অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भिंत

भिंत

संरक्षण, बंदिस्तपणा, विभाजन इ. उद्दिष्टांनी करण्यात येणारे उभे बांधकाम म्हणजे भिंत होय. एखाद्या इमारतीची किंवा खोलीची परिधी निश्चित करणारा हा वास्तुघटक आहे. भिंतीमुळे विविध आकारांची अवकाशनिर्मिती सीमित वा प्रमाणबद्ध करता येते. शहराच्या वा गावाच्या सीमा दर्शविणारे कोट वा प्राकार (शहरपन्हा वा गावपन्हा), संरक्षक, तटबंद्या, धरणे व बंधारे, पडद्या (पॅरॅपेट वॉल) हे भिंतीचेच वेगवेगळे आकार-प्रकार होत.

ईजिप्शियन भित्तिशिल्पन - पहिल्या सेटीचे मंदीर, आबायडॉस, इ. स. पू. सु. १३१२. (२) डच शैलीचे शिल्पांकन केलेली राजवाड्याची दर्शनी भिंत, मांडवी, भारत. (३) आधुनिक फ्रेंच वास्तुकल्पातील काचेच्या भिंतीची योजना, प्रदर्शन-दालन, नँतॅर, १९५६-५८. (४) राजपूत लघुचित्रांनी सजवलेली दरबार-दालनाची भिंत, कोटा, भारत.(१) ईजिप्शियन भित्तिशिल्पन - पहिल्या सेटीचे मंदीर, आबायडॉस, इ. स. पू. सु. १३१२. (२) डच शैलीचे शिल्पांकन केलेली राजवाड्याची दर्शनी भिंत, मांडवी, भारत. (३) आधुनिक फ्रेंच वास्तुकल्पातील काचेच्या भिंतीची योजना, प्रदर्शन-दालन, नँतॅर, १९५६-५८. (४) राजपूत लघुचित्रांनी सजवलेली दरबार-दालनाची भिंत, कोटा, भारत.

अतिप्राचीन काळापासून दगडाच्या व मातीच्या भिंती आढळतात. दगड एकमेकांवर रचून भिंती बांधल्या जात. दोन दगडांमध्ये मातीचा उपयोग केला जाई. त्यानंतर विटा भाजून त्यांच्या भिंती बांधण्यात येऊ लागल्या. या विटांमध्ये चुना वापरला जाई. हल्ली सर्वत्र सिमेंटचा वापर होतो. या भिंतीवर छप्पर आधारलेले असे. या भारवाही (लोड बेअरिंग) भिंती छपराचे वजन पेलण्याच्या दृष्टीने भक्कम व जाड असाव्या लागत. अनेक शतके याप्रमाणे विटांच्या भिंतीचा उपयोग केला गेला. त्यानंतर एकोणिसाव्या शतकात काँक्रीटचा शोध लागल्यावर बांधकामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले व छपराला आधार देण्यासाठी काँक्रीटच्या स्तंभांचा उपयोग केला जाऊ लागला. या बांधकामामुळे विटांच्या भिंतीचे स्वरूप केवळ स्तंभ व छप्पर यांमधील अंतर भरून काढणे एवढेच राहिले. अशा भिंतीवरील छपरांचे वजन गेल्याने अर्थातच त्यांची जाडी कमी करण्यात आली. अजूनही आपल्याकडे अशा तऱ्हेच्या भिंती बांधण्यासाठी विटांचा उपयोग केला जातो.

काँक्रीटचे वेगवेगळ्या आकारांचे भरीव व पोकळ ठोकळेही भिंती बांधण्यासाठी वापरले जातात. पोकळीयुक्त भिंती (कॅव्हिटी वॉल्स) थंडी, उष्णता व आवाज यांच्या रोधक असतात. वातानुकुलित इमारतीत त्यांचा वापर होतो. त्यानंतर आधुनिक काळात काच वा प्लॅस्टिक यांच्या आवरण-भिंतीचा (कर्टन वॉल) वापर सुरू झाला. त्यामुळे अंतर्बाह्य अवकाशात अधिकाधिक समन्वय साधणे शक्य झाले. विविध प्रकारच्या नवनवीन आवरण-भिंतींमुळे अंतर्भाग उष्णता व आवाज यांपासून सुरक्षित राहूनही बाहेरच्या सृष्टीसौंदर्याचा लाभ घेणे शक्य होऊ लागले आहे. अलीकडे पाश्चिमात्य देशांत प्लॅस्टिकच्या वायवीय (न्यूमॅटिक किंवा इन्फ्लेटेड) वास्तुरचनेमुळे भित्तिरचनेत आमूलाग्र बदल झाला आहे. अशा प्रकारच्या भिंती आणि छपरे प्लॅस्टिकच्या आवरणात हवा भरून उभारली जातात.

दगडी भिंतीत चीनची भिंत जगप्रसिद्ध असून ते स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य मानण्यात येते. प्रथम मातीने बांधलेल्या या भिंतीची डागडुजी करताना दगड व विटा वापरल्या आहेत. ग्रीक, रोमन वास्तुशिल्पज्ञांनी संगमरवर, काँक्रीट व दगड यांचा प्रामुख्याने भिंत उभारण्यासाठी उपयोग केला. भिंतीवर वेगवेगळ्या नक्षीकाम कोरलेले असे; तसेच त्यांवर शिल्पाकृती असत. रोमन काळात ६ मी. जाडीच्या व २५ मी. उंचीच्या काँक्रीटच्या भिंती बांधल्याचे आढळून येते. मध्ययुगीन यूरोपात लाकडी सांगाड्यात विटांच्या भिंती बांधून त्या शोभिवंत करीत असत. बायझंटिन व अरबी कारागीर विविध तऱ्हेच्या चित्रांनी भिंतींचे अंतर्भाग मढवीत असत. भारतात प्राचीन काळापासून राजवाडे, किल्ले तसेच शासकीय वास्तुरचनांमध्ये भव्य दगडी तटबंदी बाधंलेल्या असत. दिल्लीतील लाल किल्याची भव्य तटबंदी ही जगातील एक उत्कृष्ट रचना मानण्यात येते. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतून अद्यापही सारवलेल्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे पाहावयास मिळतात. बंगालमधील अल्पना चित्रेही प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये बांबूच्या भिंती प्रचलित होत्या. आजही तेथील वास्तुरचनेत बांबूच्या व कागदाच्या भिंती आढळतात. विषम हवामानाच्या प्रदेशात थंडी व उष्णता यांपासून संरक्षण मिळवण्याच्या हेतूने भिंतीची जाडी जास्त ठेवली जाते.

भिंतीमुळे ज्याप्रमाणे अंतर्भागास संरक्षण मिळते, त्याचप्रमाणे वास्तूच्या बाह्य दर्शनी भागास सौंदर्य प्राप्त होते. भिंतीच्या दर्शनी भागावर कोरीवकाम, भित्तीचित्रे, तसेच निरानिराळ्या रंगांचे दगडविटा अथवा अन्य आवरणे यांचा अवलंब करुन सजावट केली जाते. सौंदर्य व उपयुक्तता या दोन्ही दृष्टींनी भिंत हा वास्तुरचनेचा एक प्रमुख घटक आहे.

लेखक : मा. ग. देवभक्त

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate