অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भित्तिपत्रक

भित्तिपत्रक

(पोस्टर). बहिःस्थल जाहिरातीचा एक प्रकार. सामान्यतः सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर चिकटवून भित्तिपत्रक प्रदर्शित केले जाते. त्यावरील जाहिरात, घोषणा वा इतर मजकूर वेधक व चटकन समजेल अशा प्रकारे लिहिलेला वा छापलेला असतो. भित्तिपत्रके, छापील पत्रके (बुलेटिन) व भव्य स्वरूपाचे प्रसिद्धिफलक हे बहिःस्थल जाहिरातीचे प्रकार होत.

'बिलबोर्ड' म्हणून इंग्रजीत प्रारंभीच्या भित्तिपत्रकाचा निर्देश करण्यात येई. हा शब्द नाट्यप्रयोगांच्या छापील छोट्या पत्रकां (प्लेबिल) वरून आलेला आहे. विचार प्रसाराच्या ठळक माध्यमांपैकी भित्तिपत्रक हे माध्यम स्वस्त व सर्वांत जुने आहे. सम्राट अशोकाने उभारलेले स्तंभ म्हणजे दगडावर कोरलेली आज्ञापत्रे हा भित्तिपत्रकाचा एक प्राचीन प्रकार म्हणता येईल.

भित्तिपत्रकाच्या कल्पनेचे मूळ, भिंतीवर अथवा लाकडी फलकावर दुकानाचे नाव लिहिणे किंवा चिन्ह रंगविणे, सरकारी इमारतीवर निशाण रंगविणे इत्यादींत आहे. त्यांतील काही लक्षवेधक व परिणामकारक चिन्हे लोकांच्या मनात ठसली. त्यातूनच भित्तिपत्रककलेचा उगम झाला, असा म्हटले जाते. भित्तिपत्रक हे चालणाऱ्या लक्ष्याकडे म्हणजे व्यक्तीकडे नेम धरून द्रुतगतीने गोळ्या झाडणारे शस्त्र आहे, असे आर्नोल्ड व्हिटीक याने रूपकात्मक रीतीने, पण समर्पकपणे म्हटले आहे. भित्तीपत्रकात जो संदेश असतो, तो क्षणार्धात प्रेक्षकाच्या मनात ठसतो.

कागदाचा वापर सुरू झाल्यावर हस्तलिखित भित्तिपत्रके प्रदर्शित केली जात. त्यानंतर चौदाव्या शतकात भित्तीपत्रकावरील चिन्हांसाठी लाकडी ठसे वापरात आले.

मुद्रणतंत्राच्या विकासाबरोबर छापील भित्तीकापत्रकांचा वापर सुरू झाला. पंधराव्या शतकातील प्रारंभीची छापील भित्तिपत्रके बातमी पत्रकाच्या स्वरूपाची होती. रंगीत चित्रणाची सोय झाल्याने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून रंगीत भित्तिपत्रके प्रदर्शित होऊ लागली. यूरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर भित्तिपत्रकांची गरज व महत्त्व वाढीस लागले. सेवनवस्तूंच्या उत्पादकांमध्ये स्पर्धा वाढली. संवनवस्तूंच्या त्याचप्रमाणे पर्यटन, विमानवाहतूक, कपड्यांच्या फॅशन, नाट्यप्रयोग इत्यादींच्या जहिरातींसाठी तसेच लोकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यासाठीही भित्तिपत्रके निघू लागली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व सांस्कृतीक संस्थांच्या समाजशिक्षणाचे काम कमी खर्चात भित्तिपत्रकांद्वारे होऊ लागले. भित्तिपत्रकांच्या संख्येत जसजशी वाढ होत गेली, तसतशी त्यांच्या प्रदर्शनासाठी लागणारी जागा कमी पडू लागली. १८४५ मध्ये जर्मनीच्या अर्नेस्ट लिटफास याने भित्तिपत्रकासाठी कायमचे स्वतंत्र प्रसिद्धी स्तंभफलक उभारण्यास सुरुवात केली. आज जगातील सर्व मोठ्या शहरांतून असे प्रसिद्धी स्तंभफलक दिसून येतात.

या स्तंभफलकांचे आकार भित्तिपत्रकांच्या आकाराशी निगडित असतात. भित्तिपत्रकांच्या आकारात सुसूत्रीपणा आणण्यासाठी त्यांची छपाई सामान्यपणे ७० सेंमी. × ५१ सेंमी., १०२ सेंमी. × ६३ सेंमी., १०२ सेंमी. × ७६ सेंमी. व १०२ सेंमी. × १५२ सेंमी. अशा आकारमानात करतात. छपाई व भिंतीवर चिटकविणे सोपे व्हावे, म्हणून एकापेक्षा जास्त कागद जोडून मोठी भित्तिपत्रकेही तयार करतात.

भित्तिपत्रकांच्या सुरुवातीच्या काळात त्यावेळचे नावाजलेले चित्रकार, भित्तिपत्रकारांना गौण लेखत. त्यांची रस्त्यावरचे कलाकार म्हणून संभावना करीत. तत्कालीन भित्तिपत्रकांत विविधता, कल्पकता व कलात्मकता हे गुण निश्चितच होते. त्यात आधुनिकतेची झलक होती, तंत्र व संशोधनाला वाव होता. यामुळे काही मोठे चित्रकार भित्तिपत्रकांकडे आकृष्ट झाले. त्या दृष्टीने पॉल बोद्री व दनी ऑग्यूस्ट राफे या दोन फ्रेंच कलाकारांची भित्तिपत्रके उल्लेखनीय असून त्यांना लेकप्रियता लाभली.

आधुनिक भित्तिपत्रकाचा इतिहास शेरे झूल (१८३९-१९३३) यांच्याबरोबर सुरू होते; शेरेवर जपानी लाकडातील कोरीवकामाच्या चित्रांचा प्रभाव होता. हा महान भित्तिपत्रकनिर्माता कसबी कारागीरही असल्यामुळे त्याने १८७७ मध्ये नाटकांच्या जहिरातीसाठी ठसे वापरून भित्तिपत्रके काढायला सुरुवात केली. ती अतिशय प्रभावी ठरली. एकट्या शेरेने सु. १,२०० भित्तिपत्रके चित्रित केली. त्याच्या शैलीचा प्रभाव एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत होता.

या काळात ज्या अनेक प्रख्यात चित्रकारांनी या माध्यमात रस घेऊन काम करायला सुरुवात केली, त्यांपैकी एद्वार माने, व आंरी द तूलूझ-लोत्रेक हे उल्लेखनीय आहेत. लोत्रेकने भित्तिपत्रकीय चित्रणाला कलेचा दर्जा प्राप्त करून दिला. व्यक्तिचित्रणात तो कुशल होता. त्याचे अक्षरांकित संदेश कलात्मक होते. त्याच्या भित्तिपत्रकांत रंग व अक्षरे मोजकी व वळणदार असत. लोत्रेकचे 'जेन अ‍ॅवरील' व कासाँद्रचे 'ला एतोले द नोर्द' ही दोन भित्तिपत्रके जगातील सर्वोत्कृष्ट भित्तिपत्रकांपैकी मानली जातात. माने व लोत्रेक यांच्या भित्तिपत्रकांमुळे भित्तिपत्रककलेला गौण लेखण्याचा संकेत नष्ट झाला.

शैक्षणिक भित्तिपत्रकाचा नमुना

कोण्या एका गावात एक बाई रहात होती.  ती दिसायला अगदी छान, गोरी गोरीपान होती.  तिथे नाक तरतरीत लांब आणि टोकदार होते. पण ही बाई होती महाखट्याळ.

कोणी कुठे बोलत असले की त्या ठिकाणी ही हमखास उभी रहायची आणि तिचा संबंध असो नसो, त्या बोलण्यात हटकून भाग घ्यायची. बरे दुसऱ्याच्या गोष्टी ऐकून गप्प तरी बसावे. पण नाही. तिखटमीठ लावून त्या गोष्टी सगळ्याना सांगायची. त्यामुळे शेजाऱ्यांच्यात भांडणे व्हायची. तिचा हा उद्योग दिवसेंदिवस जसा वाढत गेला, तसेतसे तिचे नातलग, शेजारी, आजूबाजूचे लोक, गावकरी अगदी हैराण झाले. कोण सोडवणार त्याना त्या त्रासातून? त्यांनी देवाचा धावा सुरु केला.

त्या बाईविरूद्ध येणाऱ्या तक्रारी ऐकून देवही त्रासून गेला आणि त्याने त्या बाईला आपल्या कडे बोलावून घेतले. त्याचवेळी तिचा लुडबुड्या, नाक खुपश्या स्वभाव बदलण्यासाठी तोडगाही काढून तयार ठेवला.

देवाचे बोलावणे आल्यावर देवापुढे त्या बाईला जावेच लागले. देवाने तिची आपुलकीने सर्व विचारपूस केली. नंतर त्याने तिला विचारले, "बाई, मानवजन्म मिळालेली तू एक बुद्धीमान, विचारवंत आणि कर्तबगार स्त्री आहेस. पण कारण नसताना दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसण्याच्या तुझ्या स्वभावामुळे तू घराघरातून भांडणे लावली आहेस. समाजात हेवेदावे, तंटे निर्माण केले आहेस. म्हणून तुझ्या स्वभावात तू बदल करणे आवश्यक आहे. तेच सांगण्यासाठी तुला येथे बोलावून घेतले आहे. ती पाहिलीस? तिकडे एक गोण भरून ठेवली आहे. घाबरू नकोस. ती गोण सर्व सर्व बाजूनी बंद आहे. त्या गोणीप्रमाणेच तुझे तोंडही तू बंद ठेवायचेस. त्या गोणीचा तू आदर केला पाहिजे. मात्र कोणत्याहि परिस्थितीत ती गोण तू उघडायची नाहीस, माझ्या आज्ञेचा भंग केल्यास त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. ती गोण घेऊन तू आता जा.

बाई मोठ्या आदराने म्हणाली, "देवा, मी तुझ्या आज्ञेचे पालन करीन. लोकाना त्रास होणार नाही अशी वागेन."  देवाला आश्वासन देऊन गोण घेऊन बाई भीत भीत एकदाची बाहेर पडली. गोण काही विशेष जड किंवा मोठी नव्हती. पण घरी पोहोचेपर्यंत बरोबर बाळगणे बाईला कठीण आणि जाचक वाटू लागले.

चालून चालून दमल्यावर ती शेताच्या बांधावर जरा विश्रांतीसाठी म्हणून बसली. बाईच्या स्वभावाने उचल खाल्ली. ती विचार करीत होती, "काय बरे दिले असेल या गोणीत? पण नको. ती उघडायची नाही म्हणून सांगितले आहे. उघडून परिणाम भोगायचे कोणी? पण एक भोक पाडून आपण पाहूया तरी. असे म्हणून तिने गोणीला भोक पाडून हात आत घालून शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात तिच्या हाताला काहीतरी चावले. आई ग! म्हणून ती हात बाहेर काढते तोच गोणीतून मुंग्या, माश्या, झुरळे, ढेकूण, पिसवा भराभर बाहेर पडून सैरावैरा पळू लागल्या. त्यातील काहीनी तर बाईवरच हल्ला केला. बापरे, आपल्या लुडबुड्या स्वभावाला देवाने हे चांगलेच प्रायश्चित्त दिले, असे म्हणत ती ते कीटक गोळा करू लागली.

इतक्यात तिच्या कानावर देववाणीचे घनगंभीर शब्द आले- ''मला दिलेले वचन तू पाळले नाहीस. गोण उघडून माझे प्राणीधन तू वाऱ्यावर उधळून लावलेस. आपल्याशी संबंध नसलेल्या गोष्टीत तू अजून रमतेस. म्हणून आता तुला शिक्षा देणेच योग्य ठरेल. तू या क्षणापासून एक पक्षी होशील. तुझी खूण म्हणून त्या पक्ष्याची चोच तुझ्या नाकासारखी लांबलचक, टोकदार पण टणक असेल व तो ती ज्यात त्यात खुपसत राहील. तुला परत मनुष्य जन्म हवा असेल तर तू प्राणीधन गोणीतून मला आणून दे."देववाणी थांबली.

देववाणीप्रमाणे बाई सुतारपक्षाचा जन्म घेती झाली. तिच्या लांबलचक, टोकदार नाकाप्रमाणेच त्या पक्षाची चोचही लांबलचक, टोकदार, टणक होती. पुन्हा मनुष्यजन्म मिळविण्यासाठी देवाने घातलेली अट पूरी करण्यासाठी त्या पक्षाचा सातत्याने प्रयत्न चालू आहे. परंतु अनंतकाळ झाला तरी त्या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाही.

एक होता अपंग

नव्हते त्याला हात

पायाने वाजवून पेटी

केली सर्वांच्यावर मात ।।१।।

एक होता अपंग

तो होता आंधळा

गात होता गीते

गोड त्याचा गळा ।।२।।

एक होता मुका

अबोल त्याचा गळा

खुणांची वेगळी बोली

बोले बिचारा भोळा ।।३।।

एक होता अपंग

नव्हते त्याला पाय

हाताने सायकल चालवायची

हा एकच उपाय ।।४।।  - स्मिता जोशी

यानंतर अनेक प्रतिष्ठित चित्रकारांनी भित्तिपत्रके काढली. ग्रासे एद्‍वार, मेटिव्हेट, बॉनार व्हेल्दे, फॉरॉ आणि कॉफर ही काही प्रमुख नावे होत. एरिक गिल (१८८२-१९४०) ह्या ब्रिटिश कलावंताने मुद्राक्षरांचे आधुनिकीकरण केले व पर्यायाने भित्तिपत्रकांच्या कलेला आधुनिक वळण दिले. दोन महायुद्धांच्या काळात जेम्स मंगमरी फ्लॅग व बेन शाह यांनी अमेरिकेसाठी आणि एब्रॅम गेम्स याने इंग्‍लंडसाठी युद्धप्रयत्‍नांच्या दृष्टीने काढलेली भित्तिपत्रके फार गाजली. लंडन शहराच्या परिवहन प्राधिकरणाने १९०८ मध्ये अनेक नामांकित भित्तिपत्रककारांना एकत्र आणून त्यांच्याकडून भित्तिपत्रके तयार करविली. ही इतकी उत्कृष्ट होती, की त्यांच्याद्वारे लोकांची कलात्मक अभिरुची उंचावली गेली, असे म्हटले जाते. १९०९ च्या सुमारास यूरोपमध्ये अनेक ठिकाणी भित्तिपत्रकांची प्रदर्शने भरविण्यात आली. त्यासंबंधी नियतकालिके व पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली.

भित्तिपत्रकांची निर्मितीप्रक्रिया बरीच व्यापक आहे. त्यात भित्तिपत्रकाची कल्पना, रेखांकन, संदेश, किंमत इत्यादी तपशील तसेच छपाई हे घटक येतात. भित्तिपत्रकाच्या संकल्पनेत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकाची मूळ कल्पना. त्यासाठी कलाकाराला भित्तिपत्रकाच्या विषयाची मार्मिक माहिती असावी लागते. ज्याच्यासाठी ही भित्तिपत्रके तयार करण्यात येतात, त्याची भित्तिपत्रकाविषयीची कल्पना व अपेक्षाही जाणून घ्यावी लागते. खर्चाचा अंदाजही बांधावा लागतो. कारण त्यावरूनच भित्तिपत्रकाचा आकार, आकृतिबंध व मुद्राचित्रणाचा प्रकार इ. गोष्टी ठरतात. तसंच भित्तिपत्रक जवळून की लांब अंतरावरून पाहण्यात येईल, यावर त्याचा आकृतिबंध अवलंबून असतो.

भित्तिपत्रकनिर्माता प्रथम भित्तिपत्रकाच्या घटकांचे ढोबळ स्वरूपात रेखांकन करतो; नंतर तो त्या घटकांची रंगसंगती ठरवितो. निरनिराळ्या पार्श्वभूमीवर निरनिराळ्या रंगसंगतीने परिणामकारक रंगांचा मेळ साधल्यावर कच्च्या स्वरूपात भित्तिपत्रकाची जुळणी तो करतो. अंतिम जुळणीत, लहानसहान बारकावे वगळून, भित्तिपत्रक ठराविक अंतरावरून उठावदार कसे दिसेल, या दृष्टीने त्याला अंतिम स्वरूप देण्यात येते. अशा भित्तिपत्रकात (१) लक्ष खेचून घेण्याची शक्ती, (२) आकलनाची सुलभता, (३) लक्षात राहील असे काही तरी टळक वैशिष्ट्ये व (४) मनाला चालना मिळेल अशी प्रेरक वा उत्तेजक बाब असेल, तरच ते परिणामकारी ठरते. त्यातील संदेश व चिन्हांमुळे शेवटल्या दोन गोष्टी साधल्या जातात.

परंतु हे सर्व छापलेल्या भित्तिपत्रकातून साधावयाचे असते, म्हणून त्याची छपाई व मूळचे संकल्पन किती प्रमाणात जुळते यांचेकडेसुद्धा भित्तिपत्रकनिर्मात्याला लक्ष द्यावे लागते. अशाप्रकारे भित्तिपत्रकाच्या निर्मितीत अनेक क्षेत्रांतील तज्ञांचे सहकार्य आवश्यक ठरते. या सर्वांचे संकलन करण्यासाठी भित्तिपत्रकनिर्माता बहुश्रुत व अभ्यासू असावा लागतो.

भित्तिपत्रककलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास उपयोजित कलांच्या शिक्षणक्रमात अंतर्भूत आहे. सर्वच कलाशिक्षण-संस्थांतून हा विषय शिकविला जातो. भारतामध्ये अशा कला शिक्षणाची सोय मद्रास, कलकत्ता व मुंबई या शहरांत आहे. भारतीय भित्तिपत्रकांच्या संदर्भात एअरइयाने दिलेली प्रोत्साहने व जे. वॉल्टर थॉम्पसन या अमेरिकन संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे.

विसाव्या शतकात भित्तिपत्रकांच्या कला संप्रदायांचा इतका सुकाळ झाला की, प्रत्येक संप्रदायाचे वेगळेपण न ओळखता येण्याइतके ते परिणामशून्य झाले. भरीस भर म्हणून भित्तिपत्रकांच्या संख्येत वाढ झाली. जिकडे पाहावे तिकडे भित्तिपत्रक अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे लोकांची संदेश ग्रहण करण्याची शक्ती ताणली गेली. यास आळा घालण्यासाठी जगातील सर्व मोठ्या शहरांतून भित्तिपत्रकांच्या प्रदर्शनावर निर्बंध घालण्यात आले. भित्तिपत्रकांचे आकार व प्रदर्शनांच्या जागा निश्चित होत गेल्या.

काहींच्या मते जाहिराती लोकांची दिशाभूल करतात, लोकमतावर दबाव आणतात. जाहिरातीमुळे संस्कृतीचा ऱ्हास होतो, असाही आक्षेप घेण्यात येतो. वैचारिक क्षेत्रात अशा रीतीने जाहिरातीच्या इष्टानिष्ठतेबद्दल वाद आहेत. मात्र भित्तिपत्रकांमुळे शहरांच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा येते, हे निश्चित.

विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भित्तिपत्रकनिर्माता कासाँद्र याच्या म्हणण्यानुसार सौंदर्य हे भित्तिपत्रकाचे साध्य नसून लोकांशी, स्पष्ट शब्दांनी प्रभावी संपर्क साधणे व त्यांच्या दैनंदिन गोष्टींत रस घेऊन त्यांच्या वासना चाळविणे, हवीहवीशी भावना जागृत करून त्यांना स्वप्‍नाळू अवस्थेत आणून सोडणे, हे आहे.

भित्तिपत्रकाचा हेतू सार्वजनिक प्रदर्शन हा असतो व स्वरूप लक्षवेधक असते. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात एक दृक् साधन म्हणून व साहित्य क्षेत्रात लक्षवेधक नावीन्य म्हणून भित्तिपत्रकांचा उपयोग केला जातो. भित्तिपत्रककाव्य (पोस्टर पोएट्री) हा प्रकार या दृष्टीने उल्लेखनीय ठरतो. शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्र राज्य बालविकास समितीद्वारा ग्रामीण भागातील बालवाड्यांतून बालवाचकांसाठी शैक्षणिक स्वरूपाची भित्तिपत्रके प्रदर्शित करण्यात येतात. ठळक मोठी अक्षरे व वेधक चित्रे अशा भित्तिपत्रकांतून आढळतात.

संदर्भ : 1. Herdeg, Walter, Graphis Posters : Annual of Poster Art, Zurich, 1971-72.

2. Muller-Brockman, y3wuoef & Shizuko, History of the Poster, Zurich, 1971.

3. Rege, G. M. Advertising Arts and Ideas, Bombay, 1972.

४. रेगे, ग. मं. दृक्प्रसारणाचे विश्व, मुंबई, १९८३.

लेखिका : शं. ह. मुळीक

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate