অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बागकाम

घराच्या अंगणात, परसात शोभिवंत फुलझाडे, फळझाडे व भाजीपाला लावून व जोपासून बाग करण्याचा छंद जागेअभावी गच्चीवर, खिडक्यांमध्ये विविध आकारांच्या कुंड्या ठेवून त्यांत फुलझाडांचे संवर्धन करण्याचीही प्रथा दिसून येते. हा फावल्या वेळात हौसेने करता येण्याजोगा घरगुती छंद आहे. त्यात कष्ट असले, तरी ते आनंददायक असतात. त्यातून सृजनाचा, सौंदर्यनिर्मितीचा आनंद मिळतो. बागेची जोपासना करण्यासाठी फुलझाडांची, फळझाडांची माहिती असणे आवश्यक असते. तसेच बागकामासाठी लागणारी हत्यारे, बी-बियाणे, खते, कलमे, रोपे इत्यादींचीही माहिती असावी लागते.

बागेची आखणी


बाग तयार करण्यापूर्वी जागेचा विस्तार पाहून प्रथम बागेची आखणी करावी लागते. अशी आखणी करताना जाण्यायेण्याचे अरुंद मार्ग सोडून, उरलेल्या जमिनीवर आकर्षक रीतीने वाफे पाडून, त्यात कोणत्या जागेत कोणती फुलझाडे, फळझाडे वा भाजीपाला लावावयाचा, हे निश्चित करावे लागते. तसेच कोणत्या हंगामात कोणती झाडेझुडुपे, फळझाडे, भाजीपाला चांगला वाढू शकतो हे पाहून, त्या त्या वेळी पूर्वनियोजित बी-बियाण्याची किंवा रोपांची लावणी करावी लागते. झाडा-झुडुपांची चांगली वाढ होण्यासाठी गवत-हरळी यांचा नायनाट करावा लागतो. बागेसाठी उपलब्ध असलेल्या जागेचा जास्तीत जास्त वापर करून, थोडी जागा असल्यास खास फुलझाडांची बाग फुलविणे उपयुक्त ठरते. विस्तृत जागा असेल तर फळझाडे, भाजीपाला व फुलझाडे यांची निपज करता येते. बंगल्यात हिरवळीला (लॉन) विशेष महत्त्व असते. बंगल्याभोवती तारेच्या कुंपणावर व प्रवेशद्वारावर बुगनविलिया व अन्य वेली लावण्याची प्रथा आढळते. तसेच मेंदी वा तत्सम वनस्पतींनी कुंपन सुशोभित करण्याची पद्धती अवलंबली जाते. बाग-बगिचामध्ये नारळ, पेरू, डाळिंब, चिकू, द्राक्षे, आंबा, लिंबू, सीताफळे, केळ इ. फळझाडांची तसेच गुलाब, मोगरा, जाई-जुई, शेवंती, निशिगंध इ. तसेच मोसमी (सीझनल) फुलझाडांची लागवड करतात. भाज्यांमध्ये पालेभाज्या, फळभाज्या व वेलवर्गीय भाज्या आवडीनुसार लावतात.

जमिन


जमिनीचा मगदूर पाहून, त्यात चुन्याचा अंश किती आहे हे पाहून, जमीन प्रथम उकरून भुसभुशीत करावी लागते. झाडाच्या वाढीस उपयुक्त असणारी द्रव्ये जमिनीत असल्यास चांगलेच, नसल्यास आवश्यक त्या खतांची - रासायनिक नत्र, स्फुरद, पालाश तसेच शेणखत इत्यादींची जोड देऊन ती कसदार व सुपीक करून घ्यावी लागते. काही झाडाझुडुपांना सूर्यप्रकाशाची व जास्त पाण्याची आवश्यकता असते, तर काहींना सावली व थोडे पाणी पुरते. या गोष्टी विचारात घेऊन योग्य त्या झाडाझुडुपांची योग्य ठिकाणी लावणी करणे हितकर ठरते. द्राक्षाच्या वेलांची वेळोवेळी छाटणी करावी लागते. काही झाडांना कलमे (ग्राफ्टिंग) करावी लागतात, तर काहींची रोपे तयार करून ती दुसऱ्या ठिकाणी पुन्हा लावावी (रिप्लांटिंग) लागतात.
शहरामध्ये जागेअभावी घराच्या गच्चीवर, सज्जात, खिडक्यांमध्ये लोक छोट्या बागा करतात. कुंड्यांमध्ये वा लाकडी खोक्यांमध्ये खतवलेली माती भरून त्यांत आवडती रोपे-फुलझाडे लावून आपली बागकामाची हौस भागवितात. कुंड्यांचे विशिष्ट आकारप्रकार हेही कलात्मक बागकामाचा एक महत्त्वाचा घटक आहे. मातीच्या, वेताच्या, काचेच्या नानाविध प्रकारच्या कुंड्या वापरण्याची प्रथा दिसते. तद्वतच शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर सुंदर उद्याने निर्मापण केली जातात.

लेखक /लेखिका : शा. वि.शहाणे, श्री. स.चिंचणीकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate