অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजवाडा

राजवाडा

राजघराण्याचे निवासस्थान. अतिप्राचीन काळापासून जगभर ज्या विविध संस्कृती विकास पावल्या, त्यांत यागृह-वास्तुप्रकाराच्या वैविध्यपूर्ण व विपूल रचना झाल्याचे आढळून येते.

प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीत राजवाड्याची रचना झाली नाही; तथापि त्याच सुमारास टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यात उगम पावलेल्या व विकसित झालेल्या बॅबिलोनियन, सिरियन आणि इराणी(पर्शियन) संस्कृतीत विपुल प्रमाणात राजवाडे बांधलेले आढळतात. इ.स.पू. ३००० ते इ.स.पू. १०० या काळात पश्चिम आशियामध्ये वरील तीन प्रमुख संस्कृती विकसित झाल्या. मातीच्या विपुलतेमुळे विटा हेच प्रमुख वास्तुसाहित्य वापरले गेले.

पश्चिम आशियातील निमरूद येथे एसार-हडन राजाने बांधलेला राजवाडा (इ.स.पू. ८८३ –८६०) तसेच सार्‌गॉन राजाने खोर्सबाद येथे बांधलेला राजवाडा (इ.स.पू. ७२२ – ७०५) ह्या वास्तू म्हणजे राजाच्या सर्व वास्तुविषयक गरजांची संकुलेच म्हणावी लागतील. खोर्सबाद येथील राजवाडा ९ हेक्टर क्षेत्रात लहान-मोठ्या दालनांची रचना करून उंच चौथऱ्यावर बांधलेला आहे. यातील अलंकरणासाठी दगडाचा उपयोग केला आहे. स्तंभशीर्षे-एक पुरुष उंचीच्या दगडी लाद्या-नक्षीकाम करून सर्व प्रमुख दालनांत सभोवार उभारल्या आहेत.

इराणी संस्कृतीतील सर्वांत महत्वाचा राजवाडा म्हणजे पर्सेपलिस येथील होय. ह्यांची बांधणी इ. स. पू. ५१८ मध्ये थोरला डरायस ह्याने सुरू केली; पंरतु पहिला झर्कसीझ याने बहुतांशी रचना केली व त्यांनतर पहिल्या आर्टक्झर्क्सीसने इ. स. पू. ४६० मध्ये राजवाडा पूर्णत्वास नेला. वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा हा राजवाडा मानण्यात येतो. येथील स्तंभरचना बारा मी. उंचीची असून, शिरोभागी दोन बैलांचे आकार आसनस्थ आहेत. प्रमुख दरबारगृहात-‘अपादाना’त-असे ३६ स्तंभ आहेत. ईशान्येकडील प्रवेशद्वार म्हणजे ६ मी. रुंदीच्या भव्य पायऱ्या असून त्यांच्या दुतर्फा भिंतीवर मानवाकारी शिल्पे कोरली आहेत. या जिन्याची प्रत्येक पायरी कमी उंचीची व जास्त रुंद केल्यामुळे त्यावरून घोडेसुद्धा चढू शकतात. यास ‘स्टेअरवे ऑफ ट्रीपायलॅन’ संबोधण्यात येते. आर्टक्झर्क्सीसने सिंहासन-दालनाची शेवटी रचना केली. ६८·५८मी. (२२५ फुट) चौरसाकृती दालनास ‘शतस्तंभगृह’ (हॉल ऑफ हंड्रेड कॉलम्स) संबोधण्यात येते. अवकाशरचनेबरोबरच या राजवाड्यातील विविध प्रकारची शिल्परचना आजही दिपवून टाकणारी वाटते.

इराणमधील फिरूझाबाद, बिशापूर, टेसफान येथेही इ. स. २६० ते ५८० च्या दरम्यान राजवाडे बांधले गेले. यांत घुमटरचना प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण आहे. टेसफान येथील प्रवेशद्वाराची घुमटकमान २५·३० मी (८३ फुट) रुंद आणि ३६·५७ मी (१२० फुट) उंच आहे. आज वरील तीन राजवाडे पडझड झालेल्या भग्नावस्थेत अवशिष्ट आहेत.

प्राचीन ग्रीसमधील क्रीट बेटावरील नॉसस  येथील मिनॉसच्या भव्य राजप्रासादाची (इ. स. पू. सु. १४००) रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. त्याची लांबी सु. १२५ मी. व रुंदी सु. १४० मी. होती. मध्यभागीचा चौक २७ मी. रुंद व ५५ मी. लांब होता. त्याच्याभोवती निरनिराळी दालने होती. राजवाडा दुमजली असून, तळमजला दगडी भिंतीचा व वरील मजल्याच्या बांधकामात विटा आणि लाकूड याचा उपयोग केला होता. या राजवाड्यातील राणीच्या दालनाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होती. पूर्ण एकांत मिळण्यासाठी या दालनास खिडक्या नव्हता; तर प्रकाशयोजना शिरोभागी असलेल्या झरोक्यांतून केली होती. त्यापेक्षाही राणीच्या प्रसाधनगृहाची  रचना सुसज्ज म्हणावी लागेल. त्यात न्हाणीघर, शौचालय सांडपाण्याच्या व्यवस्थेसह असून, सांडपाण्याचा निचरा मातीच्या पाईपातून केला होता. सर्व राजवाड्यातील भिंतीना गिलावा करून त्यावर भित्तिचित्रे रंगवली होती. प्राचीन ग्रीकांनी टायरिन्झ आणि मायसीनी येथेही राजवाडे बांधले.

रोमन संस्कृतीत वास्तुकलेचा सर्वांगीण विकास झाला. रोममध्ये विविध राजांनी प्रदीर्घ कालावधीत (इ.स. ३ ते २१२) बांधून पूर्ण केलेला ‘पॅलेस ऑफ एम्परर्स’ हा राजवाडा आज भग्नावस्थेत असला तरी तत्कालीन वास्तुशैलीची वैशिष्ट्ये त्यात अद्यापही नजरेस पडतात. यानंतर इ. स. ३०० मध्ये स्पालतो येथे बांधलेला ‘पॅलेस ऑफ डायोक्लीशन’ हा राजवाडा समुद्रकिनारी असून त्याची भव्य रचना वास्तुकलादृष्ट्या अभ्यसनीय आहे. ३·२४ हे.(८ एकर) जागेत त्याची आयताकृती अवकाशरचना करण्यात आली होती. स्तंभरचना कॉरिंथियन पद्धतीची होती. २१३·३६ मी. (७०० फुट)लांब व १७३·७३ मी. (५७० फुट) रुंद परिसरात प्रासाद, दरबार, सज्जे इ. घटकांच्या अवकाशरचना अंतर्गत प्रांगणाभोवती केल्या होत्या. स्तंभरचना आणि कमानीचे विविध प्रकार यांमुळे अंतर्गत मार्ग सुशोभित व प्रमाणबद्ध भासत. आज हा राजवाडा भग्नावस्थेत आहे.

रोमन संस्कृतीत दुसऱ्या शतकात अनेक प्रासादतुल्य घरे बांधण्यात आली. त्यापैकी पाँपेई येथील ‘हाउस ऑफ पानसा’,‘हाउस ऑफ वेत्ती’ इ. उदाहरणे तत्कालीन प्रासादरचनेचे उत्कृष्ट नमुने मानण्यात येतात. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतरच्या अंधःकारयुगात (५०० ते १०००) यूरोपात सर्वत्र अशांतता माजली, त्याचा कलानिर्मितीवरही विपरीत परिणाम झाला. अकराव्या शतकानंतरयूरोपात ⇨गॉथिक कला विकसित झाली; पंरतु वास्तुकलादृष्ट्या तत्कालीन भर बहुतांशी कॅथीड्रल-चर्च-निर्मितीवरच होता. मात्र इटालियन गॉथिक शैलीत, व्हेनिस येथे १३०९ ते १४२७ च्या दरम्यान ‘डोजेस पॅलेस’ची निर्मिती झाली. या राजवाड्याचा १५२·४० मी. (५०० फुट) चा दुमजली दर्शनी भाग म्हणजे स्तंभशीर्ष, कमानी यांच्या आकारसौंदर्याचा उत्कृष्ट नमुना मानण्यात येतो.

सोळाव्या शतकात त्यावर तिसरा मजला बांधण्यात आला, तरी आकारसौंदर्याच्या पुनरुक्तीमुळे निर्माण झालेले खालच्या दोन मजल्यांचे रचनादृश्य अबाधित राहिले; किंबहुना समग्र वास्तू अधिक कलापूर्ण दिसू लागली. स्तंभ, त्यांची शीर्षे, कमानींचे भिन्न आकार, नक्षीदार खिडक्यांच्या पंक्ती आदी सर्व घटकाची रचना विविध रंगांच्या संगमरवरात केल्यामुळे आजही या वास्तूचे सौंदर्यं विलोभनीय वाटते. कालव्याच्या तीरावर बांधल्याने, व्हेनिसच्या इतर असंख्य वास्तुसमूहांप्रमाणेच ‘डोजेस पॅलेस’ चे सौंदर्यही खुलून दिसते. वास्तुकलेतील एक नाजुक आविष्कार म्हणून या राजवाड्याचा उल्लेख करता येईल.

यूरोपमध्ये प्रबोधनकाळात (१४०० ते १६००) सर्व कलांचे पुनरुज्जीवन झाले. इटलीतील फ्लॉरेन्स शहरात १४५८ ते १४६५ या कालवधीत बांधला गेलेला ‘पालाझ्झो पीत्ती’ हा राजवाडा माठीव संगीन दगडाच्या दर्शनी भागाची रचना व त्यावरील डोरिक, आयोनिक आणि कॉरिंथियन स्तंभरचना यांमुळे वैशिष्ट्यपूर्ण मानण्यात येतो. अनेक उत्तरकालीन वास्तूंवर त्याच्या रचनेचा प्रभाव पडलेला आढळतो. त्यांनतर फ्लॉरेन्समध्ये मायकेलोत्सी या वास्तुकाराने १४४४ ते १४६० मध्ये बांधलेला ‘पालाझ्झो रिक्वार्डी’ म्हणजे प्रबोधनकालीन वास्तुशैलीचा सर्वोत्कृष्ट आविष्कार मानला जातो. दर्शनी स्तंभहीन (ॲस्टिलर) दिसणाऱ्या राजवाड्यात माठीव संगीन दगडाचे बांधकाम, त्यात अर्धवर्तुळाकार कमानी असलेल्या नक्षीयुक्त खिडक्यांच्या रांगा आणि शिरोभागी तिसऱ्या मजल्यावर भारदस्त वाटणारी शिल्पबद्ध कंगणी या वैशिष्ट्यांमुळे या राजवाड्याचा दर्शनी भाग रेखीव, प्रमाणबद्ध वाटतो.

ह्याच रचनावैशिष्ट्यांशी तंतोतंत जुळणारा ‘पालाझ्झो स्ट्रॉटसी’ हा राजवाडा फ्लॉरेन्स येथे १४८९ ते १५३९ मध्ये बांधण्यात आला. पुढे आलेस्सी या वास्तुकाराने जेनोआ येथे १५६४ मध्ये पालाझ्झो म्युनिसिपेल या राजवाड्याची निर्मिती केली. ६०·९६ मी. (२०० फुट)लांब आणि २४·३८ (८० फुट) उंच अशा या दुमजली राजवाड्याची वैशिष्ट्ये म्हणजे तस्कन आणि डोरिक स्तंभरचनेत खिडक्यांच्या शिरोभागी गिलाव्यात निर्माण केलेल्या गोल त्रिकोणी कमानी, तसेच दोन्ही बाजूंना जोडलेले आणि कमानीयुक्त स्तंभावली असलेले देखणे ढेलज (लॉज्या) ही होत. या धर्तीवर रोम, मिलान या शहरांतही राजवाडे बांधले गेले.

प्रबोधनकाळात फ्रान्समध्ये चौथा, तेरावा व चौदावा लुई यांच्या कारकीर्दीत प्रचंड प्रमाणात राजवाडे बांधले गेले. दोन भिन्न कोनांतील छतरचना, खिडक्यांचे तळापासून छतापर्यंतचे प्रचंड आकार, अंतर्गत शिल्पमय सजावट, धुराड्यांचे मनोरे इ. वैशिष्ट्यांनी युक्त राजवाडे बांधले गेले. त्यापैकी ‘पॅलेस दी फाँतेन्ब्लो’(१५२८ –४०); ‘पॅलेस द्यू लूव्ह्र’ [लूव्ह्र],(१५४६–१८७८) पॅरिस;‘शातो दी मेझों’, पॅरिस (१६४२ –४६); ‘पॅलेस दी व्हर्साय’ (१६६१ –१७५६) हे राजवाडे वास्तुकलेच्या इतिहासात सर्वांगसुंदर गणले जातात.

व्हर्सायच्या राजवाड्यातील ‘गॅलेरे दे ग्लेसेस’(आरसेमहाल) हे मांसार या नामवंत वास्तुशिल्पज्ञाने निर्मिलेले दालन ७३·१५ मी. (२४० फुट) लांब, १०·३६ मी. (३४ फुट) रुंद आणि १३·१० मी. (४३ फुट)उंचीचे असे भव्य व नेत्रदीपक आहे. हिरव्या संगमरवराच्या कॉरिंथियन स्तंभपक्ती, छतघुमट, भिंतीवर विपुल कोरीव शिल्पे ही त्याची वैशिष्ट्ये होत. अवतीभवतीचा प्रचंड परिसर गर्द, वृक्षराई, हिरवळ, कारंजी, शिल्पे यांनी सजविला आहे. व्हर्सायसारखा प्रंचड, आखीव, वैभवशाली राजवाडा जगात इतरत्र सापडणे कठीण आहे.

इंग्लडमध्ये इनिगो जोन्स (१५७३ –१६५२)या विख्यात वास्तुशिल्पज्ञाने या काळात लंडन शहरात ‘व्हाइटहॉल पॅलेस’ची निर्मिती केली (१६१९ –२२). ३९०·१४ मी. (१,२८० फुट) लांबी व २८९·५६ मी. (९५० फुट) रुंदी असलेल्या या तीमजली प्रचंड वास्तूची रचना सात अंतर्गत प्रांगणाभोवती केली आहे. प्रबोधनकालीन अभिजात वास्तुवैशिष्ट्यांनी हा राजवाडा सजलेला आहे. खिडक्यांवरील कमानी कंगोरे, सपाट कंगोरे, कॉरिंथियन स्तंभ, संगीन दगडी भिती, प्रमाणबद्ध भव्य खिडक्या इ. वास्तुवैशिष्ट्ये या राजवाड्यात आढळतात. ऑक्सफर्डशर येथील ‘ब्लेनम पॅलेस’(१७०५ –२०) या राजवाड्याच्या अवकाशरचनेत तत्कालीन वास्तुवैशिष्ट्यांबरोबरच, तीन भुजांच्या मध्ये प्रांगण अशी रचना करण्यात आली आहे.

त्याभोवती रम्य बगीचा करून निसर्गसौंदर्याचा आसंमत राजवाड्यासाठी खास तयार केला आहे. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये १७९२ –१८२९ मध्ये जेम्स होबन वा वास्तुकाराने ‘व्हाइट-हाउस’ ह्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाची रचना केली. इंग्लिश ‘पाललाद्यीयन’ (प्रबोधनकालीन इटालियन वास्तुकार आन्द्रेआ पाललाद्यो  ह्याच्या वास्तुशैलीच्या प्रभावातून निर्माण झालेली शैली) शैलीत या राजवाड्याची रचना आहे. दुमजली आयोनिक शैलीचे स्तंभ अर्धवर्तुळाकार प्रवेशदालनाभोवती उभारले आहेत.

जगाच्या इतिहासात जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली, तसतशी राजघराणी अस्तंगत झाली आणि पर्यायाने राजवाड्यांची निर्मिती थंडावली.यूरोपातील राजवाड्यांच्या निर्मितीप्रमाणे पूर्वेकडील देशात तशा वास्तू तितक्या विविध शैलीनी विकसित झालेल्या दिसत नाहीत.चीनमध्ये १६०२ मध्ये ‘इंपीरिअल पॅलेस’ची रचना झाली. अवकाशरचनेतील आयताकृती साधेपणा, भव्य वक्राकार छतरचना, खुली दालने, पौर्वात्य काष्ठशिल्पांनी युक्त सजावट आणि भोवती फुलविलेला निसर्ग असे त्याचे स्वरूप आहे. याच धर्तीवर जपानमध्ये नारा, क्योटो येथेही राजवाडे बांधले गेले.

भारतात राजवाडे प्रामुख्याने तीन कालखंडात आणि शैलीत बांधले गेले. पहिला भारतीय संस्थानिकांचा कालखंड, दुसरा मोगल राज्यकर्त्यांचा आणि तिसरा ब्रिटिश राजवटीचा कालखंड. भारतीय संस्थानिकांनी साधारणपणे १५०० नंतर देशभर विविध ठिकाणी राजवाडे बाधंले. बहुपर्णी कमानी, चबुतरे, अष्टकोनी किंवा गोलाकार स्तंभरचना, पाषाणी छज्जे, सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या संगमरवरी जाळ्या, भव्य अवकाशरचना, भिंतीवरील गिलाव्यात केलेले जडावकाम, लांबट, षट्कोनी,  अष्टकोनी, गोल घुमटरचना व या विविध वास्तुघटकांमुळे, त्यांच्या संयोजनामुळे राजवाड्याच्या निर्मितीला लाभणारा खास हिंदुस्थानी शैलीचा भव्यपणा अशी, पहिल्या प्रकारातील भारतीय राजवाड्यांची गुणवैशिष्ट्ये सांगता येतील.

पुढे मोगल राज्यकर्त्यांनी त्यात इस्लामी शैलीची काही वैशिष्ट्ये मिसळून संमिश्र अशी ‘हिंदु-मोगल’ शैली रूढ केली. पुढे इंग्रज राज्यकर्त्यांनी यूरोपीय गॉथिक व प्रबोधनकालीन वास्तुशैलींत भारतात विविध ठिकाणी राजवाडे बांधले. त्यांच्या निर्मितीतही इंग्रजांनी अनेक ठिकाणी भारतीय वास्तुशैली-वैशिष्ट्यांचा आधार घेतलेला आढळतो.

महाराजा सवाई मानसिंग याने आपली राजधानी अंबरहून जयपूरला आणली आणि तेथे नव्याने राजवाडा बांधला. अंबर आणि जयपूर या दोन्ही ठिकाणच्या राजवाड्यांच्या निर्मितीत अस्सल भारतीय वास्तुशैलीची प्रगत रूपे निदर्शनास येतात. गिलाव्यात जडावकाम करून रंग, रंगीत पत्थर, शिल्प यांद्वारे राजावाड्याचा अंतर्भाग सजविण्याची कला जयपूर राजवाड्यात उच्च कोटीला पोहोचल्याचे दिसते. छज्जा, घुमट, कमानी, स्तंभरचना, जाळ्या इ. घटकांचे असंख्य कल्पक प्रकार इथे पहावयास सापडतात. वास्तू आणि शिल्प यांचा परस्परपूरक समन्वय जयपूर राजवाड्यात प्रत्ययास येतो.

उदयपूरच्या संस्थानिकांनी सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात तेथे ‘जगमंदिर’ प्रासादाची रचना केली. त्याचप्रमाणे तेथील ‘लेक पॅलेस’ ची निर्मिती सरोवरातील स्थानामुळे अद्वितीय अशी ठरते. त्यांनतर सु. शंभर वर्षांनी उदयपूर येथे ‘जगनिवास’ हा राजवाडा बांधण्यात आला; पंरतु त्यात जयपूर राजवाड्याची शैलीच आढळते. जोधपूर संस्थानातदेखील ‘रायकाबाग’ प्रासादाची निर्मिती याच सुमारास झाली. बिकानेर संस्थानात या शैलीचे राजवाडे राजा रायसिंगने बांधले. ग्वाल्हेर संस्थानातील ‘जय विलास’ प्रासाद मात्र इटालियन प्रबोधनकालीन शैलीत बांधला गेला आहे. दर्शनी भागात डोरिक पद्धतीच्या स्तंभरचनेचा प्रभाव या राजवाड्याला वेगळेपणा देतो. बडोदा संस्थानमधील ‘लक्ष्मीविलास’ प्रासाद हा इंडो-सार्सेनिक शैलीचा उत्कृष्ट आविष्कार मानण्यात येतो. बहुपर्णी उभट कमानीच्या रचनेमुळे या भव्य वास्तूला वेगळे रचनात्मक सौंदर्य लाभले आहे.

मोगल सम्राट अकबर ह्याने १५६९ ते ७५ मध्ये  फतेपुर सीक्री येथे नव्या राजधानीची निर्मिती केली. तेथील ‘जोधाबाई महाल’, ‘दिवाण-इ-खास’, ‘पंचमहाल’ या वास्तू म्हणजे हिंदू-मोगल शैलीचा डौलदार अविष्कार मानण्यात येतो. दिवाण-इ-खासमधील स्तंभशीर्ष हे केवळशिल्पकलेच्या दृष्टीनेच उत्कृष्ट नाही; तर ते वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातूनही सौंदर्यपूर्ण आहे. फतेपूर सीक्रीच्या वास्तूंच्या लाल पाषाणाची पुनरावृत्ती नंतर शाहजहान बादशहाने दिल्लीतील ‘लाल किल्ला’ या राजवाड्याच्या निर्मितीत, संगमरवर हे प्रमुख वास्तुसाहित्य वापरून केली आहे. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे बहुपर्णी कमानींच्या वर तिरकस छज्जांना आधारासाठी बांधलेला अर्ध्या महिरपींची (ब्रॅकेट)नक्षीबद्ध रचना होय.

दक्षिण भारतात म्हैसूर संस्थानचे राजे ओडेयर यांनी सोळाव्या शतकात म्हैसूरच्या राजवाड्याची निर्मिती केली. बहुपर्णी भव्य कमानींची रचना आणि प्रवेशद्वारासकट संपूर्ण वास्तुसंकुलाची प्रमाणबद्ध संकल्पना व रचना हे या राजवाड्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल. मध्यभागी सर्वोच्च जाणारे शिखर, दोन्ही टोकांना प्रमाणबद्ध घुमटांचे दोन दोन मनोरे, प्रवेशद्वारावरील भव्य बहुपर्णी कमानी, त्यावंरील पूरक असे चबुतरे या सर्वांच्या रचनेत आकारसौदर्यांच्या पुनरुक्तीमुळे एक रेखीव प्रमाणबद्ध वास्तुशिल्प साकार झाले आहे.

त्रावणकोरच्या संस्थानिकांनी १६०१ मध्ये त्रिवेंद्रमजवळ ‘पद्मनाथपुरम्’ प्रासादाची निर्मिती केली. या राजवाड्याचे वेगळेपण म्हणजे काष्ठ व पाषाण या दोन वास्तुसाहित्यांद्वारे आणि कौलांच्या छतरचनेमुळे वास्तुसमूहाला एक सधन आकारसौंदर्य लाभले आहे. पाषाणी स्तंभरचना, कौलारू छपराखाली नक्षीदार वासे, पर्णपट्ट, प्रवेशद्वारासाठी किंवा खिडक्यांसाठी त्रिकोणी झालेले छतभाग इ. वास्तुवैशिष्ट्यांमुळे पद्मनाथपुरम् राजवाडा साधा असूनही कलापूर्ण गणला जातो.

ब्रिटिशांच्या कारकीर्दीत त्यांनी प्रत्येक मोठ्या शहरी राजप्रासाद बांधले. ते गॉथिक किंवा प्रबोधनकालीन शैलीत बांधले. तथापि १९२९ मध्ये नवी दिल्ली येथे सध्याचे राष्ट्रपतिभवन बांधले, ते मात्र अस्सल भारतीय शैलीचा आधार घेऊन. त्याची रचना एडविन लट्येन्झ या वास्तुशिल्पज्ञाने केली आहे. त्याभोवतीचे मोगल उद्यान प्रेक्षणीय आहे. राष्ट्रपतिभवनावरील घुमट, स्तंभरचना हे घटक बौद्ध वास्तुशैलीवर आधारित आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात देशाच्या प्रमुखाचे निवासस्थान हे खाजगी होत गेले. अत्याधुनिक सुखसोयी, सुरक्षाव्यवस्था इत्यादींमुळे त्याच्या रचनेत पूर्वीच्या राजवाड्याएवढी भव्यता राहिली नाही व त्याची आवश्यकताही भासत नाही. कारण गरजा बदलल्या व कालानुरूप वास्तुकलेत आमूलाग्र फरक झाला.

 

 

 

 

संदर्भ: 1. Gaekwad, Fatesinghrao, Maharaja of Baroda; Fass, Virginia, The Palaces of India, London, 1980.

2. Sitwell Sacheverell, Great Palaces, London, 1964.

लेखिका :विजय दीक्षित

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate