असे म्हटले जाते. मानवाने केलेल्या भौतिक आणि सांकृतिक प्रगतीला प्रतीकांचे फार मोठे साहाय्य झालेले आहे.

मानव हा संस्कृतीच्या जवळजवळ प्रारंभापासून म्हणजेच फार प्राचीन काळापासून प्रतीकांचा उपयोग करीत आला आहे. त्यामुळेच विशिष्ट प्रतीकांच्या निर्मीतीची ऐतिहासिक मीमांसा करणे कठीण आहे. प्रतीकांची निर्मिती ईश्वराने केली, असे एक मत यामुळेच मांडण्यात आले. एका अवयवावरून संपूर्ण पदार्थाचा बोध घडविण्याच्या प्रयत्नातून प्रतीकांची निर्मिती झाली असावी, असे एक मत आहे. उदा., केवळ शिंगांचे चित्र काढून त्यावरून संपूर्ण पशूचे अस्तित्व सूचित करणे. प्रतीकांचा उगम प्राचीन काळी ईजिप्तमध्ये रूढ असलेल्या  चित्रलिपीतून झाला, असे काही विद्वान मानतात.

व्यक्तीचे मन, बुद्धी, कल्पनाशक्ती इत्यादींचा आणि समाजाची परंपरा, रुढी, संस्कृती इत्यादींचाही प्रतीकांच्या निर्मीतीवर व स्वरूपावर प्रभाव पडत असतो. अमुक पदार्थाला अमुक पदार्थाचे प्रतीक मानावे, असा संकेत विशिष्ट समाजाने मान्य केलेला असतो. त्या संकेतानुसार प्रतीकांना विशिष्ट अर्थ प्राप्त होत असतो. म्हणूनच कोणत्याही प्रतीकाचा खराखुरा अर्थ समजावून घ्यावयाचा असेल, तर त्या प्रतीकामागची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा समजावून घेणे आवश्यक असते. प्रत्येक समाजाची प्रतीके वेगवेगळी असतात. त्याचप्रमाणे प्रतीके व त्यांचे अर्थ काळाच्या ओघात बदलू शकतात.

मानवी जीवनाच्या बहुतेक सर्व क्षेत्रांतून प्रतीकांचा उपयोग केला जातो. त्यांपैकी धर्म व तत्त्वज्ञान ही प्रतीकांची महत्त्वाची क्षेत्रे होत. जादूटोण्याच्या क्षेत्रातही प्रतीकांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मेणाची बाहुली वा असेच काही अन्य पदार्थ हे शत्रूचे प्रतीक मानून त्यांच्यावर कृष्णयातूचे प्रयोग केले जातात. भाषा हेही एक अत्यंत महत्त्वाचे प्रतीक होय. शिल्प, वास्तू, चित्र, संगीत, नृत्य इ. विविध कलांतून प्रतीकांचा प्राचुर्याने उपयोग केल्याचे आढळते. किंबहुना, कला ही मूलतःच प्रतीकात्मक असल्याचेही मानले जाते. साहित्यात व्यक्त करावयाचा आशय वाच्यार्थाने न सांगता प्रतीकात्मक वा सूचक पद्धतीने व्यक्त केल्यामुळे साहित्याचे कलात्मक सौंदर्य व आनंददायकता वाढते, असे एक मत आहे. रुपककथा, बोधकथा व  पुराणकथा याही विशिष्ट अर्थाने प्रतीकात्मक असतात. गूढवाद, रहस्यवाद इत्यादींमध्येही प्रतीकात्मकता असते. फ्रान्समध्ये उदयास आलेली साहित्यातील  प्रतीकवादाची चळवळ या संदर्भात लक्षणीय आहे. सिंग्मड फ्रॉइडच्या मते स्वप्नात दिसणारे बहुतेक पदार्थ हे दुसऱ्या कोणत्या तरी पदार्थाचे प्रतीक असतात आणि स्वप्नातील प्रतीके ही अबोध मनातील दडपलेल्या पदार्थाचे सूचक असतात. आधुनिक विज्ञान, तर्कशास्त्र इ. विषयांतूनही प्रतीकांचा विपुल प्रमाणात उपयोग केला जातो. परंतु या संदर्भात चिन्ह, रूपक, प्रतिमा इ. शब्द अनेकदा प्रतीक या अर्थाने वापरले जातात आणि प्रतीक हा शब्दही त्यांच्या अर्थाने वापरला जातो. त्यामुळेच प्रतीक या संज्ञेला अनेकार्थता प्राप्त झालेली दिसते.

प्रतीकांमुळे सत्य लपवले जाते, असे मानणारे विद्वान प्रतीकांचा त्याग केला पाहिजे असे मानतात. परंतु प्रतीके ही मानवाच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत व त्यांच्याविना मानवाचे व्यवहारच चालणे अशक्यप्राय आहे.

लेखक : आ.ह. साळुंखे

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate