অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लघुचित्रण

लघुचित्रण

भित्तिचित्रे व लघुचित्रे

भारतीय चित्रकलेमध्ये भित्तिचित्रे व लघुचित्रे असे दोन प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. भारतातील भित्तिचित्रांचे अजिंठा येथील इ.स. पू. दुसऱ्या-पहिल्या शतकांतले नमुने सर्वांत प्राचीन आहेत. आद्य लघुचित्रांची निर्मिती मात्र इ.स. दहाव्या शतकात झाली असावी, असे उपलब्ध पुराव्यावरून दिसून येते. हस्तलिखित पोथ्यांच्या माध्यमातून ही चित्रे प्रथमतः सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. पूर्व भारतातील पाल वंशाच्या राजा महीपालच्या कारकीर्दीतील प्रज्ञापारमिता (इ. स. ९८४) या बौद्ध हस्तलिखिताच्या सजावटीत ही आद्य लघुचित्रे तालपत्रावर प्रथमतः काढण्यात आली. ही चित्रे लिखित मजकुरात म्हणजे लिपिरेखनाच्या सोबत अलंकरणासारखी (डेकोरेशन) अंतर्भूत केली जायची. पुढील मोगल आणि राजपूत काळात तालपत्राऐवजी यासाठी कागदाचा उपयोग सुरू झाला. चित्रे काहीशी मोठ्या आकाराची होत गेली. त्यांना मजकुराहून वेगळे स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. कधी चित्रातच आवश्यक तेथे थोडासा मजकूर लिपिरेखनाच्या दिमाखासह येऊ लागला. लहान आकाराच्या चौकटीतील अशा चित्रांना ‘लघुचित्र’ अशी संज्ञा आज रूढ आहे.

धर्म, तत्त्वज्ञानाचा सर्वदूर प्रसार

धार्मिक आशय अतिशय सहजसुलभ पद्धतीने सर्वसामान्य जनांपर्यंत पोचवण्यात ही चित्रे यशस्वी ठरली. धर्म, तत्त्वज्ञानाचा सर्वदूर प्रसार होण्यासाठी हस्तलिखित पोथ्यांचा मार्गच जास्त सहजसुलभ व प्रभावी ठरणारा होता. या पोथ्यांतूनच प्रथमतः लघुचित्रे बहुजनसमाजापर्यंत पोहोचली. शिवाय भित्तिचित्रणाचे जटिल तंत्र, निर्मितीसाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी, अतिरिक्त तपशीलचित्रणावर द्यावा लागणारा भर या तुलनेत हस्तलिखितातील चित्रे आकाराने छोटी, सुटसुटीत, निर्मितीला तुलनात्मक दृष्ट्या सुलभ व नेमका प्रसंग आणि आशय स्पष्ट करणारी असल्याने ही लघुचित्रशैली प्रभावी ठरली व वेगाने विकसित होत गेली. लघुचित्रे आकाराने लहान असल्याने ती सहजतेने हाताळता येतात. तद्वतच पाणी, अग्नी व कीटक यांपासून त्यांचे रक्षण करणे आवश्यक असले, तरी त्यांची जोपासना करणे भित्तिचित्रांच्या तुलनेत जास्त सोपे आहे. परिणामी भारतीय लघुचित्रे आजही फार मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. भित्तिचित्राच्या शैलीपेक्षा ही हस्तलिखित पोथ्यांतील लघुचित्रशैली अनेक बाबतीत वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

भित्तिचित्रे दुरून पहावी लागतात. लघुचित्रे जवळ घेऊन पाहता येतात. स्वतःसोबत अन्यत्र नेता येतात. जवळ घेऊन पाहावयाची असल्याने वर्णनात्मक सूक्ष्म तपशील दाखवण्याची सोय येथे असते. भित्तिचित्रात फक्त चार-पाचच मृत्तिकारंग वापरता येतात. विशेषतः अजिंठा, बाघ येथील भित्तिलेपचित्रण-तंत्रात हे पाहावयास मिळते. म्हणजे हे रंगपात्र (पॅलेट) किंवा त्यातील वर्णमाला फार मर्यादित असते. लघुचित्रांचे रंगपात्र अत्यंत बहुरंगी, व्यापक असते. कुंचले वगैरे साधनेही सूक्ष्म तपशील चित्रित करण्यासाठी यथायोग्य असतात. मर्यादित चित्रक्षेत्रात अगदी निवडक घटनाप्रसंगांचे सूक्ष्म तपशीलांसह वर्णात्मक चित्रण करण्यासाठी लघुचित्रशैली अत्यंत उपकारक ठरली. भित्तिचित्राच्या अवाढव्य क्षेत्रात कथनात्मक चित्रण येत असे. त्यात घटना, प्रसंग एका पाठोपाठ एक मांडलेले असत. ही रीत लघुचित्रणात स्वीकार्य ठरली नाही. एकदोन मोजके प्रसंग घेणेच क्रमप्राप्त ठरले. किशनगढ शैलीत चित्रचौकट त्यामानाने मोठी असते. तेथे मात्र अनेक प्रसंग यथादर्शनीय भावाने संपृक्त होऊन येतात.

अकराव्या शतकात बंगाल व बिहार प्रांतांत पालवंशीय राजांच्या कारकीर्दीत कलेला फार मोठे आश्रयस्थान लाभले. नालंदा हे विद्येचे मोठे केंद्र होते. ग्रंथांची लाकडी वेष्टने आणि तालपत्रावरील हस्तलिखिते सर्वप्रथम पालशैलीतील लघुचित्रांनी सुशोभित केलेली आढळतात. पालवंशीय रामपाल व गोविंदपाल यांच्या कारकीर्दीतील हस्तलिखिते (१०९३) उल्लेखनीय आहेत. अकराव्या शतकातील लघुचित्रांची रचना अजिंठा शैलीची साधर्म्य दर्शविणारी आहे.

महावीराच्या जीवनावरील लघुचित्रे

महावीराच्या जीवनावर अनेक लघुचित्रे चित्रित तेराव्या शतकात आणि तदनंतरच्या काळातही जैन हस्तलिखितांत विशेषतः भद्रबाहूच्या कल्पसूत्रांत-महावीराच्या जीवनावर अनेक लघुचित्रे चित्रित केलेली आढळतात. ही लघुचित्रे ठराविक चित्रविषयक संकेतांनी रेखाटली आहेत. आयताकार पृष्ठावर चौकोनी आकारात ही चित्रे रेखाटली असून, राहिलेल्या भागात मजकूर असतो. तालपत्रावरील मानवाकृती वगैरेंच्या चित्रणावर अजिंठा शैलीचा प्रभाव दिसतो. उलट जैन लघुचित्रशैलीने लोकचित्रशैलीतून सारसत्त्व आत्मसात केलेले दिसते. या चित्रातील रेखनात लिपिरेखनातील रेषेचा वळणदारपणा अंगभूत असतो. लिपिरेखित मजकूर आणि चित्र यांचा येथे आकृति-मिलाफ होतो. रेखन आणि चित्रक्षेत्रविभाजन या दृष्टीने सकृत्‌दर्शनी काहीसा तोचतोपणा असल्यासारखे भासते. मात्र रक्त, पीत, नील, धवल या रंगांवर होणारे संस्कार आणि त्यांच्या संयोजनातून निष्पन्न होणारे परस्पर नातेबंध नीट लक्षात घेतले तर प्रत्येक निळा, प्रत्येक तांबडा, पांढरा इ. रंग नित्यनवीन समृद्धता लेवून आले आहेत हे ध्यानी येते. लाल, पिवळ्या किंवा सोनेरी वर्खाच्या पृष्ठलेपनावर ही चित्रे काढली जात व अधूनमधून हा रंग तसाच सोडला जाई. गोलाकार चेहरा, टोकदार नाक, तसेच चेहऱ्याच्या काहीसे बाहेर आलेल्या रेषांनी अंकित केलेले, टपोरे उठावदार डोळे ही जैन चित्रांकनाची वैशिष्ट्ये होत. लोककलेच्या अंगाने वाढल्यामुळे जैन शैलीतील रेषेत विलक्षण निरागसता, निर्व्याजता आलेली आहे. रक्त, पीत, नील, धवल या रंगांची आक्रमक तीव्रता नाहीसी करून अंतर्मुख शोभायमानता साध्य करण्याचे कसब जैन शैलीतील चित्रकारांनी दाखवले. ते जगन्मान्य झाले आहे [जैन कला].

मोगल शैली

चौदाव्या शतकामध्ये चित्रे काढण्यासाठी कागदाचा वापर करण्यात येऊ लागला. ही प्रथा इराणकडून आली. त्याचबरोबर पोथीच्या आकाराचे असलेले ग्रंथ पारशी पद्धतीने उभ्या आकारात तयार होऊ लागले. पंधराव्या शतकात राजस्थानमध्ये जैन शैलीच्या धर्तीवर लघुचित्रांची निर्मिती होत असे. बाबर, हुमायूनसारख्या कलाप्रेमी बादशहांच्या पदरी इराणी (पर्शियन) कलावंत होते. अकबराने इराणी चित्रकारांप्रमाणेच गुजरात, राजस्थान, दख्खन आणि काश्मीर येथील स्थानिक चित्रकारांनाही आश्रय दिला. त्यामुळे मोगल शैलीत इराणी व भारतीय चित्रकारांच्या कलावैशिष्ट्यांचा संगम झाला. सोळाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतची भारतीय चित्रकला मोगल शैलीने प्रभावित झालेली दिसून येते. दैनंदिन जीवनातील सर्वसाधारण प्रसंग आणि बारकावे चित्रित करण्यात येऊ लागले. याच सुमारास लिखाणाचा भाग वर्ज्य होऊन केवळ चित्रासाठी चित्रनिर्मिती होऊ लागली. राजांच्या आवडी-अभिरुचींनुसार विषय चित्रित केले जाऊ लागले. राजदरबार, शिकार, लढाई तसेच सुखलोलुप सरंजामी वृत्तीचे दर्शन या चित्रातून होऊ लागले. प्रसंग वा घटना यथातथ्य चित्रित होऊ लागल्या. नाजुक, सफाईदार आकृत्यांचे रेखांकन तसेच पातळ व फिक्या रंगांचा भावपूर्ण उपयोग या चित्रांतून दिसतो. याच सुमारास बादशहाला भेटीदाखल येणाऱ्या कलावस्तूंत पाश्चात्त्य कलाकृतींचाही समावेश असे. त्यामुळे द्विमिती चित्राची मर्यादा कायम ठेवून पाश्चात्त्य चित्रकलेतील छाया-भास, निसर्गचित्रण आणि यथा दर्शन यांचा अंगीकार मोगल चित्रशैलीत काही अंशी होऊ लागला. अकबरनामा, बाबरनामा, शाहनामा इ. ग्रंथांतील चित्रे आशयानुरूप असून कलात्मकतेतही उत्कृष्ट आहेत. अकबराच्या काळात योगवासिष्ट या तत्त्वज्ञानपर ग्रंथातील कथाप्रसंंगांवरही लघुचित्रे रंगविली गेली. जहांगिराच्या कारकीर्दीत मोगल शैलीतील लघुचित्रांत व्यक्तिचित्रांचा अधिक विकास झाला. याच काळात पशुपक्षी, फळे, फुले यांचे उत्कृष्ट चित्रण असलेल्या कलाकृती निर्माण झाल्या. अत्यंत नाजुक, रेखीव व प्रसन्न रंगसंगतीने नटलेली लघुचित्रे उस्ताद मन्सूर नावाच्या चित्रकाराने चित्रित केली आहेत.

मोगल चित्रांसाठी वापरला जाणारा कागद हा इराणहून आणला जात असे. या चित्रणाचे विशिष्ट तंत्र होते. प्रथम योग्य आकाराचा कागद घेऊन त्या कागदाला एक मिश्रण लावून तो गुळगुळीत करीत व मग आरेखन करून त्यावर पातळ पांढऱ्या रंगाचा हात देत. या पातळ रंगातून दिसणाऱ्या अस्पष्ट रेखांकनात मग वेगवेगळे रंग भरीत. हेही रंग अतिशय पातळ व फिके असत. ही धुवणपद्धती (वॉश) होय. पांढरा, पिवळा, तांबडा हे रंग प्रामुख्याने वापरले जात. रंगभरणी झाल्यावर त्यावर गर्द रंगाची बाह्यरेषा (आउटलाइन) काढीत. अगदी शेवटी सोनेरी रंगाने काम करीत. हा सोनेरी रंग सुवर्णभस्मापासून  तयार केला जाई. रेखांकनासाठी, रंगभरणीसाठी वेगवेगळ्या जाडीचे कुंचले वापरले जात. अगदी नाजुक रेषेसाठी तितका बारीक कुंचला वापरला जाई. हे कुंचले खारीच्या केसांपासून तयार केले जात. चित्राची पार्श्वभूमी रंगविताना निसर्गाचे सांकेतिक व प्रतीकात्मक चित्रण केलेले दिसते. त्यातून विशिष्ट भावावस्था व त्याला पूरक अशी वातावरणनिर्मिती साधण्याचा प्रयत्न दिसतो. उदा., विरहिणी नायिकेचे चित्रण करताना पाठीमागे पर्णहीन वृक्ष, काळेकुट्ट ढग, वादळी वाऱ्याचे आभास वगैरे दाखविले जातात. चित्रात निसर्गाप्रमाणेच वास्तूचे चित्रणही आढळते. त्यातून तत्कालीन वास्तुवैशिष्ट्ये दृग्गोचर होतात. पशुपक्ष्यांच्या तपशीलवार चित्रणात सूक्ष्म निरीक्षण व अभ्यास दिसून येतो. त्यात पक्ष्याची शरीररचना, डौल आदींचे सूक्ष्म निरीक्षण आढळते. यथादर्शनाचा वापर असला, तरी तो वास्तवानुसारी नाही. सोनेरी रंगाचा वापर वैशिष्ट्यपूर्ण होता.

याच सुमारास (सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध) दक्षिण भारतात दख्खनी शैली उदयाला आली. विजापूर, हैदराबाद व गोवळकोंडा या ठिकाणी ही शैली विकास पावली. मोगल शैलीचा प्रभाव तसेच इराणी व स्थानिक लोकशैलींचा मिलाफ असलेल्या या शैलीने स्वतःची पृथगात्मक वैशिष्ट्ये निर्माण केली. दुसऱ्या इब्राहिम आदिलशहाच्या काळातील विजापूरमधील अशा चित्रांत जोरदार रेखांकन, उंच मनुष्याकृती व वैशिष्ट्यपूर्ण उठावदार रंगलेपन जाणवते. जोमदारपणामुळे ही शैली दक्षिणी लघुचित्रशैलींची प्रातिनिधिक ठरते.

सोळाव्या शतकात माळव्याची राजधानी असलेल्या मांडूवर मोगलांनी आक्रमण केले. त्यामुळे मांडूच्या प्रभावी शैलीत काम करणारे हिंदू चित्रकार मांडू सोडून राजस्थानातील वेगवेगळ्या राज्यांतून राहू लागले. त्यामुळे मांडू चित्रशैली खेडोपाडी गेली. पोशाखाचा ठसठशीत रेखीवपणा, सपाट व तीव्र उत्कट रंगांतील पार्श्वभूमी, गुंडाळी केल्यासारखी ढगांची रचना आणि सरळ उभ्या बुंध्यांची झाडे ही मांडू चित्रशैलीची ठळक वैशिष्ट्ये होत. बुंदेलखंडामधील ओर्छा येथील राजा इंदरजितसिंह याने याच काळात केशवदासाच्या रसिकप्रिया ग्रंथावर चित्ररचना करवून घेतली.

मेवाड शैली

राणा प्रतापसिंहाच्या मेवाड प्रांतात एका वेगळ्या शैलीची निर्मिती झाली. या शैलीत सतराव्या शतकात नसरूद्दिन नावाच्या मुसलमान चित्रकाराने रागमाला चित्रांची भर टाकली. मेवाड शैलीतील चित्रांमध्ये उभे-आडवे आयताकृती विभाग करून झाडे, पशुपक्षी आणि मनुष्याकृती यांनी एकसंधपणा आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. कृष्णभक्तीपर आविष्कार हे मेवाड शैलीचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. सतराव्या शतकाच्या मध्यकाळात राणा जगतसिंहाच्या कारकीर्दीत मेवाड चित्रशैलीमध्ये असंख्य चित्रांची भर पडली, त्यातूनच उदयपूर शैली निर्माण झाली.

मेवाडची राजधानी उदयपूर असली, तरी चितोड, अबू आणि बडोदे येथेही राजस्थानी शैलीची चित्रे निर्माण होत होती. भारतीय काव्यातील सांकेतिक कल्पनांनुसार पाऊस, ढग आणि विद्युल्लता ही प्रेमाची प्रतीके मानली जातात. पावसाच्या पाण्यासाठी तहानेलेला मोर हे प्रेमिकांच्या आतुरतेचे प्रतीक होय. मेवाड-उदयपूर चित्रशैलीत अशा प्रतीकांची रेलचेल दिसून येते. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्व राजस्थानमधील बुंदी येथे मेवाड शैली प्रसृत झाली. बुंदी राजांचे मोगल दरबारशी सख्य असल्यामुळे या शैलीवर मोगल शैलीचा बराच परिणाम झालेला दिसून येतो. प्रभावी शुद्ध रंग, पाण्यातील तरंगचित्रण आणि स्त्री-आकृतीची कमनीयता ही बुंदी शैलीची प्रधान वैशिष्ट्ये होत.

दिल्ली दरबारातील चित्रकला संपुष्टात

औरंगजेबाच्या कारकीर्दीत दिल्ली दरबारातील चित्रकला संपुष्टात आली. दरबारातील चित्रकारांना अन्य ठिकाणी जावे लागले. जैसलमीर, बिकानेर या राज्यांतून हे चित्रकार राहू लागले. त्यामुळे राजस्थानी शैलीवर मोगल शैलीचा फार मोठा प्रभाव दिसू लागला. अठराव्या शतकात राजा जगसिंह याच्या कारकीर्दीत बिकानेर शैलीला नवे रूप लाभले. चित्राच्या अधोभागी चित्राचा प्रमुख विषय, विषयानुरुप घोड्याचे ऐटबाज चित्रण, मानवाकृतीचे सुबक रेखांकन, निरव शांततामय वातावरण, तर चित्राच्या शिरोभागी पार्श्वभूमी व त्यात तत्कालीन यथादर्शनाच्या संकेताना अनुसरून प्रासादांची व झाडांची रचना ही वैशिष्ट्ये या शैलीत प्रामुख्याने आढळून येतात.

जोधपूर शैलीचा उदय

अठराव्या शतकाच्या मध्यावधीत जोधपूर शैलीचा उदय झाला. रेखीव मनुष्याकृती, चेहऱ्याचे केवळ डाव्या किंवा उजव्या एकाच बाजूचे पार्श्वचित्रण (प्रोफाइल); राजधानी फेट्यांचे वैविध्यपूर्ण रेखाटन, पक्ष्यांशी खेळणाऱ्या अथवा पतंग उडवत असलेल्या स्त्रिया अशा चित्रांतून पहावयास मिळतात. जोधपूर आणि जयपूर यांना जोडणाऱ्या किशनगढ राज्यात अठराव्या शतकात राजा सावंतसिंह हा महान कृष्णभक्त होऊन गेला. राजाश्रयामुळे कृष्णचरित्रावर आधारित अनेक चित्रे किशनगढला निर्माण झाली. त्यांत उत्कृष्ट असे राधेचे एक चित्र किशनगढच्या महाराजांच्या संग्रहात आहे. लंब मत्स्याकृती नेत्र, धनुष्याकृती भुवया, वस्त्रांची पारदर्शकता, आकृतीची लयबद्धता आणि काव्यात्मता या गुणांनी नटलेले राधेचे हे चित्र दिल्ली दरबारात चित्रकलेचे धडे घेतलेल्या निहालचंदाने रेखाटले आहे.

याच सुमारास राजस्थानमधील कोटा संस्थानात एका वेगळ्या शैलीचा आविष्कार झाला. आगळ्या, अद्‌भुत काव्यप्रकारावर आधारलेली चित्रे कोटा शैलीत निर्माण झाली. भावनात्मक आणि जोरकस चित्रणाने नटलेली राजस्थानी चित्रशैली मोगल शैलीच्या नेटकेपणाच्या आहारी गेली होती. कोटा शैली अशाच रेखीवपणाने ओथंबलेली आहे. शिकारीच्या एका चित्रणात वन्य प्राणी, झाडेझुडपे, टेकड्या आणि पत्थर इ. घटक अत्यंत बारकाव्याने रेखलेले असून एक वैचित्र्यपूर्ण लयबद्धता या चित्रातून प्रतीत होते. फ्रेंच चित्रकार रूसो याच्या चित्रांची आठवण हे चित्र करून देते.

चित्रकलेचे आध्यात्मिक महत्त्व

भारतीय जनमानसात रूजलेले होते. याच भावनेतून राम आणि कृष्ण यांच्या जीवनावर चित्रे निर्माण झाली. रामायण, महाभारत, तसेच विष्णुपुराण, भागवतपुराण इ. धार्मिक ग्रंथांतील अनेक प्रसंग चित्रित करण्यात येत. रामलीलांमधून सच्चरित्र आणि कृष्णलीलांमधून उत्कट प्रेम यांचे दर्शन घडविणे, हे या चित्रांमागील प्रमुख उद्दिष्ट असावे. कृष्णस्तुतीपर रचलेल्या गीतगोविंदच्या चित्रणात पावित्र्य, भक्ती आणि समर्पण हे भाव आढळतात. तुलसीदास सूरदास, मीराबाई आदींच्या काव्यांतून व्यक्त होणारी उत्कटता या लघुचित्रांतूनही आविष्कृत झालेली पहायला मिळते. स्त्रीसौंदर्याच्या आविष्काराची जणू परिसीमाच या कलावंतांनी लघुचित्रांतून गाठली.

भारतीय संगीतातील रागांची रूपे चित्रित करणारी लघुचित्रे सर्वसाधारणपणे सोळाव्या ते अठराव्या शतकापर्यंत निर्माण झाली. ती रागमालाविषयक ग्रंथांवर आधारित आहेत. या ग्रंथकारांनी आपापल्या परीने संगीताचे शास्त्र मांडले. त्यानुसार काही मुख्य रागांना कुटुंबप्रमुखाचे, तर अन्य रागांना त्यांच्या पत्नी-पुत्र-सुना यांचे स्थान दिले गेले. पण त्यांच्या तपशीलांबाबत ग्रंथकारांत मतभिन्नता आढळते. रागमालाकारांनी आपल्या काव्यमय ग्रंथांतून विविध रागांविषयी संकेत किवा रागध्याने लिहिली. या रागध्यानांना अनुसरुन तत्कालीन चित्रकारांनी राग-रागिण्यांची अनेकविध चित्रे रंगवली. उदा., भैरवी रागाच्या चित्रणात त्याच्या काव्यसंकेतानुरूप शिवलिंगाची पूजा करणारी स्त्री दिसते; तर जलधर रागाच्या चित्रणात नायिकेने दिलेल्या खुज्यातून (जलधर) नायक पाणी पीत आहे, असे दृश्य दिसते. कुसुम रागाच्या चित्रणात नायक फुलांचा धनुष्यबाण रोखून नायिकेला मदनबाण मारीत असल्याचे दाखवले आहे. तोडी रागाच्या चित्रणात वीणावादक स्त्री व तिच्याभोवती बागडणारी हरिणे दाखवातीत, असा सामान्य संकेत आहे. मात्र राग-रागिण्यांच्या या वर्णनांना संगीताचा  पक्का शास्त्राधार नाही. तसेच कित्येकदा या कविसंकेतांत विसंगती व अर्थहीनताही आढळते; तद्धतच हे कविसंकेत चितारताना काही ठिकाणी चित्रकारांचाही गोंधळ उडालेला दिसतो. मात्र पांढऱ्या हत्तीची शिकार चित्रित करणाऱ्या, तत्कालीन ‘कानडा’ या चित्रातील भाववृत्ती आजच्या काळात रूढ असलेल्या ‘दरबारी कानडा’ या रागाच्या भाववृत्तीशी बव्हंशी जुळणारी आहे. रतिसुखात विघ्न आणणाऱ्या कोंबड्याला बाण मारणाऱ्या नायकाचे विभास रागाचे चित्र; विरहिणी नायिका व तिच्याभोवतीचे हर्षोत्फुल्ल मोर चित्रित करणारे कुकुभ रागिणीचे चित्र, तद्वतच मेवाड शैलीतील मारू रागिणीचे चित्र इ. लघुचित्रे उल्लेखनीय आहेत.

राजस्थानी शैलीत प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची व्यक्तिचित्रे

मोगल शैलीच्या प्रभावाने राजस्थानी शैलीत प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची व्यक्तिचित्रे रेखाटली गेली. घोड्याचे चित्रण अशा व्यक्तिचित्रणात फार निपुणतेने करण्यात येई. केवळ घोड्याच्या चित्रणातून राजपुतांचा दिमाख दिसावा, हातातील फुले व स्त्रीसौंदर्याचे चित्रण यांतून रसिकता प्रतीत व्हावी, तलवारीने युद्धातील निपुणता प्रकट व्हावी, पार्श्वभूमीतील छोट्या मनुष्याकृतींनी चित्रित नायक अधिक उदात्त, भव्य वाटावा, अशा प्रकारे चित्ररचनेतून प्रतीकात्मक आशय व्यक्त करणारी योजकता त्यामागे दिसून येते. कित्येकदा ऐतिहासिक घटनांच्या चित्रणालाही महत्त्व प्राप्त झाले. अशा चित्रांतून नायक कधी प्रिय व्यक्तीच्या सान्निध्यात, तर कधी संगीतात रमलेला, कधी शिकारीच्या शोधात, तर कधी अश्वारूढ असा दर्शवला जाई. जेवढ्या बारकाव्याने अशी व्यक्तिचित्रे रेखाटली जात, तेवढ्याच बारकाव्याने पशुपक्षी आणि निसर्ग यांचे चित्रण केले जात असे.

राजपूत लघुचित्रणात वर उल्लेखिलेली राजस्थान शैली व पहाडी  शैली असे दोन प्रमुख प्रकार आहेत. डोंगराळ प्रांतात पसरलेल्या बसोली प्रदेशात कलानिर्मिती बराच काळ होत राहिली. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झालेली बसोली शैलीतील गीतगोविंदच्या प्रतीतील चित्रे वर्ण्य भावाशी अधिक तादात्म्यपूर्ण व उत्कट वाटतात. सतराव्या-अठराव्या शतकांत डोंगराळ प्रदेशातील जम्मू, चंबा, गढवाल आणि कांग्रा खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर चित्रनिर्मिती झाली. ही चित्ररचना पहाडी कलम म्हणून प्रसिद्ध आहे. गढवालच्या भोलारामची चित्रे कांग्रा शैलीत पहायला मिळतात. अत्यंत भावनाप्रधान आणि संवेदनाक्षम चित्ररचना कांग्रा शैलीत दिसून येते. केशवदासाची रसिकप्रिया, अष्टनायिका आणि कृष्णलीला हे या शैलीतील प्रमुख विषय होते. नल-दमयंती व हभीर हठ या प्रणयकथा तसेच शृंगारात्मक चित्रणदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. समुद्ध रेखांकन, गडद रंग, नाजुक मानवाकृतिचित्रण आणि मत्स्याकृती डोळे ही या शैलीची वैशिष्ट्ये होत. भावदर्शी व काव्यात्म चित्रण, उठावदार रंगांची प्रसन्न अभिव्यक्ती, नाजुक व भावपूर्ण रेषा आणि प्रसंगांची रमणीयता या सर्व गुणांनी पहाडी चित्रकला नटली आहे.

तांत्रिक धर्मसंप्रदायामध्ये तात्त्विक कल्पनांच्या विशदीकरणासाठी जी चित्रनिर्मिती झाली, तीत कांग्रा, राजस्थानी, जैन इ. शैलींतील लघुचित्रेही आढळतात. या चित्रांत मानवाकृतींप्रमाणेच भौमितिक आकारांवर आधारलेल्या केवलाकृती यंत्रचित्रांचाही अंतर्भाव होतो. [तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म (तांत्रिक कला)].

कांग्रा शैलीचा वारसा घेऊन पंजाबमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी शीख पंथीयांमध्ये आणखी एक चित्रशैली निर्माण झाली. शीख पंथातील पौराणिक कथांच्या अभावामुळे या शैलीत शिखांचे गुरू आणि सरदारप्रमुख यांची व्यक्तिचित्रेच केवळ निर्माण झाली. शीख पद्धतीचा पोषाख व नीटस रेखांकन या चित्रांतून प्रामुख्याने नजरेत भरते.

भारतातील राजसत्तांच्या ऱ्हास

भारतातील राजसत्तांच्या ऱ्हासाबरोबरच लघुचित्रशैलींचाही ऱ्हास होत गेला. एकोणिसाव्या शतकात पाश्चात्त्यांचे कलासंकेत भारतात रूढ झाले; त्याचाही अप्रत्यक्ष परिणाम लघुचित्रनिर्मितीवर झाला. लघुचित्रणाच्या या शेवटच्या पर्वात काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्वतःची लघुचित्रशैलींतील चित्रे रंगवून घेतली. तद्वतच इंग्रज चित्रकारांनी भारतीय नबाब व संस्थानिक यांची जी तैलचित्रे केली, त्यांचीही नक्कल करण्याचा प्रयत्न लघुचित्रशैलींतील चित्रकारांनी केला. परिणामी लघुचित्रणाचे सत्त्व लोपली जाऊन ब्रिटिश अमदानीत ही कला ऱ्हासाला लागली. मात्र राजस्थानातील नाथद्वारसारख्या काही अपवादात्मक ठिकाणी धार्मिक आशयापुरते लघुचित्रण करणारे कलावंत आजही आहेत. इतर सरंजामी चित्रशैलींपासून नाथद्वार शैली अलिप्त असल्यामुळे आणि लोकशैलीतून तिचा उद्गम झालेला असल्यामुळे इतर शैलीतून ही शैली अगदी वेगळी आणि धर्मभावुक दिसते.

शतकानुशतके निर्माण झालेली ही विपुल चित्ररचना म्हणजे भारताच्या संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. भारतीय लघुचित्रांचे संग्रह भारतातील प्रायः सर्वच संग्रहालयांत आहेत. जयपूर, उदयपूर इ. ठिकाणच्या राजप्रासादांतील संग्रह वाखणण्यासारखे आहेत. ‘नॅशनल म्यूझियम’, नवी दिल्ली; ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम’, 'मुंबई आणि रामकृष्णदास संग्रहालय’, बनारस येथे अनेक दुर्मिळ लघुचित्रे आहेत. अनेक अप्रतिम भारतीय लघुचित्रे ‘इंडिया ऑफिस’, 'ब्रिटिश म्यूझियम’, ‘बॉस्टन म्यूझियम' इ. परदेशी संग्रहालयांत पहावयास मिळतात.

लेखक : १) वसंत परब

२) संभाजी कदम

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate