অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बौहाउस

बौहाउस

जर्मनीतील एक कलाशिक्षणसंस्था. कला, कारागिरी व तंत्रविद्या यांचा समुचित समन्वय साधून या संस्थेने पश्चिमी कलाशिक्षणात क्रांती घडवून आणली. प्रख्यात जर्मन वास्तुविशारद वॉल्टर-ग्रोपिअस (१८८३ – १९६९) याने वायमार येथे ‘ग्रँड ड्युकल सॅक्सन स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स’ आणि ‘सॅक्सन अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स’ ह्या, त्याच्या संचालकत्वाखालील, दोन संस्थांचे एकत्रीकरण करून ‘बौहाउस’ (इं.शी. हाउस ऑफ बिल्डिंग म्हणजे वास्तुघर) या संस्थेची १९१९ मध्ये स्थापना केली. पुढे १९२८ पर्यंत संस्थेचा संचालक या नात्याने त्याने तिची जडणघडण केली. संस्थेच्या शिक्षणक्रमात चित्रकला, मूर्तिकला अशा ललित कलांचा अंतर्भाव असला, तरी मुख्यत्वे वास्तुकला व तत्संबद्ध उपयोजित कलाप्रकार यांवरच विशेष भर दिला जात असे. त्या दृष्टीने सुतारकाम, धातुकाम, मृत्पात्री, चित्रकाचतंत्र, भित्तिचित्रण, विणकाम, आरेख्यक कला, मुद्रणयोजन, रंगमंचतंत्र इ. विषय शिकवले जात. कलात्मक सौदर्यांची मूल्ये, समाजशास्त्र यांसारख्या विषयांचाही त्यात अंतर्भाव असे, एकोणिसाव्य शतकात कला व कारागिरी असा स्पष्ट भेद केला जात असे; ग्रोपिअसने या संस्थेच्या शिक्षणक्रमात त्यांचा समन्वय साधून त्यांना परस्पूरक स्वरूप दिले.

विसाव्या शतकातील प्रचंड यांत्रिकीकरणास प्रतिकार न करता यंत्र हे साधन मानून त्याचा उपयोग करावा व यांत्रिक उत्पादनामागे कारागिर-आकृतिबंधकार यांचा अर्थपूर्ण सहभाग असावा, असाही दृष्टिकोण या शिक्षणपद्धतीमागे होता. या दृष्टिने या संस्थेने वस्तूच्या प्रचंड घाऊक यांत्रिक उत्पादनासाठी तिचे मूळ आकृतिबंध (प्रोटोटाइप) निर्माण केले. कलावंतांना कारागिरीचे व औद्योगिक आकृतिबंधांचे प्रशिक्षण देऊन समाजामध्ये व्यवहारोपयोगी घटक म्हणून सन्माननीय स्थान मिळवून देण्याचे कार्यही या संस्थेने केले.आकृतिबंधाची साधीसुधी अनलंकृत शैली घडविण्याकडे या संस्थेचा कटाक्ष होता. सुटसुटीत कार्यपद्धती, भौमितिक आकारांना प्राधान्य आणि वस्तु-उत्पादनामध्ये जी माध्यमद्रव्ये वापरावयाची, त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांचे आकृतीबंधातून राखलेले भान ही बौहाईस कलाशिक्षणपद्धतीची ठळक वैशिष्टये होत. विसाव्या शतकातील अनेक श्रेष्ठ कलावंत या संस्थेच्या शिक्षकवर्गात होते. पॉल क्ले, लास्लो मोहॉइनॉड्य, व्हस्यील्यई, कंडयीनस्कई, लायनिल फायनिंगर, ओस्कार श्लेमेर, मार्सेल ब्रॉयर, हर्बर्ट बायर, गेरहार्ड मार्क्स, गेओर्ख मुख इत्यादीचा उदाहरणादाखल निर्देश करते येईल.

वायमार येथील राजकीय विरोधामुळे १९२५ मध्ये बौहाउसचे देसौ येथे स्थलांतर करण्यात आले. त्या ठिकाणी ग्रोपिअसने संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांसाठी खास वास्तूंची वैशिष्ट्यपूर्ण आखणी केली. १९२८ मध्ये ग्रोपिअस संस्थेच्या संचालकपदावरून निवृत्त झाला व हान्स मायर या स्वीस वास्तुशिल्पज्ञाची त्याच्या जागी नियुक्ती झाली. १९३० मध्ये त्याच्या जागी संचालक म्हणून प्रसिद्ध जर्मन वास्तुशिल्पज्ञ मीएस व्हान डेर रोअ याची नेमणूक करण्यात आली. १९३२ मध्ये वाढत्या राजकीय विरोधापायी संस्था देसौहून बर्लिनला हालविण्यात आली; पण पुढे अल्पावधीतच १९३३ मध्ये नाझी राजवटीने या संस्थेवर कायमची बंदी घातली. मात्र दरम्यान या संस्थेने वास्तुकला, फर्निचर, वस्त्रप्रावरणे, मुद्रणयोजन इ. कलाक्षेत्रांत निर्माण केलेले आकृतिबंध व कलाशिक्षणाच्या अभिनव संकल्पना अनेक देशांत प्रसृत झाल्या व त्यांना मोठ्या प्रमाणावर मान्यता लाभली. अमेरिकेमध्ये मोहॉइनॉड्य याने शिकागो येथे १९३७ मध्ये नव्या बौहाउसची स्थापना केली. पुढे तिचे नामकरण ‘द इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ असे झाले. बौहाउसची कार्यप्रणाली पुढे चालू ठेवणारी ही एक उल्लेखनीय संस्था होय.

संदर्भ : 1. Bayer, H. Ed. The Bauhaus 1919-1928, 1966. 2. Gropius, Walter, The New Architecture and the Bauhaus, London, 1955.

लेखक :श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate