অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रस सिद्धांत

रस सिद्धांत

रस हाच काव्याचा आत्मा, म्हणजे मुख्य प्राणभूत तत्त्व आहे, असे प्रतिपादन करणारे जे मत, त्याला ‘रससिद्धांत’ म्हणता येईल. रस म्हणजे एक विशिष्ट प्रकारची चित्तवृत्ती होय. हिचे स्वरूप आस्वादाचे, चर्वणेचे व तन्मूलक आल्हादानुभवाचे असते. हा अनुभव अर्थात काव्य (नाट्य) रसिकाचा अनुभव असतो. तो त्याच्या प्रचीतीला अणून देण्याचे सामर्थ्य काव्यात वा नाट्यात असते, म्हणून रस हा काव्यात अथवा नाट्यात असतो असे म्हणावयाचे. हे सामर्थ्य काव्याचे (म्हणजे नाट्याचेही) आत्मभूत तत्त्व आहे, ही कल्पना या रससिद्धांताचा मूळ पाया आहे.

रसिकमनात आणि काव्यातही, ही रसनिष्पत्ती कशी होते, याविषयी भरताने प्रथम आपल्या नाट्यशास्त्रात एक सूत्र घालून दिले आणि त्या सूत्राला धरून आणि त्याच्या भोवतीच संस्कृत साहित्यशास्त्रामधील एतद्‌विषयक पुढील सर्व चर्चा झाली आहे. ते सूत्र असे : ‘विभाव−अनुभाव−व्यभिचारि−संयोगात् रसनिष्पत्तिः’ (नाट्यशास्त्र ६−२२). म्हणजे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसनिष्पत्ती होते. या सूत्रात आलेल्या वि-भाव, अनु-भाव, व्यभिचारी भाव या भावांखेरीज आणखी एक भाव−स्थायी भाव−आहे आणि तो या सर्वांच्यापेक्षा महत्त्वाचा आहे (एवं हि सर्व भावानां भावः स्थायी महान् इह−नाट्यशास्त्र ७−१२). तसेच हे सारे एकत्रित झाले असताना ज्याला मोठे रूप प्राप्त होते, त्याला स्थायी रस म्हणावे, असेही त्याने म्हटले आहे (सर्वेषां समवेतानां रूपं यस्य भवेत् बहु ∣ स मन्तव्यो रसः स्थायी, शेषाः संचारिणो मताः – ना. शा. ७−११९). म्हणजे रसनिष्पत्ती ही विभाव−अनुभाव−व्यभिचारी भाव (यांनाच ‘संचारी भाव’ हे दुसरे नाव आहे) यांच्या संयोगाने होत असली, तरी रस ही स्थायी भावापासूनच निर्माण होतो, असे त्याचे मत दिसते. या सर्व भावांच्या संयोगाने रसनिष्पत्ती होते, म्हणजे काय होते आणि ते कसे होते, याविषयी पुढे अनेकांनी अनेक मते प्रकट केली आहेत.

काव्य-नाटकांत ज्या रसांची निर्मित झालेली दिसते, ते रस संख्येने आठ असून ज्या स्थायी भावांचे या रसांत पर्यवसान होते, ते स्थायी भावही अर्थात आढ म्हणजे रति, उत्साह, शोक, क्रोध, भय, विस्मय, हास आणि जुगुप्सा असे भरताच्या मताने आहेत. या स्थायी भावांचे अनुक्रमे शृंगार, वीर, करुण, रौद्र, भयानक, अद्‌भूत, हास्य आणि वीभत्स असे आठ रस होतात. पण या स्थायी भावांना रसरूप येण्यास त्या त्या भावांना अनुरूप असे विभाव, अनुभाव आणि संचारी वा व्यभिचारी भाव हे अस्तित्त्वात यावे लागतात. यांच्या एकाच संदर्भात केलेल्या वर्णनाने, त्यांचा, भरतास अभिप्रेत असलेला संयोग होतो आणि त्यापासून त्या त्या रसाची निष्पत्ती होते. स्थायी भावांचे विभाव हे आधारभूत असतात.

कोणताही भाव कोणातरी व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या मनात निर्माण झाल्याचे वर्णन कोणत्याही कथा-काव्यात किंवा नाटकात आलेले असते; भावाचा अनुभव घेणारा हा आलंबन होय. अशा व्यक्ती या त्या भावाच्या आलंबन होत, म्हणून त्यांना आलंबनविभाव असे म्हटले जाते. परंतु व्यक्तींच्या ठिकाणी ते निर्माण होण्यास काही सहकारी कारणे आवश्यक असतात. तीही विभावच; पण ते उद्दीपन−विभाव होत. एका शृंगार रसाचे उदाहरण घेतले, तर त्यांचा पुढीलप्रमाणे निर्देश करता येईल. त्याचा स्थायी भाव जो रति अथवा प्रेम, ते दुष्यंत−शकुंतला, मालती−माधव, अथवा रोमियो−ज्युलिएट यांच्या ठिकाणी निर्माण झाल्याचे सांगवे लागते. यांना काही ना काही व्यक्तिमत्त्व असते. शृंगारास अनुकूल असे तारुण्य तरी निदान असते.

यांच्या रूप−गुणांचे शक्य तेवढे सविस्तर व सूक्ष्म वर्णन हे आलंबन−विभाव−वर्णन ठरते. पण एवढ्यानेच भागत नाही. अशा व्यक्तींच्या मनात प्रेमोद्‌भव होण्यास काही अनुकूल वा अनुरूप अशी देश-काल-परिस्थिती लागते. तसे झाल्यासच यांच्या ठिकाणी प्रेमभावना उद्‌भवते व उद्दीपित होते. वसंत व आम्रमंजरी, शरदातील चांदणे, एकान्त, कोकिल-गायन, नौकाविहाराची सोय, नायिकेचे मोहक हावभाव, नायकाची चाटुवचने इत्यादींनी रतिभावनेच उद्दीपन होते. यांचे वर्णनही आवश्यक असते व ते जेवढे असेल तेवढ्या प्रमाणात रतिभावना जागृत झाल्याचा प्रत्ययही येतो. विभाव हे याप्रमाणे आलंबन आणि उद्दीपन असे द्विविध असतात. रतिभावना नायक-नायिकांमध्ये जागृत झाल्याचे यांच्या कृती-उक्तींवरून आणि बाह्य शरीरविकारांवरून कळू शकते. नायिकेच्या मनात प्रेमभावना उद्‌भूत अथवा उद्दीपित झालेली असल्यास, गालांवर लाली येणे, वस्त्रांशी हाताचा चाळा चालणे, खाली मान घालणे किंवा तिरपे पाहणे, अस्फुट स्मित वा हास्य करणे इ. शरीराच्या हालचाली किंवा त्यावर झालेले विकार दृग्गोचर होतात. या गोष्टी अनुभाव होत व त्यांचे वर्णनही साहजिकच येते.

हे अनुभाव-वर्णन होय. ज्यांना अष्टसात्त्विकभाव म्हणतात, तेही वस्तुतः अनुभावच होत. हे अनुभाव नायकनायिका यांच्या मनातील विकारांचे सूचक असतात. शृंगारात यांच्या मनातील प्रेममूलक आशा, लज्जा, हर्ष, चिंता, आशंका, औत्सुक्य इ. सूक्ष्म भावनांचे सूचनही या अनुभावांच्या वर्णनाने होते. या भावना वा मनोविकार हे तादृश स्थायी असत नहीत. वर्णनाच्या ओघात व प्रेमविकासाच्या प्रक्रियेत त्या येतात व जातातही. म्हणून या सूक्ष्म व तरल भावनांना संचारी किंवा व्यभिचारी भाव असे नाव आहे. इतके सारे झाले, की काव्यगत रसाची निष्पत्ती झाली असे म्हणता येईल व त्याच वेळी ती रसिकमनामध्ये होते असे म्हणावयास हरकत नाही. या प्रक्रियेला रसप्रक्रिया आणि विभाव-अनुभाव-संचारी भाव यांना रससामग्री असे म्हणता येते. यातील अनुभाव हे असंख्य आहेत, परंतु सर्व रसांचे मिळून संचारी भाव भरतमताने एकंदर तेहेतीस आहेत व पुढीलांनी ती संख्या मान्य केली आहे.

निरनिराळ्या रसांची रससामग्री साहजिकच वेगवेगळी असते. करूण रसात दैन्य, विषाद, निराशा इ. संचारी भाव, आणि अश्रुपात, आक्रंदन, भूमिपतन इ. अनुभाव होतात. भयानकात भुते, वाघ वगैरे भयप्रद गोष्टी या उद्दीपन विभाव; भिन्ना मनुष्य हा आलंबन विभाव; रोमांच, कंप, विवर्णता, गलितगात्रता हे अनुभाव आणि दैन्य, निराशा इ. संचारी भाव होतात. दैन्य, निराशा हे संचारी भाव करुण आणि भयानक या दोनही रसांत आणि हर्ष हा भाव हा विविध रसांमध्ये संचार करतो; तो कोणत्याही एकाच रसाचा अनुचर नसतो. म्हणूनच त्यास व्यभिचारी भावही म्हणतात. आजच्या भाषेत ही सारी रसयंत्रणा झाली.

प्रस्तुत रसयंत्रणेमधील एकेका घटकांना ही नावे कशी प्राप्त झाली आहेत?  स्थायी भावांचा परिपोष झाला असता त्यांना रस का म्हणवयाचे याचे उत्तर त्यांचे रसन, आस्वादन होते, हे आहे. रस हा पदार्थ काय आहे असा प्रश्न करून तो आस्वाद्य असतो म्हणून रस होतो, असे भरताने उत्तर दिले आहे (रसः हति कः पदार्थः ? उच्चते, आस्वाद्यत्वात). स्थायी भावांनाही स्थायी असे का म्हणावयाचे, याचे उत्तर अनेकांनी अनेक प्रकारांनी दिले आहे. कोणताही प्राणी जन्मापासूनच या भावनांनी युक्त असतो, असे अभिनवगुप्त म्हणतो (जातः एव जन्तुः इयतीभिः संविद्‌भिः परीतो भवति). अर्थात ते भाव स्थायी असतात.

सबंध काव्यभर हे भाव स्थिर असतात, म्हणून जगन्नाथ त्यांना स्थायी भाव म्हणतो (तत्र आप्रबंध स्थिरत्वात् अमीषां, भावानां स्थिरत्वम्), ते मनात नेहमी−बराच काल−वास करितात म्हणून स्थायी असे भोजाचे म्हणणे आहे (चिरं चित्तेऽवतिष्ठन्ते), विभावांना विभाव म्हणण्याचे कारण यांच्या आश्रयाने आणि यांच्यामुळे स्थायी भावांचे विभावन होते म्हणजे ते दिसू लागतात, प्रकट होतात हे आहे. स्थायी भाव ज्यांच्यात असतात ते आलंबन  विभाव व ज्यांमुळे स्थायी भाव उत्तेजित होतात ते उद्दीपन विभाव होत. आलंबनातही नायक हा प्रेमाचा आश्रय म्हटला, तर नायिका ही विषय होते, किंवा उलटही म्हणता येणे शक्य आहे. रसांचा अनुभव करून देणारे जे शरीरगत विकार ते अनुभाव होत (ये रसान्‌अनुभावयन्ति, अनुभवगोचरती नयन्ति, ते अनुभावाः), जगन्नाथाने भाषांच्या नंतर (अनु) ज्यांची उत्पत्ती आहे, ते अनुभाव अशीही व्युत्पत्ती दिली आहे (अनु-पश्चात् भावः येषाम्). स्थायी भावांचे दीपन करीत ज्यांचा संचार चालतो ते संचारी भाव असे भरताचे म्हणणे आहे (दीपयन्तः प्रवर्तन्ते ये पुनः स्थायिनं रसम् ते तु संचारिणे ज्ञेयाः ते न स्थायित्वमागताः – ना. शा. ७−१८२). भावांच्या गतीला चालना देतात (संचारयति भावस्थ गतिमिति संचारी) म्हणून त्यांना संचारी म्हणावे, असेही कोणी सांगतो.

परंतु संचारी शब्दापेक्षा व्यभिचारी हा शब्दच अनेक वेळा वापरला गेला आहे, वि + अभि या उपसर्गांचा उपयोग करून त्याची व्युत्पत्ती देण्यात येते (विविधं वा विशेषात् वा आभिमुख्येन) चरन्ति). विविध प्रकारे वा विशेष प्रकारे समोर संचार करतात ते, असा अर्थ. जलसंचयावर निर्माण होऊन पुनः त्यातच निमग्न होणाऱ्या लाटांप्रमाणे स्थायी भावांतून उत्पन्न होऊन पुनः त्यांतच विलीन होणारे असे हे भाव असतात, असे विश्वनाथ सांगतो (साहित्यदर्पण ३−१४०). रसयंत्रणेमधील घटकांची ही व्यवहारातील नावांपेक्षा काहीशी वेगळी नावे त्यांचे व्वहारापेक्षा वेगळेपण दर्शवितात. व्यवहारजीवन हे लौकिक म्हटल्यास काव्यरसास्वाद हा त्यापेक्षा वेगळा म्हणजे अलौकिक असतो, अशी कल्पना याच्या मुळाशी आहे. प्रत्यक्षातील, व्यवहारातील कार्यकारणादी घटना काव्यात वा नाटकात अलौकिक रूप धारण करतात आणि त्यांमुळे निर्माण होणारा रसही तसाच अलौकिक असतो. लौकिकात शोककारणांनी दुःख होते, काव्यात त्यांच्याही अनुभवांनी आनंदच होतो, अशी ही भूमिका आहे. म्हणून ‘नाट्ये एव रसः न तु लोके’ असे अभिनवगुप्त पुनःपुन्हा सांगतो व (स्थायी विलक्षणे रसः) रस हा स्थायीपेक्षा वेगळा, स्थायी विलक्षण असतो, असेही म्हणतो.

रसाचे स्वरूपही मोठ्या गौरवाच्या भाषेत वर्णिलेले असते. रसास्वाद हा ब्रह्मास्वादाचा सहोदर आहे, म्हणजे त्याच्या तोडीचा आहे. त्या आस्वादाच्या वेळी काव्यात जे चाललेले असते, त्याखोरीज इतर कोणत्याही ज्ञेय गोष्टीचे भान असत नाही. या आस्वादसुखास रज आणि तम यांचा स्पर्शही झालेला नसतो. तो केवळ सत्त्वोद्रेक असतो. सत्त्वोद्रेकामुळे तो चिन्मयप्रकाशानंदाच्याच स्वरूपाचा म्हणावयास हरकत नाही. तो अखंड, एकजिनसी असतो. तो लोकोत्तरचमत्काररूप असल्याने अलौकिकच म्हणावयास हवा. असे व अशा प्रकारचे त्याचे वर्णन विश्वनाथादींनी केले आहे. साहजिकच ब्रह्मास्वाद हा जसा त्या आस्वादसुखाकरिता घेणे योग्य ठरते, तसा काव्याचा आस्वादही त्या आस्वादासुखाकरिताच घेणे इष्ट ठरेल. काव्यवाचनाची वा लेखनाची इतर प्रयोजने काहीही असली, तरी त्याचे सकल प्रयोजनांत श्रेष्ठ प्रयोजन म्हणजे हा रसास्वाद होय, असे म्हणणे ओघानेच येते.

रसास्वादाचे हे वर्णन अर्थात काव्यगत व्यक्तींच्या अनुभवाचे वर्णन नव्हे. मेघदूतातील यक्ष−यक्षपत्नी किंवा शाकुंतलातील दुष्यंत-शकुंतला यांचा भावनानुभव ब्रह्मास्वादसहोदरादी शब्दांनी व्यक्त होत नाही. रसानुभव हा रसिकाचा, प्रेक्षकाचा, सामाजिकाचा अनुभव होय. कवी सुद्धा रसिकच होय, रसनिष्पत्ती कोठे होते, रसिकाच्या मनात की नाट्य काव्यगत व्यक्तीच्या मनात, याविषयी निरनिराळी मते पूर्वी व्यक्त केली गेली आहेत. त्यांतील काही मते काव्यविषयीभूत व्यक्तिमनात रसाची निष्पत्ती मानणारी, तर काही रसिकमनात ती होते असे मानणारी आहेत. भट्ट लोल्लट आणि श्रीशंकुक रसनिष्पत्ती ही काव्यगत व्यक्तिमनात खरोखर होते, असे मानणारे होते; तर भट्टनायक आणि अभिनवगुप्त रसाचे स्थान रसिकमन होय, असे मानणारे होते. रसिक हा दुष्यांतादी नाट्यगत व्यक्तींच्या मनातील रसाचा आरोप त्यांचा अभिनय करणाऱ्या, नटांवरही करतो व आरोपक्रियेने रसिकास आनंद होतो, असे लोल्लट मानतो, तर शंकुक हा काव्यगत व्यक्ती व  नट अभिन्न मानून विभावादी करणांच्या वर्णनाने रसादी कार्याचे अनुमान करून आनंद मिळवतो असे म्हणतो. या दोनही मतांत रसिकास आनंद होतो, हे अर्थात गृहीत आहे, परंतु त्याला रसानुभव येत असल्याचे मात्र मानलेले नाही.

आनंद हा आरोपामुळे वा अनुमानमुळे होतो, स्थायी भावानुभवाने नव्हे. भट्टनायकाने मात्र अभिधा, भावना व भोगीकृती या तीन भावना कल्पून रसास्वाद हा रसिकापर्यंत आणून पोहोचविला आहे. अभिधेने काव्यगत व्यक्तींमधील विभावानुभावादिकांचे ज्ञान त्याला होते, भावनाव्यापाराने काव्यगत व्यक्तींमधील या भावना सर्व मानवास साधारण होतात, की रसिकांस त्यात आपला प्रवेश सुखेनैव करून घेऊन रसास्वाद घेता येतो तो भोगीकृतीच्या व्यापारामुळे, असे त्याला म्हणवयाचे आहे. यांतील साधारणीकरणाची कल्पना मान्य करून अभिनवगुप्ताने रसिकमनात नेहमीच सुप्त असणाऱ्या स्थायी भावांची अभिव्यक्ती मात्र काव्यगत विभावादिकांच्या वर्णनाने होते, असे म्हटले आहे. त्याच्या मते ही रसाची निष्पत्ती म्हणजे खरोखर रिसकगत भावांची अभिव्यक्ती आहे, काव्यगत व्यक्तींच्या भावनांचे संक्रमण नव्हे.

काव्यगत व्यक्तिभावना या लौकिक व शबल असतात, रसिकगत रसाभिव्यक्ती अलौकिक आणि केवळ सात्त्विक आनंदाच्या स्वरूपाची असते. या चार स्थूल व महत्त्वाच्या उपपत्तींखेरीज आणखी बारीकसारीक तपशीलाचे भेद असणाऱ्या उपपत्ती आहेत, पण येथे यांच्या अस्तित्तवाच्या उल्लेखावरच भागवावे लागते. एकंदर रसनिष्पत्तिप्रक्रियेत प्रथम कविमन, नंतर त्याचे काव्य आणि शेवटी रसिकमन अशा रसोत्पत्तीच्या तीन जागा असतात आणि त्या सर्वांचा अनुभव एकाच स्वरूपाचा असतो, अशी मतेही असल्याचे दिसते. याबाबत कवी हा सामाजिक (प्रेक्षक-रसिका) सारखाच होय (कविर्हि सामाजिकतुल्य एव); किंवा काव्यगत नायक, कवी आणि रसिक (श्रोता) या सर्वांचा अनुभव सारखाच मानावा (नायकस्य कवेः श्रोतुः समानोऽनुभवः स्मृतः) असे सांगणारी वचनेही संस्कृत रसचर्चेमध्ये आलेली आहेत. परंतु त्यांचे अधिक उपपादवन मात्र झालेले नाही.

रसांची संख्या किती आणि स्थायी भाव रसपदवीस कशामुळे पात्र होतात, हा यापुढील विचार होय. भरतमुनींनी मुळात आठ रस सांगितले होते, पण त्यातही शृंगार, वीर, रौद्र, बीभत्स हे मूळ असून त्यांपासून अनुक्रमे हास्य, करूण, अद्‌भुत व भयानक रस झाले, असेही म्हटले होते, याचे अधिक विवेचन मात्र त्यांनी केले नाही. कालिदास, दंडी यांनाही आठ रसच मान्य अथवा माहीत होते, उद्‌भटाने प्रथम शांत रसाची कल्पना पुढे मांडली आणि आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त यांनी त्याचा पुरस्कार केला. मराठीमध्ये ज्ञानदेवांनी शांतरसाचा विशेष गौरव केल्याचे दिसते. आनंदवर्धन, अभिनवगुप्तांच्या पुरस्कारामुळे काव्यप्रकाशकार मम्मट यालाही ‘शांतोऽपि नवमो रसः’  असे आवर्जून सांगावे लागले.

रुद्रटाने शांताच्या बरोबर प्रेयान् रसाची भर घालून रससंख्या दहावर नेली. विश्वनाथाने वत्सल रसालाही रसमालिकेत गोविले आणि मधुसूदनसरस्वती यांनी भक्तीचा पाठपुरावा केला. या आधीच भोजाने उदात्त आणि उद्धत असे आणखीही रस मानले; किंबहुना संभाव्य रस एकंदर ४९ होऊ शकतील, असे पल्या शृंगारप्रकाशामध्ये म्हणून ठेवले (रत्यादीनां एकोनपंचाशतोऽपि...रसव्यपदेशार्हता). रसांच्या संख्येत याप्रमाणे संस्कृत साहित्यशास्त्रातच अशी भर पडत गेली असली, तरी भरताच्या आठ या रससंख्येतच काही गाळगाळी करण्याचा प्रयत्‍न झाला नव्हता. मराठी रसचर्चेत द. के. केळकर यांनी प्रथम बीभत्स रस गाळण्याची सूचना केली व के. ना. वाटवे यांनी बीभत्स व रौद्र यांची मान्यता काढून घेऊन यांच्या जागी भक्ती, वत्सल व शांत यांची जोड देऊन एकंदर रससंख्या नऊ केली. त्यानंतर कवी अनिल यांनी प्रक्षोभ आणि शं. द. जावडेकर यांनी क्रांती या रसांचाही पुरस्कार केला. सर्वसामान्य रसिकांची समजूत रस हे आठ वा नऊ असतात, अशीच असते. वस्तुतः काव्यानंदाची अवस्था, म्हणजे ब्रह्मानंदसदृश आनंदाची अवस्था, म्हणजे रस ही कल्पना असल्याने रस एकच असतो, भावभेदामुळे ते आठ वा नऊ किंवा त्यांहूनही अधिक असे समजावयाचे. ही रसास्वादाची अवस्था केव्हा रती, केव्हा शोक, केव्हा भय हे स्थायी भाव आणि त्यांना अनुरूप असे विभाव-अनुभाव-संचारी भाव यांमुळे निष्पन्न होते, म्हणूनच रसभेदाचे बोलणे शक्य होते, हीच पर्यंतिक भूमिका आहे.

रसाची कसोटी काय हा प्रश्न साहजिकच उद्‌भूत होतो. स्थायी भावाचेच रस होऊ शकतात अशी भारताची कल्पना आहे. आठ स्थायी भाव सांगून त्यांचे आठ रस होतात, हे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे. विशिष्ट भावच स्थायी का मानावयाचे याचीही कारणमीमांसा त्याने  केली नाही. तथापि रस म्हणजे काय हा प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर ‘आस्वाद्य’ असे त्याने दिले आहे. म्हणजे भाव (स्थायी) रसरूप पावतो, आस्वाद्य असतो, असे त्याचे मत असल्याचे निष्पन्न होते, अर्थात आस्वाद्यता ही त्याच्या मते रसाची कसोटी होती, असे म्हणावयास हरकत नाही. स्थायी भाव मुख्यतः आस्वाद्य का होतात? तर ते रसिकमनात स्थायी असतात, संचारी भावांप्रमाणे अधूनमधून येतात-जातात असे नाही; अशी त्याची उपपत्ती आहे. अभिनवगुप्ताच्या मताने मानवमनात हे भाव जन्मजातच असतात; याचा अर्थ हे भाव मूलभूत असतात, म्हणून स्थायी असतात आणि आस्वाद्यही होतात असा होतो. म्हणजे आस्वाद्यता व मूलभूतता या रसाच्या कसोटी होतात. तथापि स्थायी भावांप्रमाणे संचारी इ. भावही आस्वाद्य होतात; परंतु ते स्थायी भावाचे अंगभूत व सहकारी आहेत; तर स्थायी भाव हे मुख्य आहेत, म्हणून मुख्याला रस असे नाम दिले, असे भरताने म्हटले आहे. म्हणून तेही रसरूप पावणे शक्य आहे, असे भोजाला वाटत होते. म्हणून त्याने आठ स्थायी भाव, तेहेतीस संचारी भाव आणि आठ सात्त्विक भाव अशा ४९ भावांचे ४९ संभाव्य रस होतात, असे म्हटले आहे. मात्र त्या त्या भावाचा ‘परप्रकर्ष’ झाला पाहिजे. तसे म्हटले तर स्थायी भावंबरोबर संचारी भावही काहीना काही प्रमाणात आस्वाद्य असतातच, पण ते बहुधा स्थायी भावाचा परप्रकर्ष साधण्यात कामाला येतात. तेव्हा प्रकर्षाने म्हणजे उत्कटत्वाने आस्वाद्य होणे, ही रसाची कसोटी ठरते. हिच्या जोडीला

  1. पुरुषार्थोपयोगित्व,
  2. सर्वजनानुभवक्षमता आणि
  3. उचितविषयनिष्ठता अशा आणखीही कसोट्या प्राचीनांनी सांगून ठेवल्या आहेत.

परंतु आस्वाद्यता ही कसोटीच सर्वांत महत्त्वाची आहे, ही गोष्ट उघड आहे.

रसविचारामध्ये रसाभास, भावोदय, भावसंधी, भावशवलता आणि भावशांती असे काही गौण विचारही येतात. एखाद्या भावाचे चित्रण नायकविरोधी पात्रे, किंवा गौण पात्रे, किंवा मानवेतर प्राणी यांच्या विषयी झालेले असेल, तर त्यातील भावाला यावी इतकी उत्कटता न आल्याने त्याचा प्रकर्ष अनुभवास येत नाही. तेथे रसाची निर्मिती न होता, त्याचा आभास मात्र होतो. त्या भावांमध्ये उचितविषयनिष्ठता नसते, हे त्याचे कारण सांगितले जाते. प्रथम शृंगारानुकूल भावाचे वर्णन चालू असता काही अनिष्टदर्शनाने कोपच प्रभावी ठरला, तर त्याला भावोदय आणि तो कोप रसपदवीप्रत पोचण्याआधीच नाहीसा होण्यास काही कारण झाले. तर भावशांती असे त्यास म्हणता येते. प्रेम आणि रोष या दोहोंचाही सारखाच आविष्कार एकाच वेळी होत असल्याचे दिसत असल्यास त्याला भावसंधी आणि दोहोंपेक्षा अधिक भाव−उदा., दुःख, धैर्य, शंका, क्रोध, औत्सुक्य, निराशा−या सर्वांचेच चित्रण एकाच संदर्भात लागोपाठ होत असल्यास त्याला भाव शबलता अशी नावे सुचविण्यात आली आहेत. कोणताही एक भाव उत्कट न होता वास्तवात अनुभवास येणारी भावांची चलबिचल हीही काव्यात चित्रित होणे शक्य असल्याने त्यांची व्यवस्था याप्रकारे करण्यात आली आहे.

मूळ आठ रसांत प्रत्यक्ष काटछाट करण्याचे प्रयत्‍न पूर्वी झाले नसले, तरी एक रस इतरांपेक्षा श्रेष्ठ असे सांगण्याचे प्रयत्‍न मात्र झाले होते. भोजाने शृंगाराला प्राधान्य दिले; अभिनवगुप्ताने शांताचे महत्त्व मानले; मधुसूदनसरस्वती यांनी मुळात भक्तिरसाला नसलेले स्थान देऊन त्याचा विशेष गौरव केला; नारायण नावाच्या पंडिताने अद्‌भुत  हाच इतरांच्या मुळाशी असतो असे म्हटले. मराठीतही खाडिलकरांनी शृंगार हा रसांचा राजा मानला; तर केळकरांनी हास्य हा रसराज असल्याचे प्रतिपादन केले. गोविंद कवी वीरालाच प्राधान्य देत. यातून रसांचा गौणप्रधानभाव निर्माण होऊन त्यांची एक श्रेणीच लावून देण्याचा प्रयत्‍न अलीकडे के. ना. वाटवे यांनी केला आहे. शृंगार, करूण, वीर असा पहिल्या तीन रसांचा क्रम लावून दिल्यावर हास्यात भावनांश कमी, भक्तीची व्याप्ती धर्मप्रवण लोकांपुरती मर्यादीत, शांत हा मुमुक्षुजनांनाच प्रिय, अशी कारणे हे रस वरील तीन रसांपेक्षा गौण का म्हणावयाचे, याबाबत दिली आहेत.

शृंगार हा अत्यंत आस्वाद्य, म्हणजेच उत्कट, संमिश्र, व्यापक व सार्वजनामिमत असतो, म्हणून तो सर्वांत प्रभावी व श्रेष्ठ ठरतो असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे रसांचा गौणप्रधानभाव या कसोटींवरून ठरतो, असे निष्पन्न होते, करूण व वीर हेही इतरांपेक्षा श्रेष्ठ का, याची आणखीही कारणे त्यांनी दिली आहेत. मूळ रस हा एकच असता भावभेदाने त्यात भेद होतात, ही भूमिका स्वीकारल्यावर रसांत अनेकत्व आले आणि अनेकत्व मान्य केल्यावर गौणप्रधानभावही ओघानेच आला. पण याबावत भिन्न रुचींना भरपूर वाव आहे, हे मान्यच करावयास पाहिजे.

रसव्यवस्थेचा प्रवर्तक भरत हा मानला गेला असला तरी, त्याच्या आधी द्रुहिणाची आणि वासुकीची अशा दोन परंपरा याबाबत होत्या, असे दिसते. द्रुहिण हा आठ रस मानीत असे, तर वासुकीने शांत रसालाही मान्यता दिली होती. या परंपरा भरताच्या काळी परिचित असल्याने बहुधा भरताने रसचर्चेचा विस्तार फार केला नाही. मूळ रसव्यवस्था ही नाट्यामधील असल्याने भामह, दंडी (पाचवे-सहावे शतक) या प्राचीन काव्यचर्चात्मक ग्रंथ रचणाऱ्यांनी आपल्या ग्रंथांतून त्याला विशेष महत्त्व दिले नाही; शिवाय ते अलंकारवादीच मानले जातात. वामन (आठवे शतक) हा रीतिवादी असल्याने  त्यानेही रसांचे महत्त्व मानले नाही. उद्भट व रुद्रट (आठवे-नववे शतक) हेही अलंकारवादी होते; तथापि त्यांनी आपल्या ग्रंथात रसांचा अधिक गौरव केला.

रसमताला विशेष महत्त्व ध्वनिवादी आनंदवर्धनानेच दिले (नववे शतक) ; कारण ध्वनीमध्ये रसध्वनीच प्रधान आहे हे त्याने जाणले होते. आनंदवर्धनाच्या हा उपपत्तीचाच पुरस्कार करून अभिनवगुप्ताने (दहावे शतक) आपल्या नाट्यशास्त्रावरील आणि ध्वन्यालोकावरील टीकांमध्ये सविस्तर उपपादन करून काव्यशस्त्रात रसाचे महत्त्व दृढ केले. पुढील मम्मट, हेमचंद्र, विश्वनाथ, जगन्नाथ यांच्या काव्यचर्चात्मक ग्रंथातून आणि धनंजय, शारदातनय यांच्या नाट्यावरील ग्रंथातून रसचर्चा ही महत्त्वाचा भाग होऊन बसली. विश्वनाथाने (चौदावे शतक) आपल्या साहित्यदर्पणात रसाला स्पष्टपणे काव्याच्या आत्म्याचे पद देऊन काव्याची व्याख्याच त्यावर आधारली (वाक्यंरसात्मकं काव्यम्). संस्कृतमधील रससिद्धांताचा हा थोडक्यात इतिहास आहे.

मराठीमध्ये प्राचीन काळात रसचर्चात्मक ग्रंथ झाले नाहीत. वाङ्मय नवरसात्मक असल्याचे उल्लेख मात्र येत. त्यात शांत आणि भक्ती या रसांना मान्यता मिळाली होती. किंबहुना यांनाच प्राधान्य मिळाले  होते. एकोणिसाव्या शतकात संस्कृतमधील रसचर्चा मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्‍न प्रथम (१८६८) दाजी शिवाजी प्रधान यांनी आपल्या रसमाधव या ग्रंथात केला व नंतर ब. क. माकोडे यांनी (१८९२) आपल्या रसप्रबोधामध्ये रसचर्चा केली. पहिला भाषांतररूप व दुसरा स्वतंत्र विवेचनात्मक आहे. यानंतरच्या−राजारामशास्त्री भागवत यांचा अलंकारमीमांसा, गणेशशास्त्री लेले यांचा साहित्यशास्त्र, ग. मो. गोरे यांचा अलंकारप्रकाश, लक्ष्मणशास्त्री लेले यांचा अलंकार चंद्रिका इ.-ग्रंधांमधून मुख्य विचार अलंकारांचा असला, तरी अनुषंगाने रसविषयक माहिती येऊन गेली आहे.

रससंख्येमध्ये कमीअधिक गणन करण्यापलीकडे त्यांतून याबाबत स्वतंत्र विचार फार आलेला नाही. रसविषयक स्वतंत्र विचाराला प्रारंभ श्री. नी. चापेकर यांनी काव्यचर्चेमध्ये (१९२२) केला. त्यानंतर विदर्भविणेच्या प्रस्तावनेत श्री. कृ. कोल्हटकर यांनी असाच एक प्रयत्‍न केला आहे. रसचर्चेस आधुनिक मानससास्त्रांचा आधार घेण्याचे प्रयत्‍न १९३० च्या सुमारास द. के. केळकर यांनी काव्यलोचनमध्ये आणि रा. श्री. जोग यांनी अभिनव काव्यप्रकाशामध्ये केला. पुढे के. ना. वाटवे यांनी केवळ रसचर्चेवरच लक्ष देऊन त्याच भूमिकेतून रसविमर्शमध्ये सविस्तर प्रपंच केला. याची प्रतिक्रिया म्हणूनच की काय, मा. त्र्यं. पटवर्धन यांनी ‘रसांची अडगळ’ (खडक आणि पाणी) या लेखांतून मूळ रसव्यवस्थेवरच आघात केले. आजच्या काव्यचर्चेत रसव्यवस्थेचा आधार क्वचितच घेतला जातो.

रसव्यवस्था ही मुळातच नाटक, महाकाव्ये, खंडकाव्ये त्यादींच्या संदर्भातच सांगितली गेली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. नायकनायिकादिकांच्या कथानकातच अष्टरसादिकांचा संपूर्ण परिपोष शक्य होता. काव्य हा शब्द पूर्वी अशा सर्वच वाङ्मयाला लावण्यात येई. पूर्वीही अमरू कविच्या स्फुट एकश्लोकी कवितेमध्येसुद्धा रसव्यवस्थेमधील भावोदय, भावसंधी, भावशबलता, भावशांती यांचे दर्शन होत असे. आधुनिक स्फुट भावकवितेमध्येही रसव्यवस्थेमधील या भागांचे दर्शन होऊ शकेल. भावनांच्या सूक्ष्म छटा म्हणजे संचारी भावांचेच प्रकार नाटक यांतून रसपरिपोष आजही झालेला दिसतो व स्फुट किवतेत भावोदयादी रसाच्या अंगांचे दर्शन होते. आजच्या वाङ्मयविचारात मानसशास्त्राचा आधार घेतला जातो. रसव्यवस्था हीही त्यावेळी ज्ञात व अभवास येत असलेल्या मानसिक प्रक्रियांवरच आधारलेली होती. व्यवस्था लावताना काही परिभाषा निर्माण होत असते. ती आपण आज योजीत नाही; योजिली पाहिजेच असे नाही. पण तेवढ्याने ती व्यवस्था व्यर्थ ठरत नाही; कदाचित अपुरी ठरेल. रसविचार व ध्वनिविचार हे भारतीयांचे स्वतंत्र असे कलासौंदर्याचे तत्त्वज्ञान आहे, हे मात्र निर्विवाद होय.

संदर्भ : १. जोशी, लक्ष्मणशास्त्री, आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धान्त, पुणे, १९७२.

२. देशपांडे, गणेश त्र्यंबक, भारतीय साहित्यशास्त्र, मुंबई, १९६३.

३. भरतमुनी; अनु. कंगले, र. पं. रस-भाव-विचार : नाट्यशास्त्र, अध्याय ६ व ७, मुंबई, १९७३.

४. वाटवे, के. ना. रसविमर्श, पुणे, १९६१.

लेखक/लेखिका :  रा. श्री. जोग

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate