অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाँबे आर्ट सोसायटी

बाँबे आर्ट सोसायटी

महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कलासंस्था. मुंबईमध्ये १८५७ साली ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ ची स्थापना झाली. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या कलावंतांच्या कलागुणांची ओळख समाजाला करून देण्यासाठी व सर्वसामान्य रसिकाला अधिकाधिक सन्मुख करण्यासाठी एखाद्या संस्थेची निकड भासणे साहजिकच होते. या उद्देशाने मुंबईमध्ये १८८८ मध्ये ‘बाँबे आर्ट सोसायटी’ या कलासंस्थेची स्थापना करण्यात आली. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही पश्चिम भारतातील एकमेव कलासंस्था असल्यामुळे त्या संस्थेतील बहूतेक मानकरी व व्यवस्थापक प्रामुख्याने ग्लॅडस्टन सॉलोमन यांसारखे विद्यालयाचे अधिकारी व माजी विद्यार्थी - हे आर्ट सोसायटीमध्ये प्रामुख्याने सहभागी असायचे. याशिवाय त्याकाळचे मुंबईतील कलाप्रेमी धनिक व सामाजातील मान्यवर पुढारी यांचाही सोसायटीच्या उत्कर्षात सहभाग होता. विशेषतः लँगहॅमर, आर्थर, स्लेसिंजर, आर्. व्ही. लायडन इ. पाश्चात्य कलावंत व आश्रयदाते यांनी सोसायटीच्या भरभराटीस हातभार लावला. सोसायटीच्या उत्तरकालीन भरभराटीस दोन व्यक्ती प्रामुख्याने साहाय्यभूत ठरल्या. एक मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योगपती व कलाप्रेमी सर कावसजी जहांगीर यांनी अध्यक्ष म्हणून व दुसरे बॅरिस्टर ओक यांनी वकिली व्यवसायात असूनही सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून तीन दशकांपर्यंत अविरत परिश्रम केले. कलाकृतींची वार्षिक प्रदर्शने भरवून श्रेष्ठ व दर्जेदार कलावंतांचा व त्यांच्या कलागुणांचा सन्मान करणे, हे सोसायटीचे आद्य व प्रमुख कार्य पहिल्यापासूनच मानण्यात आले. ह्या सोसायटीचे कार्यालय रंपार्ट रो वरील सध्याच्या आर्टिस्ट सेंटरच्या जागेत होते. ते ‘बाँबे आर्ट सोसायटीज सलून’ या नावाने ओळखले जात असे. सोसायटीचे कार्यालय आता जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आहे. सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनासाठी अखिल भारतातून अनेक कलावंत आपल्या कलाकृती पाठवीत असत. ही प्रदर्शने मुंबईमध्ये कौन्सिल हॉल, टाउन हॉल, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, कावसजी जहांगीर हॉल तसेच काही वेळा पुण्यातही भरत असत. स्वातंत्र्यपूर्वकाळातील वार्षिक कलाप्रदर्शने हा भारतीय कलाविश्वातील सर्वांत मोठा व सामाजिक महत्त्वाचा सोहळा मानला जात होता. कारण सोसायटीचे सुवर्णपदक किंवा अन्य कोणतेही पारितोषिक लाभणे हे त्या कलावंताच्या दृष्टीने मोठे गौरवास्पद मानले जात असे. भारतात तसेच भारताबाहेरही कलावंत म्हणून ख्याती मिळवून देण्यास ते उपकारक ठरत असे. ह्या पारितोषिकांतही विशेषतः सोसायटीचे सुवर्णपदक आणि राज्यपालांचे खास पारितोषिक खास मानाची समजली जात. यासोबत अनेक धनिकांनी आणि संस्थांनी ठेवलेली रोख रकमेची बक्षिसेही असत. वार्षिक प्रदर्शनांचा उद्‌घाटन सोहळा प्रतिवर्षी मुंबई राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते मोठ्या थाटाने पार पडत असे. प्रदर्शनाच्या वेळेला सदस्यांना चित्रांच्या छापील प्रतिकृती असलेल्या सुबक छपाईची सूचिपत्रे (कॅटलॉग) पुरवली जात. सोसायटीच्या जुन्या सूचिपत्रांची पाहणी केल्यास वास्तववादी चित्रशैलीपासून आजतागायत कलेमध्ये कोणकोणते आधुनिक प्रवाह येऊन गेले, याचे सुस्पष्ट दर्शन घडते.

ही वार्षिक प्रदर्शने मुख्यत्वे ललितकलांच्या क्षेत्रांशी संबंधित असून, त्यातील वर्गवारी तैलचित्र, जलरंगचित्र, शिल्पाकृती अशी माध्यमानुसारी, त्या त्या माध्यमाच्या वैशिष्ट्यांवर भर देऊन केलेली असे. त्यामुळे हल्लीच्या प्रदर्शनांतील सदोष वर्गवारीमुळे निर्माण होणाऱ्या त्रुटी व वैगुण्ये त्या प्रदर्शनांत अभावानेच आढळत असत.

लाकारांचे मित्र आणि श्रेष्ठ चाहते मानले गेलेले सर कावसजी जहांगीर यांनी आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर, त्याचे स्मारक म्हणून १९५१ मध्ये ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ या कलावीथीची स्थापना केली. मुंबईतील कलाविश्वास ही एक अपूर्व भेट रोती. त्यानंतर ही विश्वस्त संस्था प्रदर्शने आयोजित करण्यासाठी बाँबे आर्ट सोसायटीच्या हवाली करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईतील कलाजगताची वाढ भरभराटीने होऊ लागली. कलावंतांच्या वाढत्या संख्येबरोबरच अनेक नवनवीन व्यापारी स्वरूपाच्या कलावीथींचीही भर पडली. ह्या कलावीथींच्या कार्याचे स्वरुप कलावंत आणि ग्राहक यांच्यामधील दलालीचे असल्यामुळे, कलाकृतींच्या किंमतीदेखील भरमसाठ वाढल्या. अशा ह्या व्यापारी स्पर्धेच्या काळात सोसायटीला आपले पूर्वीचे वैभव टिकविणे जड झाले. कलाकृतींची जाणीवपूर्वक कदर करणाऱ्या संस्थानिकांची आणि ब्रिटिश अधिकाऱ्याची जागा आता धनिक उद्योगपती आणि औद्योगिक संस्था यांनी घ्यायला सुरूवात केली. कलाकृतींमध्ये तर अनाकलनीय फरक होऊ लागले. कलाकृती केवळ रसास्वाद्य वस्तूपेक्षा व्यापारी वस्तू होऊ लागल्या. अशा ह्या झपाट्याने बदलत चाललेल्या काळात, मागे वळून जुन्या कलाकृतींचा पुन्हा एकवार रसास्वाद घेण्याच्या भूमिकेतून सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षात जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये १९६६ मध्ये एक भव्य प्रदर्शन भरवण्यात आले. त्या प्रदर्शनात राजा रविवर्मा, अमृता शेरगील, पेस्तनजी बमनजी, आबालाल रहिमान, त्रिंदाद यांसारख्या गतकालीन कलावैभवाची साक्ष देणाऱ्या कलावंतांबरोबरच अलीकडील काळातील हुसेन, सोझा, रझा, मोहन सामंत, गायतोंडे ह्यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आधुनिक कलावंतांच्या कलाकृतींचाही अंतर्भाव होता. पुढे बदलत्या कलाव्यापाराला अनुसरुन सोसायटीचे कार्यक्षेत्रही विस्तृत झाले. सोसायटीच्या रंपार्ट रो वरील जागेत, सोसायटीतूनच निर्माण झालेल्या ‘आर्टिस्ट एड सेंटर’ ने मुंबईतील गरजू कलावंतांना बरेच साहाय्य केले. जहांगीर आर्ट गॅलरीच्या आवारात सोसायटीने नवनवीन उपक्रमांना प्रारंभ केला. नामवंत कलासंग्रहांची निवडक प्रदर्शने भरविण्यात आली. तसेच कलाव्यासंगासाठी वाचनालय व वेळोवेळी चित्रपट प्रदर्शने, कलाविषयक चर्चा असे वेगवेगळे उपक्रम कलाभिरुची वृद्धिंगत करण्याच्या हेतूने हाती घेण्यात आले. तरीसुद्धा सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनांचे गतकालीन वैभव सध्याच्या काळात अस्तांगत झालेले दिसते.

लेखिका /लेखक : वि. मो.सोलापूरकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate