অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बादामी

बादामी

बादामी भारतातील इतिहासप्रसिद्ध स्थळ. ते कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यात आहे. लोकसंख्या११,६५१(१९७१). वस्तीपासून सु. ५ किमी. अंतरावर, गदग-सोलापूर लोहमार्गावर बादामी स्थानकही आहे. विजापूरपासून दक्षिणेस सु. ११७ किमी. अंतरावर असलेले हे ठिकाण तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. त्याचे बादामोई, बादावी, वातापी इ. प्राचीन नामोल्लेख आढळतात. सभोवर खरपांच्या (धार लावण्याच्या दगडाच्या) व चुनखडीच्या खाणी आहेत. उत्तरेकडे बावनकोट आणि दक्षिणेकडे रणमंडळकोट असे दोन जुने किल्ले आढळतात. पूर्वकालीलन चालुक्यांची राजधानी येथे होती. (इ.स. ५५॰ पासून पुढे २॰॰ वर्षे). जवळच्याच डोंगरात चार लेणी आहेत. त्यांपैकी प्रत्येकी एक शैव व जैन असून दोन वैष्णव आहेत. लेण्यातील शिलालेखांशिवाय इतरत्र मंदिरांतून अठरा शिलालेख आढळतात. या सर्वांचे वाचन झालेले असून त्यांचा काळ सर्वसाधारणत: इ.स. सहावे ते सोळावे शतक आहे. या काळात चालुक्य, पल्लव वंशातील राजांनी तसेच विजयानगरच्या राजांनी जी मंदिरे बांधली वा दुरुस्त केली, त्यासंबंधी माहिती मिळते. बादामीवर चालुक्यांनंतर पल्लव, विजयानगरचे राजे, आदिलशाही सुलतान, हैदरअली, निझाम आणि अखेरीस १८१८ नंतर ब्रिटिश सरकार यांचा अंमल होता.

मंदिरातील सर्वांत जुने शिवमंदिर ‘मलेगित्ति’ म्हणजे माळिणीचे मंदिर हे होय. ते एका खडकावर उभे असून द्राविड वास्तुशैलीत बांधले आहे. याचे शिल्पकाम प्रेक्षणीय असून येथील कृष्णलीलाशिल्पे सुरेख आहेत. त्याच्या जवळच जंबुलिंग देवालय आहे. तेथे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची छोटी मंदिरे आहेत. गावाजवळ एक मोठे सरोवर आहे. ते भूतनाथ किंवा अगस्त्यतीर्थ या नावाने ओळखले जाते. या सरोवराजवळ लहानमोठी मंदिरे आहेत. पैकी भूतनाथ-शिवाची मंदिरे प्रसिद्ध आहेत. या मंदिरसमूहातील मल्लिकार्जुन, दत्तात्रेय, अनंतशायी, विष्णू, यल्लमा इ. मंदिरे प्रेक्षणीय आहेत. भूतनाथाच्या मंदिराजवळील खडकांत शिवलिंगे व विष्णू, महिषासुरमर्दिनी, नरसिंह, गणपती, ब्रह्मदेव, वराह इत्यादींच्या सुरेख मूर्ती खोदलेल्या आहेत. ही सर्व मंदिरे उत्तर किंवा कल्याणी चालुक्य शैलीची निदर्शक आहेत. त्यांना जाळीदार खिडक्या असून भौमितिक अलंकरणही आढळते.

बादामीची वैष्णव लेणी मंगलेश चालुक्य राजाच्या काळी इ.स.५७८च्या सुमारास खोदली गेली. क्रमांक एकचे लेणे दक्षिणेकडील पहाडात खोदलेले असून ते सर्वात जुने आहे. त्यात शैवसंप्रदायाच्या मूर्ती आढळतात. प्रवेशाजवळ अठरा हातांचा नटराज, गणपती, गण व नंदी यांसह खोदला असून याशिवाय अर्धनारीश्वर, हरिहर, पार्वती, लक्ष्मी, महिषासुरमर्दिनी, भूतगण व नृत्यांगना यांच्या मूर्ती आहेत. व्हरांड्यातील स्तंभांवर पदके कोरली आहेत. शैव लेण्याच्या पूर्वेला थोड्या उंचीवर दुसऱ्या क्रमांकाचे वैष्णपंथी लेणे असून सोप्यात द्वारपालांच्या मूर्ती आहेत. त्याच दोन्ही बाजूंस शिल्पपट्ट असून एका बाजूला वराह अवतारातील विष्णू समुद्रातून पृथ्वी उचलत आहे व त्रिविक्रम एक पाय उचलून आकाश मोजण्यास उभा आहे, असे दाखविले आहे. त्याच्या गणेशपट्टीवरील समुद्रमंथन, त्यातून बाहेर आलेल्या विविध देवता-ऐरावतारूढ इंद्र, गरुडारूढ विष्णू, मयूरारूढ स्कंद, नंदीवर बसलेला शिव, कमलासनावरील लक्ष्मी इत्यादींची शिल्पे कलात्मक आहेत. याशिवाय कृष्णलीलांच्या शिल्पपट्ट्या खोदलेल्या असून, त्यांतील पूतनावध हे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. मंडपाचे छत अलंकृत असून त्यातून विद्याधरांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत.
या वैष्णव लेण्याच्या वर एक गुहा असून तीत वरील लेण्यांच्या तुलनेने फारच थोडे शिल्पकाम आहे. या लेण्यातील पद्मपाणी बोधिसत्त्वाची मूर्ती आकर्षक आहे.

लेणे क्रमांक चारमध्ये सर्वात जास्त शिल्पाकृती असून सोप्यातील स्तंभांवर सिंहाची तीरशिल्पे आहेत. सोप्याच्या एका बाजूला शेषशायी विष्णू व दुसऱ्या बाजूला त्रिविक्रम यांच्या मूर्ती आहेत. त्रिविक्रम मूर्तीच्या पायाजवळ त्याचे पूर्वीचे रूप वामन हे दाखविले आहे. याशिवाय वराह, नृसिंह, हरिहर इत्यादींच्या मूर्ती आहेत. सोप्यातील छत विविध नक्षीकामाने सजविलेले असून त्यात विद्याधर, नागदांपत्ये व नागराजा यांच्या सुबक व सुंदर मूर्ती आहेत. येथील मंडपही विविध नक्षींनी नटलेला असून त्याच्या छतावर गरुडारूढ विष्णू, नंदीसह शिव, ऐरावतावरील इंद्र, हंसारूढ ब्रह्मा, मकरावरील वरुण इ. मूर्ती आहेत. मुख्य मंडपाचे छतही असेच नक्षीयुक्त असून त्यावर अग्नी, ब्रह्मदेव, वरुण, यम, इंद्र इ. अष्टदिक्पालांच्या आकृत्या आहेत. स्तंभांवरील तीरशिल्पांत अर्धनारीश्वर, मन्मथ आणि रती, अशोक वृक्षाखालील रती, दर्पणधारी इत्यादींच्या मूर्ती आढळतात. येथील गणेशपट्टीवर व त्याजवळील शिल्पपट्टांत समुद्रमंथन, श्रीकृष्ण – ,इंद्रयुद्ध, गरुड व नाग, सुरासुर युद्ध व कृष्णलीला यांच्या कथा शिल्पित केल्या आहेत. याच गुहेत काही भित्तिचित्रे असून ती अत्यंत पुसट झाली आहेत; तथापि अवशिष्ट रंगचित्रणातून दृग्गोचर होणाऱ्या कल्याणसुंदर शिव, राजपुत्र व चामरधारिणी, नृत्यांगना, अप्सरा इत्यादींच्या प्रतिमांतून तत्कालीन कलाविष्काराची वैशिष्ट्ये दिसून येतात. या सर्वांवर वाकाटक कलापरंपरेची छाप जाणवते. या वैष्णव गुहेजवळच उंच जागी उत्तराभिमुख जैन लेणे असून त्यातील शिल्पकामात सिंहासनाधिष्ठित महावीराची मूर्ती लक्षवेधक आहे. भिंतीवर गोमटेश्वर व पार्श्वनाथ आणि त्यांचे सेवक तसेच इतर तीर्थकरांच्या मूर्ती आहेत.

एकूण सर्व लेण्यांच्या रचनेत सारखेपणा असून पुढे स्तंभयुक्त सोपा, मध्ये स्तंभयुक्त मंडप आणि शेवटी चौकोनी गर्भगृह अशी रचना आढळते. उत्तरेकडील डोंगरांवर दोन मंदिरे आहेत, पण त्यात शिल्पकाम नाही. लेण्यांतील गलथ्याच्या अंतर्भागावर भित्तिचित्रांचे अवशेष आढळतात, पण कल्याणसुंदरम् या चित्राव्यतिरिक्त फारशी चित्रे सुस्थितीत आढळत नाहीत. तथापि यावरूनही मूळ चित्रांच्या दर्जाची व रंगांची कल्पना येते. येथील काही मूर्तीही रंगविल्याचे दिसून येते.

संदर्भ : 1. Annigiri, A.M. Guide to Badami, Bijapur, 1960

2. Cousens, Hentry, Chalukyan Architecture, Calcutta, 1926

3. Sivaramamurti, C. The Art of India, New York, 1974.

लेखक :सु. र.देशपांडे,

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate