অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रचनापरिमाण

रचनापरिमाण

(मॉड्यूल). कोणत्याही शास्त्रात मापन, प्रमाणबद्धता यांसाठी तसेच घटकांचे संकलन, संयोजन आणि बांधणी प्रमाणभूत व सुलभ करण्यासाठी वापरण्यात येणारे कोणतेही परिमाण. ल कॉर्ब्यूझ्ये याची ‘मॉड्यूलर’ परिमाणपद्धती  (आकृतीमधील सर्व आकडे मिमी. मध्ये आहेत.)ल कॉर्ब्यूझ्ये याची ‘मॉड्यूलर’ परिमाणपद्धती (आकृतीमधील सर्व आकडे मिमी. मध्ये आहेत.)याचा वापर अनेक शतके जरी विविध शास्त्रांत होत असला, तरी आजकाल त्याचा वापर फक्त वास्तुकलेच्या मापनासाठी करतात. या मापनाच्या परिमाणास लॅटिनमध्ये ‘मॉड्यूल’ असे नाव आहे. या मापनपद्धतीने संयोजन करण्याच्या क्रियेला ‘मॉड्यूलर’ म्हणतात. १० सेंमी. (४ इंच) हे मूलभूत रचनापरिमाण खूप विचारान्ती आज जगात वापरात आले आहे. याउलट प्राचीन अभिजात ग्रीक कालखंडात स्तंभाच्या त्रिज्येचा प्राथमिक वा मूलभूत (बेसिक) रचनापरिमाण म्हणून वापर स्तंभ व प्रस्तर प्रमाणबद्ध करण्यासाठी होत असे. जपानी वास्तुकलेमध्ये ‘टाटामी’ या तांदुळाच्या १·८३ मी. (६ फुट) लांब व ०·९१ मी. (३ फुट) रुंद चटईचा रचनापरिमाण म्हणून वास्तुसंयोजनात वापर होतो. फ्रँक लॉइड राइट (१८६९-१९५९) याने १·२२ मी.च्या (४ फुट) रचनापरिमाणबद्ध चौकटीचा वापर वास्तुनियोजनासाठी केला; तर मानवी आकाराशी निगडित रचनापरिमाणाचा वापर ल कॉर्ब्यूझ्ये (१८८७-१९६५) या फ्रेंच वास्तुशिल्पज्ञाने केला.

ग्रीक तत्त्वगणितज्ञ पायथॅगोरस, तसेच रोमन वास्तुशिल्पज्ञ व्हिट्रूव्हिअस यांनी प्रतिपादिलेल्या प्रमाण व सुसंवादित्व (हार्मनी) विषयक सिद्धांतांवर आधारित ल कॉर्ब्यूझ्येने मांडलेल्या अंकिक रचनाप्रमाणास मॉड्यूल किंवा प्रमाणसाधक अशी संज्ञा आहे. या विषयावर कॉर्ब्यूझ्ये याने आपल्या वास्तुकलेचे मर्म विशद करण्यासाठी ग्रंथ लिहिले : Le Modular I (१९५०) व Le Modular II (१९५५). तथापि तत्पूर्वीच ही कल्पना सुवर्ण रचनापरिमाण (गोल्डन- मॉड्यूल) किंवा सुवर्ण-छेद (गोल्डन सेक्शन) या नावांनी व्हिट्रूव्हिअस व लिओनार्दो दा व्हींची यांनी कलेत वापरात आणली होती.

स्वस्त बांधकामासाठी साचेबंद बांधणी आवश्यक असते; परंतु साचेबंद बांधणी तितकीशी सर्जनशील नसल्यामुळे वास्तुकलेच्या शास्त्रीय संदर्भात ल कॉर्ब्यूझ्ये याने आपली ‘मॉड्यूलर’ ही परिमाणपद्धती मांडली. यामागील विचारसरणी ही मानवी देहास निसर्गाची सर्वोत्तम व प्रमाणबद्ध आकृती कल्पून त्यावर आधारलेली आहे. मानवी देहाकृतीवर आधारित श्रेणी निर्माण करून, त्यांचा वापर अंकगणितातील ‘फीबोनात्ची श्रेणी'प्रमाणे [लेओनार्दो फीबोनात्ची (११८०-१२५०) या इटालियन गणितज्ञाच्या नावाने ओळखली जाणारी श्रेणी] केला असता निर्माण होणाऱ्या संख्यांचा वापर वास्तूमध्ये केला जावा, ही मूळ भूमिका आहे (उदा., ३०, ४८, ७८, १२६, २०४, ३३०, ५३४ या संख्या). हात वर करून उभ्या असलेल्या मानवी आकृतीची एकंदर उंची २,२६० मिमी. धरून, खाली सरळ असलेल्या हाताच्या मनगटाजवळ ८६३ मिमी. उंचीचा एक व उरलेला १,३९७ मिमी.चा दुसरा असे दोन भाग कल्पून व या भागांचे परिमाण साधून त्याचा वापर शरीरावर आधारित १,१३० : ६९८ या प्रमाणाबरोबर वास्तूसाठी केला. या प्रमाणात असलेल्या अनेक घटकांचे संकलन करून निर्माण केलेल्या वास्तू ह्या दृष्टीला प्रमाणबद्ध व कलापूर्ण दिसतात, असा त्यांचा दावा आहे.

वास्तूमध्ये वापरावयाच्या अनेक घटकांचा आकार रचनापरिमाणावर आधारित असल्याने बांधकाम जलद व प्रमाणबद्ध होते. रचनापरिमाणाचा वापर फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, हंगेरी, रशिया, भारत इ. अनेक देशांतून होतो व त्याचा प्रचार करण्यासाठी वाहिलेल्या संस्था त्या त्या देशांत आहेत. प्राचीन भारतात ‘अंगुळ’ हे रचनापरिमाण वापरले जात असे.

लेखक : गो. कृ. कान्हेरे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate