অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लूव्ह्‌र

लूव्ह्‌र

फ्रान्समधील पॅरिस या राजधानीच्या शहरातील लूव्ह्‌र हे राष्ट्रीय कला वस्तुसंग्रहालय त्यातील अगणित सुंदर वस्तू व ऐतिहासिक महत्त्वाच्या कलाकृती यांसाठी आज सर्व जगभर प्रसिद्ध आहे. इतिहास व संस्कृती यांच्या दृष्टीने यांतील संग्रह अनमोल असाच आहे. याची मूळ वास्तू सु. ११९० मध्ये फिलिप दुसरा ऑगस्टस याने बांधली. ती एखाद्या प्रचंड किल्ल्याप्रमाणे होती. या ठिकाणी राजभांडार, जडजवाहीर, चिलखते, हत्यारे व महत्त्वाची धार्मिक सुनिदर्शित हस्तलिखिते सुरक्षिततेसाठी ठेवली जात असत. १४०० च्या सुमारास फ्रान्सचे राजकुटुंब येथे राहू लागले. याच काळात ही इमारत वाढविली गेली. विशेषतः पाचवा चार्लस् याच्या कारकीर्दीत या इमारतीची सजावट विशेष लक्ष देऊन केली गेली व याच काळात येथे ‘बिब्लिओथेक नॅशनेल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, सुनिदर्शित हस्तलिखितांच्या संग्रहाची स्थापना झाली.

पहिल्या फ्रान्सिसने मूळ जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन भव्य राजप्रासाद १५४६ मध्ये बांधला. या काळात इटलीच्या लहान लहान राज्यांतील राजपुत्रांनी कलावस्तू व इतर कारागिरीच्या वस्तू यांचा संग्रह करण्याची आवड विशेषत्वाने जोपासलेली होती. त्याच धर्तीवर फ्रान्सच्या या बादशहानेही लूव्ह्‌रमधील सर्व संग्रह शिस्तबद्धपणे वाढविला व प्रबोधनकाळातील लिओनार्दो दा व्हींची, आंद्रेआ देल सार्तो, प्रीमातीत्वो, चेल्लीनी यांसारख्या थोर कलाकारांच्या कलाकृतींची त्यात भर टाकली. त्याच्या स्वतःच्या संग्रहातील èमोनालिसा हे लिओनार्दो दा व्हींचीचे जगद्विख्यात चित्र आज लूव्ह्‌र संग्रहालयाचे भूषण ठरले आहे. सोळाव्या शतकात जुन्या किल्ल्याच्या इमारतीच्या जागी पाच दालनांच्या पंक्ती असलेला राजवाडा बांधण्याचे काम सुरू झाले. प्येअर लेस्को या वास्तुशिल्पज्ञाने यातील पश्र्चिमेकडील व दक्षिणेकडील बाजू पूर्ण केली, झां गूजाँ या शिल्पकाराने त्याची शिल्प सजावट केली.

तसेच लेस्कोने ‘पेटिट गॅलरी’ बांधण्याची सुरुवातही केली. पुढे अनेक वास्तुशिल्पज्ञांनी वेगवेगळ्या कालखंडांत या इमारतीचे वेगवेगळे भाग बांधले. सोळाव्या शतकातील कॅथरिन दी मेदीची हिच्यासाठी फीलीबेअर दलॉर्म या वास्तुशिल्पज्ञाने त्वीलरी येथे निवासवास्तू उभारण्यास सुरुवात केली (१५६४). हा भाग लूव्ह्‌रच्या मुख्य इमारतीला लांब गॅलरीद्वारे जोडण्याची तिची कल्पना होती. मात्र त्याची प्रत्यक्ष सुरुवात-म्हणजेच ‘ग्रॅन्ड गॅलरी’ च्या प्रत्यक्ष बांधकामाची सुरुवात-चौथ्या हेन्रीच्या काळात झाली. सतराव्या शतकात हिच्या सजावटीचे काम पूसँ या चित्रकाराने केले. लूव्ह्‌र-वास्तूचे बांधकाम १५४६ ते १८७८ या तीन शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत टप्प्याटप्प्याने चालू होते; त्यात नवनवीन भर घातली जात होती. वास्तुशिल्पदृष्ट्या हा भव्य प्रासाद ही श्रेष्ठ दर्जाची निर्मिती मानली जाते.

चौदाव्या लूईच्या काळात कॉलबेअर या त्याच्या मंत्र्याने या संग्रहात जवळजवळ दोन हजार महत्त्वाच्या चित्रांची भर टाकली. ही चित्रे कार्डिनल माझारँ याच्या ख्यातनाम संग्रहातील होती. यानंतर जर्मन बँकर एव्ह्रार याबाख याच्या संग्रहातील सुंदर रेखाचित्रांची व रंगचित्रांची त्यात भर पडली. सतराव्या शतकात या संग्रहातील काही भाग जनतेला पहाण्यास खुला केला गेला. नवीन कला अकादमीही स्थापन झाली व तिची कलाप्रदर्शने या जागेत नियमित भरू लागली. कॉलबेअरने लूव्ह्‌रचे काम पूर्ण करण्यासाठी त्या काळातील महान इटालियन वास्तुशिल्पकार बेर्नीनी याला पाचारण केले. त्याने सादर केलेल्या नमुन्याप्रमाणे हे काम सुरू झाले; तथापि बेर्नीनी परत गेल्यावर ते थंडावले. मात्र ल्वी ल व्हो आणि क्लोद पेरो या वास्तुशिल्पज्ञांनी लूव्ह्‌रच्या पूर्वेकडील दर्शनी भागाची अप्रतिम रचना केली (१६६७-७०). त्यातील स्तंभावलीमध्ये अभिजात वास्तुघटकांचा विशुद्ध आविष्कार पाहावयास मिळतो. चार्लस् ल ब्रं याने त्याची चित्रसजावट केली. तिसऱ्या नेपोलियनच्या काळात यातील बराचसा भाग पूर्ण झाला.

लूव्ह्‌रच्या सार्वजनिक कलावस्तुसंग्रहालय म्हणून वापर करण्याच्या कल्पनेस अठराव्या शतकात खरी चालना मिळाली. क्रांतिकाळात १७९३ मध्ये लूव्ह्‌रचे शासकीय कलासंग्रहालयात रूपांतर करण्यात आले. पहिल्या नेपोलियनने लोकशाहीच्या प्रेमामुळे लूव्ह्‌र हे संग्रहालय लोकांना पाहण्यास संपूर्ण खुले केले. नेपोलियनने जिंकलेल्या राष्ट्रांकडून खंडणी म्हणून आणलेल्या कलाकृती येथे ठेवल्या. मात्र त्याच्या पराभवानंतर ही चित्रे पुन्हा त्या त्या राष्ट्रांना परत दिली गेली. यांपैकी फक्त व्हिक्टरी ऑफ सॅमोश्रेस आणि व्हीनस दी मिलो या प्रख्यात ग्रीक कलाकृती मात्र लूव्ह्‌रमध्येच राहिल्या. नंतरच्या काळातही अनेक महत्त्वाच्या कलाकृतींची त्यात भर पडली. त्यात लक्सेंबर्ग राजवाड्यातील काही कलाकृती व आधुनिक दृक्प्रत्ययवादी चित्रकारांची महत्त्वाची चित्रे यांचा समावेश आहे.आज या अफाट कलासंग्रहामुळे लूव्ह्‌र संग्रहालय पाहण्यासाठी कलेच्या इतिहासाचे अभ्यासक, कलाकार व रसिक पर्यटक यांची गर्दी येथे होत असते. अभ्यासू कलाविद्यार्थी थोर चित्रकारांच्या मूळ चित्रांवरून त्यांच्या हुबेहूब प्रतिकृती करून तंत्रशैलीचा अभ्यास करतात. लूव्ह्‌रमध्ये अशा प्रतिकृती रंगविण्याची परवानगी देण्यात येते.

संदर्भ : Great Museums of the World Series, Louvre Paris, London, 1969.

लेखिका :  नलिनी भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate