অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाबलीपुर

महाबलीपुर

तमिळनाडू राज्याच्या चिंगलपुट जिल्हातील मंदिरवास्तु-शिल्पांसाठी जगप्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ. हेबंगालच्या उपसागरावर मद्रासच्या दक्षिणेस सु. ५७ किमी. व चिंगलपुटच्या पूर्वेस सु २५ किमी. अंतरावर वसले आहे. मामल्लपुरम् हे पल्लवांचे मोठे व भरभराटीस आलेले व्यापारी बंदर होते. पल्लव वंशातील पहिला नरसिंहवर्मा (कार. ६३०−६८) याच्या ‘महामल्ल’ वा ‘मामल्ल’ या बिरूदावरून या ठिकाणास मामल्लपुरम् (महाबलीपुर) हे नाव पडले असावे. पहिला महेंद्रवर्मा (कार. ५८०−६३०) व पहिला नरसिंहवर्मा या पल्लव राजांच्या कारकीर्दीत महाबलीपुर येथील शिल्पनिर्मिती झाली. येथे द्राविड वास्तु-शिल्पांचे अत्यंत प्राचीन असे आविष्कार दृष्टीस पडतात. त्यात ‘रथ’ नावाने प्रसिद्ध असणारी, एका पाषाणात खोदलेली मंदिरे, ‘अलैवाय-क-कोवील’ (तट-मंदिर) हे सागरकिनाऱ्यावरील शिवमंदिर आणि गंगावतरणाची कथा साकार करणारा, सु. २९.२६ मी. (९६ फुट) लांब व सु. १३.१० मी. (४३ फुट) इतका विस्तीर्ण शिल्पपट्ट हे उल्लेखनीय होत.

एकपाषाणी घडीव मंदिरांत−म्हणजे रथांत−पल्लवांच्या मामल्ल शैल्लीची वैशिष्ट्ये दिसतात. या पांडव रथांचे दोन समूह आहेत : एक महाबलीपुराच्या दक्षिणेचा व दुसरा पश्चिमेचा. नगराच्या मध्यभागी एक शिलाखंड तासून आणखी एक रथ धडकला आहे. दक्षिण समूहात चार रथ, तर पश्चिम समूहात दोन रथ आहेत. दक्षिणेचे द्रौपदी, धर्मराज, अर्जुन व पिडारी हे ‘कूट’ (चौरस विधानाची अगदी लहान वास्तू ) पद्धतीचे रथ आहेत. या चौरस वास्तूंची छपरे चारी बाजूंनी उतरली आहेत. द्रौपदी रथ एकमजली, पिडारी व अर्जुन दुमजली, तर धर्मराज तिमजली आहे. भीम व गणेश या नावांचे पश्चिमेचे रथ ‘शाला’ (आयताकार विधानाची वास्तू) पद्धतीचे आहेत. भीम रथ एकमजली तर गणेश दुमजली आहे. नकुल-सहदेव हा रथ ‘चाप’ (धनुष्याकृती विधान) पद्धतीचा आहे. याचे छप्पर गजपृष्ठाकार आहे. बहुतेकांच्या प्रस्तावांवर सजावटीदाखल कूट, शाला अशा वास्तूंच्या छोट्या प्रतिकृतींच्या रांगा आहेत. त्यांचे स्तंभ अष्टकोनी, काहीसे निमुळते असून त्यांवर ‘ताडी’ (गोलाकार स्तंभशीर्ष), ‘कुंभ’ (मंदिराच्या पीठावरील अर्धगोलाकार थर) इ. भाग आहेत. तसेच स्तंभाच्या पायाशी व्याल वा सिंह यांच्या मूर्ती आहेत. नकुल-सहदेव रथाच्या स्तंभाच्या पायाशी गजमूर्ती आहेत. मकरतोरणांचा वापर द्रौपदी व पिडारी रथांवर आहे. रथांच्या बाह्यभागावर व अंतर्भागावर मूर्ती कोरल्या आहेत. त्या आखीव चौकटीत असून भिंतीच्या सपाटीच्या वर येत नाहीत.

पल्लव मूर्तीकामाचे काही वैशिष्ट्यपूर्ण नमुने या शैलगृहात दिसतात. उदा., महिषासुर गुंफेतील महिषासुरमर्दिनीची मूर्ती. या मूर्तीचा पवित्रा तिच्या असुरवधाच्या उद्दिष्टाशी सुसंवादी असला, तरी चेहऱ्यावर शांततेचा, अलिप्ततेचा दैवी भाव आढळतो. तसेच वराह मंडपातील दुर्गामूर्ती उल्लेखनीय आहे. मूर्तीचा बांधा मुळात स्थूल असला, तरी ती सडपातळ वाटावी इतकी उंच असून तिचे शिरोभूषणही उभट आहे. महिषासुरमर्दिनी गुंफेतील शेषशायी विष्णूची पाषाणमूर्ती ताठर असून तीत लालित्य कमी आढळते. तेथील ‘तट-मंदिर’  हे वास्तुकलादृष्ट्या महत्त्वाचे आहे. ते राजसिंह ऊर्फ दुसरा नरसिंहवर्मा (कार. ७००−२८) याने बांधले .त्यात एका विस्तृत आयातकार प्रांगणात उंच चौथऱ्यावर तीन मंदिरे व इतर वास्तू होत्या. सध्या फक्त मंदिरे व त्यांना वेढणारी भिंत शिल्लक आहे. त्यांपैकी पूर्वेचे ‘क्षत्रियसिंहेश्वर’ व पश्चिमेचे ‘राजसिंहेश्वर’ मंदिर आहे. हे मंदिर पहिल्यापेक्षा आकाराने लहान आहे. या दोन मंदिरांमधील मोकळ्या जागेत खडकात अनंतशायी विष्णूची मूर्ती घडवण्यात आली. त्यावर आच्छादन घालण्यात आले. हे मंदिर वास्तुदृष्ट्या फारसे लक्षणीय नाही. पहिल्या दोन मंदिरांचे गाभारे चौरस असून त्यांच्यासमोर लहान आकाराचे मुखमंडप आहेत. ते पीठस्तरांचे पण साधे आहेत. भिंतीत अर्धस्तंभांच्या साहाय्याने चौकटी पाडल्या आहेत. या अर्धस्तंभांच्या पायाशी सिंहमूर्ती आहेत. पीठाच्या प्रस्तरावर आणि हस्त, कर्ण यांवर सिंह, व्याल, गज यांच्या आकृत्या होत्या. दोन्ही मंदिरांची शिखरे टप्प्याटप्प्यांनी वर जाणारी आहेत. शिखराला अनेक ‘भूमी’ (मजले वा टप्पे) असल्या, तरी त्यांचे प्रमाण असे आहे, की शिखराची बाह्याकृती अखंड वाटावी. प्रत्येक भूमीवर कूट व शाला या वास्तूंच्या छोट्या प्रतिकृतींच्या मालिका खोदल्या आहेत.

पल्लवकालीन द्राविड मंदिरांचे हे विलोभनीय नमुने आहेत. पण याहीपेक्षा आकर्षण आहे तो ‘गंगावतरण’ शिल्पपट्ट .येथे भगीरथ राजाची तपश्चर्या व गंगादेवीचे पृथ्वीवर अवतरण हे विषय शिल्पकारांनी आपल्या प्रतिभाबळाने साकार केले आहेत. शिल्पकामासाठी सलग दरड असणारा शिलाखंड घेतला आहे. या शिलाखंडातील फटींचा वापर कौशल्याने केला आहे. या घळीत नागराज, नागस्त्रिया यांच्या मूर्ती कोरल्या आहेत. पूर्वी शिलाखंडाच्या माथ्यावर प्रचंड कुंड होते. तेथून या घळीत पाणी सोडण्यात येई, म्हणजे ही गंगाच झाली! . या गंगेच्या दोन्ही काठींवर पाणी नेणारे ऋषीमुनी तसेच पाणी पिण्यासाठी आलेली हरिणे इ. प्राणी आहेत. भगीरथाचे दर्शन दोनदा होते : एकदा हात वर करून तपश्चर्या करणारा व नंतर शिवाचा आशीर्वाद स्वीकारणारा. त्याच्या शेजारीच विष्णुमंदिर आहे. त्यापलीकडील उत्थित शिल्पात बाहू उंचावून तप करणारे मांजर व त्याच्याभोवती बागडणारे उंदीर दाखवले आहेत. सहजशत्रू असणारे प्राणीही मित्र बनतात, हा कथाभाग त्यातून शिल्पबद्ध केला आहे. याखेरीज आकाशगामी विद्याधर, गंधर्व-इंद्रादी देव-देवता व प्रचंड गजमूर्ती आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरलेला व तोही इतक्या कलात्मकतेने घडविलेला शिल्पपट्ट अन्यत्र दृष्टीस पडत नाही.

लेखिका : उषा रानडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate