অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लॉरी बेकर - एक अभिजात वास्तुशिल्पकार

लॉरी बेकर - एक अभिजात वास्तुशिल्पकार

निसर्गाची हेळसांड न करता, एखादी वास्तू तयार करणे हे खरे कौशल्य असते. अशा पर्यावरणस्नेही वास्तू निर्माण करणारे एक नाव म्हणजे ‘लॉरी बेकर.’ त्यांच्या कार्याचे स्मरण करण्याला निमित्तही तसेच आहे.

2 मार्च रोजी लॉरी बेकर यांची शंभरावी जयंती झाली. हवा खेळती राहील आणि पुरेसा उजेड येईल अशी वास्तूंची बांधणी उत्कृष्ट नक्षीकामासह, आणि तीही अल्पखर्चात करणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. उपलब्ध जागेचा उत्कृष्ट आणि सुयोग्य वापर, घरबांधणीतील साधेपणातच लपलेले सौंदर्य आणि तरीही इतर घरांच्या तुलनेत स्वस्त अशीच ओळख त्यांनी निर्माण केलेल्या घरांची होती.

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून आणि हिमाचलमधल्या दुर्गम भागातल्या अनुभवांतून त्यांनी बांधकामासाठी जास्तीतजास्त स्थानिक सामग्री वापरण्याचा नियमच घालून दिला होता. परिसराशी एकरूप होऊ शकणारे स्वस्त आणि सुंदर असे ‘वास्तुशिल्पकलेचे शाश्वत’ नमुने निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. 1950 नंतरच्या काळात त्यांनी पर्जन्यजलसंवर्धन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), ऊर्जाबचत आणि बांधकामाच्या ठिकाणी निसर्गाचे कमीतकमी नुकसान होईल अशा प्रकारच्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या. त्यांच्या ठायी असलेला सामाजिक दृष्टिकोन, सामग्रीचा सुयोग्य आणि प्रामाणिक वापर, वास्तुमधला साधेपणा आणि अहिंसेवर असलेला ठाम विश्वास यांमुळे त्यांना ‘वास्तुकलेमधील गांधी’ म्हटले गेले.

2 मार्च, 1917 रोजी इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथे जन्मलेले लॉरी बेकर 1945 साली कुष्ठरोग-निर्मूलनाच्या कार्यासाठी पहिल्यांदा भारतात आले आणि पुढील 50 वर्षे भारतातच वास्तव्य करून त्यांनी वास्तुकलांचे अद्भुत नमुने सादर केले. ‘सेंटर फॉर सायन्स टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट’चे संचालक म्हणून त्यांनी कार्य केले.

‘पद्मश्री’ आणि ‘मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. सामान्य माणसाला किफायतशीर घर उपलब्ध करून देणे आणि ते तितकेच सुंदर आणि मजबूत व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न होता. पर्फोरेटेड ब्रिक स्क्रीन, पिरॅमिड स्ट्रक्चर ही त्यांच्या वास्तुकलेची वैशिष्ट्ये होत. घसरते छत आणि टेराकोटा मंगलोर टाइल्स, वर्तुळाकार भिंती आणि सोबतीला उंचीवर व्हेन्ट (हवा खेळती राहण्यासाठी भिंतीत राखलेली छिद्रे) असे अनेक प्रयोग त्यांनी वास्तुनिर्मितीत केले; ज्यांमुळे उष्णता कमी करता येईल.

‘चित्रलेखा फिल्म स्टुडिओ’ आकुलम, ‘लिटरसी व्हिलेज’ लखनौ, ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’ त्रिवेंद्रम, ‘द इंडिअन कॉफी हाउस’ त्रिवेंद्रम, ‘साकोन’ कोइम्बतूर अशा वास्तू बेकर यांनी निर्माण केल्या.

जागतिकीकरण, शहरीकरण, स्पर्धा, प्रगती, स्मार्ट सिटी अशा विकासाच्या परिभाषांचा विचार लॉरींच्या दृष्टिकोनातून करण्याची गरज आज आहे असे वाटते. लोकसंख्या आणि घरांचे भावही दिवसेंदिवस वाढत असताना समाजातल्या ‘बॉटम ऑफ द पिरॅमिड’पर्यंतच्या माणसांना मूलभूत गरज असलेले छत कधी आणि कसे मिळणार हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. लॉरी बेकर यांनी उभारलेल्या वास्तू आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. बदलते हवामान, जागतिक तापमानवाढ, एल निनो अशा अनेक पर्यावरणीय समस्यांचा अंदाज कदाचित लॉरींना खूप पूर्वी आला होता. त्यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने का होईना, त्यांच्या या कार्याचा पुनश्च विचार करणे ही काळाची गरज आहे.

लेखक: रंजन पांढरे (सिव्हिल इंजिनिअर), बाएफ, पुणे संपर्क : 9405535435

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate