অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फ्रान्सिस न्यूटन सोझा

फ्रान्सिस न्यूटन सोझा

(१२ एप्रिल १९२४). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आधुनिक भारतीय चित्रकार. गोवा येथे एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्म. त्यांनी 'सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट', मुंबई येथे १९४० मध्ये कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला; तथापि १९४७ मध्ये त्यांनी देशप्रेमाने प्रेरित होऊन महाविद्यालयाच्या इंग्रजी प्राचार्यांच्या विरोधात निदर्शनात भाग घेतल्याने त्यांची जे. जे. मधून हकालपट्टी करण्यात आली. या काळात त्यांच्यावर मार्क्सवादी राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या सुरुवातीच्या काळातील सामाजिक वास्तववादी चित्रांमध्येही उमटलेले दिसते. त्या दृष्टीने त्यांच्या चित्रांची शीर्षके अन्वर्थक आहेत. उदा., आफ्टर वर्क द होल डे इन द फील्ड्स, वुई हॅव नो राइस टू इट; एनिमीज ऑफ द पीपल; प्रोलेटॅरिएट ऑफ गोवा इत्यादी. जे. जे. स्कूलमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करून काही काळ पक्षाचे कामही केले; पण लवकरच त्यांचा भ्रमनिरास होऊन त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी १९४७ मध्ये हुसेन, रझा, आरा व अन्य काही समकालीन चित्रकारांसमवेत 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप' नामक प्रागतिक चित्रकार संघाची स्थापना केली. त्यानंतर दोन वर्षांनी १९४९ मध्ये ते लंडन येथे स्थायिक होण्याच्या उद्देशाने गेले. या काळातील त्यांची चित्रनिर्मिती पाश्चात्त्य आधुनिक चित्रशैलीने, विशेषतः अभिव्यक्तीवादी शैलीने संस्कारित झालेली दिसून येते. मुख्यतः झार्झ र्वो, सुटीन, पिकासो या चित्रकारांचा प्रभाव त्यांच्यावर जाणवतो. पोर्तुगीज-भारतीय परंपरेतील बायझंटिंन शैलीतील चित्रप्रतिमांचा प्रभावही त्यांच्या चित्रांवर दिसतो, तसेच भारतीय, विशेषतः खजुराहो येथील कामशिल्पांच्या प्रभावातून त्यांच्या चित्रांतील स्त्री-प्रतिमांमधील लैंगिक कामोत्तेजक भाव प्रकटले आहेत. उदा., हाफ न्यूड गर्ल इन अ चेअर (१९६०), सिटिंग न्यूड (१९६२) या त्यांच्या चित्रांतील नग्न, अर्धनग्न स्त्रिया स्थूल, पुष्टकाय व कामोद्दिपक भाव सूचित करणाऱ्या आहेत, तर पुरुषप्रतिमा धूर्त, कावेबाज व दुष्प्रवृत्त भासतील अशा रंगवल्या आहेत. त्यांचे द थ्री गर्ल्स (१९४९) हे चित्र मथुरा येथील यक्षीच्या शिल्पाचा प्रभाव दर्शवते. अशा विविध, भिन्न भिन्न प्रेरणाप्रभावांतून त्यांनी स्वतःची खास वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र चित्रशैली घडवली. सोझा यांच्या कॅथलिक ख्रिश्‍चन कौटुंबिक पार्श्वभूमीने त्यांच्या अनेक चित्रांना विषय पुरवले. ही चित्रे बायबलच्या जुन्या व करारांतील प्रसंगांवर आधारित आहेत. उदा., क्रूसिफिक्शन (१९५९), डीपोझिशन (१९६४) ही चित्रे. आध्यात्मिक आशय असलेल्या या चित्रांतील खिन्न, शोकात्म भाव लक्षणीय आहेत. त्यांचे फिलॉसॉफर (१९६१) हे तैलरंगातील चित्र व फिशरविमेन (१९४८) हे जलरंगातील चित्र यांनाही रसिकमान्यता लाभली. त्यांच्या चित्रांत आध्यात्मिकता व विषयवासना यांचे सारख्याच तीव्रतेने केलेले उत्कट चित्रण आढळते, तसेच भेसूर व भग्नमनस्क भासणाऱ्या विरूपित स्त्री-पुरुष प्रतिमाही दिसतात. व्यक्तीच्या आत्मपीडन व परपीडन विकृती, तसेच मानवी अस्तित्वाचा शोध घेत असताना प्रत्ययाला येणाऱ्या आत्मविसंगती व अंतर्विरोध अशा स्वरूपाच्या आधुनिक मानसिकतेची पार्श्वभूमी त्यांच्या चित्रनिर्मितीमागे जाणवते. धीट व बंडखोर वृत्ती, प्रक्षोभक व धक्कादायक प्रतिमासृष्टी व चित्रभाषा, व्यक्तिप्रतिमांचे भेसूर व भयावह विरूपण, सौंदर्यान्वेषी दृष्टिकोनातून केलेले मूर्तिभंजन ही त्यांच्या चित्रनिर्मितीची काही वैशिष्ट्ये त्यांच्या आधुनिक मानसिकतेची निदर्शक आहेत.

सोझा यांना चित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. त्यांनी भारतात तसेच परदेशांत अनेक एकल चित्रप्रदर्शने (वन मॅन शो) भरवली. त्यांची चित्रे लंडन, पॅरिस, झूरिक, व्हेनिस, न्यूयॉर्क, साऊँ पाउलू, रीओ दी जानेरो, कैरो इ. ठिकाणी प्रदर्शित झाली, तसेच काही आंतरराष्ट्रीय कलासंग्रहालयांतून कायमस्वरूपी जतन केली आहेत. उदा., लंडन येथील टेट गॅलरी, कंटेम्पररी आर्ट सोसायटी, वेकफील्ड सिटी म्यूझीयम, मेलबर्न येथील कलासंग्रहालय इ. ठिकाणी त्यांची चित्रे पाहावयास मिळतात. भारतात बडोदा म्यूझीयम, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली येथील कलासंग्रहालयांत त्यांची चित्रे जतन केली आहेत. त्यांनी लिहिलेले वर्ड्स अँड लाइन्स हे आत्मकथन १९५९ मध्ये लंडन येथे प्रकाशित झाले.

लेखक : श्री. दे. इनामदार

माहित स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate