অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामकिंकर बैज

रामकिंकर बैज

( १९१० – २ ऑगस्ट १९८०). आधुनिक भारतीय शिल्पकार. त्यांचा जन्म बंगालमधील बांकुरानजिक एका खेड्यात आदिवासी कुटुंबात झाला. बालवयातच मातापित्यांचे छत्र हरपल्यामुळे, उदरनिर्वाहासाठी ते खेड्यांतील जत्रांमधून खेळ करणाऱ्या एका नाटककंपनीत काम करू लागले. पडदे रंगविणे, इतर वस्तूंची सजावट करणे याबाबतींतील त्यांची कल्पकता पाहून १९२५ साली मॉडर्न रिव्ह्यू मासिकाचे संस्थापक-संपादक रामानंद चतर्जी यांनी त्यांना कलाभवन, ‘शांतिनिकेतन’ मध्ये नंदलाल बोस यांच्या हाताखाली उच्च कलाशिक्षणासाठी पाठविले. तिथे रामकिंकर यांनी हाताखाली उच्च कलाशिक्षणासाठी पाठविले. तिथे रामकिंकर यांनी चित्रकला व शिल्पकला या दोन्ही विषयांचा सखोल अभ्यास केला व त्याचबरोबरच नाट्य व संगीत यांचीही आवड जोपासली. तेथील निसर्गरम्य परिसरात व आसपासच्या संथाळ खेड्यांत भरपूर भ्रमण केल्यामुळे तेथील लोकजीवन व शैली यांच्याशी त्यांचा निकट परिचय झाला. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कलेत, विशेषतः व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व शिल्पाकृती यांच पडलेले दिसते.

त्यांचे कार्य शिल्पकलेच्या क्षेत्रात प्रामुख्याने लक्षणीय ठरले. शांतिनिकेतनमध्ये आलेल्या लिझा वॉन पॉट, मादाम मिलवर्ड, बेटमन प्रभृती नवविचारांच्या यूरोपीय शिल्पकारांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी त्यांना अल्पकाळ लाभली. यामुळेच शिल्पकलेतील आधुनिक तंत्रे व साधने त्यांना अवगत झाली. हळूहळू त्यांनी चित्रकलेपेक्षा शिल्पकलेवर जास्त लक्ष केंद्रित केले. प्रत्यक्ष कार्यशाळेत काम करण्यापेक्षा मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात काम करणे त्यांना आवडत असे. यामुळेच बहुधा त्यांच्या शिल्पाकृती व मोकळ्या वातावरणात बसविण्यासाठी केलेल्या, मानवसमूहांच्या शिल्पाकृती इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले. जोमदारपणा, लयदार बाह्यरेषा व उस्फूर्त चैतन्य त्यांच्या शिल्पांत आढळते. त्यांतील भरीव भाग व मोकळ्या जागा यांच्यातून सुरेख मांडणीचा प्रत्यय येतो. आदिवासी व ग्रामीण जनजीवनात आढळणारा जोष, एक प्रकारचा रासवट सुदृढपणा व जीवन आनंदाने जगण्याची वृत्ती त्यांच्या शिल्पाकृतींत प्रकट होते. जमिनीतून रोप उगवावे तितक्या सहजतेने त्यांचे शिल्प आकाराला आले असावे, असे भासते.

सुरुवातीच्या काळातील त्यांच्या शिल्पांत मिथुन (१९३१), संथाळ फॅमिली (१९३८), पोर्ट्रेट ऑफ अ लेडी (१९४९) ही शिल्पे विशेष प्रभावी वाटतात. या काळानंतर निग्रो-आफ्रिकी शिल्पांच्या प्रभावामुळे त्यांच्या शिल्पांत मावनाकृतींचे विरूपीकरण व अमूर्तीकरण दिसू लागले व हळूहळू ते तीव्र होत गेले. पोएट्स हेड (१९३८), सुजाता (१९३५), कच-देवयानी (१९२९), कॉम्पोझिशन (१९४३), स्पीड (१९५३) वगैरेंसारख्या शिल्पांत त्याचा प्रत्यय येतो. दगड, प्लॅस्टर, सिमेंट, काँक्रीट, ब्राँझ इ. विविध साधनांचा वापर करून त्यांनी शिल्पनिर्मिती केली. भारतीय कलेतील पारंपरिकतेपासून ते आधुनिकतेपर्यंतच्या संक्रमणकालातील सर्वांत महत्त्वपूर्ण आधुनिक शिल्पकार म्हणून त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

विश्वभारती विद्यापीठ, शांतिनिकेतन येथून शिल्प विषयाची पदविका घेतल्यावर ते तिथेच शिक्षक म्हणून काम करू लागले व शेवटी शिल्पविभागाचे प्रमुख होऊन निवृत्त झाले. त्यांच्या शिल्पाकृतींची स्वतंत्र प्रदर्शने नवी दिल्ली (१९४२), शांतिनिकेतन व कलकत्ता (१९६०) येथे भरविली गेली. ‘रेयालिते नुव्हॅल’, पॅरिस (१९५०-५१), ‘एशियन आर्ट एक्झिबिशन’, टोकिओ येथील प्रदर्शनांतही त्यांच्या शिल्पाकृती प्रदर्शित झाल्या. १९७६ साली ललित कला अकादमीने त्यांना समारंभपूर्वक अधिछात्रवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : Lalit Kala Akademi, Ramkinker, New Delhi, 1981.

लेखिका : नलिनी भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate