অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बुद्धमूर्ति

प्रस्तावना

मथुरा येथील पाषाणाची बुद्धमूर्ती, ५ वे शतक.

गौतमबुद्धाचे जीवितकार्य, बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान व संप्रदाय यांप्रमाणेच बुद्धमूर्ती हाही अभ्यासकांच्या संशोधनाचा व व्यासंगाचा महत्त्वाचा विषय ठरला आहे. बौद्ध धर्मातील प्रतीके व मूर्तिपूजा यांची परंपरा आद्य बुद्धमूर्ती, बुद्धमूर्तीच्या स्थल-काल-वंश-संप्रदाय-सापेक्ष वेगवेगळ्या शैली, बौद्ध प्रतिमाविद्या यांसारख्या अनेक दृष्टींनी हा अभ्यास केला जातो.

बुद्धमूर्तींचा उगम बौद्ध धर्माप्रमाणे भारतात झाला. बुद्धोत्तर सु.बाराशे ते पंधराशे वर्षांच्या काळात ही मूर्ती पश्चिम आशिया वगळता आशियाच्या अन्य सर्व भागांत पसरली. बुद्धाची मूर्ती अस्तित्वात येण्यास गौतम बुद्धाच्या जीवितकाळानंतर सु. पाचशे वर्षे जावी लागली. बुद्धाच्या मूळ थेरवाद धर्मामध्ये बुद्धाच्या रूपाचा उल्लेख आहे (विसुद्धिमग्ग ७.१२८ : १७.१४२ ह्यात बुद्धरूप किंवा रूपारम्मण ह्यांचा उल्लेख आहे). त्या धर्मात बुद्धाच्या गुणांचा मान-सन्मान होता; तरी त्याच्या मूर्तीच्या पूजेचा उल्लेख आढळत नाही.

बौद्ध धर्माचा उगम

बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील हीनयान पंथामध्ये बुद्धाचे मानवी रूप गृहित धरले होते. त्यामुळे त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. त्यांच्या कलाविष्कारामध्ये बुद्धाच्या प्रतीकांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. बुद्धाच्या जीवनातील चार प्रमुख घटनाचार प्रतीकांच्या द्वारे दर्शविल्या जात. जन्माचेप्रतीक हत्तीच्या (श्वेत गज) रूपाने, ज्ञानाचे प्रतीक पिंपळवृक्ष (बोधिवृक्ष), उपदेशाचे प्रतीक चक्र(धर्मचक्र), तर बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक स्तूप, अशा रीतीने हीनयान पंथाची कला प्रामुख्याने प्रतीकात्मकच राहिली. पुढे महायान पंथाच्या उदयाबरोबर बौद्ध धर्मात मूर्तिपूजेला प्रारंभ झाला. त्यात बुद्धाला लोकोत्तर दैवी अंश मानून त्याच्या भक्तीला प्राधान्य देण्यात आले.

त्यातून बुद्धाच्या विविध प्रतिमा निर्माण झाल्या. या पंथातील बुद्धभक्त अनुयायांना बुद्धाच्या अतिश्रेष्ठ गुणांबद्दल आदर वाटून त्याच्या शारीरिक व मानसिक गुणांचे उत्तम प्रदर्शन करण्याची इच्छा निर्माण झाली व त्यानुसार निरनिराळ्या कलाकारांनी आपापल्या कल्पनांनुसार बुद्धमूर्ती तयार केल्या. त्यायोगे बौद्ध मूर्तिकला व चित्रकला यांचा झपाट्याने विकास घडून आला. त्याच्या पुढच्या अवस्थेतील वज्रयान पंथामध्ये तर अनेक बौद्ध देवदेवता निर्माण झाल्या. गौतम बुद्धाच्या पूर्वकालीन व नंतरच्या ‘मैत्रेय’ बुद्धाची मालिकाच तयार झाली व तदनुषंगाने मूर्तीचे प्रकार व संख्या यांत लक्षणीय भर पडत गेली.

आद्य बुद्धमूर्ती कोठे व केव्हा निर्माण झाल्या, याविषयी विद्वानांमध्ये अनेक मतमतांतरे आढळून येतात. आल्फ्रेद फूशे या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याच्या मते पहिल्या बुद्धमूर्ती ग्रीक-बौद्ध शैलीतील असून त्या गांधार देशात निर्माण झाल्या. आनंदकुमारस्वामी यांच्या मते गांधार आणि मथुरा येथील कलाकारांनी जवळजवळ एकाच काळात म्हणजे कनिष्काच्या कारकीर्दीत(सु. पहिले वा दुसरे शतक) त्या बनवल्या असाव्यात. चिनी प्रवासी फाहियानने (इ.स. ४थे-५वे शतक) श्रावस्तीच्या जेतवनारामामध्ये बुद्धप्रतिमा पाहिल्याचा उल्लेख केला आहे. बुद्धप्रतिमा गौतम बुद्धाच्या जीवनकालातच निर्माण होऊ लागल्या, असे प्रतिपादन ओ. सी. गांगुली यांनी केले आहे.

बुद्धमूर्तीची जडणघडण

बुद्धमूर्तीची जडणघडण निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या प्रकारे, वेगवेगळ्या शैलींनुसार झाल्याचे दिसून येते. ग्रीक कलाकारांनी आपल्या कल्पनेप्रमाणे इ.स. पहिल्या शतकात उपलब्ध असलेल्या मूर्तीवर आधारित धर्मोपदेश करणाऱ्या बुद्धाची प्रतिमा गांधार शैलीप्रमाणे तयार केली, तर सारनाथ येथील किंवा श्रीलंकेतील अनुराधपुर येथील ध्यानस्थ बुद्धाची मूर्ती तेथील कलाकारांनी आपापल्या कल्पनांप्रमाणे तयार केली. मथुरा शिल्पकारांच्या संकेतांप्रमाणे मूर्तीवरील पोषाख वगैरे असल्यास तो मूर्तीशी एकजीवी असतो. त्यात भावनांचा उद्रेक दिसतो. येथील कलाकारांच्या मनात ध्यानस्थ बुद्धाची प्रतिमा जास्त महत्त्वाची वाटून त्याप्रमाणे त्यांनी मूर्ती तयार केली. येथील मूर्तीच्या चेहऱ्यावरून ध्यानस्थ योग्याचीच कल्पना मनात जास्त ठसते. अनुराधपुर येथील मूर्तीत शांतता व विचारमग्नताच दिसून येते, तसेच भव्यता व निर्भयाताही वाटते.

कनिष्काच्या कारकीर्दीतील एका नाण्यावर बुद्धाची प्रतिमा पाहावयास मिळते. ही सुरूवातीच्या बुद्धप्रतिमांपैकी एक होय; पण ती फार लहान प्रमाणात आहे. साधारणपणे बुद्धाच्या मूर्ती आसीन (बैठी), स्थानक (उभी) व शयन (आडवी पसरलेली) अशा अवस्थांमध्ये दिसून येतात. शिवाय थायलंडमध्ये चालण्याच्या अवस्थेतील पुतळेही आढळतात. चेहऱ्याची, विशेषतः नाकाची, किंवा वेषभूषेची अथवा मुकुटाची ठेवण पाहून ही कोणत्या देशातील मूर्ती आहे, हे ओळखता येते. तसेच बुद्धाच्या मूर्ती निरनिराळ्या मुद्रा-प्रकारांत दिसून येतात. ध्यानस्थ मुद्रेच्या अवस्थेतील काही दिसतात, तर काही धर्मोपदेश करताना दिसतात. काही कल्याणावस्था दाखविणाऱ्या स्वस्तिक मुद्रेत दिसतात. ह्यालाच अभयमुद्रा असेही नाव आहे.

गांधार व भारतीय शैलींचे मिश्रण

उत्तरेकडील ग्रीक कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार पुष्कळच देशांत करता आला. काश्मीर व वायव्येकडील प्रांतात अफगाणिस्तानात, बामियान येथील व काबूलच्या संग्रहालयात असलेली बेग्रॅम येथील मूर्ती, तसेच फोंडुकिस्तानातील निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्त्रप्रावर्णांतील बुद्धमूर्ती गांधार शैलीचा प्रभाव दर्शवतात. मध्य आशियातील तुर्कस्तानात गांधार व भारतीय शैलींचे मिश्रण आढळते, तर चीनकडील भागातील मूर्तिशैलीवर चिनी कलाकारांचा प्रादुर्भाव दिसतो. काराशाहर, किझिल, तुर्फान, तुंगहान, चीन, कोरिया मार्गे जपानपर्यंत बुद्धाच्या मूर्तीने मजल मारली. जपानमध्ये नारा येथील सु. १६.१५ मी. (५३ फूट) उंच धातूची मूर्ती भव्य व प्रेक्षणीय आहे. महायान पंथाचा उद्भव दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात झाला असला, तरी त्याला उत्तरेकडील पंजाब व वायव्य प्रदेशात सहानुभूती मिळून अफगाणिस्तान, मध्य आशिया, तिबेट, चीन, कोरिया, व जपान मार्गे बुद्धाच्या मूर्तीची उपासना करण्यात आली. चीनमधील युन-गांग येथील मूर्तीची स्मितहास्य, डोळे बाजूस पसरलेले आणि डोक्यावर केसांची गाठ ही वैशिष्ट्ये दिसून येतात. नेपाळ व तिबेट येथील मूर्तिनिर्मितीत तांत्रिक पद्धतीचा अवलंब केला असून तेथील मूर्तींचे वर्णन साधनमालामध्ये आहे.

गांधार कलेच्या विरुद्ध मथुरा व सारनाथ येथील कलाकारांनी आपल्या बुद्धाच्या मूर्तींना भारतीय स्वरूप दिले. त्यांनी, भारतीय ग्रंथांनी बुद्धाची विशेषतः गुप्तकाली (चवथे ते सातवे शतक) जी वर्णने केली, त्यांचा उपयोग मूर्तीच्या निर्मितीसाठी करून घेतला. बुद्ध त्रयस्त्रिगत देवांकडून खाली पृथ्वीवर येताना त्याच्या भोवती एक भारतीय देवता म्हणजे इंद्र दर्शविली आहे. चेहरा भावपूर्ण आहे. ‘उष्णीष’ हे शिरोवेष्टन दाखविले आहे. उजव्या हाताने मुद्रा दाखवल्या आहेत. एका उभ्या मूर्तीत गांधार कलेचे अवशिष्ट रूप असलेल्या चुणीदार वस्राची उंची कमी करून ती घोट्याच्या वरपर्यंतच ठेवलेली आहे. डोक्याभोवती कलात्मक चित्रांचे मंडल आहे. कत्रा येथील प्रतिमेत बुद्धाने उत्तरीय वस्र पांघरलेले दर्शविले आहे. मूर्ती सुबक नसून स्थूल व अवजड आहे, त्या मूर्तीच्या बाजूला रक्षक असून डोक्यावर निरनिराळ्या प्रकारच्या नक्षी असलेल्या कमानी आहेत. ह्या कलाकारांच्या संघटनेतदेखील काही गांधार कलांचे शौकीन कलाकार आहेत. सारनाथ येथे आढळलेल्या एका उभ्या भव्य मूर्तीवर कोरलेल्या लेखामध्ये कनिष्काच्या कारकीर्दीचा कालनिर्देश (इ.स.सु.१३१ किंवा १४७) आढळतो. मूर्तीच्या वस्त्रप्रावरणांमध्ये हिंदू पद्धतीचे धोतर तसेच डाव्या बाजूच्या हाताखांद्यावर चुणीदार वस्त्र असून ते घोट्याच्या वरपर्यंतच दर्शविले आहे. ही मथुरेतील पहिल्या काही मूर्तींपैकी एक आहे. कदाचित ही बोधिसत्वाची असावी. कारण कमरेवरील भाग वस्त्ररहित आहे. इ.स. पू. पहिले शतक ते इ.स.३२० पर्यंत बौद्ध कलाकारांची निर्मिती अधिक प्रगल्भ व उच्च दर्जाची असल्याचे दिसून येते. कलाकारांनी निर्मिलेल्या बुद्धमूर्तीचे अनुकरण केवळ श्रीलंकेमध्येच नव्हे तर, इंडोचायनातील चंपा व सेलेबीझमधील सेम्पागा येथेही करण्यात आले. नागार्जुनकोंडा येथे सापडलेल्या मूर्तीमध्ये एक विशीर्ष पण चुणीदार वस्त्र असलेली उभी मूर्ती आहे. त्या मूर्तीचा एक खांदा अनावृत्त असून वरील चुणीदार वस्त्र ‘संघाटी’ म्हणून आहे. येथील स्तूपातील कलाकुसर सारनाथ येथील कलाकुसरीपेक्षा जास्त आहे. अनेक ठिकाणी स्तूपांतील बुद्धाची जागा रिकामी ठेवली आहे. इतरत्र बुद्धाच्या अनेक मूर्ती विखुरलेल्या आहेत. हे मुळचे हीनयान क्षेत्र असले, तरी महायान पंथाचा परिणाम खूप झालेला दिसतो. बुद्धाच्या मूर्तीची डोकी लहान कुरळ्या केसांच्या झुपक्यांनी आच्छादिलेली व सुबक घडवलेली दिसतात. येथील क्षेत्रात गांधार व मथुरा येथील शिल्पकलांचे मिश्रण पाहावयास मिळते.

बुद्धास ध्यानस्थ मूर्तीची एक ‘थलम’ (डोक्याचा उंच भाग व हनुवटीचे खालचे टोक हे अंतर) चेहरा, तर संबंध शरीराची उंची पाच थलम इतकी असे. डोक्याचे टोक उंच भाग व पायाचा भाग खालचा तळ अशा त्रिशूलांत मूर्तीची बैठक असे. उंच मूर्तीत हे डोक्यापासून तो पायापर्यंतचे अंतर नऊ थलम असे.

गुप्तकलेच्या ऊर्जितावस्थेमध्ये भिंतीवर सर्वत्र बुद्धाच्या प्रतिमा काढलेल्या दिसून येतात.ह्या कल्पनांना अनुसरून चीन देशातही तिसऱ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत मूर्ती कोरल्या गेल्या. चैत्यघरही स्वतंत्र मंदिर झाले. मंदिराची उंच उंच शिखरे अस्तित्वात येऊ लागली. बुद्धाच्या मूर्ती बौद्ध वाङ्मयात आलेल्या वर्णनाप्रमाणे घडवण्यात येऊ लागल्या. उष्णीष व अंगावरील महापुरुषाची लक्षणे दर्शविली जाऊ लागली. बुद्धाच्या उभ्या मूर्तींना बाक देण्यात येऊन भारतीय नृत्यातील ‘त्रिभंग’ अवस्थेचे वळण त्यात दिसू लागले. ह्या काळातील नमुना म्हणून सारनाथ येथे असलेली, धर्मोपदेश करणाऱ्या बुद्धाची मुद्रायुक्त बैठी मूर्ती उल्लेखनीय आहे. अजिंठा येथील कलाकारांनीही बुद्धचरित्रावर आधारित उत्स्फूर्त निर्मिती केली. ह्याचा प्रभाव दक्षिणेत श्रीलंकायेथे व आग्नेयेकडील देशांतही दिसतो. उभ्या मूर्तीच्या अंगावर कोरलेले वस्त्रही पारदर्शक आहे. गुप्तकलेचे क्षेत्र सारनाथ येथेही होते.

बुद्धप्रतिमा स्वरूप

श्रीलंकेत अनुराधपुरात एक पुराणी ध्यानमूर्ती आहे. त्या मूर्तीत दिसणारा आंतरिक भाव, अंतस्थ शांती व भव्यता पाहणाऱ्याच्या मनात आदर निर्माण करते. राहुल वालपोल ह्यांच्या मते ही मूर्ती इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात निर्माण झाली. महावंस ३६.१२८ मध्ये थूपारामांत ‘देवानं पियतिस्सेन पतिठ्ठापितं’ (प्रतिष्ठित केली आहे), असे म्हटले आहे. तसेच बुद्धमूर्ती कशी करावी, ह्या संबंधाची शास्त्रीय प्रमाणमात्रताही दिसू लागली. ही मूर्ती इ.स. तिसऱ्या शतकात निर्माण झाली, असेही काही विद्वानांचे म्हणणे आहे. ह्या कलेच्या प्रभावातून व्हिएटनामची राजधानी हानोई येथे ब्राँझ धातूचा बुद्ध पुतळा घडवलेला असून त्यात चुणीदार, घोट्यावरपर्यंतच थांबणारे उत्तरीय वस्त्र आढळते.ब्रह्मदेशात जुन्या गुप्तकालीन मूर्तीप्रमाणे तयार केलेली मूर्तीही आढळून येते. तसेच निरनिराळ्या ठिकाणी डोक्यावरील व्यवस्थित केलेल्या चूडासकट मूर्ती आढळतात. सयाम (थायलंड) व कंबोडियामध्ये दीपशिखा डोक्यावर असलेल्या मूर्ती आढळतात. बँकॉकच्या राजवाड्यात चक्रवर्तीप्रमाणे मधून मधून बाह्य अलंकार आणि रम्य शिरोवेष्टन असलेली रत्नजडित मूर्ती आढळते. बोरोबूदूर (जावा) येथील बुद्धाची मूर्ती भारतीय शैलीची आहे. तेथे जातककथाही शिल्पांकित केलेल्या आढळतात.

बोरोबुदूर येथील चार ध्यानी मुद्रेतील बुद्धप्रतिमा भारतीय प्रतिमांना धरूनच आहेत. कंबोडियाची राजधानी प्नॉमपेन येथे गुप्तकालीन शैलीची प्रतिमा आहे. तिच्यावरील वस्त्र पारदर्शक असून ते पायाच्या घोट्यावरच पोहोचणारे आहे. अंकोर येथे अनेक प्रतिमा आहेत, त्यांत धर्मचक्र मुद्रेत असलेल्या मूर्ती आहेत.

निरनिराळ्या देशांतल्या बुद्धप्रतिमांच्या अवलोकनावरून काही ठळक वैशिष्ट्ये जाणवतात, ती अशी : गांधार प्रतिमांतील शरीरसौष्ठव व बाह्यदर्शन विस्मयकारक आहे; पण बुद्धाच्या मूर्तीत आवश्यक असणाऱ्या मानसिक भावांचा त्यात अभाव दिसतो. मात्र सारनाथ येथील मूर्तीत तसेच अनुराधपुर येथील मूर्तीत हा भाव प्रदर्शित केलेला आहे. गुप्तकालीन भारतीय मूर्तींत हे गुण विशिष्ट रीतीने दिसतात. ह्या भारतीय शिल्पांचेच अनुकरण आग्नेय आशिया खंडातील मूर्तीत तसेच किंवा थोडाफार फरक करून केलेले आहे. त्या दृष्टीने अनुराधपूर येथील मूर्तीला किंवा भारतातील गुप्तकालीन मूर्तीला खास वैशिष्ट्य प्राप्त झालेले आहे.

लेखक : पु. वि. बापट

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate