অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मलमल

प्रस्तावना

परंपरागत सुविख्यात भारतीय वस्त्रप्रकार. अतिशय तलम आणि मुलायम पोत हे मलमलीचे वैशिष्ट्य होय. संस्कृत बौद्ध साहित्यात मलमलीसाठी ‘विरली’ शब्द आला असून त्याकाळी जामदानी कलाकाम युक्त विरलीसाठी ‘चित्रा’ नाव रूढ होते.गुप्तकाळातही मलमलीचा वापर विशेषत्वाने करण्यात येई. त्याकाळातील अतितलम मलमल ‘पेलवांकुश’ यी नावाने प्रसिद्ध होती. मलमलीसाठी लागणारा कापूस भारतातच पिकत असे. इ.स. पहिल्या शतकात रोमकडे मलमलीची निर्यात होई आणि ती अतिशय महाग असे, हे प्लिनीच्या उल्लेखावरून दिसते.

डाक्का (ढाका) मलमलीचा नमुना, १९ वे शतक.डाक्का (ढाका) मलमलीचा नमुना, १९ वे शतक.भारताच्या पूर्व किनाऱ्‍यावरील पांड्य राज्याच्या सीमेलगतच्या प्रदेशातील कुशल विणकरांनी निर्मिलेली मलमल तमिळ लोकांना अतिशय प्रिय होती. त्याकाळी कलिंग देशीचे नाग लोक वस्त्रनिर्माणकलेत बरेच कुशल होते; त्यामुळेच तमिळ भाषेमध्ये उत्कृष्ट प्रतीच्या वस्त्राला ‘कलिंग’ या देशवाचक नावाने संबोधीत, रोममध्ये या मलमलीला विशेष मागणी असे. तिच्यापासून प्राप्तीही खूप होई. पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या ग्रंथानुसार (इ.स. पहिले शतक) ‘मोनाचे’ ही उत्कृष्ट प्रतीची व ‘सगमतोगेने’ ही निम्न प्रतीची मलमल होय. दुसरी पासून खोळी तयार करण्यात येत व गुजरातमधून त्या निर्यात होत. यांखेरीज इतरही प्रदेशांतील मलमल परदेशी निर्यात होई. तिची प्रदेशपरत्वे नावेही वेगवेगळी असत. उदा., त्रिचनापल्ली व तंजावरची ‘अर्गरतिक’, मच्छलीपटनम्‌ची ‘मसलिया’ व ढाक्याची (डाक्का-सध्या बांगला देशात) ‘गँगेटिक’ इत्यादी. शिवाय सर्वोत्कृष्ट भारतीय मलमलसाठी रोमन लोक ‘विंड्सटेक्स्टाइल’ म्हणजे ‘हवासदृश वस्त्र’ व ‘नेब्युला’ म्हणजे ‘अक्षपटल’ अशीही नावे वापरीत असत.

भारतीय मलमलीचे प्रकार

भारतीय मलमलीची ही परंपरा मध्ययुगीन काळातही टिकून होती. विशेषतः मोगलांच्या कारकीर्दीत तिला अधिकच चालना मिळाली. ढाका व ढाक्याच्या पंचक्रोशीतील मलमल त्या काळातही दर्जेदार ठरली. तिच्याविषयीच्या अनेक आख्यायिकाही रूढ आहेत. त्याकाळी मलमलीच्या तलमपणावरून तिला अनेक काव्यरूप नावे पडली होती. उदा., ‘शबनम’ म्हणजे सांध्यतुषार. तिला ओला पदर हिरवळीवर टाकला, तरी तो डोळ्यांना दिसू नये, हे या शबनमचे वैशिष्ट्य होते. शबनमप्रमाणेच आब-ए-रवाँ (जलौघ), ‘शरबती’ (रसमधुर), ‘सौगाती’ (उपायन) आणि ‘बाफ्त हवा’ (विणलेली हवा). मलमलीचे हे प्रकार सांप्रत इतिहासजमा झाले असले, तरी जामदानी, दोरिया, पट्टी इ. प्रकारच्या मलमलीसाठी डाक्क्याची प्रसिद्धी अजूनही टिकून आहे.

लखनौचे मलमली

डाक्क्याप्रमाणेच लखनौ, वाराणसी, रामपूर, हैदराबाद, नागपूर, जयपूर, म्हैसूर, कोटा, ग्वाल्हेर, अरणी, इंदूर, नेल्लोर, मदुराई व तंजावर येथील मलमलीची निर्मितिपरंपराही पूर्वापार आहे. त्यांपैकी ग्वाल्हेर, हैदराबाद आणि नागपूर ही ठिकाणे प्रायः दोरिया व पट्टी मलमलीसाठी ; तर नेल्लोरची प्रसिद्धी ‘चारखणा’ मलमलीकरिता आहे. काही ठिकाणी मलमलीवर पातळ व नाजूक फुलेही उठविण्यात येतात. ही फुले मुलायम पोतावर इतस्ततः विखुरलेली असल्यामुळे असल्यामुळे मलमलीची शोभा वृद्धिंगत करतात आणि पाहणाराला ती प्रसन्न व आल्हाददायक करून सोडते. याखेरीज कलकत्ता-लखनौची ‘चिकनकारी’ आणि तिरूचिरापल्ली येथील ‘छपाई’ तसेच सुरत, जयपूर, हैदराबाद व डाक्का या ठिकाणाचे मलमलीवरील जरीकाम विख्यात आहे. विशेषतः मलमली टोप्यांवरील जरीकामासाठी लखनौ, वाराणसी व आग्रा या गावांची पूर्वीपासूनची प्रसिद्धी आहे. लखनौचे मलमलीवरील बादलाकाम (चपट्या तारांचा कशिदा) परंपरागत असून त्याची तेथे ‘कामदानी’ या नावाने प्रसिद्धी आहे. मलमलीवरील अशाच कलाबतूच्या कामाला ‘जरदोज’ म्हणतात. लखनौचे मलमली अंगरखे याच ‘जरदोज’ कामाने तयार करण्याची प्रथा आढळते.

स्वातंत्र्यपूर्वकाळातील मलमलनिर्मिती

स्वातंत्र्यपूर्वकाळात सिकंदराबाद येथेही मलमलनिर्मिती होई. त्यापासून प्रायः जरीकाठी फेटे, रूमाल, दुपटे व ओढण्या तयार करण्यात येत. त्यांना त्याकाळी मागणीही खूप असे. त्याचप्रमाणे आझमगढ जिल्ह्यातील महू येथे तयार होणारी मलमल साधी तसेच चट्‌ट्या पट्‌ट्यांची असे. पूर्वीच्या काळी तिची निर्यात नेपाळात होई; तर महंमदनगर व लखनौची साधी, चट्‌ट्यापट्‌ट्यांची, कोरी व धुवट अशा मलमलीचा वापर यूरोपीय देशांत करण्यात येई. साध्या मलमलीला ‘अद्धी’व ‘तंडरम्‌’ आणि चट्‌ट्यापट्‌ट्यांच्या मलमलीला ‘दोरिया’ अशी नावे रूढ होती. दमास्कस पद्धतीची मलमलही रायबरेली जिल्ह्यातील जैस या गावी होई. ती ‘ढाक्का मलमली’ च्या तोडीची असून तिचा वापर टोप्या तयार करण्याकडे होई. अवध (अयोध्या) राज्य संपुष्टात आल्यावर तिचा वापरही कमी पडला. टांडा (फैजाबाद जिल्हा) येथील आकर्षक मलमलीला ‘खेस’ म्हणत. हिच्या पोतामध्ये जरीचा धागा वापरण्यात येई. कलकत्त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात तिला सुवर्णपदक प्राप्त झाले होते.

पंजाबमधील मलमल

पंजाबमधील मलमल चिनी कापसाच्या धाग्यापासून बनविण्यात येई व त्यासाठी त्याकाळी २ लाख किंमतीच्या कापसाची दरवर्षी आयात होई. या मलमलीपासून फेटे तयार होत. त्यांचे निर्मिती प्रमाणही बरेच असे; त्याचप्रमाणे उन्हाळी अंगरख्यासाठी येथील ‘तनजेब’ नामक मलमलीचा वापर करण्यात येई; परंतु पुढे विदेशी मालाच्या प्रसारामुळे त्याची पीछेहाट झाली. मध्य प्रदेशातील चंदेरी येथे देखील उत्कृष्ट मलमलीची निर्मिती होई. ती अतिशयच पांढरी शुभ्र असून तिचे काठ रेशमी वा जरतारी असत. काठांचे रंग पोताच्या रंगापेक्षा वेगळे राखत. इंदूरची मलमलही अशीच असे. तिच्या पोताचे रंग अतिशयच लोकप्रिय ठरले होते. देवास संस्थानची मलमल प्रायः फेटे. धोतरे व स्त्रियांच्या पोशाखासाठी वापरण्यात येई.

डाक्क्याची मलमल

डाक्क्याची मलमल कलेच्या दृष्टीने उच्च प्रतीची होती. तिचा पातळपणा वा तलमपणा हा त्या कारागिरांच्या कौशल्याचा व चिकाटीचाच द्योतक होता. २० यार्ड (सु. १८ मीटर) लांबीचे व १ यार्ड रूंदीचे (सु. ०.३० मीटर) हे मलमली वस्त्र एखाद्या साधारण व्यक्तीच्या अंगठीतून सहज आरपार काढले जाई. त्यातच त्याच्या कलागुणाची कसोटी असे. त्याकाळी उत्कृष्ट मलमलीसाठी इतरही काही कसोट्या लावण्यात येत. उदा., मलमली वस्त्राचे धागे व त्याचे आकारमान यांच्याशी त्याचे वचन संतुलित ठेवणे. १५ यार्ड (सु. १३ मीटर) लांब व १ यार्ड रूंद (०.३० मीटर) मलमली वस्त्राचे वजन त्याकाळी फक्त  ९०० गुंजा (सु. १०५ ग्रॅम) असून त्याचे मूल्यही साध्या मलमलीच्या चौपट असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अशा प्रकारच्या मलमलीची निर्मिती चालू असल्याचे दाखले सापडतात. सु. १० यार्ड (सु. ९ मीटर) लांब व १ यार्ड (०.३० मीटर) रूंद मलमली वस्त्र विणण्यासाठी साधारणतः पाच महिन्यांचा कालावधी लागे. शिवाय हे विणकाम फक्त पावसाळ्यातच होई. कारण या दिवसांतच हवेत आर्द्रता असल्यामुळे  धागा तुटत नसे. १८४० च्या सुमारास अशी एकूण ३६ प्रकारची विविध शैलीतील मलमल विणण्यात येत असल्याचे टेलर या पाश्चिमात्य गृहस्थाने नमूद करून ठेवले आहे; तर ‘आमची सर्व यंत्रे व साधने यांचा वापर करूनही आपण जी तलम वस्त्रे विणतो, ती डाक्क्याच्या ओबडधोबड हातमागाच्या साहाय्याने विणलेल्या ‘बाफ्त हवा’ या मलमलीच्या तोडीची ठरू शकत नाहीत’; असे उद्‌गार फॉर्ब्झ वॉटसन या गृहस्थाने आढळते.

परंपरागत चिकनकारी

लखनौ व उत्तर प्रदेशातील अन्य ठिकाणी चिकनकारीचे काम चालते. पांढऱ्‍या वस्त्रावर पांढऱ्‍या रेशमी धाग्याने केलेली लखनौची चिकनकारी म्हणजे सूक्ष्म भरतकामाचा एक उत्कृष्ट प्रकार आहे. याची परंपरादेखील भारतीय असून ती अत्यंत प्राचीन आहे. कनौजच्या हर्षवर्धन राजाच्या सुवर्णकालात (इ.स. ६०६−६४७) अशा स्वरूपाचे भरतकाम चालत असल्याचा उल्लेख मिळतो; तथापि या प्रकाराला मोगल काळात विशेषच चालना मिळाली. स्थानिक मलमलीचा अवलंब करून व त्यावर नाजूक चिकनकारीचे भरतकाम काढून त्याचा वापर वस्त्रभूषणे तयार करण्याकडे त्यांनी केला, असे म्हटले जाते.

चिकनकारीचे श्रेयही नूरजहाँलाच देण्यात येते. तुर्की भरतकाम शैलीवर आधारलेल्या या भरतकामाचे आकृतीबंध मात्र तिने स्वतःच निर्मिल्याचे सांगतात. चिकनकारीत रंगांचा वापर मुळीच करण्यात येऊ नये, असा संकेत आहे. केवळ पांढऱ्‍या शुभ्र रंगाचा वापर भरतकामातील सूक्ष्मता, आकृतिबंधातील नाजुकपणा आणि एकसारखेपणा यांमुळे हे भरतकाम मनाला मोहून टाकते.

नखावर जलदगतीने कातलेल्या मलमलीवर चिकनकारीचे दोन प्रमुख प्रकार मानतात. एक ‘कटाव’ म्हणजे कापकाम व दुसरे ‘बखिया’ म्हणजे बारीक व सूक्ष्म टीपकाम. कटाव प्रकारात कापकाम अर्थात तुकडेजोडकाम (प्लिक वर्क) व भरतकाम (एम्ब्रॉयडरी) यांचा कौशल्यपर्ण आणि वेधक मेळ असतो. तर बखिया प्रकार (बॅक स्टिच) अत्यंत गुंतागुंतीचा असतो. त्यामध्ये वस्त्राच्या पार्श्वभागी काळसर भागासाठी मुग्गा रेशीम व आकृतिबंधाच्या बाह्यरेपेसाठी उच्च प्रतीच्या पांढऱ्‍या रेशमी धाग्याचा वापर करतात; त्यामुळे सुलट बाजूने एखाद्या उत्थित (एम्बॉस्ड) शिल्पाचा आभास निर्माण होतो. याला छाया भरतकाम (शॅडो वर्क) असेही म्हणतात. खरी चिकनकारी ती हीच होय. यांशिवाय मुर्री वा मरोडी (नॉटेड), जाळी (नेटेड) व तेपची (स्टेम स्टिम) असेही प्रकार यात आहेत. जाळीचेही सिधुरी, मद्रास व कलकत्ता जाळी असे उपप्रकार पडतात.

चिकनकारीतील टाके साधे असून फुली टाक्याचा वापर प्रायः टाळण्यात येतो; तर आकृतीबंधांसाठी भौमितिक आकृत्या त्याज्य मानतात. दैंनंदिन जीवनातील वस्तू उदा., तांदूळ (अंगूरी बाले मुर्री) व ज्वारी (फदा) अशा धान्य पिकांच्या आकाराचाच वापर करण्याची  प्रथा आहे. साड्या, झब्बे, जॅकेट व टोप्या चिकनकारीने अलंकृत करण्यात येतात. चिकनकारीची निर्मिती स्त्री आणि पुरूष करीत असले, तरी मिळकतीसाठी पुरूषच हे काम करतात. चिकनकारीच्या एका साडीला रू.१५ पासून ५०० पर्यंत किंमत पडते. अलीकडे या हस्तोद्योगाला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश शासनाने लखनौ शहरी चिकनकारीची निर्मितीकेंद्रे उघडली आहेत.

लेखक : चंद्रहास जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate