অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भित्तिचित्रण

प्रस्तावना

वास्तूच्या भिंती वा छत सजवण्याच्या उद्देशाने त्यावर जे चित्रण वा अलंकरण केले जाते, त्यास स्थूलमानाने भित्तिचित्रण (म्यूरल पेंटिंग) म्हटले जाते. हे चित्रण अनेक पद्धतींनी व विविध माध्यमांतून केले जाते. वास्तुसजावटीच्या या अन्य तांत्रिक माध्यमांमध्ये चित्रकाच, कुट्टिमचित्रण, लाकडावरील व दगडावरील जडावकाम, उत्थित शिल्पांकन इत्यादींचा अंतर्भाव होता. या चित्रणाचा आकार भिंतीवर टांगण्याच्या चित्रांप्रमाणे ठराविक चौकटीचा नसतो, तर त्याची व्याप्ती संबंधित भिंत आणि वरचे छत यांच्याशी सुसंबद्ध ठरेल अशा प्रकारे निश्चित केलेली असते. हे चित्रण इमारतीच्या आतील बाजूस, त्याचप्रमाणे बाहेरील बाजूसही केले जाते.

भित्तिचित्रणास फार प्राचीन काळापासूनची समृद्ध परंपरा आहे. त्याची सुरुवातीची उदाहरणे म्हणजे इ. स. पू. सु. ३०,००० ते १०,००० या काळात आदिमानवाने गुहेतील भिंतींवर काढलेली चित्रे होत. स्पेनमधील  अल्तामिरा व फ्रान्समधील लॅस्को या ठिकाणी प्रागैतिहासिक चित्रकलेची उदाहरणे या दृष्टीने फार महत्त्वाची मानली जातात. भारतात मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणी व इतरत्रही अशा तऱ्हेची भित्तिचित्रणे नैसर्गिक गुहांतून केलेली आढळतात. या चित्रांमागील प्रेरणा प्रामुख्याने यातुविद्येची असावी. यूरोपमध्ये प्राचीन काळात आढळलेली बहुतेक भित्तिचित्रे ही खोल नैसर्गिक गुहांमधील संपूर्ण अंधाऱ्या जागी ओबडधोबड भितींवर व छतांवर, दगडाच्या नैसर्गिक आकारांचा उपयोग प्राण्यांचे पोट वगैरे फुगीर भाग दाखविण्यासाठी करून, हुबेहूब चित्रित केलेली आढळतात. काही ठिकाणी हाताचा पंजा भिंतीवर ठेवून त्याच्याभोवती हाडांच्या नळीतून रंगीत चूर्ण फुंकून त्याची आकृती उमटवलेली आढळते. अशा तऱ्हेचे हजारो हातांचे ठसे उपलब्ध आहेत. प्राण्यांची चित्रे काढल्याने त्या प्रकारचे प्राणी त्या गुहांजवळ आकर्षित होतील, त्याचप्रमाणे चित्रित प्राण्याच्या शरीरात बाण घुसल्याचे दाखविल्याने शिकार सहज साध्य होईल, अशी ही चित्रे काढण्यामागील कल्पना असावी. या गुहांमधून रानबैल, गायी, भीमगज, गेंडे, हरणे, घोडे इ. प्राणी प्रामुख्याने आढळतात. यांतील बरीचशी चित्रे भूपृष्ठाच्या खाली असलेल्या गुहांमधून आहेत. मँगनीझपासून मिळणारा काळा रंग तसेच गेरू व पिवडी यांसारख्या मातीपासून निरनिराळे रंग यांचा या गुहाचित्रांत उपयोग केलेला आढळतो.

वन्य व आदिवासी जमातींमध्ये भित्तिचित्रण

कित्येक वन्य व आदिवासी जमातींमध्ये भित्तिचित्रण हे लोककलेच्या अंगाने विकसित झाल्याचे दिसून येते. उदा., कच्छमधील माती व शेण यांचा उपयोग करून काढलेले उठावाचे लिंपण-चित्र; अथवा वारली जमातीच्या झोपड्यांवर निरनिराळ्या सणासुदीला वा लग्‍नप्रसंगी काढलेली देवदेवतांची व दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे. ही चित्रे शेणाने सारवलेल्या भिंतीवर काड्यांचा व बोटांचा कुंचल्यासारखा वापर चुन्याने काढली जातात.

उत्थित शिल्पांकन

भित्तिचित्रणाची इ. स. पू. सु. ३५०० मधील उदाहरणे ईजिप्त व मेसोपोटेमिया प्रदेशात आढळतात. ईजिप्तमधील भित्तिचित्रणाचे नमुने त्या काळातील राजेरजवाड्यांच्या व श्रीमंत व्यक्तींच्या थडग्यांमधून आढळतात. मरणोत्तर जीवनावर त्यांचा दृढ विश्वास होता व म्हणूनच देवाच्या सान्निध्यात मृत व्यक्तीसंबंधी निरनिराळी दृश्ये दाखविताना त्याचे आवडते खेळ, खाण्यापिण्याच्या व अन्य आवडीनिवडीच्या वस्तू इ. विषयांची चित्रे सपाट पृष्ठभागावर व त्याचप्रमाणे दगडावर उत्थित शिल्पांकन करून रंगविलेली आढळतात.

यानंतरच्या काळातील (इ. स. पू. ४०० ते इ. स. १००) ग्रीक, रोमन व इट्रुस्कन संस्कृतींमधील मोठमोठे राजवाडे व श्रीमंतांचे प्रासाद भूषविणारी भित्तिचित्रे महत्त्वाची मानली जातात. त्यांचे काही काही नमुने पाँपेई व हर्क्यूलॅनिअम या शहरांमधील उत्खननांत आढळले आहेत. या भित्तिचित्रांत दैनंदिन जीवनातील प्रसंग, प्रचलित प्रसंग, प्रचलित कथा-नाटकातील प्रसंग इ. चित्रित केलेले असत.

इ. स. पू. १०० ते इ. स. ८०० पर्यंतच्या काळात भारतामध्ये अस्तित्वात असणारी एक समृद्ध व सौंदर्यपूर्ण भित्तिचित्रपरंपरा अजिंठ्याच्या रूपात आढळते. बौद्ध धर्मातील अनेक उपदेशपर व अन्य प्रसंगांचे चित्रण त्यांत आढळते. हीच परंपरा चीनमध्ये आणि जपानमध्येही प्रसृत झालेली दिसून येते. त्यात चीनमधील दुन हवांगमधील सहस्त्र बुद्धांच्या गुहांचाही अंतर्भाव होतो.

भित्तिचित्रणाच्या विविध तांत्रिक पद्धती

भित्तिचित्रणाच्या प्रदीर्घ व समृद्ध अशा परंपरेमध्ये अनेकविध तांत्रिक प्रक्रिया व पद्धती उत्क्रांत झालेल्या दिसून येतात. त्यांपैकी काहींची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे :

शुष्क पद्धती

(सेक्को). भिंतीवर लावलेला गिलावा (प्लास्टर) संपूर्ण सुकल्यावर व योग्य ते पोत मिळाल्यावर त्यावर पारदर्शक वा अपारदर्शक जलरंगाने, गोंद वा अंड्याचा बलक हे बंधक म्हणून वापरून रंगवितात. ईजिप्तमधील व अजिंठ्याची चित्रे या प्रकारची आहेत. जयपूर पद्धतीची भित्तिचित्रे याच प्रकारात मोडतात. परंतु या पद्घतीत पृष्ठभाग तयार करण्यासाठी साधारण दीड वर्षाहून अधिक कालावधी लागतो.

सार्द्र किंवा भित्तिलेपपद्धती

यामध्ये गिलावा ओला असतानाच जलमाध्यमांतून लावलेले, चुनाविरोधी रंग खोलवर शोषून घेतले जातात आणि कायम टिकतात. पॅड्युआ व असीझी येथील चर्चमधील जॉत्तो याने काढलेली लास्ट जज्‌मेंट सारखी तसेच ख्रिस्ताच्या जीवनावरील अन्य चित्रे, रोममधील सिस्टाइन चॅपेलमधील मायकेलअँजेलोने छतावर काढलेली चित्रे ही या पद्धतीची उत्तम उदाहरणे होत.

अंडे-मिश्रित चिकणरंग

माध्यम भिंत, काष्ठफलक, कॅन्‌व्हास इ. कोणत्याही चित्रपृष्ठांवर वापरले जाते. चूर्णरंग अंड्याच्या फक्त पिवळ्या बलकात घोटून त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून रंगलेपन केले जाते. कीटकांपासून संरक्षण करण्याकरिता बलकामध्ये लवंगेच्या तेलाचे थेंब टाकले जातात.

चित्रकाच

ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर यूरोपमध्ये अनेक चर्चवास्तू उभारण्यात आल्या. यांमध्ये ख्रिस्तजीवनातील विविध प्रसंगांची चित्रे रंगीत पारदर्शक काचांच्या माध्यमातून तसेच भित्तिचित्रणातून दाखविली गेली. याची उत्तम उदाहरणे पॅड्युआ, मीस्ट्रा, पीसा, रोम, फ्लॉरेन्स इ. ठिकाणी पाहावयास मिळतात. रंगीत पारदर्शक काचांचे तुकडे चित्राच्या संकल्पनेनुसार शिशाच्या साहाय्याने सांधून गवाक्षाच्या चौकटीत बसवतात. बाहेरच्या प्रकाशामुळे चित्रांचे रंग झळझळीत दिसतात. मार्क शगाल याची या माध्यमातील आधुनिक गवाक्षे उल्लेखनीय आहेत.

कुट्टिमचित्रण

यामध्ये निरनिराळ्या रंगीत काचांचे तसेच अन्य संगमरवरी माध्यमांचे तुकडे दाटपणे एकत्र जडवून चित्र तयार केले जाते. प्रथम चित्र कागदावर उलट काढले जाते व त्यावर गोंदाने काचांचे तुकडे चिकटवले जातात. नंतर भिंतीवर गिलावा लावून त्यामध्ये तुकड्यांची बाजू रुतवली जाते व गिलावा सुकल्यावर वरचा कागद धुऊन टाकला जातो व सुलट चित्रण भिंतीवर दिसू लागते. बायझंटिन काळातील चर्चवास्तूंमध्ये अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण भित्तिचित्रे आढळतात.

मारो फ्लाज

या प्रकारात तैलरंगांनी चित्र कॅन्‌व्हासवर काढले जाते व नंतर ते खास रसायनांच्या [म्हणजे गोल्ड साइझ व व्हाइट झिंक (झिंक ऑक्साइड) यांचे मिश्रण] साहाय्याने भिंतीवर क्रमाक्रमाने लावून चित्र हळूहळू चिकटवले जाते.

आधुनिक काळात प्लॅस्टिक, अ‍ॅल्युमिनियम, पोलाद, तांबे वगैरे धातू, काचा, भाजलेली माती इ. अनेकविध नवनवीन माध्यमांतून भित्तिचित्रण केले जाते.

लेखक : विश्वास यंदे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate