অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बंगला

बंगला

लहानसे,एकमजली घर. तात्पुरती वास्तू, उन्हाळी घर असेही पर्यायी अर्थ शब्दकोशात आढळतात. मूळ बंगालमधील वास्तू व त्यावरून ‘बंगला’ ही संज्ञा, अशी व्युत्पत्ती दर्शवली जाते. ब्रिटिश अंमलदारांच्या निवासासाठी, साधारणतः अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कलकत्त्याच्या परिसरात अशा वास्तू प्रथमतः उभारण्यात आल्या. त्या उष्ण कटिबंधातील हवामानास व पर्जन्यमानास अनुकूल तसेच हलक्याफुलक्या बांधकामसाहित्याने अल्पावधीत व कमी खर्चात उभारता येण्याजोग्या होत्या. स्थानिक बंगाली द्विछपरी (डबलरूफ) वास्तुरचनेवर यूरोपीय शैलीचे संस्कार होऊन त्या निर्माण झाल्या असाव्यात. उतरती शाकारलेली छपरे, प्रशस्त खोल्या आणि व्हरांडे ही या मिश्रशैलीची ठळक वैशिष्ट्ये होत. पुढे बांधकामसाहित्यात व तंत्रात काही फेरफार केले जाऊन, अधिक स्थायी आणि टिकाऊ स्वरूपाचे बंगले उभारण्यात आले. बंगल्यात अभ्यागतांसाठी दालन, दिवाणखाना, भोजनगृह आणि अभ्यासिका या तळमजल्यावर व शयनगृहे पहिल्या मजल्यावर असत. स्वयंपाकघर, कोठी, नोकरचाकरांच्या खोल्या किंवा पडघरे (आउटहाउस) ही अलग असून व्हरांड्यातून ये-जा करून सर्व दालनांशी संपर्क साधला जाई. बंगल्याभोवती मोठे आवार आणि बागबगीचा असे. डास-कीटकादींपासून संरक्षणासाठी आतून जाळीचे दरवाजे असत. नगररचनेत अशा वास्तूंचे स्थान गावाच्या सीमेलगत, हवेशीर जागेत असे. कालांतराने एतद्देशीय संस्थानिक, जहागीरदार, जमीनदार अशा धनिकांनी त्यांच्या इतमामाप्रमाणे यूरोपीय लोकांच्या या राहणीचे अनुकरण करण्यासाठी बंगले बांधले. कौलारू उतरती छपरे, प्रशस्त खिडक्या आणि त्यांस जाळीच्या व काचेच्या झडपा, दालनातील छतास हंड्या झुंबरे, भिंतीवर तैलचित्रे लावण्यासाठी शोभिवंत लाकडी चौकटी, स्पॅनिश वा फ्रेंच वा आंग्ल पद्धतीचे फर्निचर यांसारखे संकेत बंगल्याच्या रचनेत व सजावटीत रूढ झाल्याचे दिसते. प्रवाशांसाठी, सरकारी अधिकाऱ्यांसाठी वगैरे अशा प्रकारे जे बंगले बांधले जातात, त्यांचे वर्गीकरण डाक बंगला, इन्स्पेक्शन बंगला इ. प्रकारांनी केले जाते.

संदर्भ : Nilsson Sten; Trans. George, Agnes & Zettersten, Eleonore,  European Architecture in India, 1750-1850, London 1968.

लेखक : मा. ग देवभक्त , कृ. ब. गटणे

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate