অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मंदिर-वास्तुकला

प्रस्तावना

‘मूळ मंदिर’ (संस्कृत) या संज्ञेचा अर्थ घर. मराठीत तो देवालय असाही होतो. मानवी जीवनाचे नियंत्रण करणाऱ्या, त्याच्यावर कमीअधिक प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या अतिमानवी शक्ती म्हणजेच देवदेवता, अशा प्रकारची श्रद्धा जगातील अनेक समाजांत आढळते. या देवदेवतांचे प्रतीकरूपाने अथवा मूर्तींच्या रूपाने भाविकास दर्शन घडवणारे स्थळ म्हणजे मंदिर होय. मंदिरात दैवी शक्ती व सामर्थ्य यांचा प्रत्यय येतो, अशी सर्वसामान्य श्रद्धा असते. अतिप्राचीन काळापासून जगात सर्वत्र मंदिरे बांधलेली दिसतात. मात्र त्यांच्या स्वरूपात फार मोठे वैविध्य आढळते.

मंदिराचे स्वरूप अनेक गोष्टींवरून ठरत आले आहे.

(१) पूजनीय व उपास्य वस्तूचे स्वरूप

(२) पूजेचे व उपासनेचे विधी व उपचार

(३) जिथे मंदिर उभारले जाते त्या प्रदेशात प्रचलित असणारी वास्तुशिल्प-परंपरा.

मानवाने कोणकोणत्या गोष्टी पूजनीय वा उपास्य मानल्या , ह्यांचा आढावा घेतल्यास काही ठळक प्रकार ध्यानात येतात. पहिला म्हणजे निसर्ग. त्यात सूर्य, चंद्र, पर्जन्य, नद्या, वृक्ष, गिरिगव्हरे, शिखरे या सगळ्यांचा समावेश करता येईल. दुसरा प्रकार म्हणजे स्थूलमानाने ज्याला पितरपूजेचा म्हणता येईल असा. त्यामध्ये प्रत्यक्ष वाडवडील, थोर पुरूष, राजे-राण्या, धर्मोपदेशक अशा सर्वांचा समावेश होतो. त्यांच्या प्रेतांची, शारीर-अवशेषांची, भिक्षापात्रासारख्या संबंधित वस्तूंची वा केवळ स्मृतीची पूजा व उपासना केली जाते. तिसरा प्रकार क्षुद्र देवतांचा. डोळ्यांना न दिसणाऱ्या पण परिणाम सतत जाणवत राहतात अशा, देवीच्या रोगराईसारख्या अतिमानवी शक्तींना दैवी स्थान देण्यात आले. सृष्टिक्रमाचा-म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय या चक्राचा-काही अर्थ शोधण्याचे, तत्त्वचिंतनाचे प्रयत्न ही सगळ्यात शेवटची पायरी. त्यातून एकच सर्वश्रेष्ठ परमेश्वर आणि मग त्याचे दूत, अनुचर आणि अवतार किंवा अंशावतार अशा मालिका तयार होतात. या सर्वांची मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही रूपांत पूजा व उपासना होते.

पूजेच्या आणि उपासनेच्या पद्धती

पूजेच्या आणि उपासनेच्या पद्धतीही जगभर साधारण सारख्याच आढळतात. त्यांचा मुख्य उद्देश देवतेला प्रसन्न करून घेणे, हा असतो. त्यासाठी देवतेची स्तुती करणे म्हणजे स्तोत्रे म्हणणे, तिची प्रार्थना करणे, करूणा भाकणे, प्रत्यक्ष किंवा यज्ञयागांच्या म्हणजे अग्नीच्या द्वारे बळी, नैवेद्य अर्पण करणे आणि शेवटी फुले, सुवासिक द्रव्ये यांनी पूजा करणे ही याची ठळक अंगे होत. हे पूजन वा उपासना, वैयक्तिक व सामूहिक अशा दोन्ही प्रकारचे असते. त्यात बहुधा पुरोहिताला स्थान मिळालेले असते. पूजापद्धतीचा विस्तार होऊन पूजन, नैवेद्य यांच्या जोडीला नृत्य, गायन ह्या गोष्टी आल्या. देवाचे स्नान, भोग, सोहळे आले. हे सर्व विधी सहजतेने करता येतील अशाच वास्तुविधानाची मंदिरे उभी राहिली; किंवा त्यांना अनुसरून विधानात भर पडत गेली. पुढे मंदिर म्हणजे विश्वाची प्रतिकृतीच आहे, अशी श्रद्धा रूढ झाली आणि विश्वविषयीच्या माणसाच्या कल्पना मंदिराच्या वास्तूंत, मूर्तिकामात दिसू लागल्या. मंदिराच्या आखणीत अष्टदिक्पाल तसेच नवग्रह यांना स्थान मिळाले, यावरून या गोष्टीची कल्पना येईल.

कालांतराने मंदिर ही केवळ धार्मिक वास्तू राहिली नाही. मंदिराला जोडून मठ आले, पाठशाळा आल्या आणि ग्रंथांची भांडार आली, तसेच धर्मशाळाही आल्या. मंदिर हे जसे तत्त्वचिंतनाचे, उपासनेचे, अध्ययनाचे स्थान झाले, तसेच ते त्या त्या ठिकाणच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे केंद्रही बनले. ग्रामसभा, न्यायसभा इ. तेथे होऊ लागल्या. मंदिर ही एक सामाजिक संस्था झाली. तिचा व्यावहारिक, आर्थिक आधार मात्र दानधर्माच्या स्वरूपाचा-म्हणजे राजेरजवाडे, व्यापारी व इतर धनिक मंडळींनी दिलेली दाने, जमिनींची इनामे-हाच राहिला. बहुतेक देवालयांचे बांधकाम एखाद्या राजाने करून घेतले आहे, तर जीर्णोद्धार सामूहिक दानधर्मातून झालेला आहे, असे दिसून येते.

वरील उद्देशांना अनुसरून जी मंदिरे आजतागायत उभारण्यात आली, त्यांचे काही ठळक प्रकार सांगता येतील. पहिला प्रकार पितरपूजेतून उदभवणारा, स्मृतिमंदिरांचा. ईजिप्तमधील पिरॅमिड, पितर-मंदिरे, प्राचीन भारतातील स्तूप किंवा नंतरच्या काळातील समाध्या, छत्र्या इ. या वर्गात मोडतील. दुसरा प्रकार म्हणजे प्रार्थनामंदिरांचा. ज्या ठिकाणी सामान्यतः सामुदायिक प्रार्थना होते, अशा वास्तू या प्रकारात मोडतात. या प्रकारामध्ये दैवी शक्तीचा वास बहुधा प्रतीकरूपाने सूचित करतात. या प्रकारामध्ये बौद्धांचे चैत्य, ख्रिस्ती लोकांचे चर्च, मुसलमानांच्या मशिदी इ. वास्तू येतात. तिसरा प्रकार म्हणजे ज्याला प्रत्यक्ष देवालय म्हणजे देवाचे घर म्हणता येईल, अशा वास्तू. यात देवतेची मूर्ती स्थापन केलेली असते. अशी मंदिरे जगभर सर्वत्र सापडतात.

अतिप्राचीन म्हणजे प्रागैतिहासिक काळापासूनच्या देवता-मूर्ती आता उपलब्ध झाल्या आहेत. या बव्हंशी मातृदेवतेच्या आहेत .त्या मातीच्या वा क्वचित दगडी आहेत. त्यांची पूजा घराच्याच एखाद्या कोपऱ्यात किंवा भागात होत असे. त्यांचे स्वतंत्र मंदिर असे आढळून येत नाही.

प्राचीन ईजिप्तमध्ये मंदिरांचे प्रकार

प्राचीन ईजिप्तमध्ये मंदिरांचे सर्व प्रकार दृष्टीस पडतात. राजांची स्मारके म्हणून दगडाच्या कृत्रिम टेकड्या म्हणजे पिरॅमिड तयार करीत व त्याच्याखाली राजाची दफन-पेटी असे. त्याभोवती परलोक-प्रवासाला आवश्यक अशा वस्तू असत. यापुढची पायरी म्हणजे डोंगराच्या कपारीत मृत राजाचे वा राणीचे मंदिर बांधणे. हॅटशेपसूट या साम्राज्ञीचे देऊळ डेर-एल्-बाहरी (इ. स. पू. १५२०) येथे असून, तो पितरमंदिराचा उत्तम नमुना मानता येईल. मुख्य गाभाऱ्यात राणीचा पुतळा, डाव्या हाताला शवपेटिकेची खोली, त्याच्या समोर बलिदानाचे दालन असे तीन भागांचे विधान तीनही डोंगरांत कोरलेले आढळते. त्याच्या समोर प्रचंड आकारच्या खांबांचे मोठाले मांडव उभारलेलेहोते. तसेच डोंगराच्या दर्शनी भागावरही देवतेचा निवास दोन्हीकडे असावयाचा. उपचार वाढल्यावर मंदिराचे रूप कसे बदलते याचे हे उत्तम उदाहरण आहे.यापुढच्या काळात ईलम येथे बांधलेले  झिगुरात हे अरप्रमाणे अनेक टप्प्यांचे होते, मात्र त्याच्या बाजू उतरत्या नव्हत्या, तर सरळ होत्या (इ.स.पू. १३ वे शतक). शिवाय त्यामध्ये ठराविक अंतरावर प्रक्षेपही होते.

ग्रीकांनची मंदिरे

ग्रीकांनी आपल्या देवालयात इजीअन व मायसीनियन समाजांच्या परंपरा बऱ्याच प्रमाणात पुढे चालू ठेवल्या; मात्र देवालयाच्या वास्तूचा विशिष्ट घाट आता रूढ झाला. बाहेरच्या बाजूने पाहिले तर, ही इमारत आयताकार, चारी बाजूंनी भक्कम खांबांनी वेढलेली अशी दिसे. इमारतीचे छप्पर दोन्ही बाजूंस उतरते असून त्यामुळे चांदईच्या भिंतीच्या वरच्या बाजूला जे त्रिकोण तयार होत, त्यात हरतऱ्हेचे मूर्तिकाम केलेले असे. इमारतीत गेले म्हणजे खांबांची आणखी एक ओळ दिसे, त्याच्या आत गाभारा, गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला देवाचा खजिना किंवा भांडार आणि समोर मंडप असे. बलिदानासाठीचे स्थंडिल देवतेच्या अगदी समोर, मुख्य वास्तूच्या बाहेरच्या बाजूला असे. देवालयाचा आकार वाढल्यावर आतल्या बाजूला असणाऱ्या ओळीत एकावर एक दोन खांब बसवीत. झ्यूसच्या प्रसिद्ध देवालयात (इ.स.पू. ४६०) या ठिकाणी वरच्या बाजूला लहान खांब बसविण्याऐवजी भारवाहक यक्षांच्या मूर्ती बसविल्या होत्या. अथेन्सच्या इरेक्थीयम (इ.स.पू.सु. ४२१-४०६) मंदिराची मांडणी थोडी निराळी होती. आयताकार गाभाऱ्याभोवती खांबांच्या ओळींऐवजी भिंत होती व समोरच्या बाजूला खुला प्रवेशमंडप होता. या मंडपाच्या खांबांच्या जागी अतिशय सुरेख अशा स्त्रीमूर्ती बसविलेल्या होत्या. पण सामान्यपणे देवालयाची मांडणी आधीच्या (इ.स.पू.सू. ४४७) प्रकारचीच होती. अथेन्स येथील सुप्रसिद्ध पार्थनॉन झ्यूसच्याच घाटाचे आहे.

रोमन मंदिरे

रोमन मंदिरे बव्हंशी ग्रीक मंदिरांसारखीच असत. मात्र ग्रीक मंदिरात मुख्य देवता कधी एका टोकाला, तर कधी मध्यभागी बसवीत. त्याऐवजी आता मूर्ती ही एका बाजूच्या गाभाऱ्यातच बसवण्याची पद्धती स्वीकारण्यात आली. मंदिराचे बाह्य स्वरूप हे त्यातील खांबांचे व स्तंभशीर्षांचे रूप वगळता ग्रीक मंदिरासारखेच राहिले. व्हेस्टा हे अग्निदेवतेचे मंदिर (इ.स.२०५) मात्र सर्वस्वी भिन्न होते. या पद्धतीची आणखीही काही देवालये आढळतात. या मंदिराचा आराखडा गोलाकार होता. मध्यभागी अग्निकुंड व त्याभोवती गोलाकार भिंत, माथ्यावर घुमटाकार छप्पर व त्यात मध्यभागी चिमणी असे. या गोल दालनाला तीन बाजूंनी, गोलाकार विधानावरच उभारलेली स्तंभांची रांग होती. एका बाजूला मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांचा घाट होता. अगदी साध्या अशा गोलाकार झोपडीचीच ही खूप सुधारित आवृत्ती आहे, हे सहज ध्यानात येते. भारतातील अत्यंत प्राचीन असे काही चैत्य याच घाटाचे होते व त्यांची उभारणी अशा प्राथमिक नमुन्यावरूनच केलेली होती, त्याचा येथे मुद्दाम उल्लेख करावयास हवा.

पश्चिम आशियामधील प्रार्थनामंदिरे

पश्चिम आशियामध्ये इस्लामच्या उदयापूर्वी अनेक मूर्तिपूजक समाज अस्तित्वात होते. त्यांची मंदिरे कशा प्रकारची होती, याची कल्पना आता येऊ शकत नाही. कारण ती आता नामशेष झाली आहेत. इराणमध्ये जरथुश्त्राचा सूर्य व अग्नी यांची पूजा व उपासना करणारा पारशी धर्म कित्येक शतके प्रचलित होता, परंतु त्या अग्यारीचे (अग्निमंदिराचे) स्वरूपही आता केवळ तर्कानेच जाणीव लागते व तो तर्क भारतातील पारशी समाजाच्या अग्निमंदिरांवरूनच करावा लागतो. सतत अग्नी प्रज्वलित असणारी खोली व समोर एखादे दालन वा मंडप असे त्याचे स्वरूप असावे. यापैकी काही भागांत-विशेषतः पॅलेस्टाइन, सिरिया इ. भागांत-ख्रिस्ती धर्माचाही प्रसारझालेला होता व या धर्माच्या प्रथेला अनुसरून प्रार्थनामंदिरेही उभारण्यात आलेली होती. चर्च म्हणजे सामुदायिक प्रार्थनेचा मंडप होय. तो मोठा जनसमूह सामावून घेण्याच्या दृष्टीने बांधलेला आढळून येतो. हा मंडप लंबचौकोनी असून त्याच्या एका टोकाला व्यासपीठ असते. क्वचित हा भाग अर्धवर्तुळाकार करतात आणि त्याच्या डाव्या व उजव्या बाजूंना खोल्या असल्यामुळे चर्चचे वास्तुविधान हे क्रॉससारखे किंवा इंग्रजी ‘टी’ या अक्षरासारखे दिसते. रोमन वास्तुशिल्पाच्याच परंपरेत ही वास्तू निर्माण झाल्याने सर्व बांधकाम हे कमानी, घुमट आणि गजपृष्ठाकार छप्पर यांनी युक्त असे. बाहेरच्या बाजूने छपरे खूपच उतरतो ठेवलेली असत. चर्चच्या मंडपाला जोडूनच एक उंच मनोरा बांधत आणि त्यावर घंटा टांगलेली असे. प्रार्थनेची वेळ झाल्याची लोकांना सूचना देण्यासाठी ही घंटा वाजविण्यात येई. पुढे इमारतीचा आकार वाढला, कमानींना धीरे देण्याची जरूर उत्पन्न झाली, तेही ठराविक अंतरावर व ठराविक आकाराचे बांधून वास्तू अधिक बळकट असल्याचा भास निर्माण करता येई. मनोऱ्यांना खूपच उंच अशी शंकूसारखी छपरे बसवीत. कमानी, शिखरे, घुमट ही सगळी वास्तूच्या रचनेची साधने असत; पण त्यांचा सजावटीसाठीही उपयोग होत असे. वास्तूच्या सौंदर्यात भर घालण्यासाठीही तसेच धार्मिक वातावरणनिर्मितीच्या हेतूने छतावर व भिंतींच्या वरच्या भागावर ख्रिस्तजीवनातील विविध प्रसंग रंगवीत असत. मायकेलअँजेलोसारख्या जगप्रसिद्ध चित्रकाराची बहुतेक चित्रनिर्मिती चर्चवास्तूंमध्ये झालेली आहे, हे पाहिले म्हणजे चर्चच्या वास्तूमध्ये चित्रकलेला केवढे स्थान होते, ध्यानात येते. त्यातील खिडक्यांना रंगीत काचा वापरीत आणि त्यात हरतऱ्हेचे भौमितिक आकृतिबंध तसेच ख्रिस्ती पुराणातील चित्रे तयार करीत यूरोप व तुर्कस्तान (बायझंटिन) भागात स्थलकालनिदर्शक वैशिष्ट्यांनी युक्त अशा शेकडो चर्चवास्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांचा मूळ आराखडा मात्र एकसारखा टिकून राहिला आहे, हे विशेष.

मशीद

मशीद हे मुस्लिमांचे प्रार्थनामंदिर होय. बऱ्याच लोकांना एकाच वेळी मक्केकडे तोंड करून प्रार्थना करता यावी, हा या वास्तुनिर्मितीमागील प्राथमिक उद्देश असावा. मक्केची दिशा दाखविणारा ‘मिहराब’ हा कोनाडा, त्याशेजारी ‘मिंबर’ किंवा व्यासपीठ व त्यासमोर उपासकांना सामावून घेणारे लहानमोठे मंडप हे मशिदीचे मुख्य वास्तुघटक होत. मशिदीचा केंद्रबिंदू ध्यानात येण्यासाठी मिहराबीच्या शिरोभागी मोठा घुमट बांधण्यात येऊ लागला, तसेच उपासकांना हाकारा (बांग) देण्यासाठी मनोरेही बांधण्यात येऊ लागले. त्यासमोर मोकळे आवार व त्याभोवती धर्मशाळेसारख्या ओवऱ्या असत. पुढेपुढे राजघराण्यातील व्यक्तींसाठी खास दालन राखून ठेवण्यात येऊ लागले, तर काही ठिकाणी पोटमाळ्यासारखा मजला काढून त्यांची सोय करण्यात आली. समोर मोठाल्या कमानी, मुखदर्शनाच्या दोहो बाजूंस उंचच उंच मनोरे व मध्यभागी डौलदार घुमट व मशिदीचे वास्तुरूप पुढे कायम झाले. आतल्या बाजूला छतावर चुन्यात केलेले उठावाचे नक्षीकाम, भिंतीवरील जाळ्या व विशेषतः इराणमध्ये रंगीत झिलईच्या कौलांचे आच्छादन वास्तूच्या अलंकरणासाठी वापरण्यात येऊ लागले.

भारतीय धार्मिक वास्तू

भारतात सुरूवातीच्या काळात प्राधान्याने स्तूपरचना आढळतात. मृताच्या अवशेषावरील दगडामातीच्या ढिगाऱ्याला घुमटाकार देऊन स्तूपाची कल्पना प्रथम साकार करण्यात आली. त्यावर रंगकाम व मूर्तिकाम करण्यात आले. भोवती वेदिका व तोरणे उभारण्यात आली. भारहूत, सांची येथील मूर्तिकामात स्तूपांच्या प्रतिकृती रेखाटलेल्या आहेत. गांधार देशात व पुढे मध्य देशात, स्तूपांच्या बैठकीचा आकार मोठा करण्यात आला, तो अनेकमजलीझाला व घुमट लहान होत गेला. खालच्या मजल्यावरील कोनाड्यात व चौकटीत बुद्धमूर्ती बसविण्यात येऊ लागल्या. स्तूपांच्या लहान प्रतिकृती बांधून त्याभोवती मंदिरे म्हणजे चैत्य बांधण्यास इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून प्रारंभ झाला. हे चैत्य सुरूवातीला वर्तुळाकार विधानाचे होते. पुढे यांनाच एक आयताकार मंडप जोडून चापाकार विधानाचे चैत्य तयार झाले. भाजे, कार्ले येथील गिरिशिल्पांत हेच चैत्य दिसतात. अर्धवर्तुळाकार चैत्य-तोरण हे या वास्तूचे ठळक वैशिष्ट्य. बुद्धमूर्तीची पूजाअर्चा सुरू झाल्यावर मूर्तीसाठी गाभारा, समोर अंतराळ व मंडप अशी वास्तुयोजना प्रचलित झाली. अजिंठ्याची महायान शैलमंदिरे याच घाटाची आहेत. पहिल्यापासूनच बौद्धांच्या मंदिरांच्या अलंकरणासाठी मूर्तिकामाचा व चित्रकामाचा मुक्तहस्ताने उपयोग करण्यात आला.

हिंदू आणि जैन मंदिरे बौद्ध वास्तु

हिंदू आणि जैन मंदिरे बौद्ध वास्तुपरंपराच बऱ्याच प्रमाणात पुढे चालवितात. आज उपलब्ध असणारे सर्वांत प्राचीन मंदिर गुप्त काळातील (४ थे शतक) आहे. चौरस गाभारा व समोर आयताकार प्रवेशमंडप एवढेच त्याचे भाग आहेत. खांब नक्षीदार आहेत, द्वारशाखेवरही कोरीवकाम आहे. छप्पर प्रथम सपाट असावे; पण पुढे कालांतराने त्यात बदल झाले. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ व समोर मोठा मंडप आला. मंडपाचे छप्पर सपाट, भोवतीच्या ओवऱ्यांचे उतरते असे; मात्र आता गाभाऱ्यावर शिखर आले. एकावर एक मजल्यांचे, सगळ्यात वर कळस असे त्याचे स्वरूप होते. गाभाऱ्याच्या आणि मंडपाच्या मधला भाग म्हणजे अंतराळ व त्यावर ‘शुकनास’ हे गजपृष्ठ पद्धतीचे छप्पर असे. चौकोनी मंडप बाधू लागल्यावर कोनाकार, शंकूसारखी छपरे बसविण्यात येऊ लागली. या छपरांची उंची अशा क्रमाने लावलेली असे, की गाभाऱ्यापासून लांब जाणाऱ्या मंडपाच्या छपराची उंची कमीकमी होत जावी. याउलट दक्षिणेतील मंदिरांच्या मंडपांचे छप्पर मात्र सामान्यपणे सपाट असल्याचे दिसून येते. उत्तर भारतातील मंदिरात भोगमंडप, नृत्यमंडप असे अनेक मंडप एका रेषेत गाभाऱ्यासमोर बांधण्यात येऊ लागले. दाक्षिणात्य मंदिरात, कल्याणमंडपासारखे प्रशस्त मंडप, मुख्य वास्तूच्या प्राकारातच पण तीपासून अलग असे बांधण्यात येत. शिवाय स्नानादी विधींसाठी मोठाली कुंडेही प्राकारातच बांधीत. या प्राकाराभोवती मोठा तट बांधून चारी दिशांच्या भिंतींत प्रवेशद्वारे व मोठाली  गोपुरे असत. बाराव्या-तेराव्या शतकांपासून एकाभोवती एक असे अनेक प्राकार बांधण्याची पद्धत पडली. प्रत्येक प्राकाराला गोपुरे असतच व मंदिरापासून जितका दूरचा प्राकार तितकी त्यावरील गोपुरे मोठी बांधली जात.

मंदिराची वास्तू

खुद्द मंदिराची वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहे. भिंतीत उठावाचे पट्टे करून, तिची मांडणी करून, वा नक्षत्राकृती विधानावर गाभारा बांधून भिंतीचे अनेक तुकडे तयार करीत. या प्रत्येकावर देवदेवता, यक्ष, सुरसुंदरी, व्याल यांच्या मूर्ती बसवत. आतील बाजूला बऱ्याच ठिकाणी-विशेषतः दक्षिण भारतात-सर्वत्रच रंगकाम करून वास्तूची शोभा वाढवीत. ही चित्रे स्वाभाविकपणेच पौराणिक असत. याशिवाय मंडपाच्या छतावरही कथनशिल्पे अथवा देवदेवतांच्या मूर्ती घडवीत. मंदिराच्या वास्तूचे व मूर्तिकामाचे आयोजन कोणच्या उद्दिष्टीने केले आहे हे बघितले तर, शिल्पकाराच्या डोळ्यासमोर सलग व लालित्यपूर्ण रेषांनी बांधलेला छायाप्रकाशाचा खेळ होता, हे सहज समजते.

प्राचीन वास्तुशास्त्र

आठव्या-नवव्या शतकांपासून तेराव्या शतकापर्यंत भारतात शेकडो मंदिरे बांधण्यात आली. स्वाभाविकपणेच त्यात स्थलकालानुरूप काही वैशिष्ट्ये दिसून येतात. प्राचीन वास्तुशास्त्रानुसार मंदिरशैलीच्या ‘नागर’ (उत्तर भारतीय) आणि ‘द्राविड’ (दक्षिण भारतीय) अशा दोन प्रमुख परंपरा मानल्या जातात. त्याशिवाय ’वेसर’ नावाची आणखी एक उपशैलीही उल्लेखिलेली आहे; पण तिची लक्षणे कोणतीव ती कोणत्या प्रदेशाची हे सहजतेने समजत नाही. काही अभ्यासकांच्या मताने होयसळ मंदिरे वेसर शैलीची आहेत. पण हे एक मत आहे, प्रस्थापित सिद्धांत नव्हे.

बौद्ध धर्माचा प्रसार

बौद्ध धर्माचा प्रसार मध्य आशिया, चीन, जपान, आग्नेय आशिया या सगळ्या भागांत झाला आणि तेथेही स्तूप आणि बौद्ध मंदिरे मोठ्या संख्येने उभी राहिली. बौद्ध मंदिरे उभी राहिली ती प्रासादाच्या धर्तीवरः मध्यभागी गाभारा, मध्ये मोकळी जागा, भोवती अनेक दालने, विस्तीर्ण प्राकार, प्रवेशद्वारावर तोरणे वा गोपुरे ही त्याची वैशिष्ट्ये. मंदिराचे छप्पर विशेष उल्लेखनीय म्हणता येईल. छत्रावलीसारखी एकावर एक अनेक छपरे बसविलेली आहेत. इमारती विटांच्या असत, पण त्यात लाकूडकामाचा वापर मोठा केलेला असे. त्यावर चित्रविचित्र नक्षीकाम व चित्रकाम केलेले आढळून येते. सयाममधील दगडी देवळांवर मूर्तीही घडवल्या आहेत. जावा बेटावरील स्तूप व मंदिरे थोड्या निराळ्या प्रकारची आहेत. येथे स्तूप म्हणजे झिगुरातसारख्या पायऱ्यापायऱ्यांचा केलेला असे. ती एखाद्या डोंगराचीच प्रतिकृती भासते. बौद्ध व हिंदू धर्म येथे येण्यापूर्वी जावा बेटावरील लोक पर्वतपूजक होते व तोच घाट त्यांनी स्तूपासाठी वापरला. बोरोबूदूर इथला स्तूप ४८० फुट (१४६.३० मी.) चौरस आहे, एकावर एक सहा मजले (पायऱ्या) असून सगळ्यात वरच्या माथ्यावर ५२ फुट (१५.८५ मी.) व्यासाचा स्तूप आहे. त्याच्या प्रत्येक टप्प्यावर चारी दिशांकडे तोंड करून बुद्धमूर्ती बसविल्या आहेत (इ.स. नववे शतक).

डोंगराची प्रतिकृती मंदिरासाठी वापरण्याची कल्पना केवळ जावातच होती, असे नाही. बॅबिलनचे झिगुरात या कल्पनेचेच आविष्कार होत, तर पॅसिफिक महासागरापलीकडील अमेरिकेच्या मध्य व दक्षिण भागात इंका, माया यांसारख्या समाजांनी हीच कल्पना प्रत्यक्षात उतरवली होती आणि तीही इ. स. नवव्या शतकाच्या आसपासच. जावा व माया यांचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी, काही विचार आणि कल्पना सर्वंकष असाव्यात हे दिसते. कोपन, तीकाल येथे टप्प्यांनी बांधलेल्या टेकड्या व त्यांच्या माथ्यावर मंदिरे यांचे अवशेष मिळाले आहेत. या बांधकामात ग्रहनक्षत्रांच्या स्थानाकडे विशेष लक्ष दिलेले होते. अर्थात मंदिरे होती देवदेवतांचीच.

मंदिर म्हणजे देवतेच्या दर्शानाचे, पूजेचे, उपासनेचे स्थान. त्याचे वास्तुरूप आविष्कार या देवदेवतांइतकेच विविध व वैचित्र्यपूर्ण आहेत. परंतु सर्व वास्तूंमध्ये दोनतीन गोष्टी समान दिसतात. उपास्य दैवत व उपासक यांना जास्तीत जास्त जवळ आणले आहे आणि उपासनेला इतरांचा उपसर्ग पोहोचू नये, अशी खबरदारी घेण्यात आली आहे.

लेखक : म. श्री. माटे

माहिती स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate