অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामेश्वरम्

रामेश्वरम्

भारतातील हिंदूंचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व चार धामांपैकी दक्षिण धाम. लोकसंख्या २७,९२८ (१९८१). हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम् जिल्ह्यातील रामेश्वरम् बेटावर, रामनाथपुरम् शहराच्या पूर्वेस सु. ५६ किमी.वर वसले आहे. या ठिकाणाला ‘देवनगर’ असेही म्हणतात. रामेश्वरम् हे सु. २६ किमी. लांबीचे व १·५ ते १४ किमी. रुंदीचे प्रवाळ बेट असून पूर्वी ते ‘पांबन’ या नावाने ओळखले जात होते. प्रथम हे मुख्य भूमीशी जोडलेले होते, पण भूहालचालीमुळे ते पांबन सामुद्रधुनीने वेगळे झाले आहे. या बेटावर रामेश्वरम्‌व्यतिरिक्त इतर अनेक धार्मिक स्थळे असून धनुष्कोडी हे प्रसिद्ध ठिकाण बेटाच्या आग्नेय टोकाला असून १९६४ च्या वादळात याचा बराच भाग वाहून गेला. रामेश्वरम् बेट मुख्य भूमीशी रस्त्याने व लोहमार्गाने जोडलेले असून येथून श्रीलंकेला जलमार्गाने वाहतूक चालते. बेटाच्या दक्षिण व ईशान्य भागांत मोती गोळा करण्याचा उद्योग आणि मत्स्यव्यवसाय चालतो.

या तीर्थक्षेत्राविषयी प्राचीन संस्कृत-प्राकृत वाङ्मयांत अनेक उल्लेख आढळतात. श्रीरामाने येथे स्थापन केलेल्या शिवलिंगामुळे याला रामेश्वरम् हे नाव पडले अशी वदंता आहे. शिवलिंगाच्या स्थापनेविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. रावणवधानंतर ब्रह्महत्येच्या पापक्षालनार्थ श्रीरामाने अगस्त्य ऋषींच्या सल्ल्याने येथे शिवलिंग स्थापण्याचा संकल्प केला. त्याकरिता हनुमंताला कैलासावर पाठविण्यात आले; परंतु त्याला उशीर झाला, मुहूर्तघटिका साधण्यासाठी सीतेने बनविलेल्या वालुकालिंगाची स्थापना रामाने केली. तेव्हा हनुमान निराश झाला. त्यावेळी रामाने हनुमानाला त्याने आणलेले दिव्य लिंग त्याजवळच स्थापण्याची आज्ञा केली. दिव्य शिवलिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय रामेश्वर दर्शनाचे यात्रेकरूंना फल मिळणार नाही, असे रामाने हनुमंताला आश्वासन दिल्याची एक कथा आहे. रामाने स्थापिलेले ते रामेश्वरम् अथवा रामनाथ व हनुमंत याने स्थापन केलेले ते काशीविश्वनाथ किंवा हनुमंदीश्वर या नावांनी ही शिवलिंगे ओळखली जातात. येथील मुख्य मंदिर रामलिंगस्वामी या नावाने प्रसिद्ध आहे.

बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर येथील प्रमुख व भव्य मंदिर बांधले आहे. हे मंदिर व त्याच्या परिसरातील लहान-मोठी मंदिरे द्राविड वास्तुशिल्पशैलीत, पूर्व-पश्चिम २५१·५ मी. लांब व दक्षिणोत्तर २०० मी. रुंद; अशा सहा उंच प्राकारांत ग्रॅनाइट व वालुकाश्मात बांधली आहेत. यांतील रामेश्वरम् (रामलिंगस्वामी) मंदिर हे भव्यता व विस्तार दृष्टींनी अद्वितीय आहे. मंदिराच्या चारी दिशांना भव्य व उंच गोपुरे पूर्णतः वालुकाश्मात बांधली असून त्यांतील दोन ३८·४ मी. उंच व जास्तीतजास्त दहा मजल्यांची आहेत. गोपुरांवर मूर्तिकाम असून मुख्य मंदिर गर्भगृह, रंगमंडप व सभागृह अशा तीन स्वतंत्र दालनांत विभागले आहे. भिंतींना लागून शिल्पपट्ट आहेत.येथील मूर्तिकामात भव्यता असूनही वैविध्य नाही. पौराणिक प्रतिमांव्यतिरिक्त नृत्यांगना व प्राणी यांची शिल्पे आहेत. मात्र त्यांत क्वचित एखादेच शिल्प लक्षणीय आढळते. उंच व एकसंध दगडी स्तंभावर छत असून रामेश्वरम् लिंगासमोर सु. ४ मी. उंचीची नंदीमूर्ती आहे. तीजवळ सोन्याच्या पत्र्याच्या मढविलेला गरुडस्तंभ आहे. रामेश्वरम्-व्यतिरिक्त येथे पार्वती, षडानन, गणपती व काशीविश्वेश्वर या देवतांची तसेच सप्तमातृका, नवग्रह, विशालाक्षी, अन्नपूर्णा, नंदिकेश्वर या उपदेवतांची मंदिरे आढळतात.

येथील बहुसंख्य मंदिरे रामनाडच्या पाळेगार सेतुपती घराण्याने बांधली आहेत. त्यांची बांधणी पंधराव्या ते सतराव्या शतकांमध्ये प्रामुख्याने झाली. उदयन सेतुपतीने मूळ मंदिर परराज शेखर या लंकाधिपतीच्या साहाय्याने १४१४ मध्ये बांधले. पुढे याच घराण्यातील सेतुपतींनी त्यात भर घातली. देवस्थानच्या पूजे अर्चेसाठी त्यांनी अग्रहार दिले असून पहिल्या पूजेचा मान या घराण्याकडे आहे. याविषयीचे अनेक शिलालेख मंदिरांत असून काही ताम्रपट उपलब्ध आहेत. या मंदिरांविषयी जेम्स फर्ग्युसन म्हणतो, ‘द्राविडियन वास्तुशिल्पातील परिपूर्ण वास्तू म्हणून या मंदिराकडे मी बोट दाखवेन; पण त्याच वेळी आकृतिबंधातील लक्षणीय दोषही यात दृग्गोचर होतात, हे नमूद केले पाहिजे’.

येथील धार्मिक स्थळांशी हनुमंताचे लंकेला उड्डाण, सेतुबंधन, सीतेचे अग्निदिव्य इ. रामायणातील कथांचा संबंध जोडला जातो. बेटावर सु. २२ तीर्थे असून त्यांपैकी राम, लक्ष्मण, सीता, अग्नी, माधव, गंधमादन, नील तसेच जटा तीर्थ, विल्लूरणी तीर्थ, भैरव तीर्थ ही प्रमुख आहेत. यांशिवाय रामझरोखा (टेकडीवरील मंदिर), साक्षी विनायक, एकांत राम मंदिर, नवनायकी अम्मन मंदिर, कोदंडरामस्वामी मंदिर इ. ठिकाणांनाही धार्मिक महत्त्व आहे. येथे महाशिवरात्र, वैशाखी पौर्णिमा या दिवशी मोठे उत्सव होत असून वसंतोत्सव, नवरात्र व आषाढातील आदी अमावासई (अमावास्या) इ. उत्सवही साजरे होतात. पर्यटकांसाठी येथे धर्मशाळादी सुविधा उपलब्ध आहेत.

लेखक / लेखिका : १) सु. र. देशपांडे

२) मा. ल. चौंडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate