অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतातील हस्तिदंतशिल्पन

भारतातील हस्तिदंतशिल्पन

वॉलरसाचे दात, हिप्पोपोटॅमसचे दात, प्रामुख्याने हत्तीचे सुळे-दात व नारव्हाल देवमाशाचे दात यांवर प्रक्रिया व कोरीव काम करून बनविलेल्या शोभा किंवा विलासवस्तू व मूर्तिशिल्पे. ही एक अनुप्रयुक्त कला असून तिचे माध्यम मुख्यत्वे हत्तीचा दात असतो. तिची कारागिरी क्लिष्ट असून केवळ सुवर्णा-लंकारांच्या कलेशीच तिची तुलना केली जाते. हस्तिदंताचा उत्पाट किंवा कणी (ग्रेन), मलईसदृश फिकट रंग, सफाईदार पोत आणि मृदू चमक वाचकाकी इ. गुणविशेषांमुळे त्यापासून बनविलेल्या वस्तू वा मूर्ती आकर्षक, नाजूक व मनोरम दिसतात. हस्तिदंती खेळणी, मूर्ती, अलंकार इ. वस्तू कशा बनवाव्यात यांविषयीची माहिती प्राचीन वाङ्मयातून मिळते.

कौटिलीय अर्थशास्त्र, वराहमिहिरची बृहत्संहिता, महावंश महावस्तू , जैन निशीथसूत्र, आगम साहित्यातील बृहत्कल्पभाष्य इ. वाङ्मयीन पुराव्यांबरोबरच अनेक ठिकाणच्या उत्खननांतही बरेच हस्तिदंती अवशेष विशेषतः अलंकार, मूर्ती, मणी, बाहुल्या, अन्य खेळणी इ. उपलब्ध झाले आहेत. यांशिवाय काही शिलालेखांतूनही त्यासंदर्भात माहिती मिळते. हस्तिदंती शिल्पकलेचे दोन स्वतंत्र विभाग आढळतात. एक, प्रसाधनाच्या वस्तू विशेषतः बांगड्या, फण्या, आकडे (पीन), आंजनशलाका, आरशांच्या मुठी, डब्या, तबके, खेळणी (बाहुल्या), तलवारीच्या मुठी, फासे, विविध भांडी, फर्निचर अलंकृत करण्याच्या वस्तू इ. आणि दोन, मूर्ती. हस्तिदंती शिल्पकलेचे पुरावे सिंधू संस्कृती (इ. स. पू. २७५०–१७५०) पासून मिळतात. ही कला सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत भारतात अवशिष्ट होती; अद्यापही ती काही शहरांतून आढळते.

रामायण-महाभारतात हस्तिदंताचे काम करणाऱ्या कारागिरांचा एक स्वतंत्र वर्ग होता. सांचीच्या स्तूपातील एका तोरण शिलालेखात हस्तिदंती कलाकाम करणाऱ्या कलाकारांचा एक वर्ग असल्याचा उल्लेख असून या कलाकारांना दंतकार किंवा दंतघाटक म्हणत. रावणाच्या राजवाड्याचे स्तंभ व खिडक्यांच्या जाळ्या हस्तिदंताच्या होत्या (अरण्य पर्व ५५.८–१०), कैकेयीच्या राजमहालात आणि कौरवांच्या सभेत दंतासने होती (महा. उद्योग पर्व ४७.५), धर्मराज हस्तिदंताच्या फाशांनी द्यूत खेळत होता( विराट पर्व १.२५) वगैरे काही संदर्भ उल्लेखनीय होत. तद्वतच अभिजात संस्कृत वाङ्मयात विशेषतः मृच्छकटिक व रघुवंश यांतून अनुक्रमे हस्तिदंताच्या तोरणाचे आणि सिंहासनाचे उल्लेख आढळतात.

सिंधू संस्कृतीतील हडप्पा येथे मणी, पेंडन यांसारखे दागिने आणि निरनिराळ्या प्राण्यांचे आकार दिलेले आकडे (पीन) मिळाले आहेत. यांशिवाय कौशाम्बी, नेवासे येथील उत्खननांत तसेच तक्षशिला, भिरचे टेकाड, सिर्काप, बेग्रॅम (आधुनिक कपिशा) इ. ठिकाणच्या उत्खननांतइ. स. पू. दुसऱ्या शतकापासून ते इ. स. दुसऱ्या शतकापर्यंतचे अनेक अवशेष उपलब्ध झाले. त्यांत हस्तिदंती बांगड्या, बाहुल्या, आरशांच्या मुठी, स्त्री-प्रतिमा, फण्या, आकडे, आंजनशलाका, खेळणी वगैरे विविध प्रकारचे अवशेष मिळाले. यासुमाराची एक हस्तिदंती भारतीय बनावटीची स्त्रीमूर्ती (यक्षिणी) पाँपेई येथे मिळाली. त्यावरून जॉन मार्शल या पुरातत्त्व-वेत्त्याने व आनंद कुमारस्वामी या कलासमीक्षकाने असे अनुमान काढलेकी, या वस्तू बाहेरच्या प्रदेशातून भारतात आल्या असाव्यात; कारण त्यांवर ग्रीकांश व रोमन संस्कृतीचा प्रभाव आढळतो; तथापि पाँपेईच्या यक्षिणीच्या मूर्तीवरून या कलात्मक वस्तूंवर सांची, मथुरा, अमरावती येथील स्तूपांवरील मूर्तिकामाची छाप असल्याचे आढळले.

इ. स. १९३७ आणि १९३९-४० दरम्यानच्या उत्खननांत बेगॅ्रम येथे एका शाही प्रासादात अनेक हस्तिदंती वस्तू आढळल्या व त्यावर मथुरा शिल्पशैलीचा प्रभाव होता. या उत्खननाव्यतिरिक्त पंजाबातील रूपड येथील उत्खननांत मिळालेली फणी ही तिच्या कलात्मक आकारासाठी प्रसिद्ध असून तीवर नक्षीकाम आहे. अशाच प्रकारची एक नक्षीयुक्त फणी पाटलीपुत्र येथे मिळाली. तीवर मिथुन शिल्प कोरले असून दुसऱ्या बाजूस वृक्षवल्लीत एक स्त्री-प्रतिमा कोरली आहे. प्रस्तुत फणी लंडनच्या व्हिक्टोरिया-अ‍ॅल्बर्ट संग्रहालयात ठेवली आहे. वरील उत्खननात काही अलंकरणाच्या ज्ञापकांशिवाय अपोत्थित शिल्पात खोदलेल्या तीन सुरेख स्त्री-प्रतिमा आढळल्या. त्यांची उंची ५० सेंमी. असून त्या मकरावर उभ्या आहेत. त्या नदीदेवतांच्यामूर्ती असून त्यांपैकी एकीचा पोशाख पाश्चात्त्य स्त्रीच्या झग्यासारखा आहे.

दागदागिने आणि अलंकार यांबरोबरच उत्खननांत काही चौकोनी आणि वर्तुळाकार तबके (प्लाक), फर्निचर विशेषतः खुर्च्या, टेबले, कपाटे यांना अलंकृत व सजविण्यासाठी काही कलात्मक ज्ञापके हस्तिदंतात कोरलेली आढळली. तसेच बाहुल्या, खेळणी आणि प्रसाधनाची साधने विशेषतः मंजूषा (पेट्या) आढळल्या. तबके व मंजूषा यांवर नक्षीकाम केलेले असून बुद्धाच्या पूर्व जीवनातील कथानक (जातक कथा) आणि काही स्त्री-प्रतिमा यांचे कोरीव काम आहे. या स्त्रियांबरोबर काही कला-वस्तूंत मुलांचेही चित्रीकरण आढळते. या सर्वांवर मथुरा, अमरावती, सांची येथील स्तूपांच्या कलेचा प्रभाव आढळतो. अलंकरणात (काही हस्तिदंती पेट्या सु. १२ सेंमी. उंच आहेत) तरुणींच्या उभ्या मूर्ती असून त्यांच्याएका हातात कमळ व दुसऱ्या हातात ओढणी (स्कार्फ) आहे, तरएक तरुणी आरशामध्ये (दर्पणधारी) पाहत आहे. ही सर्व हस्तिदंतीशिल्पे ब्रिटिश म्यूझीयममध्ये असून त्यांवर मध्य प्रदेश व माळव्यातील दहाव्या–बाराव्या शतकातील शिल्पकलेची छाप आढळते.

राजेरजवाड्यांच्या सिंहासनांचे हात-पाय यांना विविध प्राण्यांची रूपे देण्याची पद्धत मध्ययुगात प्रचलित होती. गुप्त (इ. स. ३२१–४५७) आणि गुप्तोत्तर काळात (इ. स. ४५८–६४६) काही हस्तिदंती वस्तू बनविल्याचे दाखले मिळतात. ओडिशात बाराव्या शतकातील हत्तीच्या प्रतिकृतीचे सिंहासनाचे पाय आढळले असून ते कोलकात्याच्या आशुतोष मुखर्जी संग्रहालयात ठेवले आहेत. विजयानगर साम्राज्याला भेट दिलेल्या फेर्नओ न्यूनीझ या परदेशी प्रवाशाने राजप्रासादातील पलंगाचे हस्तिदंतीपाय पाहिल्याचा उल्लेख केला आहे. त्रावणकोर संस्थानात एक हस्तिदंती सिंहासन मिळाले असून त्यावर उत्तम शिल्पांकन आहे. त्यातील काही तरुणी पक्ष्यांच्या अंगावर गुलाबपाणी शिंपडत आहेत, तर एक चतुर्मुखीस्त्री तंबोरा वाजवीत असून अन्य काही स्त्रिया तिला इतर वाद्यांचीसाथ देत आहेत. यांतील काही तरुणींच्या हातात पुष्पगुच्छ आहेत, तर काहींच्या हाती पुष्पमाला आहेत. काही ठिकाणी पशुपक्षी कोरलेआहेत. अशाच प्रकारचे दुसरे एक हस्तिदंती सिंहासन त्रावणकोरच्या संस्थानिकांनी तयार करून घेऊन नक्षी व सुवर्णाने अलंकृत करून१८५१ मध्ये राणी व्हिक्टोरियाला भेट म्हणून दिले, ते व्हिक्टोरिया आणिअ‍ॅल्बर्ट संग्रहालयात आहे.

हैदराबाद (सिंध) या शहराच्या ईशान्येस ब्राह्मणबाद नावाच्या जुन्या गावी १८५४–५६ दरम्यान केलेल्या उत्खनन-संशोधनात ए. एफ्. बेलॅसिस याला हस्तिदंती कलावस्तूंचा खजिनाच आढळला. येथील पेटींवरील आसजीव पटलीवेष्टन केलेली हस्तिदंताची अनेक उदाहरणेआहेत. त्यांपैकी काही तंजावरच्या राजप्रासादात पाहावयास मिळतात. दोन खुर्च्यांवर (सतरावे- अठरावे शतक) अलंकरण केलेले असून त्यावर लाखेच्या रंगाचे आवरण दिल्याचा उल्लेख आनंद कुमारस्वामी करतात.यात प्रथम वरच्या भागावर कोरीव काम करून त्यातील खाचांत उष्ण लाख (पातळ द्रव) ओतत असत. नंतर ते घासून घेऊन स्वच्छ केल्यावर तो रचनाबंध उठून दिसे. ही प्रक्रिया पद्धती अद्यापि तंजावरमध्ये विशेषतः संगीत वाद्यांच्या अलंकरणात वापरली जाते. ती म्हैसूर व श्रीलंकेतही प्रचलित आहे; मात्र त्रावणकोर कलासंप्रदायातील हस्तिदंती वस्तू या अधिक सुबक व कलापूर्ण आहेत.

धर्मातीत (सेक्युलर) मूर्तींव्यतिरिक्त हस्तिदंताच्या काही धार्मिक मूर्तीही तत्कालीन दंतकारांनी घडविलेल्या आहेत. अशा मूर्तींत बुद्धाच्या व बोधिसत्वादिकांच्या मूर्ती असून विष्णू , गणेश, सरस्वती, पार्वती, शिव या हिंदू देवतांचीही हस्तिदंती शिल्पे कोरण्यात आली. त्यांतून लोकमानसातील विविध संप्रदाय व पूजाविषय स्पष्ट होतात. यात रथांवरील, पेट्यांवरील स्तबकातील मूर्तींचा अंतर्भाव आहे. काही स्वतंत्र हस्तिदंती शिल्पे असून त्यांचे नमुने गणपती, त्रिवेंद्रम; ओडिशातील गणेशमूर्ती,मेट्रोपॉलिटन संग्रहालय, न्यूयॉर्क; राधाकृष्ण, आशुतोष मुखर्जी संग्रहालय, कोलकाता; गजलक्ष्मी, कर्नाटक; कालियामर्दन कृष्ण, तमिळनाडू ; ख्रिस्ती संत, गोवा या विविध शहरांतील संग्रहालयांत आहेत.

सोळाव्या-सतराव्या शतकांतील हस्तिदंती मूर्तिशिल्पे महाराजा शिवछत्रपती संग्रहालय, मुंबईयेथे आहेत. याच संग्रहालयात बाराव्या शतकातील नृत्यावस्थेतील एक स्त्रीमूर्ती आहे. तिचे दोन्ही हात तुटलेले असूनही तिची नृत्यमुद्रा स्पष्टदिसते. ओडिशा, विजयानगर, काश्मीर, तंजावर, म्हैसूर ही भारतातील हस्तिदंती कलेची प्रमुख ठिकाणे असून या भागातील घरगुती सजावटीच्या अनेक हस्तिदंती वस्तू मिळतात. हस्तिदंताच्या मूर्ती बनविण्याची जुनीपद्धत मागे पडून आधुनिक यंत्रसामग्रीने आता ही कला विकसित झाली आहे. अलिकडे त्रिवेंद्रम, म्हैसूर, दिल्ली, लखनौ, जयपूर, अमृतसर इ. ठिकाणी दंतवस्तू बनविण्याचे कारखाने आहेत.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate